डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. १३
©अनुप्रिया
©अनुप्रिया
रात्रीच्या त्रासामुळे स्वराज आणि नंदिनी नीट झोपले नव्हते. पहाटे कधीतरी त्यांचा डोळा लागला. सकाळी सहाच्या दरम्यान पाखरांच्या किलबिलाटाने नंदिनीला जाग आली. ती उठून बसली. अंगावरचे दागिने काढून तिने ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवले.
“एका दिवसापुरतीच या दागिन्यांची माझ्या अंगावर जागा होती म्हणायची तर!”
कालचा प्रसंग आठवला आणि तिचा राग अजूनच उफाळून आला. ब्लँकेटची घडी घालून ठेवली. पलंगावरील बेडशीट ठीक करत असताना तिची नजर सोफ्यावर झोपलेल्या स्वराजकडे गेली. तो अवघडलेल्या अवस्थेत सोफ्यावर झोपला होता.
“याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून वाटत नाही, हा इतका दृष्ट असेल.. किती शांतपणे झोपलाय बघा, जसं काही घडलंच नाही.”
त्याच्याकडे रागाने पाहत ती पुटपुटली. फ्रेश होण्यासाठी नंदिनी बाथरूममध्ये गेली. बाथरूममधल्या आरश्यात स्वतःचं नव्या नवेली नवरीचं रूप पाहून सुरुवातीला तिचं तिलाच कौतुक वाटलं खरं; पण नंतर स्वराजचं बोलणं आठवल्यावर जीव कासावीस झाला. ती फ्रेश होऊन बाहेर आली. गुलाबी रंगाची स्वच्छ नीट कॉटन सिल्कची साडी नेसली. ओले केस टॉवेलने झटकत असताना त्याचे तुषार स्वराजच्या तोंडावर पडल्याने झोपेत त्याची थोडी हालचाल जाणवली. त्याला जाग येत होती.
“कॉफी… कॉफी..”
तो झोपेतच पुटपुटला. नंतर त्याला तिची आठवण झाली असावी डोळे किलकिले करून त्याने नंदिनीकडे पाहिलं. ती तयारी करत होती. त्याला जागं झालेलं पाहून ती तिरप्या नजरेने पाहत म्हणाली,
“मी आताच्या आता माधवकाकांशी बोलणार आहे? ते माझ्याशी असं का वागले? इतका खोटेपणा का केला ते मला माझ्या समजलंच पाहिजे.”
तो काहीच बोलला नाही किंबहुना त्याला बोलायचं नव्हतं. चैतन्यला हाताशी धरून त्यांनी आपल्याच मुलाला फसवलं होतं. त्यालाही त्याचं उत्तर हवं होतं. नंदिनी त्यांच्या खोलीतून उठून बाहेर आली. घरात लग्नानंतरची लगबग सुरू होती. स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता. कोणाकोणाचा चहा, नाष्टा सुरू होता. अंगणात पाहुण्यांची ये-जा होती. स्वराली अंगणात रांगोळी काढत होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर औपचारिक हसू होतं पण नंदिनीच्या मनात काल रात्रीची एकही गोष्ट शांत बसू देत नव्हती. ती चहाचा ट्रे घेऊन हळूहळू दिवाणखान्यात आली.
माधवराव हॉलमध्ये वर्तमानपत्र वाचत बसले होते. नेहमीसारखेच शांत, संयत जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात ते वागत होते. नंदिनीच्या हातात चहाचा ट्रे होता. पावलं जड झाली होती, पण मनाने ती ठाम होती. तिने ट्रे टेबलावर ठेवला.
“माधवकाका…”
नंदिनीचा आवाज शांत होता; पण त्या शांततेतही हृदय चिरून टाकणारी धार होती.
माधवरावांनी वर पाहिलं.
“हो बाळा… काही हवंय का?”
तो आवाज नेहमी जसा मायेचा वाटायचा तसा आज तिला वाटला नाही. बनावटीपणाची झलक जाणवत होती.
“मला तुमच्याशी दोन मिनिटं एकांतात बोलायचं आहे.”
नंदिनीच्या त्या एका वाक्याने माधवराव थोडेसे दचकले. तरीही त्यांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि म्हणाले,
“बरं, बोल नंदिनी..”
नंदिनी समोर उभी राहिली. तिने एक खोल श्वास घेतला. थेट त्यांच्या नजरेला नजर भिडवत नंदिनीने प्रश्न विचारला.
“लग्नाआधी ज्या दिवशी माझ्या घरी फोन आला होता, त्या दिवशी फोनवर स्वराज बोलत नव्हता बरोबर ना?”
क्षणभर माधवराव गप्प झाले.
“हे काय नवीन प्रश्न आहेत सकाळी सकाळी?”
ते थोडं चिडून म्हणाले.
“नवीन नाहीत काका, पण उशिरा विचारलेले आहेत.”
नंदिनीचा स्वर थरथरला नाही.
“नंदिनी, काही गोष्टी मोठ्यांच्या निर्णयावर सोडाव्या लागतात.”
माधवरावांचा आवाज शांत होता; पण त्यात पश्चातापाचा लवलेशही नव्हता. हॉलमध्ये दाट शांतता पसरली.
“तो आवाज चैतन्यचा होता. तुम्हीच त्याला स्वराज म्हणून बोलायला सांगितलं आणि माझ्याकडून लग्नाचा होकार मिळवलात. आणि हे सगळं त्याने तुमच्या सांगण्यावरून केलं. हे खरं आहे ना?”
तिच्या प्रश्नावर माधवरावांचा चेहरा उग्र झाला.
“स्वराज हट्टी आहे. तो लग्नाला नकार देत होता. मग आम्ही काय करायचं होतं? हो.. केलं आम्ही. कारण आम्ही त्याचे वडील आहोत.. त्याचं भलं झालेलं आम्हाला हवं होतं आणि आमच्या मुलाचं भलं आम्हालाच कळतं.”
माधवराव स्वतःच्या वागण्याचं समर्थन करत म्हणाले. नंदिनीच्या डोळ्यांत पाणी दाटलं; पण आवाज अजून ठाम होता.
“मग माझं भलं? माझं आयुष्य ठरवताना मला एक शब्दही विचारायचं कर्तव्य नव्हतं का? खोट्या माणसाच्या आवाजावर विश्वास ठेवून मी होकार दिला. हे तुम्हाला योग्य वाटतं?”
“या लग्नाने तुझं भलंच झालं आहे नंदिनी.. तुला स्वराजचं नाव माहीत होतं. घराणं माहीत होतं. आमचा मुलगा चांगला आहे हेही तुला माहित होतं.”
माधवरावांचा आवाज कडक झाला. माधवराव जागेवरून उठले आणि खिडकीपाशी उभं राहून बाहेर पाहू लागले.
“तुमचा मुलगा चांगला आहे यात काहीच दुमत नाही; पण त्याचं लग्न करण्यासाठी तुम्ही निवडलेला मार्ग चुकीचा आहे. तुमच्या मुलाच्या हितासाठी तुम्ही माझ्याशी खोटं बोलायचं? माझ्या विश्वासाचा गैरफायदा घ्यायचा? असं आहे का? एका खोट्या कॉलवरून मी लग्नात बसले. बोहल्यावर चढले. समाजासमोर मान खाली घालून उभी राहिले. आणि हे फक्त तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे झालंय.”
थोड पुढे येऊन नंदिनी थेट त्यांच्याकडे पाहत म्हणाली.
“लग्न म्हणजे सौदा नाही काका.. आणि सून म्हणजे घराची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी वापरायची गोष्ट नाही.”
ते उठून उभे राहिले. संतापाने त्यांचं सर्वांग थरथरू लागलं.
“आता तुमचं लग्न झालंय नंदिनी.. मागच्या सर्व गोष्टी विसरून पुढे जा.. आता तू आमच्या घरची सून आहेस.”
नंदिनीने मान ताठ करत म्हणाली,
“विसरणं इतकं सोप्पं असतं काका, तर सत्य लपवण्याची गरजच पडली नसती. आणि हो… मी या घरच्या सून आहे. पण फसवणूक सहन करून गप्प बसणारी मुलगी नाही.”
त्या एका वाक्याने वातावरण अजूनच गरम झालं. नंदिनी तिच्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीला उलट बोलत होती.
“मी इथे तमाशा करायला आलेली नाही. फक्त एवढंच सांगायला आलेय, हे लग्न खोट्यावर उभं आहे. आणि या खोट्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल.”
माधवराव पहिल्यांदाच अस्वस्थ झाले.
“नंदिनी, काय करायचा विचार आहे तुझा?”
ती थांबली. मागे वळून पाहिलं.
“तो वेळ येईल… तेव्हा तुम्हालाच कळेल.”
माधवराव काही बोलणार इतक्यात स्वराज तिथे आला. त्याने त्या दोघांचं बोलणं ऐकलं होतं. त्याच्याकडे पाहून वळत म्हणाली,
“माझा संघर्ष कुणाशी आहे हे मला स्पष्ट झालंय. आता पुढचा निर्णय मी माझा घेईन.”
ती तिथून निघून गेली. माधवराव स्तब्धपणे तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभे राहिले. तिची नजर शब्दांपेक्षा जास्त बोलत होती. स्वराजला पहिल्यांदाच जाणवलं,
“नंदिनी कमजोर नाही., ती अन्यायाविरुद्ध उभी राहणारी शक्तीशाली स्त्री आहे. आता ती पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.”
स्वराज विचारात पडला.
क्रमशः
©अनुप्रिया
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा