डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. १५
©अनुप्रिया
©अनुप्रिया
गुरुजींनी ‘वधूला आणा’ म्हणून सांगताच घरात एकच खळबळ माजली. कारण वृंदा आणि तिचे नातेवाईक अजून लग्न मंडपात पोहचले नव्हते. माधवराव दरवाज्याकडे नजर लावून उभे राहिले. मनात कुठेतरी धाकधूक होती, पण ती त्यांनी स्वतःपासूनच लपवण्याचा अतोनात प्रयत्न केला. कारण त्यांची भीती प्रतापला समजली तर तो बिथरेल याची त्यांना कल्पना होती. संयम बाळगण्यापलीकडे त्यांच्याकडे दुसरा मार्ग नव्हता.
“अहो, एवढा उशीर का होतोय?”
मंडपात बसलेलं कोणीतरी कुजबुजलं.
शालिनीताईंच्या चेहऱ्यावरही काळजीची रेषा उमटली. त्यांनी फोन हातात घेतला.
“वृंदाच्या मावशींचा नंबर लागत नाहीये.”
त्या हळूच म्हणाल्या. मुहूर्ताची वेळ जवळ येत होती. गुरुजींनी पुन्हा एकदा आठवण करून दिली.
“वेळ निघून चाललीय.. वधूला लवकर आणा.”
माधवरावांच्या काळजाचा ठोका चुकला.
“मी बघतो.”
असं म्हणून ते झपाट्याने शेजारच्या खोलीत असलेल्या प्रतापकडे गेले. आता त्याच्याकडे जाण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हतं. सरपोतदार घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. लग्नमंडपात नवरी मुलगी हजर राहिली नाही तर साऱ्या पंचक्रोशीत बदनामी होईल याचीच त्यांना धास्ती होती. माधवराव खोलीत आले. प्रताप तयारी करत होता. क्रीम रंगाची शेरवानी त्याला खूपच छान दिसत होती. तो फार खुश होता. माधवरावांना खोलीत पाहून तो पटकन मागे वळून म्हणाला,
“अरे दादा.. ये ना.. काय झालं, काय हवं होतं का?”
त्यांना काय बोलावं ते समजत नव्हतं. शब्दांची जुळवाजुळव करत त्यांनी प्रतापला विचारलं,
“प्रताप, ते वृंदा.. मुलीकडची मंडळी अजून आली नाहीत. मुहूर्ताची वेळ झालीय. तुझा काही फोन वगैरे?”
“अरे येईल ती.. तुला तर माहीतच असेल, या मुलींना तयार व्हायला किती वेळ लागतो ते! आणि आज तर तिचं स्वतःचंच लग्न म्हटल्यावर किती नटायचं असेल याची कल्पना कर फक्त.. येईल ती.. तू काळजी करू नकोस.”
प्रताप हसून म्हणाला.
“तू एकदा तिला फोन करून पाहतोस का? कुठवर आलीय ते तरी समजेल.”
माधवराव चिंतीत होऊन म्हणाले.
“तशी मला गरज वाटत नाही. मला माहितीये ती येईलच; पण तरीही तू म्हणतोस म्हणून तुझ्या समाधानासाठी मी तिला कॉल करतो.”
असं म्हणत प्रतापने खिशातून मोबाईल काढला आणि वृंदाला फोन लावला. नुसतीच रिंग होत होती. त्याने पुन्हा पुन्हा कॉल्स केले पण तरीही ती कॉल घेत नव्हती.
“उचलत नाहीये..”
तो अस्वस्थ होऊन म्हणाला. आता मात्र प्रतापला काळजी वाटू लागली. इतका उशीर झाला तरी अजून वृंदाचा तपास नव्हता. लग्नघटिकाही टळून गेली होती. माधवराव काळजीत पडले. तेवढ्यात दारात एक माणूस धापा टाकत आला. कपाळावर घाम, चेहऱ्यावर गोंधळ पसरलेला होता.
“माधवराव… एक मिनिट.”
“काय झालं?”
त्यांचा आवाज नकळत थरथरला.
“वृंदा… वृंदा घरातून निघून गेलीय.”
क्षणभर सारं जग जागीच थांबल्यासारखं वाटलं. त्या माणसाच्या बोलण्यावर काय बोलावं हे माधवरावांना सुचेना. कानात फक्त एकच आवाज घुमत राहिला.
“वृंदा निघून गेलीय.”
“काय अर्थ आहे याचा?”
शालिनीताईंनी घाबरून पुढे येत विचारलं.
“लग्न होणार नाही असं तिनं सांगितलंय. तुमच्यासाठी एक चिठ्ठी ठेवून गेलीय. हे पहा..”
त्या माणसाने आपल्या हातातली घडी घातलेली एक चिठ्ठी पुढे केली. थरथरत्या हातांनी माधवरावांनी ती उघडली.
‘प्रताप, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. पण तुझ्यासाठी, तुझ्या घरासाठी मला स्वतःला हरवायचं नाही. माझ्या अस्तित्वाची किंमत इथे कधीच समजली जाणार नाही, हे मला जाणवलंय. मी तुला सोडून जातेय.. आशा करते तू मला समजून घेशील आणि मला माफ करशील.’
माधवरावांच्या हातातून चिठ्ठी गळून खाली पडली.
“दादा, काय झालं रे?”
असं विचारत प्रताप धावत पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद एका क्षणात पुसला गेला होता.
“वृंदा, कुठे आहे वृंदा?”
तो वेड्यासारखा इकडे-तिकडे पाहू लागला. माधवरावांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यांच्या डोळ्यांसमोर प्रतापच्या अंधारलेल्या भविष्याचं चित्र उभं राहिलं होतं. प्रतापने खाली पडलेली चिठ्ठी उचलली. आणि वाचता वाचता त्याचे डोळे भरून आले. दीर्घ श्वास घेत तो निराशपणे म्हणाला,
“दादा, तुम्हीच तिला घाबरवलंत ना? तिला सांगितलं ना, की ती या घरासाठी योग्य नाही?”
त्याचा आवाज तुटला होता.
“नाही… आम्ही असं का सांगू? तसं असतं तर आम्ही लग्नाला तयार झालो असतो का?”
माधवराव पोटतिडकीने सांगत होतें.
“मग का ती मला सोडून गेली? ती योग्य नाही असंच तुम्हाला वाटत होतं आणि तेच तुम्ही तिला दाखवत आलात. त्यालाच वास्तव समजून ती निघून गेली. हेच वास्तव तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होतं!”
असं म्हणून प्रताप कोणालाही न सांगता, कोणाशीही न बोलता तिथून निघून गेला. लग्नमंडपात गुरुजी मंत्र थांबवून बसले होते. नातेवाईकांमध्ये कुजबुज सुरू झाली.
आणि माधवराव? ते त्या रिकाम्या मंडपाकडे पाहत उभे राहिले. त्या दिवशी त्यांनी पहिल्यांदाच जवळून पाहिलं होतं, ‘प्रेम तुटल्यावर माणूस कसा एकटाच उरतो ते.’
आणि माधवराव? ते त्या रिकाम्या मंडपाकडे पाहत उभे राहिले. त्या दिवशी त्यांनी पहिल्यांदाच जवळून पाहिलं होतं, ‘प्रेम तुटल्यावर माणूस कसा एकटाच उरतो ते.’
डोळे उघडले तेव्हा वर्तमानात परत आले. त्यांच्या डोळे पाणावले होते. वृंदा दागिने, उंची कपडे शिवाय तिला आणण्यासाठी पाठवलेली कारसुद्धा तिने सोडली नव्हती. गोड बोलून तिने प्रतापला चांगलंच लुबाडलं होतं. लग्न मोडलं होतं. तो त्याच्या खोलीत निघून गेला पण पुन्हा बाहेर आलाच नाही. दुसऱ्या दिवशीही प्रतापने दार उघडलं नाही. आई, आप्पा, माधवराव, शालिनीताई, घरातली नोकर माणसं सर्वांनी दार ठोठावलं पण सगळं व्यर्थ! दरवाजा उघडला नाही. तेव्हा मात्र सगळेच घाबरले. दार तोडून आत गेले. समोरचं दृश्य पाहून तर धाबेच दणाणले. प्रताप लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. आठवणींच्या गर्तेतून बाहेर पडताना सारा भूतकाळ ढवळून निघाला होता.
“प्रतापला वाटलं, की वृंदा आमच्यामुळे त्याला सोडून गेली. पण ते तसं नव्हतं. मुळात ती मुलगीच चांगली, घरंदाज नव्हती. ती लबाड, लालची होती म्हणून सगळं घबाड घेऊन पसार झाली. त्याने आमच्यावर अविश्वास दाखवला आणि स्वतःचा जीव गमावला.”
माधवराव स्वतःशीच पुटपुटले. त्यांनी अवतीभवती पाहिलं, नंदिनी तिथून निघून तिच्या खोलीत गेली होती. स्वराजही निघून गेला होता. माधवरावांच्या ओठांवर एकच वाक्य तरळत होतं.
“त्या दिवशी प्रतापला वाचवण्याच्या नादात आज आम्ही स्वराजलाही त्याच दरीत ढकलतोय का?”
क्रमशः
©अनुप्रिया
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा