Login

तुम दे ना साथ मेरा.. १६

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी प्रेमकहाणी..
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. १६
©अनुप्रिया


माधवराव विचारात गढून गेले. लग्नघर म्हटल्यावर अजून जवळचे काही नातेवाईक थांबले होते. लग्नानंतरच्या विधी करण्यासाठी लगबग सुरू होती. घरात वर्दळ, गजबज होती; पण स्वराज, नंदिनी आणि माधवराव या तिघांच्या मनात कल्लोळ माजला होता. माधवराव आपल्या खोलीत एकटेच बसले होते. त्यांना काहीतरी आठवलं. ते खुर्चीतून उठले आणि कपाट उघडून आत ठेवलेली जुनी फाइल त्यांनी उघडली. प्रतापचा फोटो त्यातून बाहेर डोकावला. क्षणभर हात थबकले.

“तू अजूनही इथेच आहेस रे… इतकी वर्षं झाली, पण मनातून गेलासच नाहीस.”

ते स्वतःशीच पुटपुटले. डोळे मिटताच आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. तो लग्नमंडप, ती चिठ्ठी, आणि दार तोडून आत शिरल्यावर दिसलेलं ते दृश्य… अंगावर काटा आला.

“मी काही चुकीचं केलं होतं का, प्रताप? घर सांभाळणं, प्रतिष्ठा जपणं… एवढंच तर बघत होतो. पण तुझ्या प्रेमाचं ओझं मला कधी समजलंच नाही.”

ते खुर्चीत मागे टेकले.

“वृंदा…ती खरंच लबाड होती का? की आम्हीच तिला आमच्यापासून दूर ढकललं?”

क्षणभर ते गप्प झाले. स्वतःलाच उत्तर देण्याची त्यांची तयारी नव्हती.

“नाही… नाही… ती घरंदाज नव्हतीच. तीच चुकीची होती.
असं नाही मानलं, तर मी स्वतःला कसं माफ करू?”

त्यांनी स्वतःशीच वाद सुरू झाला. तेवढ्यात बाहेरून हसण्याचा हलकासा आवाज आला. बाहेर स्वराली आणि तिच्या मैत्रिणी हसत खिदळत होत्या आणि स्वराज त्यांच्या घोळक्यात बसला होता. सर्वजणी त्याची चेष्टा करत होत्या. माधवराव क्षणभर थांबले.

“स्वराज…”

त्यांच्या ओठांवर नाव आलं.

“हा मुलगा तरी मजबूत आहे ना? की प्रतापसारखाच… जास्तच हळवा?”

त्यांच्या कपाळावर आठी पडली. ते पुन्हा विचारात पडले.

“नंदिनी चांगली आहे. सुशील आहे. घरात रमतेय. आज सगळं नीट चाललंय; पण तेव्हाही तर सगळं नीट चालेल असंच वाटत होतं. मग असं का घडलं?”

पुन्हा त्यांच्या जीवाचा थरकाप उडाला.

“आपण पुन्हा तेच करतोय का?आपल्या भीतीच्या सावलीत दुसऱ्याचं आयुष्य गुदमरवत तर नाही ना?”

खोलीतल्या भिंतीकडे पाहत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक कटू, थकलेलं हसू उमटलं.

“नाही…यावेळी मी चुकणार नाही. मी गप्प राहीन. काहीही हस्तक्षेप करणार नाही.”

पण मनाच्या एका कोपऱ्यातून पुन्हा आवाज आला.

गप्प राहणंही कधी कधी अपराधच असतं, माधवराव…’

माधवरावांनी डोळे उघडले. घड्याळात दोन वाजले होते. हातातला प्रतापचा फोटो त्यांनी अलगद फाइलमध्ये ठेवला.

तू केलेली चूक मी परत होऊ देणार नाही असं स्वतःलाच सांगतोय; पण इतिहास नेहमी माणसाची परीक्षा घेतो रे…”

ते उठून उभे राहिले. दार उघडून बाहेर पाहिलं. घर तसंच शांत होतं. नवी नवरी, नवं नातं, नवं आयुष्य सगळं सुरळीत दिसत होतं; पण माधवरावांना माहीत होतं.

वादळ येण्याआधी शांतताच जास्त भयंकर असते.’

इकडे नंदिनी माधवरावांची बोलून रागाने पावलं टाकत तिच्या खोलीच्या दिशेने निघाली. डोळ्यातलं पाणी थोपवून ठेवण्याचा तिने खूप प्रयत्न केलं; पण अखेर त्यांनी पापण्यांचा उंबरठा ओलांडलाच.

“आता नाही थांबायचं. एक मिनिटही नाही..”

ती स्वतःलाच बजावत जिना उतरायला वळली. तेवढ्यात समोरून शालिनीताई आल्या.

“नंदिनी…”

तो आवाज ऐकताच ती पावलं थबकली. नकळत मान खाली गेली.

“कुठे चाललीस बाळ?”

त्या हळूवारपणे विचारत होत्या. आवाजात प्रश्न नव्हता, काळजी होती. नंदिनी काहीच बोलली नाही. ओठ थरथरत होते. ती पुढे जायला वळली; पण शालिनीताईंनी तिचा हात धरला. तो स्पर्श इतका मऊ, इतका आपुलकीचा होता की तिला आतून बांध फुटल्यासारखं झालं.

“काय झालं गं? स्वराजशी काही बोलणं झालं का?”

एवढं ऐकताच नंदिनीचा संयम सुटला.

“मला… मला इथे राहायचं नाहीये.”

ती शब्द शोधत होती.

“मी चुकीची आहे का हे मला माहीत नाही; पण इथे माझा जीव गुदमरतोय. नको वाटतंय सगळं.”

नंदिनी हमसून हमसून रडू लागली. काल रात्रीपासून साठलेलं सगळं त्या अश्रूंमधून बाहेर पडत होतं. शालिनीताईंना गलबलून आलं. त्यांनी पटकन पुढे येऊन नंदिनीला घट्ट मिठी मारली.

“रड बाळ, रडून घे.. मी तुझ्या मनाची अवस्था समजू शकते. नवी माणसं, नवं घर.. हे सगळं एकदम अंगावर आलं की रडू कोसळणारच ना? आणि रडल्याशिवाय मन तरी कसं हलकं होणार?”

शालिनीताई मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या. जसं एखादी आई आपल्या मुलीला समजावत असावी. त्यांच्या गोंजारण्याने ती अजूनच हळवी झाली.

“नंदिनी, तुमचं लग्नाच्या आदल्या दिवशी मला एक मेजर हार्ट अटॅक येऊन गेलाय. कोण जाणे मी किती दिवसांची सोबतीण आहे!”

त्या उदासपणे हसून म्हणाल्या. बोलतानाही त्यांना धाप लागत होती. तरी श्वास आवरत त्या म्हणाल्या,

“बाळ नंदिनी, आम्ही आता म्हातारे झालोत. पिकलं पान.. कधी गळून पडेल ते सांगता येत नाही. आता मला या घरात फक्त शांतता हवीय. स्वराज चांगला मुलगा आहे. थोडा गुंतलेला आहे, एवढंच.”

नंदिनीने त्यांच्याकडे पाहिलं. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. औषधांचा वास, डोळ्यांखालची काळी वर्तुळं… आणि तरीही ओठांवर तेच मायेचं हसू होतं. नंदिनी धीर करून हळू आवाजात म्हणाली,

“काकू, मी परत जात होते. सगळं सोडून…”

शालिनीताई थोडा वेळ शांत राहिल्या. क्षणभर थांबून एक दीर्घ सुस्कारा टाकत म्हणाल्या,

“मग जा.. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू चुकीची नाहीस. आणि समज तू इथे थांबण्याचा निर्णय घेतलास तर तो कुणाच्या भीतीने नाही, तर तुझ्या मनाचा निर्णय असेल. तुझ्या मनाचं ऐक.. कारण तुझं मन कधीच खोटं बोलणार नाही. बरोबर ना?”

तेवढ्यात बाजूच्या खोलीतून स्वराली आणि इतर नातेवाईकांचा आवाज आला. घर पुन्हा जिवंत झालं होतं. दोघीही भानावर आल्या. नंदिनीच्या नजरेसमोर एक चित्र तरळलं. आजारी सासू, विस्कळीत घर, आणि स्वतःसाठी नव्हे तर दुसऱ्या कोणासाठी तरी थांबणं.. तिने खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाली,

“काकू मी आज थांबतेय.. फक्त तुमच्यासाठी..”

शालिनीताईंच्या डोळ्यांत पाणी आलं.

“देव तुला खूप सुखी ठेवो बाळ! आणि हो मला काकू नाही, आई म्हणायचंस.. समजलं?”

नंदिनीने पुसटसं हसण्याचा प्रयत्न केला. तिचा राग अजून पूर्णपणे गेलेला नव्हता. वेदना संपल्या नव्हत्या; पण आजारी सासूबाईंसाठी तिने थांबण्याचा निर्णय घेतला होता.

‘आणि तोच निर्णय तिच्या आयुष्याला वेगळ्या वळणावर नेणार होता.’

क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all