डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. २०
©अनुप्रिया
©अनुप्रिया
मीरा नंदिनीच्या कानाजवळ कुजबुजली आणि नंदिनीला कळून चुकलं, ही परीक्षा साधी नाहीये. बरेच खाचखळगे येणार आहेत आणि तिला त्यातून सहीसलामत बाहेर पडायचं आहे. सर्वांची जेवणं झाली. माधवराव आणि शालिनीताईंनी तृप्ततेची ढेकर दिली. शालिनीताई नंदिनीकडे पाहत म्हणाल्या,
“नंदिनी फार रुचकर स्वयंपाक केला होतास बाळा.. पोट गच्च भरलं बघ.. एकदम भारी झालं होतं सगळं..”
“आणि खीर तर एकच नंबर झाली होती. यम्मी! अजून थोडी दे ना वहिनी..”
स्वराली वाटीतली खीर संपवून रिकामी वाटी पुढे करत म्हणाली. नंदिनीने हसून तिच्याकडे पाहत मान डोलावली आणि पुन्हा तिला अजून वाटी खीर दिली.
“नंदिनी खरंच खूपच छान झालं आजच जेवण.. अशीच सदैव तुझ्यात अन्नपूर्णा वसो! सुखी रहा बाळ..”
माधवरावांनी तिचं कौतुक केलं पण नंदिनी काहीच बोलली नाही. माधवराव तिच्यासोबत जे वागले होते त्यामुळे ती प्रचंड नाराज होती. माधवरावांनी त्यांच्या खिशातून पाचशेच्या काही नोटा काढल्या आणि त्या तिला देण्यासाठी हात पुढे केला पण तिने मान हलवून नकार दिला. इतक्यात शालिनीताई म्हणाल्या,
“नको काय म्हणतेस अगं? घे ते.. शकून असतो तो.. मोठ्यांचा आशिर्वाद म्हणून घ्यायचा. घे बरं पटकन.”
शालिनीताईंचा हुकुम म्हटल्यावर नंदिनीने त्या दुखावल्या जाऊ नये म्हणून नाईलाजाने तिने ते पैसे आशीर्वाद म्हणून स्वीकारले आणि दोघांनाही नमस्कार केला. तिच्या डोक्यावर हात ठेवून दोघांनी तिला हसून आशिर्वाद दिला आणि थोड्याच वेळात माधवराव त्यांच्या खोलीत निघून गेले. त्यांच्या मागोमाग स्वरालीही उठून उभी राहिली आणि म्हणाली,
“मम्मा चल मी तुला तुझ्या खोलीत घेऊन जाते. रात्रीची औषधं पण द्यायचीत ना?”
शालिनीताईंनी हसून मान डोलावली आणि त्या स्वरालीसोबत त्यांच्या खोलीच्या दिशेने निघून गेल्या. डायनिंग टेबलावर आता शांतता होती. स्वराज अजून तिथेच उभा होता. तो कुणाच्याही चर्चेत नव्हता; पण त्याच्या नजरेतून काहीच सुटलं नव्हतं. आत्याबाईंचं बोलणं, मीराचं वागणं तो सगळं पाहत होता. नंदिनी अजूनही उभी होती. ताट उचलायला ती पुढे आली, पण तिचा हात थोडा थरथरत होता. ती लपवायचा प्रयत्न करत होती; पण स्वराजच्या नजरेत आलंच.
“पहिलाच दिवस…आणि तिच्यावर एवढा भार!!”
प्रभावतीबाईंचे शब्द अजूनही त्याच्या कानात घुमत होते.
“इथे चुका चालत नाहीत.”
त्याने नंदिनीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर नाराजी नव्हती;पण त्याही पेक्षा स्वतःला सावरायचं ओझं जास्त दिसत होतं. मीरा खुर्ची मागे सारत उठली. तिच्या चेहऱ्यावरचा हलका समाधानाचा भाव स्वराजच्या नजरेतून सुटला नाही. नंदिनी भांडी घेऊन स्वयंपाकघराकडे वळली. स्वराज क्षणभर तिथेच थांबला. नंदिनीला न्याहाळत असताना त्याच्या मनात विचार आला.
“प्रभाआत्याचं बोलणं, मीराचं वागणं हा फक्त गैरसमज नाही. हा त्यांनी नंदिनीला जाणीवपूर्वक दिलेला त्रास आहे. मला वाटलं होतं, इतकं सगळं झाल्यावर ती रडेल, त्रागा करेल पण नाही ती शांत आहे की तसं ती भासवतेय?”
त्याच्या मनाची चलबिचलता वाढली. तिचं शांत राहणं त्याला बैचेन करत होतं. तो विचार करू लागला,
“मी हे लग्न करायला तयार नाही असं ठामपणे म्हणताना,
त्या मुलीच्या वाट्याला काय येईल याचा विचारच केला नव्हता.”
त्या मुलीच्या वाट्याला काय येईल याचा विचारच केला नव्हता.”
तो स्वतःशीच पुटपुटला. स्वराज खिडकीत उभा राहिला. बाहेर गार वारा सुटला होता. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना दाटू लागली.
“ही लढाई माझी नाही असं म्हणणं आता इतकं सोपं राहिलं नाहीये. माझ्या निर्णयाचे परिणाम आता तिचा काही दोष नसताना तिला भोगावे लागताहेत. या सगळ्या प्रकारात ती नाहक ओढली जातेय. हे तिच्यासाठी योग्य नाही. हा तिच्यावर केलेला अन्याय आहे.”
आज पहिल्यांदाच स्वतःच्याच त्या वाक्याने स्वराज प्रचंड घाबरला होता. आजवर तो साऱ्यांपासून पळत आला होता. स्वतःच्या दुःखाऐवजी कोणाच्यातरी दुःखाला त्याने जवळून पाहिलं होतं. आज पहिल्यांदाच स्वराज कुणाच्या तरी वेदनेला साक्षीदार झाला होता.
इकडे नंदिनी किचन आवरून तिच्या खोलीत आली. खोलीत मंद पिवळा प्रकाश पसरलेला होता. साडी बदलून तिने साधा नाईटड्रेस घातला आणि पलंगावर येऊन बसली. मन अजूनही दिवसभराच्या घटनांत अडकलेलं होतं. खिडकीबाहेर असलेल्या रस्त्यावरच्या दिव्याकडे तिचं लक्ष गेलं. त्याचा फिकट प्रकाश पसरला होता. त्या फिकट उजेडात भिंतीवर पडलेल्या स्वतःच्या सावलीकडे पाहत असताना तिच्या मनात प्रश्न आला.
“मी आत्याबाई आणि मीराचं बोलणं का सहन करतेय? मुळात मी इथे का आहे? हा प्रश्न पहिल्यांदाच मनात आलेला नाहीये; पण आज त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये.”
तिला आईचे शब्द आठवले.
“सहनशीलता म्हणजे गप्प राहणं नसतं बाळा… स्वतःला हरवू न देणं असतं.”
आईच्या आठवणींनी नंदिनीला गलबलून आलं आणि आज दिवसभर तिने रोखून ठेवलेलं पाणी डोळ्यांतून वाहू लागलं.
इतक्यात दार उघडल्याचा आवाज आला. स्वराज आत आला आणि काही न बोलता दार लावून आत सोफ्यावर येऊन बसला. खोलीत क्षणभर शांतता पसरली. नंदिनीने मान उचलून पाहिलं; पण ती काहीच बोलली नाही. स्वराज सोफ्यावरून उठला आणि पलंगाच्या दुसऱ्या टोकाला येऊन बसला. दोघांमध्ये अंतर होतं; पण त्याहीपेक्षा अवघडलेपण जास्त होतं. क्षणभर थांबून स्वराज म्हणाला,
“आजचा दिवस तुझ्यासाठी खूप कठीण दिवस होता.”
नंदिनी हलकेच हसली.
“हो.”
फक्त एवढंच म्हणाली. स्वराज पुढे काही बोलला नाही. जणू तो शब्द शोधत होता.
“मी… ते.. मी असं होईल याचा अंदाज केला नव्हता.”
नंदिनीने खिडकीकडे पाहत उत्तर दिलं,
“मीही नाही.”
ती शांत होती. तिचं ते शांत राहणं त्याला त्याच्यावर केलेल्या आरोपांपेक्षा जास्त बोचरं वाटलं. स्वराज हाताची घडी मोडत म्हणाला,
“मला लग्न मान्य नव्हतं. माझ्या वडिलांनी हट्टाने आणि आईच्या तब्येतीची काळजी वाटल्याने मी लग्नाला उभा राहिलो हे तुला माहीत आहे.”
थोडं थांबून दीर्घ श्वास घेत तो हळू आवाजात म्हणाला,
“पण आज जे झालं ते तुझ्यासाठी जास्त कठीण होतं हे मला कळतंय. आय ऍम सॉरी.. माझ्यामुळे तुला हे सहन करावं लागलं.”
नंदिनीने त्याच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच तिच्या नजरेत तक्रार नव्हती फक्त थकवा होता. थकलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत ती म्हणाली,
“मी कोणत्याच अपेक्षा ठेवलेल्या नाहीत.”
“पण रोज तुला स्वतःला सिद्ध करत राहावं लागेल असं वाटतंय. ते जरा भीतीदायक आहे. पण मी सध्या काही वचन देऊ शकत नाही.”
स्वराज नजर फिरवत म्हणाला.
“मला वचन नकोय..फक्त…”
ती क्षणभर थांबली.
“फक्त काय?
“इथे मी एकटी पडू नये इतकंच.”
त्या वाक्याने स्वराज हलला. त्याने खोल श्वास घेतला.
“तू एकटी नाहीस.”
ते शब्द मोठे नव्हते पण त्या खोलीत ते भरून राहिले. नंदिनीने नजर खाली झुकवली. डोळ्यांतलं पाणी अखेर ओघळलंच. स्वराजला गलबलून आलं पण तो काहीच बोलला नाही. तो उठून खिडकीजवळ गेला आणि बाहेर पाहत म्हणाला,
“झोपायचा प्रयत्न कर. म्हणजे उद्या थोडं सोपं जाईल.”
“थँक्यू..”
नंदिनी इतकचं म्हणाली. स्वराजने मागे वळून पाहिलं. ती अजूनही पलंगाच्या कडेला बसली होती.
“झोप म्हणतोय ना.. उद्या सकाळी मला ऑफिस मीटिंग आहे.. मला रूममधल्या दिव्याच्या उजेडात झोप येत नाही.”
नंदिनी उशीवर आडवी झाली. पहिल्यांदाच या घरात तिला थोडीशी जागा मिळाल्यासारखं वाटलं.
ही एक सुरुवात होती…ना प्रेमाची, ना युद्धाची.. फक्त दोन माणसांच्या समजुतीची…
क्रमशः
©अनुप्रिया
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा