डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. २१
©अनुप्रिया
©अनुप्रिया
नंदिनी एका कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करत होती. बऱ्याच उशिराने तिला झोप लागली. स्वराज खिडकीतून वळून बाल्कनीत येऊन उभा राहिला. रात्रीची वेळ.. घरात निरव शांतता होती. खाली अंगणात अंधुक लाईट आणि रस्त्यावरची तुरळक वर्दळ.. स्वराज स्वतःच्याच विचारात गुंग होता.
“काय होऊन बसलंय हे? क्षणार्धात संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. किती स्वप्नं पाहिली होती आम्ही आमच्या संसाराची! सगळी धुळीस मिळाली. स्वप्नांप्रमाणे माझ्या प्रेमालाही अपूर्णतेचा शाप आहे का? तिला जेंव्हा हे सगळं समजेल तेंव्हा कधी रिॲक्ट करेल ती? रागवेल, चिडेल, रडेल, आकांडतांडव करेल. मला दोष देईल. विश्वासघातकी म्हणेल. मला वाईट समजेल. पण हे मी जाणूनबुजून केलं नाही. मी जे काही केलं ते माझ्या आईसाठी केलं. त्यावेळी मला माझ्या आईशिवाय कोणीच जास्त महत्वाचं वाटलं नाही. आईचा जीव वाचवणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं होतं.”
तिच्या विचारांनी स्वराजच्या डोळ्यांत पाणी आलं.
“कसं निभावून नेऊ सगळं? एकीकडे ती आणि दुसरीकडे माझी धर्मपत्नी म्हणून या घरात वावरतेय ती ही नंदिनी. ”
त्याच्या डोळ्यांसमोर स्वयंपाकघरात शांतपणे उभी असलेल्या सालस, निरागस नंदिनीचा चेहरा आला.
“कोणतीही तक्रार नाही. कोणाकडून कसलीच अपेक्षा नाही. ती कोणतेही हक्क सांगत नाही. समोर जे वाढलंय ते ती निमूटपणे स्वीकारतेय असं वाटतंय तर खरं की, तीही माझ्यासारखी फक्त थांबलीय? सहा महिने..”
‘सहा महिने..’ मनात पुन्हा तोच आकडा आला. स्वराज मनातल्या मनात ठोकताळे बांधू लागला. त्याच्या डोक्यात आकडेमोड सुरू झाली.
“मी कोणालाही फसवलं नाहीये किंबहुना फसवत नाही किंवा तशी माझी मुळीच इच्छा नाही. तिला हे मी सगळं सांगणार आहे. तिच्याकडून आणि नंदिनीकडूनही वेळ मागून घेणार आहे. सहा महिने.. फक्त सहा महिने.. माझ्या आईसाठी.. आई आताच हॉस्पिटलमधून घरी आलीय. तिला आता हा धक्का नको. लग्न मोडल्याचं दु:ख तिला झेपणार नाही. कोर्टाने सहा महिन्यांचा दिलेला अवधी पुरेसा आहे. त्या सहा महिन्यात आई बरी होईल. मग सगळ्यांना समजावून सांगता येईल.”
स्वराज स्वतःशीच पुटपुटला. आता हवेतही गारठा वाढला होता.
“आता हे सहा महिने तरी हिच्यासोबत नीट वागलं पाहिजे. ती एकटी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि आता झोपायला गेलं पाहिजे. उद्या कॉन्कॉल आहे. उद्या तिच्याशी शांतपणे बोलतोच.”
असं मनाशी पक्कं ठरवून तो पुन्हा त्याच्या खोलीत आला आणि सोफ्यावर येऊन झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी लवकर उठली. फ्रेश होऊन ती अंगणात तुळशीपाशी उभी होती. घरातला लग्नाचा गोंधळ थोडा ओसरला होता. तुळशीला पाणी घालण्यासाठी तिने तांब्यातलं पाणी ओतायला सुरू केलं; पण मन कुठेतरी दूर अडकलेल्यासारखं होतं. इतक्यात मागून पावलांचा आवाज आला.
“नंदिनी…”
तिने मागे वळून पाहिलं. तो आवाज स्वराजचा होता. आवाजात ना घाई होती ना कठोरता होती, फक्त काळजी होती.
“तू ठीक आहेस?”
त्याने तिला विचारलं. नंदिनीने क्षणभर काहीच उत्तर दिलं नाही.
“माहीत नाही.. पण आता जरा बरी आहे मी..”
ती प्रामाणिकपणे म्हणाली त्यावर स्वराज हलकेच हसला. थोडं थांबून तो म्हणाला,
“नंदिनी, मी तुला काही विचारणार नाही किंवा सांगणारही नाही. फक्त तुला ऐकू शकतो. तुझ्या मनात जर काही असेल तर तू मला सांगू शकतेस.”
ते ऐकताच नंदिनीची नजर त्याच्यावर स्थिरावली. त्याच्याकडे रोखून पाहत तिने त्याला विचारलं.
“कोणत्या अधिकाराने?”
तो शांत बसला. ती पुन्हा हसून म्हणाली,
“ठीक आहे.. जास्त लोड घेऊ नका. मी सहजच विचारलं. मला वाटलं, तुम्ही रागावले असाल.”
“राग असतो कधी कधी…पण जाऊ देत ते. तुला हे सगळं सहन करत थांबायचं नसेल तर..”
तो मान खाली घालून जमिनीकडे पाहत म्हणाला.
“मग काय करू ? जाऊ माझ्या घरी?”
“मी तुला थांबवायला नाही सांगणार.. फक्त एवढंच सांगायचंय की, तू या घरात स्वतःला एकटी समजत असशील तर ते चुकीचं आहे. मी आहे इथे.. तू असेपर्यंत मी तुझ्यासोबत असेन. कदाचित मी बोलण्यात कमी पडलो असेन पण तुझं ऐकायला मी तयार असेन.”
नंदिनीने खोल श्वास घेतला.
“खरंतर लग्न करून मी या घरात आलें तेंव्हापासून या मला इथे फार परकं वाटत होतं; पण तुमच्या आईमुळे आणि आता तुमच्यामुळे थोडं बरं वाटतंय.”
स्वराजने तिच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच तो नवी नवरी म्हणून नाही तर एक माणूस म्हणून तिच्याशी बोलत होता.
“मग एक करुया?”
तो हलकंसं हसत म्हणाला.
“आजपासून आपण एकमेकांना दोष देणार नाही. जे मनात असेल ते शांतपणे बोलू.”
नंदिनीच्या ओठांवर पुसटसं हसू उमटलं.
“मैत्री?”
नंदिनीने हसून हात पुढे करत त्याला विचारलं.
“आधी मैत्रीच.”
स्वराज तिच्या हातात हात मिळवत ठामपणे म्हणाला. दोघेही काही क्षण शांत उभे राहिले. तुळशीची पानं अलगद शहारली. त्या क्षणी ना वचनं होती, ना अपेक्षा.. फक्त दोन माणसं पहिल्यांदाच एकमेकांकडे वादाशिवाय पाहत होती.
आणि बाल्कनीतून पाहणाऱ्या माधवरावांना ‘ही एक वेगळी नवी सुरुवात आहे.’ असंच वाटत होतं.
इकडे मीरा आपल्या खोलीत आरशासमोर उभी होती. कॉरिडॉरमधल्या दिव्यांचा मंद उजेड पडद्याआडून आत येत होता.
चेहऱ्यावरचा मेकअप काढून टाकला होता. आता चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता. एकाच ध्यासाने तिला पछाडलं होतं. तिने मोबाईल उचलला. स्क्रीनवर स्वराजचा नंबर होता. नंबर डायल करण्यासाठी सरसावलेली तिच्या हाताची बोटं क्षणभर थांबली.
“नाही.. आता नाही. अजून वेळ आहे.”
ती पलंगावर बसली. दिवसभराच्या सगळ्या घटना तिच्या नजरेसमोर फेर धरू लागल्या. नंदिनीचा शांत चेहरा, आत्याबाईंचे टोमणे आणि स्वराजची ती नजर तिच्या नजरेतून चुकली नव्हती.
‘तो बदलतोय…’
हा विचार मीराच्या मनात विजेसारखा चमकून गेला. हाताच्या मुठी आवळल्या जाऊ लागल्या.
“नाही.. मी हे होऊ देणार नाही.”
ती स्वतःशीच पुटपुटली. तिने ड्रॉवर उघडला. आत जुन्या फोटोंचा गठ्ठा होता. लहानपणीचे, कॉलेजचे, फंक्शनचे फोटो होते. स्वराज तिच्या शेजारी, कधी हसताना, कधी अगदी आपुलकीने उभा होता. ती एक फोटो उचलून पाहू लागली.
“तू माझा आहेस आणि हे फक्त आठवणीत नाही, तर लवकरच ते सत्यात बदलणार आहे.”
तिने ठाम निर्धार केला. तिच्या डोळ्यांत असूया चमकत होती. सुडाच्या भावनेने पेटून उठलेलं मन अंधारातही लख्ख चमकलं. तिने पटकन एक नंबर डायल केला. समोरून ‘हॅलो’ म्हणताच तिने बोलायला सुरुवात केली.
“हॅलो… राघव? मीरा बोलतेय.”
“हं.. बोल ना..”
“मला तुझी एक मदत हवी आहे.”
“कसली मदत?”
नाही नाही… काही बेकायदेशीर नाही.”
मीरा हसून म्हणाली तसा राघवही हसला. ती उठून खिडकीजवळ गेली आणि म्हणाली,
“फक्त थोडी माहिती हवीय. मला स्वराजच्या बायकोबद्दल, नंदिनीबद्दल म्हणजे तिचं माहेर, तिचे नातेवाईक, आईवडील, भावंडं, तिचं ऑफिस, तिचा स्वभाव.. सगळं सगळं.. अगदी छोट्या छोट्या गोष्टीही.. कारण माणूस मोठ्या गोष्टींनी नाही तर छोट्या गोष्टींनीही दुखावला जाऊ शकतो म्हणून तू काहीही सुटू देऊ नकोस. समजलं?”
हळू आवाजात म्हणाली.
“या घराची, या माणसांची रीतभात तुला माहीत नाही.”
तिच्या ओठांवर तेच छद्मी हास्य उमटलं.
“आणि ही मीरा मुजुमदार… खेळ हरायला जन्मलेली नाही.”
ती जवळजवळ कुजबुजली. ती दिवा बंद करून पलंगावर आडवी झाली. अंधारात तिचे डोळे मात्र उघडेच होते. पहिली चाल टाकायची होती. आणि ती चाल थेट नंदिनीच्या पायाखालची जमीन हलवणारी असणार होती.
क्रमशः
©अनुप्रिया
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा