Login

तुम दे ना साथ मेरा.. २३

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेमकहाणी..

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. २३
©अनुप्रिया

नंदिनी मीराच्या बोलण्याने विचारात पडली,

“काय नवीन सांगितलं मीराने? मला तर सगळं ते माहिती आहे. तो पहिल्याच रात्री स्पष्टपणे, काहीही न लपवता बोलला होता; मग आज इतकं अस्वस्थ का वाटतंय? त्याने त्याच दिवशी आपल्याकडून घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या घेतल्या होत्या. सहा महिन्यांनी हे नातं संपुष्टात येणार आहे हेही माहिती आहे मग मला दुःख का होतंय?”

तिला प्रश्न पडला.

“तो म्हणाला होता, मला वेळ हवाय.. कशासाठी? कोर्टाने दिलेला सहा महिन्यांचा अवधी पूर्ण करण्यासाठी? याचा अर्थ तो वेळ काढतोय की थांबतोय? वेळ म्हणजे तरी काय असतं? घड्याळावर काहीतरी मोजायचं की मनं जोडण्यासाठी असलेली एखादी तयारी? मी त्याला वेळ दिला; पण त्यावेळेत त्याने मला काय दिलं? शांतपणा, सभ्यता, जबाबदारी, सन्मान दिला; पण प्रेम? तो माझ्यासोबत खूप चांगला आहे; पण तो माझा आहे का? मी स्वतःला थांबवलं. त्याला कोणतेही प्रश्न विचारायचे नाहीत. तो गोंधळलेला आहे त्याला समजून घ्यायचं; पण आज पहिल्यांदा जाणवलं, समजून घेणं म्हणजे स्वतःला मागे ठेवणं होत नाही ना? मी निवड आहे की एक पर्याय? तो माझ्याशी बोलतो; पण स्वतःचं मन मोकळं करतो का? मीराने काहीही नवीन सांगितलं नाही. तिने फक्त माझ्या मनातला एक विचार मोठ्याने उच्चारला. ‘वेळ काढण्यासाठीही लग्नं होतात.’ मी लगेच तिला म्हणाले, तो तसा नाही; पण तो तसा नसण्याची खात्री मला का हवी आहे?”

नंदिनीची अस्वस्थता वाढू लागली. डोळे भरू लागले. मन आक्रंदत होतं.

“मी त्याच्यावर संशय घेत नाहीये. मी स्वतःला विचारतेय. जर उद्या तो म्हणाला, ‘आपण दोघं वेगळे होऊया’ तर मी म्हणेन का हे ‘मला आधीच माहित होतं’ की ‘मला वाटलं होतं’? या दोन वाक्यांमध्ये खूप फरक आहे. तुळशीपाशी उभी असताना मी त्याला नवरा म्हणून स्वीकारलं. आता मात्र स्वतःला बायको म्हणून शोधतेय. मी तक्रार करत नाहीये. मी भांडत नाहीये; पण आता मी गप्पही बसणार नाही. कारण वेळ देणं वेगळं असतं आणि वेळेत हरवणं वेगळं.. आणि हे कळणं हेच खरं दुखणं आहे.”

नंदिनीने स्वराजला जाब विचारायचा असा ठाम निर्धार केला आणि तिच्या कामाला लागली. दुपारी सर्वांची जेवणं झाली. दुपारची घाई आटोपली होती. नंदिनीही थोडी निवांत झाली. स्वराज फाइल्स चाळत सोफ्यावर बसला होता. नंदिनी त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. ती क्षणभर तिथेच घुटमळत होती. ही गोष्ट स्वराजच्या लक्षात आली असावी. त्याने मान वर करून तिच्याकडे पाहत विचारलं,

“तुला माझ्याशी काही बोलायचं का?”

“हं.. एक विचारू?”

“हो.. विचार ना..”

नंदिनीने पाण्याचा ग्लास त्याच्या हातात देत त्याच्याकडे न पाहताच विचारलं,

“आपण दोघं अजून एकमेकांना ओळखायचा प्रयत्न करतोय ना?”

स्वराज क्षणभर गडबडला.

“हो… म्हणजे होच.”

नंदिनीचा आवाज शांतच होता.

“म्हणजे थोडा वेळ लागतो ना? आपण बोललोच होतो.”

स्वराजच्या बोलण्यावर तिने होकारार्थी मान डोलावली. ती आता त्याच्याकडे पाहत होती.

“पण स्वराज, हा वेळ काही मिळवण्यासाठी आहे की फक्त वेळ काढण्यासाठी?”

“नंदिनी, तू असं का विचारतेयस?”

स्वराजने आश्चर्यचकित होऊन विचारलं.

“तसं काही नाही. फक्त मला समजून घ्यायचं आहे.”

“मी तुला आधीच सगळं सांगितलंय.”

“हो.”

तिने मान डोलावली.

“आणि म्हणूनच मी तुम्हाला दोष देत नाहीये.”

हे वाक्यच त्याला अधिक त्रास देऊन गेलं.

“मग?”

नंदिनी थोडीशी हसली. पण त्या हसण्यात सहजपणा नव्हता.

“मग एवढंच जाणून घ्यायचं आहे की, तुम्ही माझ्याबरोबर थांबताय की माझ्याबरोबर पुढे यायचं ठरवताय?”

स्वराज काही बोलणार तोच ती पुढे म्हणाली,

“घाई नको. आत्ताच उत्तर नको. मला फक्त तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारावा असं वाटलं.”

पहिल्यांदाच त्याला जाणवलं, नंदिनी काही मागत नव्हती तर ती तिची जागा शोधत होती. आणि ती जागा त्याच्या आणि त्याच्या प्रेमाच्या नात्याच्या मधोमध थांबली होती.

“नंदिनी तुला आता असे प्रश्न का पडताहेत? मी तुला लग्नाच्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं. फक्त सहा महिने आपलं नातं असणार आहे. आईसाठी मी तुला इथे थांबण्यास सांगितलं. आईची प्रकृती सुधारल्यावर तू मोकळी आणि मीही.. मग तू तुझी आणि मी माझा.. दोघांचे मार्ग वेगळे..”

“म्हणजे तुम्ही फक्त वेळ काढत आहात तर..”

इतकं बोलून ती तिथून निघून गेली. स्वराज मात्र तसाच बसून राहिला. त्याने मोबाईल हातात घेतला. स्क्रीनवर एक नाव चमकलं. क्षणभर अंगात कळ आली.

“आत्ता नाही. आता तुला यात ओढणं योग्य नाही. थोडा वेळ थांब शोना..”

त्याने कॉल कट केला. बाल्कनीतून वळताना त्याची नजर नंदिनीच्या खोलीकडे गेली. दार अर्धवट उघडं होतं.

“ही माझी बायको आहे पण फक्त कागदावर..”

त्याच्या मनात आलेला विचार न स्वीकारता त्याने स्वतःलाच बजावलं.

“ही इतकी शांत का आहे? प्रश्न का विचारत नाही?”

पुन्हा त्याच्या मनात विचार आला. पहिल्यांदा त्याला तिच्या रागाची नव्हे तर तिच्या अपेक्षांची, वागण्याची भीती वाटली.

“तिच्याशी मैत्री होऊ दे. निदान तेवढं तरी मी तिच्याशी प्रामाणिक राहीन. त्या नात्यात प्रेम, स्वप्न, अगदी भविष्यही नाही फक्त सहवास आहे आणि तेही फक्त सहा महिने..”

त्याने एकदा आईच्या खोलीकडे पाहिलं.

“हे सगळं फक्त आणि फक्त आईसाठीच आहे. ही तडजोड आईच्या जीवासाठीच आहे.”

तो स्वतःला पुन्हा एकदा समजावून सांगत होता; पण मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी एक प्रश्न डोकावत होता.

आणि या सहा महिन्यांत काही बदललं तर?”

क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही

0

🎭 Series Post

View all