डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. २४
©अनुप्रिया
©अनुप्रिया
स्वराजच्या बोलण्याने नंदिनी दुखावली गेली होती. ती तिच्या खोलीत आली. दार अर्धवट पुढे ढकलून ती पलंगावर बसली. दिवसभराचा कामाने थोडासा थकवा आला होता तरी ती लवंडली नाही. हातात साडीच्या पदराचं टोक घट्ट पकडलं होतं. आता काही वेळापूर्वी जे घडलं होतं, त्याचं ओझं तिच्या मनात रुतून बसलं होतं.
“मी त्याला थेट प्रश्न विचारला आणि तो त्याचं थेट उत्तर देऊ शकला नाही. हेच खरं उत्तर होतं. म्हणजे मला नेमकं काय अपेक्षित आहे? त्याने तर स्पष्ट सांगितलंय फक्त सहा महिने.. मग मला अजून त्याच्याकडून कसलं थेट उत्तर हवंय?”
नंदिनी उठून आरशासमोर उभी राहिली. त्या आरशात बायको दिसत होती; पण त्या नजरेत अपेक्षेपेक्षा जास्त स्पष्टता होती.
“आज पहिल्यांदा मी मागितलं नाही. मी फक्त त्याला विचारलं आणि प्रश्न विचारणं हा अधिकार असतो.”
ती स्वतःशी पुटपुटली. तिला मीराचं वाक्य पुन्हा आठवलं,
‘वेळ काढण्यासाठीही लग्नं होतात.’ आज पहिल्यांदा त्या वाक्याला भीती वाटत नव्हती. आज त्याला अर्थ होता. जर हे नातं फक्त वेळ काढण्यासाठी असेल. तर मी त्या वेळेत स्वतःला हरवणार नाही. तिने कपाट उघडलं. हातातल्या साड्यांतून इतरांच्या आवडीनिवडींचा विचार न करता तिने स्वतःसाठी एक साधी, हलकी साडी बाहेर काढली. साडी नेसून तिने पुन्हा आरशात पाहिलं, त्या क्षणी नंदिनीचा निर्णय स्पष्ट झाला.
“मी थांबेन; पण गप्प बसून नाही. मी इथे असेन; पण अदृश्य होऊन नाही.”
इकडे बाल्कनीत उभा असलेला स्वराज मात्र अस्वस्थ होता. नंदिनी खोलीत निघून गेल्यापासून घरातली शांतता त्याला टोचत होती. आधी हीच शांतता त्याला सुरक्षित असल्यासारखी वाटायची. आज नंदिनी त्याला प्रश्न विचारत होती.
“ती ओरडली नाही, रडली नाही, आरोपही केला नाही मग इतकं का हललंय आत? मी इतका अस्वस्थ का होतोय? ती अपेक्षा ठेवतेय का? की फक्त स्वतःची जागा ठरवतेय?”
त्याने स्वतःलाच प्रश्न केला. आणि आज त्याला पहिल्यांदा जाणवलं,
“नंदिनीला सोडून देणं सोपं असणार नाही कारण ती धरून बसलेली नव्हती आणि जी धरून बसत नाही. तीच सुटताना जास्त भीती देते.”
तो विचार त्याला अस्वस्थ करून गेला. इतक्यात आईच्या खोलीतून हलका खोकल्याचा आवाज आला. तो थबकला. आणि पुन्हा स्वतःला आठवण करून दिली की, हे सगळं आईसाठीच आहे; पण आज पहिल्यांदा त्याच्या त्याच वाक्याला धार नव्हती आज ते कारण वाटत नव्हतं तर ते एका सबबीसारखं वाटत होतं.
पुढचे काही दिवस घरात चैतन्याचं वातावरण होतं. नव्या नवरीचं कोडकौतुक, लाड सुरू होते. पाहुण्यांच्या भेटीगाठी, शेजारीपाजारी भेटायला येत होते. नंदिनी पहाटे उठायची. देवघरात दिवा लावायची. स्वयंपाकघरात सुमनच्या मदतीने साऱ्यांचा स्वयंपाक करायची. सासूबाईंशी हसून बोलायची. त्यांचं पथ्यपाणी, औषधंपाणी सारं काळजीने करायची. शालिनीताई आजारी असल्या तरी खुश होत्या. नंदिनीसारखी गोड गुणी मुलीसारखी सुन त्यांना मिळाली होती. सारं काही सुरळीत आहे असं वाटत असलं तरी नंदिनीमध्ये काहीतरी बदल झालाय हे सर्वांनाच जाणवत होतं. नंदिनी घरातली सगळी कामं करत होती पण त्यात कृत्रिमपणा वाटत होता. ती आता स्पष्ट बोलू लागली होती. लहानसहान गोष्टीतून तिचा स्पष्टपणा जाणवत होता. एक दिवस अर्पिता नंदिनीला म्हणाली,
“नंदिनी, आज सगळ्यांसाठी पोळ्या करतेस ना?”
“मला एकटीला नाही जमणार. आपण दोघी मिळून करूयात.”
नंदिनीच्या या उत्तराचं अर्पिताला खूप नवल वाटलं.
“अगं तुला जमणार नाही असं नाही ना?”
“हो मला जमू शकेल पण मला एकटीला सगळं करायचं नाही. आपण दोघी मिळून करूयात ना..”
नंदिनीने हसून उत्तर दिलं. तिच्या त्या एका वाक्याने घरातली हवा बदलली. नवीन सुन उलट बोलते असं वाटू लागलंआणि वरचेवर घटनाही तशा घडत होत्या. एके दिवशी स्वरालीने सहज विचारलं,
“वहिनी, आज कॉलेजला सोडशील का मला?”
“आज नाही जमणार.. मी जरा कामात आहे.”
ते वाक्य बोलताना कुठलाही कडवटपणा नव्हता. फक्त स्पष्टता होती. एक दिवस नंदिनी शालिनीताईना म्हणाली,
”शालिनीकाकू.. आता सगळं स्थिरस्थावर झालं असेल तर मी पुन्हा ऑफिस जॉइन करायचं म्हणतेय. चालेल ना?”
त्या क्षणभर शांत बसल्या. त्यांना शांत बसलेलं पाहून नंदिनी पुन्हा म्हणाली,
“म्हणजे कसं तसं मी वर्क फ्रॉम होमच आहे. पण आठवड्यातले दोन तीन दिवस ऑफीसमध्ये जावं लागेल.”
तरीही शालिनीताई शांतच होत्या.
“काय झालं काकू? तुम्ही काहीच का बोलत नाही? मी घरातली कामं पण करून जाईन. त्याची चिंता प्लीज तुम्ही नका करू.”
तिच्या बोलण्यात स्पष्टता जाणवत होती. शालिनीताईंनी तिच्याकडे पाहिलं आणि करड्या स्वरात म्हणाल्या,
“तुला तुझ्या कामावर रुजू व्हायचंय? जरूर जा पण माझी एक अट आहे.”
“अट? कसली अट?”
नंदिनीने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. शालिनीताईंनी शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि हसून म्हणाल्या,
“काकूंच्याऐवजी तू मला आई म्हणायचंस.”
त्यांचे शब्द ऐकताच नंदिनीच्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं. तिने पटकन पुढे येऊन त्यांच्या कुशीत शिरत ‘आई’ अशी हाक मारली. कितीतरी वेळ ती त्यांच्या कुशीत विसावली होती. त्या तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत होत्या. त्यांनी मायेने विचारलं,
“नंदिनी, थकलीयस का ग?”
नंदिनी थोडा वेळ शांत राहिली मग म्हणाली,
“नाही आई. मी थकलेली नाही. मी आता स्वतःची काळजी घ्यायला लागलेय.”
शालिनीताईंनी तिच्याकडे पाहिलं. त्या नजरेत आश्चर्य नव्हतं पण अभिमान होता. त्या हळू आवाजात म्हणाल्या,
“बरं आहे.. बायको म्हणजे सर्व घराचं ओझं उचलणारी बाई नसते तर घरातली आपली जागा धरून ठेवणारी व्यक्ती असते.”
शालिनीताईंच्या बोलण्याने नंदिनीचे डोळे भरून आले.
क्रमशः
©अनुप्रिया
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा