डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. २७
©अनुप्रिया
©अनुप्रिया
नंदिनी विचार करू लागली. स्वराजची दुसरी बाजू हळूहळू उलगडू लागली होती. आजवर तिने त्याला दोषच दिला होता; पण हळूहळू सहवासाने रागाचे आवरण तुटून पडू लागले होते. त्याच्या विचारांत रात्री खूप उशिरा तिचा डोळा लागला. अचानक पहाटे तिला जाग आली. खिडकीतून पहाटेचा अंगावर शहारा आणणारा पहाट वारा मंद प्रकाश घेऊन आत शिरला. नंदिनी उठून बसली. घड्याळात साडेपाच झाले होते. तिने आजूबाजूला पाहिलं, सोफ्यावर स्वराज दिसला नाही. बाथरूमची लाईट बंद दिसली. बाहेर अंगणात असेल या विचाराने ती खोलीतून बाहेर आली. सगळेजण गाढ झोपेत होते. घरात शांतता होती. तेवढ्यात तिला स्वयंपाकघरात दिवा लागलेला दिसला. नंदिनी जागीच थबकली. स्वराज स्वयंपाकघरात उभा होता. हातात थर्मास, गॅसवर दूध तापत होतं. त्याच्या चेहऱ्यावर कालचा थकवा अजून उतरलेला नव्हता.
“इतक्या लवकर उठलात?”
नंदिनी नकळत विचारून गेली. स्वराजने दचकून मागे वळून पाहिलं आणि म्हणाला,
“अगं ते आईला सकाळची औषधं दूधाबरोबर घ्यायची आहेत ना? हल्ली तिला झोप लागत नाही म्हणून डॉक्टरांनीच सांगितलंय. मी उठलोच होतो म्हणून म्हटलं, आपणच आईला दूध गरम करून द्यावं.”
नंदिनी काही बोलली नाही. तो दूध थर्मासमध्ये ओतत म्हणाला,
“तू झोप. मी पाहतो सगळं.”
ती तिथेच उभी राहिली.
“मी मदत करू का?”
तिने हळू आवाजात त्याला विचारलं
“नको. तू काल खूप दमली होतीस. जा आराम कर.. मी पाहतो.”
स्वराज सहज बोलून गेला. नंदिनी विचार करू लागली.
“किती सहज बोलून गेला हा! म्हणजे जे केलं ते फार काही विशेष केल्यासारखं नाहीये. आजिबात मोठेपणाचा किंवा खूप काही केल्याचा आवही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये.”
थोड्या वेळाने स्वराज शालिनीताईंच्या खोलीकडे गेला. दार न उघडता हलकेच आवाज दिला,
“आई… दूध ठेवतोय बाहेर. जाग आली की घे.”
आतून क्षीण आवाज आला,
“हो रे बाळा.. तू कशाला त्रासकरून घेतलास? नंतर घेतलं असतं. बरं राहू देत. घेते मी..”
स्वराज क्षणभर थांबला. त्याच्या चेहऱ्यावर हलकं समाधानाचं हसू आलं. नंदिनी दूर उभी होती. हे सगळं पाहताना तिच्या मनात नकळत विचार आला,
“हा माणूस कुठल्याही कौतुकासाठी करत नाही. कोणाला दाखवण्यासाठी नाही. तो फक्त त्याचं काम करतो. आपलं कर्तव्य बजावतो.”
स्वराज मागे वळला तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहत होती.
“काय झालं?”
त्याने सहज विचारलं. नंदिनी मान हलवून म्हणाली,
“काही नाही… चहा हवा आहे का?”
“हो. पण अर्धा कपच.”
तो किंचित हसला; पण त्या हसण्यातही काही अपेक्षा नव्हती आणि नंदिनीला पहिल्यांदाच वाटलं.
“हा आईची इतकी काळजी घेतोय! किती प्रेम आहे त्याचं त्याच्या आईवर! जो आईची इतकी काळजी घेतोय म्हटल्यावर कदाचित हा माणूस मला दुखवणार नाही.”
तिच्या मनातला त्याच्याविषयीचा रोष अशा छोट्या मोठ्या प्रसंगामुळे विरत चालला होता. स्वराजच्या स्वभावाची दुसरी चांगली बाजू तिला दिसत होती.
एके दिवशी दुपारी नंदिनी तिचं ऑफीसचं काम संपवून स्वयंपाकघरात भाजी चिरत होती. स्वराज हॉलमध्ये बसून लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. इतक्यात नंदिनीचा फोन वाजला. स्क्रीनवर ‘आई’ असं झळकलं.
“आई?”
तिने लगेच फोन उचलला.
“काय ग नंदू? कशी आहेस बाळ?”
आईचा आवाज नेहमीसारखा काळजीचा होता.
“हो आई. सगळं ठीक आहे.”
नंदिनी आणि तिची आई दोघी थोडं बोलल्या. फोन ठेवताना नंदिनीचा आवाज थोडा थरथरला होता. ती पुन्हा भाजी चिरायला लागली; पण हात आपोआप मंदावले होते. डोळे पाणावले होते. स्वराजच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. त्याने हळू आवाजात विचारलं,
“आईचा फोन होता का?”
“हो.. बाबा उद्या गावाला जाणार आहेत. डॉक्टरांनी बोलावलंय. आई थोडी घाबरली आहे. बाबांना मागच्या वेळी अटॅक येऊन गेल्यापासून ती थोडी घाबरीघुबरी होते. इमोशनल होते. कोणाशीतरी बोललं तर मग शांत होते.”
त्याच्या प्रश्नावर नंदिनीने भाजी चिरता चिरता उत्तर दिलं. स्वराज काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला,
“उद्या तुला जायचं असेल तर तू तुझ्या माहेरी जाऊ शकतेस..”
नंदिनी भाजी चिरता चिरता थांबली आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं.
“म्हणजे?”
“आणि हो.. तू तुझ्या माहेरी एकटी जाऊ नकोस.. मी पण सोबत येतो.”
“नको… तुमचं काम..”
ती पटकन म्हणाली.
“काम थांबेल. ते नंतर करता येईल; पण आई-बाबा? ते थांबत नाहीत. म्हणून आपणच त्यांची काळजी करायला नको?”
स्वराज सहज बोलून गेला; पण त्याच्या या बोलण्याने नंदिनीला पुढे काही बोलताच येईना. तिच्या डोळ्यांसमोर बाबांचा थकलेला चेहरा आला. त्यांच्या काळजीने तिचे डोळे वाहू लागले. इतक्यात स्वराज पुढे म्हणाला,
“नंदिनी तुला एक सांगायचं होतं.”
“हं.. बोला ना..”
“मला माहित आहे, आपलं लग्न सहा महिन्याच्या करारावर आहे. पण आईबाबा तसे करारावर येत नाहीत गं.. आपण त्यांची काळजी घ्यायला हवी. उद्या आपण कुठे असू माहित नाही पण निदान हे सहा महिने तरी आपण आपल्या पालकांची, घरातल्या माणसांची काळजी घेतली पाहिजे ना? तुझ्या आईबाबांच्या मान ठेवणं माझं कर्तव्य आहे.”
हे ऐकून नंदिनीची मान आपोआप खाली झुकली. डोळ्यांत
दाटून आलेलं पाणी तिने अलगद लपवलं.
दाटून आलेलं पाणी तिने अलगद लपवलं.
“थँक्यू…”
तिचा आवाज कातर झाला.
“थँक्यू नको. तू माझ्या, सरपोतदारांच्या घरी आलीस. त्यामुळे तुझे आई-वडील ते माझेही आईबाबा..”
त्या वाक्यावर नंदिनी काहीच बोलली नाही; पण तिच्या मनात स्वराजची जागा वरच्या स्थानावर गेली होती.
“हा माणूस माझा नवरा नसला, तरी आता तो मला परका वाटत नाही.”
क्रमशः
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा