Login

तुम दे ना साथ मेरा.. २८

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेम कहाणी..

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. २८
©अनुप्रिया


नंदिनी पुन्हा भाजी चिरायला लागली. सुरीचा आवाज नेहमीसारखाच होता; पण मन मात्र कुठेतरी अडकलं होतं. स्वराजच्या बोलण्यात काही विशेष नव्हतं, तरीही त्याच्या सहजतेने तिला अस्वस्थ केलं होतं. स्वराजबद्दल तिच्या मनात उभी राहिलेली भिंत कुठे आणि कधी कोसळली ते तिचं तिलाही कळलं नाही. आजवर तिने त्याला केवळ परिस्थितीच्या चौकटीत पाहिलं होतं. सहा महिन्याचा करार, अटी, अंतर, अबोल राहिलेल्या रात्री हेच तिने पाहिलं होतं, अनुभवलं होतं; पण आज पहाटे त्या दूधाच्या उकळणाऱ्या वाफेत, आईच्या औषधांसाठी उठलेल्या माणसात, तिला पहिल्यांदाच निखळ माणूस दिसला होता.
‘हा माझा नवरा आहे.’ हा विचार अजूनही तिला जड जात होता; पण ‘आता हा माणूस तिच्यासाठी परका राहिलेला नाही.’ हा विचार मात्र आता तिच्या मनाने नाकारला नाही.

“आपण त्याच्याविषयी जे ठरवून टाकलं होतं, त्याच्याबद्दल माझं जे मत झालं होतं, त्याला स्वराज हलकेच धक्का देतोय. माझ्या विचारांना, मतांना मोडीत काढत नाहीये पण चुकीचं ठरवतोयत. हे काय होतंय माझ्यासोबत? आपण इतकं उशिरा का पाहिलं याला?”

तिच्या मनात विचार चमकून गेला;पण लगेचच दुसऱ्या क्षणाला तिने तो विचारही बाजूला सारला.

“हा काय विचार करतेय मी? नाही नाही.. हा विचार मला झटकून टाकला पाहिजे. कारण हा बदल स्वीकारणं म्हणजे स्वतःच्या जखमांवरची खपली काढून पुन्हा त्यांना भळभळत ठेवणं होईल. पण एक मात्र नक्की, त्या जखमांवर कुणीतरी अलगद हात ठेवलाय. कोणीतरी हळुवारपणे फुंकर घातलीय. असंही कोणी वागू शकतं?”

तिला प्रश्न पडला. तिच्यात झालेला हा बदल कधी झाला हे तिच्या लक्षातही आलं नव्हतं. घर तेच होतं, माणसंही तीच; पण तरीही आता सकाळी उठताना अंगावर चढणारी ती परकेपणाची जाणीव हळूहळू कमी होत चालली होती. स्वयंपाकघरात पाऊल टाकताना हात नकळत योग्य भांड्याकडे जात होते. शालिनीताईंच्या औषधांच्या वेळा तिला लक्षात राहू लागल्या होत्या. अंगणात तुळशीला पाणी घालताना ती क्षणभर थांबून तिथल्या शांततेकडे पाहू लागली होती. आपण इथे राहतोय, हे माझं घर आहे हा विचार आता मनात सहज येत होता.

संध्याकाळी स्वराज घरी आला तेव्हा नंदिनी नेहमीसारखीच चहा करत होती; पण आज तिच्या हालचालींमध्ये घर आपलं असल्याचा एक आत्मविश्वास होता.

“चहा ठेवला आहे.”

तिने स्वराजला सांगितलं. आज तिने ‘तुम्हाला चहा घ्यायचा आहे का?’ असं विचारलं नव्हतं तर चहा ठेवलाय असं सांगितलं होतं. स्वराज क्षणभर थांबला आणि चहाचा कप उचलून ओठांची लावला. पहिल्या घोटाबरोबरच त्याच्या नजरेला जाणवलं,

“ती आता विचारत नाही. ती गृहीत धरते. अधिकारवाण्याने ती मला सांगतेय.”

पहिल्यांदाच मनात आलेल्या या विचाराने त्याला वाईट वाटलं नव्हतं. आता दिवसेंदिवस तो नंदिनीला जास्त निरखून पाहू लागला होता. ती कशी शांतपणे घरात मिसळते. ती कुठेही आपला हक्क मिरवत नाही; पण तरीही तिची अनुपस्थिती जाणवू लागते इतका तिचा घरात सहज वावर आहे हे त्याला जाणवू लागलं होतं. स्वयंपाकघरात तिचं मनापासून काम करताना पाहून त्याच्या मनाने नोंद केली होती.

“नंदिनी फक्त आपली कर्तव्ये निभावत नाहीये तर आता ती या घरात स्थिरावते आहे; पण मग नंतर सहा महिन्यांनी ती स्वतःचं इथे, इथल्या लोकांत गुंतलेलं मन ती काढू शकेल? सहा महिन्यातल्या आठवणींना ती पुसून टाकू शकेल?”

दिवस सरत होते. नंदिनी आणि स्वराज यांच्या नात्यात बसलेली गाठ हळूहळू सैल होऊ लागली होती. त्यांना त्यांच्या संसारात छान रुळताना पाहून माधवरावांनीही सुटकेचा निःश्वास सोडला होता.

“चला, आम्ही जे केलं, जे झालं ते सर्वांच्या भल्यासाठीच झालं असं म्हणायला हरकत नाही. मोठी माणसं जे सांगून गेलेत ते खोटं नाही. ‘लग्नाच्या गाठी वर, स्वर्गातच बांधलेल्या असतात.’ या दोघांचं लग्न व्हावं हीच देवीआईची इच्छा होती. आता त्यांना एकमेकांबद्दल आपुलकी, जिव्हाळा वाटू लागला आहे. हळूहळू प्रेमही वाटू लागेल. सहवासाने एकमेकांची सवय झाली की, आपोआप प्रेम होतंच..”

स्वराज आणि नंदिनीला एकमेकांना समजून घेताना पाहून माधवराव हसून स्वतःशीच पुटपुटले.

बघता बघता आता स्वराज आणि नंदिनीच्या लग्नाला पंधरा दिवस उलटून गेले होते. नंदिनी सरपोतदारांच्या घरी छान रुळली होती. नोकरी घर अशी तारेवरची कसरत तिला जमू लागली होती. स्वराजलाही आता लवकरच त्याच्या कामावर रुजू व्हावं लागणार होतं. खरंतर शालिनीताईंची तब्येत अचानक बिघडल्याने तो सुट्टी टाकून गावी निघून आला आणि गावी आल्यावर आईवडिलांनी लगेच त्याला बोहल्यावर चढवलं होतं. एक चैतन्य सोडल्यास ऑफिसमध्ये त्याच्या लग्नाबद्दल कोणाला फारसं कळलेलं नव्हतं. आता मात्र पुन्हा नोकरीवर रुजू झाल्यावर ही गोष्ट जगजाहीर होणारच होती.

आज घर थोडं शांतच होतं. स्वयंपाकघरात भांड्यांचा आवाजही आज शांत झाला होता. नंदिनी ऑफिसला गेली होती आणि स्वराजही कोणत्यातरी कामानिमित्त बाहेर होता. अर्पिता, माधवरावांची थोरली सुन तिच्या खोलीत बसली होती. मनात कसलंसं वादळ घोंगावत होतं. ती जागेवरून उठली आणि कपाट उघडून उभी राहिली. कपाटाच्या खालच्या कप्प्यात तिचं लक्ष गेलं. नीट घडी घालून ठेवलेले ते फिकट गुलाबी, निळसर, पिवळे पांढऱ्या रंगाचे अगदी छोटे छोटे कपडे जे कधी वापरलेच नव्हते ते तिच्या नजरेस पडले. तिने एक कपडा हातात घेतला. किती मऊ. अगदी मऊ. उबदार इवलेसे झबली, स्वेटर्स हातमोजे, पायमोजे, छोटी छोटी दुपटी त्या सर्व वस्तूंवरून अलगद तिचा हात फिरला. क्षणभर तिच्या ओठांवर हसू आलं; पण दुसऱ्या क्षणाला लगेच तेच हसू विरघळलंही.

“हे सगळं माझ्यासाठी नव्हतंच.. हे सुख माझ्या नशिबात नाहीच का?”

हा विचार तिला छेदून गेला आणि त्यादिवशी घडलेला प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. स्वराज आणि नंदिनीच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सुनमुख पाहण्यासाठी त्याचबरोबर हळदीकुंकवासाठी शेजारच्या बायका घरी जमल्या होत्या. त्यावेळीस यमुनाआत्या म्हणाल्या होत्या,

“शालिनीताई आता दोन्ही मुलांची लग्नं झाली. लवकरच नातवंडं येऊ देत हो.. पाळणा फार लांबवू नका.. मोठ्या सुनेने बराच लांबवला. आता धाकट्या सुनेने तरी लवकरात लवकर मनावर घ्यावं म्हणजे झालं!”

त्यांच्या बोलण्याने सर्व बायकांत हशा पिकल्या पण अर्पिता खूपच व्यथित झाली.

“गेली पाच वर्ष ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते त्यांनी किती पटकन मनाचा तो कप्पाच बंद करून टाकला आणि दुसरा पर्याय आल्यावर मला सहजपणे बाजूला करून टाकलं! म्हणजे आता वंशाला दिवा मी नाही तर नंदिनी देणार.. इतकं सोप्पं वाटतं यांना?”

अर्पिताला दारात उभी असलेली नंदिनी आठवली. सशक्त सुदृढ, सुंदर देखण्या नंदिनीवर सगळ्यांच्या नजरा नकळतपणे खिळून होत्या. वंश… वारस… पुढे कोण? हे शब्द कुणी थेट तिच्याशी बोलले नव्हते; पण घरात ते शब्द हवेत तरंगत होते. अर्पिताने कपडा परत ठेवला. कप्प्याचं दार हळूच बंद केलं. आरशात पाहिलं. तोच चेहरा. तीच अर्पिता… पण कुठेतरी अपूर्ण.. अर्पिताला तिच्यातल्या अपूर्णत्वाची जाणीव झाली.

“मी कमी आहे का?”

हा प्रश्न तिने पहिल्यांदाच स्वतःला विचारला. खरंतर तिला नंदिनीवर राग आला नव्हता. तिला स्वतःचाच राग होता त्याचबरोबर ‘मातृत्व म्हणजेच स्त्रीची पूर्णता.’ हे ज्या लोकांनी नकळतपणे ठरवून टाकलं होतं, त्या सर्व लोकांवर तिचा राग होता. अर्पिताने साडीच्या पदराने डोळ्यांतून वाहणारं पाणी टिपलं आणि स्वतःला सावरत ती खोलीबाहेर पडली. बाहेर पडताना तिच्या मनात एकच विचार होता.,

“नंदिनीला आणलं म्हणून ही लोकं मला विसरून तर जाणार नाहीत ना?”


क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all