Login

तुम दे ना साथ मेरा.. २९

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेमकहाणी..

जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. २९
©अनुप्रिया


अर्पिता दारात उभं राहून विचार करू लागली. काही घटनावळी तिच्या डोळ्यांसमोर रुंजी घालू लागल्या. या पंधरा दिवसांत नंदिनीचं घरात वावरणं, स्वराजची न बोलता तिच्यावर थांबलेली नजर आणि त्याच्या नजरेत तिच्याबद्दल वाटणारा जिव्हाळा, आपुलकी तिने पाहिलं होतं. अर्पिताच्या मनात अचानक कडवट विचार चमकून गेला.

“ही अशीच राहिली तर? घरातली सगळी सूत्रं तिच्याच हातात जातील. मग माझी जागा? ही माझी जागा घेईल आणि मला या घरातून हद्दपार करेल. मग मी काय करू?”

अर्पिताला स्वतःची जागा, स्वतःचं स्थान याबद्दल असुरक्षितता वाटू लागली. वर्षानुवर्षं घरासाठी तिने जे काही केलं होतं ते सगळं तिला आठवलं. अर्पिताला स्वतःचा भूतकाळ आठवू लागला.

“सार्थकशी लग्न करून सरपोतदारांची थोरली सुन म्हणून मी या घराचा उंबरठा ओलांडला. अगदी त्या दिवसापासून मी या घराची आणि हे घर माझं झालं. किती वर्षे घरात राब राब राबले. स्वयंपाक, सणवार, जबाबदाऱ्या. पै पाहुणे, सोहळे सारं मनापासून सांभाळलं. घरासाठी इतकं सगळं केलं पण कोणी माझ्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, तरीही मी कधी तक्रार केली नव्हती; पण आता इतकं सगळं करूनही एक गोष्टीमुळे मला दुय्यम स्थान दिलं जाणार.. तिला धाकटी असून मानसन्मान, प्रेम, जिव्हाळा सगळं मिळणार आणि मी अशीच मागे.. मागे..”

अर्पिताच्या मनात नंदिनीबद्दल असूयेचं बीज रोवलं जाऊ लागलं. आपण आई होऊ शकत नाही ही एक गोष्ट तिला सतत टोचत होती.

अर्पिता स्वयंपाकघराच्या दारात थांबली होती. हातातली वाटी तशीच होती; आत जायचं होतं, पण पाय पुढे सरकत नव्हते. समोर नंदिनी सहजपणे भाजी काढत होती. कुणाला मदतीसाठी आवाज देणं नाही, हाक मारणं नाही, कुणाची वाट पाहणं नाही. ती स्वतःच भरभर कामं उरकत होती, जणू ती कायमपासूनच इथे राहत होती! नंदिनीच्या चेहऱ्यावर तो पहिल्या दिवसांचा संकोच उरला नव्हता. स्वयंपाकघरातला तिचा वावर अगदी सहज झाला होता. कुठल्या कपाटात काय आहे हे तिला विचारावं लागत नव्हतं. घर तिला ओळखीचं झालं होतं. आणि हीच गोष्ट अर्पिताला अस्वस्थ करत होती. कधीपासून असं सगळं चित्र तिच्या नजरेत येऊ लागलं हे तिचं तिलाच आठवेना.

स्वराज हॉलमध्येच वर्तमानपत्र वाचत बसला होता. वर्तमानपत्र हातात होतं, पण नजर मात्र वारंवार स्वयंपाकघराकडे जात होती. त्याने एक क्षणभरच नंदिनीकडे पाहिलं होतं पण त्याची नंदिनीचा ठाव घेणारी नजर अर्पिताच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नव्हती. तिच्या मनात विचार आला,

“सरपोतदारांच्या घरात स्वराज सर्वात मायाळू, घरातल्या सगळ्यांकडे लक्ष देणारा मुलगा आहे; पण आताचं त्याचं वागणं किती वेगळं आहे! किती बदललंय! एरवी त्याच्या वागण्यात बोलण्यात माझ्याबद्दल माया असायची, काळजी असायची. तो प्रेमाने माझी चौकशी करायचा; पण आता तो माझी साधी दखलही घेत नाहीये.”

अर्पिताने हलकेच मान वळवली.

“आपण उगाचच हे सगळं पाहतोय का?“

तिने स्वतःलाच प्रश्न विचारला. पण मन ऐकत नव्हतं. नंदिनी चहा घेऊन बाहेर आली.

“ताई, चहा घ्या..”

नंदिनीने हसून चहाचा कप तिच्यासमोर धरला. नंदिनीचा आवाज नम्र पण सहज होता. आवाजात अजिबात संकोच नव्हता. अर्पिताने हुंकार भरत चहाचा कप घेतला. नंदिनीने पुढे जाऊन स्वराजला चहा दिला आणि तीही सोफ्यावर बसून चहा घेत मोबाईलवरचे मेसेज पाहू लागली. अर्पिता मात्र तिथेच थांबली.

“ही नंदिनी अशीच राहिली तर?”

हा विचार पुन्हा मनात डोकावला.

“माझं सगळं जरी खरं असलं तरी पण एक गोष्ट कायम होती. एक अपूर्णता.. घराण्याला वारस नाही. हे शब्द मी जरी उच्चारले नाहीत तरी नातलगांनी, मित्रमैत्रिणींनी कळत नकळत कधी थेट तर कधी आडून आडून बोललं होतं. जाणवून दिलं होतं. वर्षानुवर्षं तो विचार मी गिळून ठेवला होता. कधी देवाच्या नावावर, कधी नशिबावर ढकलून दिला होता. आणि आता?”

तिची नजर नंदिनीवर स्थिरावली.

“आता घरात एक नवी सून आहे. शांत, संयमी. कुठेही पुढे न येणारी, पण तरीही हळूहळू सगळीकडे पोहोचणारी.. ही आता घरात छान रुळतेय..”

हा विचार अर्पिताच्या मनात आला आणि त्या विचारानेच तिला धडकी भरली. नंदिनी काही मागत नव्हती. म्हणूनच ती जास्त धोकादायक वाटत होती. अर्पिताने कप खाली ठेवला. तिचा हात किंचित थरथरत होता.

“आपण इतकी वर्षं इथे आहोत; पण हिच्या येण्याने सगळं बदलणार का?”

तिला स्वराजचं वाक्य आठवलं. कधी तरी तो सहज म्हणाला

“घर पुढे चालवायचं असतं.”

तेव्हा तिने त्याला फार अर्थ दिला नव्हता. आज मात्र त्या वाक्याला वेगळाच अर्थ जाणवत होता. तिने डोळे मिटले. ‘आपण वाईट नाही’ तिने स्वतःलाच समजावलं. आपण फक्त आपली जागा वाचवतोय. ती आतल्या खोलीकडे वळली. चेहऱ्यावर नेहमीसारखाच निर्विकार भाव होता. कुणालाही तिच्या मनात चाललेली खळबळ दिसली नाही.
पण मनात बीज पडलं होतं. ते बीज ईर्षेचं नसून भीतीचं होतं आणि अर्पिताला हेही माहीत होतं,

“भीती जेव्हा मूळ धरते, तेव्हा ती हळूहळू वागण्यात उतरते.”

आणि अर्पिताच्या मनात आज पहिल्यांदाच ते वागणं आकार घेत होतं.

क्रमशः
©अनुप्रिया

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all