Login

तुम दे ना साथ मेरा.. ३०

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेमकहाणी

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. ३०
©अनुप्रिया


नंदिनी स्वयंपाकघर आवरत होती. भांडी ठेवता ठेवता तिच्या मनात विचार सुरू होते.

“आज अर्पिताताई माझ्याशी फारशा बोलल्या नाहीत. एरवी एखादा सल्ला, एखादी सूचना, हे कर, ते कर असतंच. निदान कधी “झालं का सगळं?” असं सहज विचारणं असतंच; पण आज त्या काहीच बोलल्या नाहीत. चहा घेतानाही त्या तिथेच थांबल्या होत्या; पण त्यांनी माझ्याकडे नीट पाहिलंसुद्धा नाही. काय झालं असेल त्यांना? त्या माझ्याशी नीट बोलल्या का नसतील?”

नंदिनी विचारात पडली.

“कदाचित थकल्या असतील.”

तिने स्वतःलाच समजावलं.

सासरी येऊन नंदिनीला पंधरा दिवस झाले होते. ती घरातल्या माणसांच्या स्वभावाची सवय करून घेत होती. बऱ्याचदा सर्वांच्या मुडची कल्पना येणं कठीण व्हायचं; पण आता हळूहळू ती घरातल्या प्रत्येकाला थोडफार समजून घेऊ लागली होती. प्रत्येक घराची स्वतःची लय असते हे तिला माहित होतं. त्यामुळे त्या लयीत योग्य रीतीने बसण्याचा तिचा प्रयत्न सुरूच होता. तिने हॉलमध्ये बसलेल्या स्वराजकडे पाहिलं. स्वराज वर्तमानपत्र वाचत होता; पण तो काहीच बोलला नाही. ती पुन्हा तिच्या कामाकडे वळली. पण का कोणास ठाऊक! रोजच्या सारखं आज तिचं कामात मन लागत नव्हतं. मनात एक हलकीशी सल चिरून गेली. आज सगळं तिला थोडं वेगळं वाटत होतं. रात्री कपडे घडी घालताना अर्पिताताईंचा आवाज कानावर पडला.

“माझे हे कपडे इकडे माझ्या खोलीत ठेवलेस का?”

अर्पिताचा आजचा स्वर शांत होता, पण पूर्वीसारखा आपुलकीचा नव्हता. नंदिनीने पटकन होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली,

“हो ताई, ठेवलेत.”

अर्पिताने काहीच उत्तर दिलं नाही. ती सरळ तिथून निघून गेली. नंदिनी तिथेच तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभी राहिली. तिच्या आत कुठेतरी हलकंसं दडपण आलं.

“मी काही चुकीचं तर केलं नाही ना?”

हा प्रश्न पहिल्यांदाच तिच्या मनात आला. ती पलंगावर बसली. खोलीत शांतता होती; पण तिचं मन मात्र अशांत होतं.

“या इथे सासरी येताना मी स्वतःला ठरवून सांगितलं होतं, मी कुणाची जागा घेणार नाही, कुणाच्या आड येणार नाही. तरीही आज पहिल्यांदाच मला जाणवलं, की नुसतं असणंसुद्धा कधी कधी एखाद्याला किती अस्वस्थ करू शकतं!”

नंदिनी स्वतःशीच पुटपुटली आणि तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. अंधार दाटला होता. घर शांत होतं, पण त्या शांततेत काहीतरी बदलत असल्याची चाहूल होती. नंदिनीने हळूच डोळे मिटले.

“आपण जरा जपून राहायला हवं..”

हा विचार जसा तिच्या मनात आला आणि तिला कळून चुकलं,

“की घरातले बदल नेहमीच आवाज करत नाहीत; पण कधी कधी काही बदल फक्त आपल्या मनालाच जाणवतात.”

हल्ली रोजच अर्पिताचं बदलेलं वागणं नंदिनीला जाणवू लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळची घाई होती. नंदिनी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात आली; पण आज नंदिनीला सगळं थोडंसं विस्कळीत वाटत होतं. रोजच्या लागणाऱ्या वस्तू त्यांच्या नेहमीच्या जागेवर नव्हत्या. कणिक मळण्यासाठी तिने कपाटात ठेवलेली परात काढण्यासाठी हात घातला तर परात तिथे नव्हती. तिने दुसऱ्या, तिसऱ्या कपाटात पाहिलं पण तिथेही तिला परात दिसली नाही.

“ताई, परात कुठे ठेवलीये?”

अर्पिता देवघरातून बाहेर येत होती. तिने क्षणभर थांबून नंदिनीकडे पाहिलं.

“अगं, ती नेहमीच्याच जागी आहे. ते काय तिथे वरच्या कपाटात ठेवली आहे.”

अर्पिताचा स्वर सौम्य होता. कुठलाही टोमणा नव्हता. पण नंदिनी गोंधळली.

“पण नेहमी तर इथे खालच्या कपाटात असते. आज वरच्या कपाटात कशी गेली?”

तिच्या मनात विचार चमकून गेला.

“ओह… मला माहीत नव्हतं.”

“हं… सुरुवातीला सगळं गोंधळतंच.”

अर्पिता सहजपणे म्हणाली आणि पुढे निघून गेली. नंदिनीने वरचं कपाट उघडलं. परात तिथेच होती. तिचा हात क्षणभर थांबला.

“मीच चुकीच्या ठिकाणी शोधतेय का?”

तिने स्वतःलाच विचारलं. दुपारी पाहुण्यांसाठी चहा करायची वेळ आली. नंदिनीने साखरेची डबा उघडला. साखरेचा डबा रिकामा होता. आधी कधीही असं झालं नव्हतं.

“ताई, साखर संपलीये का?”

नंदिनीने अर्पिताला प्रश्न केला. अर्पिताने पटकन उत्तर दिलं,

“अगं मी सकाळीच आणून ठेवलीये. स्वयंपाकघरातल्या मागच्या कपाटात आहे बघ.”

नंदिनी गप्प राहिली. मागचं कपाट उघडलं. साखर खरंच तिथेच होती. पण ती नेहमीच्या जागी नव्हती. त्या दिवशी असंच दोन-तीन वेळा झालं. काही वस्तू नेहमीच्या जागेवरून दुसरीकडे हलवल्या सारख्या वाटल्या.. काही सवयी बदलल्या होत्या. कुणी तिला सांगितलं नव्हतं, कुणी रागावलं नव्हतं; पण तरीही नंदिनीला सारखं आपण काहीतरी चुकतोय असं वाटत होतं. संध्याकाळी स्वराज घरात आला.

“आज थकलीयस वाटतं.”

त्याने सहज विचारलं. नंदिनी हसली.

“थोडंसं.”

ती त्याला हे सगळं सांगू शकली नाही. कारण सांगण्यासारखं काहीच नव्हतं. सगळं अगदी बरोबरच होतं. पण तरीही मनात एक प्रश्न घर करून बसला होता. रात्री झोपताना तिला जाणवलं,

आज घर तिचं होतं, पण त्याची भाषा बदलली होती आणि ती भाषा तिला अजून नीट उमगत नव्हती.

नंदिनीने कुशी बदलली.

“कदाचित मला अजून नीट रुळायला हवं…”

तिने स्वतःलाच म्हटलं. पण त्या विचाराखाली कुठेतरी हलकीशी शंका पसरत होती जी अजून नाव न घेता हळूहळू मूळ धरत होती.


क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all