डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. ३४
©अनुप्रिया
©अनुप्रिया
दिवस पुढे सरत होते. आता नंदिनी सरपोतदारांच्या घरी छान रुळली होती. नंदिनी आणि अर्पितामधले गैरसमज हळूहळू गळून पडू लागले होते. नंदिनीच्या काळजी घेण्याने आणि डॉक्टरांच्या औषधोपचारांनी शालिनीताईंची प्रकृती सुधारू लागली होती. हळूहळू नंदिनीला स्वराजच्या वडिलांचा, माधवरावांचा प्रेमळ स्वभाव उमजू लागला. सहवासाने नंदिनीच्या मनातला माधवरावांबद्दलचा कडवटपणा कमी होऊ लागला होता. स्वराज आणि नंदिनीच्या मैत्रीचा प्रवासही सुरू होता.
सकाळची वेळ होती. घरात पुन्हा नेहमीसारखी लगबग सुरू झाली होती. स्वयंपाकघरातून फोडणीचा सुगंध येत होता. अर्पिता पोहे परतवत होती आणि नंदिनी बाजूला उभी राहून कांदे चिरत होती. दोघींच्या हालचालींमध्ये एक अनोळखी पण सुखावणारी शांतता होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. नंदिनीने हात पुसत दरवाजा उघडला. समोर मीरा उभी होती. मोठे काळे गॉगल्स, मोकळे केस, ओठांवर ठसठशीत लिपस्टिक आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाने भरलेलं हसू.. फारच मोहक दिसत होती ती!
“हाय!”
ती थेट आत शिरत म्हणाली. नंदिनी क्षणभर गोंधळली.
“या… या ना.”
मीरा घरभर नजर फिरवत होती जणू ती या घरात नव्याने आली होती आणि आपलं काहीतरी हरवलेलं शोधत होती!
“अर्पिता कुठे आहे?”
तिने सहज विचारलं.
“स्वयंपाकघरात..”
नंदिनीने उत्तर दिलं तसं मीरा थेट स्वयंपाकघराच्या दिशेला वळली. स्वयंपाकघराच्या दारात उभं राहूनच तिने विचारलं
“अरे वा! आज तर अर्पिताताई स्वतः पोहे करतायत!”
अर्पिताने वळून पाहिलं.
“अगं मीरा! कधी आलीस?”
“आत्ताच. म्हटलं अचानकच भेट द्यावी.”
मीरा तिच्याकडे पाहून हसली. तिने नंदिनीकडे नजर वळवली
“आणि ही.. काय बरं नाव हिचं? हं.. आठवलं.. नंदिनी.. बरोबर ना?”
“आणि ही.. काय बरं नाव हिचं? हं.. आठवलं.. नंदिनी.. बरोबर ना?”
अर्पिताने तिच्या प्रश्नावर होकारार्थी मान डोलावली..
“अच्छा! मग काय, आता घर छान चालायला लागलं असेल नाही का? नवी सुन, नवी एनर्जी…”
मीराने मान तिरकी करत खोचकपणे म्हणाली. तिचं वाक्य हवेतच विरून गेलं. नंदिनी हसली आणि म्हणाली,
“मी शिकतेय अजून.”
मीरा तिच्याकडे पाहून पुन्हा हसली; पण त्या हसण्यात उब नव्हती. मीरा खोचकपणे म्हणाली,
“दिसतंय ते.. काही लोक पटकन सगळं आपलंसं करून घेतात.”
तिच्या वाक्याने अर्पिताच्या हातातला चमचा निसटून खाली पडला. मीरा पुढे म्हणाली,
“म्हणजे बघ ना अर्पिता, पूर्वी या घरात काय कुठे असायचं, कोण काय करायचं हे सगळं तुलाच माहीत असायचं. पण आता ही नंदिनी सगळं पाहतेय म्हटल्यावर आता तू आरामात बसू शकतेस.”
हे बोलताना तिचा सूर गोड होता; पण शब्दांनी वेगळाच अर्थ धरला होता. नंदिनी काही बोलणार इतक्यात अर्पिता म्हणाली,
“मी बसलेली नाहीये. आज सगळं मीच करणार आहे.”
मीरा भुवया उंचावून म्हणाली,
“असं का? याचा अर्थ सवय सोडायला कठीण जात असणार.”
क्षणभर शांतता पसरली. नंदिनीने विषय बदलायचा प्रयत्न केला.
“मी चहा करू का?”
“नको.. मी बाहेरूनच पिऊन आलेय.”
आणि मग मीरा पटकन अर्पिताकडे वळून हळू आवाजात म्हणाली,
“तुला आठवतंय अर्पिता? आपण दोघी सकाळी स्वयंपाकघरात बसून किती गप्पा मारायचो.”
त्या वाक्यात आपण होतं. नंदिनी नव्हती. अर्पिताच्या चेहऱ्यावरची सहजता किंचित ढळली. मीरा ते पाहून मनातच हसली. तिला हवं ते मिळालं होतं. नंदिनी आणि अर्पितामध्ये पुन्हा एक हलकीशी रेघ उमटली. नंदिनीला अर्पिताच्या वागण्याबोलण्यात बदल जाणवला; पण ती शांत राहिली. मीरा मात्र मनात म्हणत होती,
“प्रत्येकवेळी भांडणाची गरज नसते. फक्त योग्य वेळी योग्य शब्द टाकले, की नाती स्वतःच डगमगायला लागतात.”
आणि अशारितीने सरपोतदार यांच्या घरी दिसताना हसतखेळत, गोड बोलत असली तरी पण घरातल्या शांततेला नकळत धक्का देत मीराची एन्ट्री झाली होती. मीराच्या बोलण्याने अर्पिता शांत झाली खरी पण तिच्या मनात नंदिनीबद्दल पुन्हा एकदा शंका निर्माण झाली होती.
अर्पिता रात्री उशिरापर्यंत जागी होती. तिच्या मनात मात्र गोंधळ होता. छताकडे पाहताना आठवणी नकळत मागे ओढू लागल्या. लग्नानंतरचं हे सासर.. या घरात अर्पिताने स्वतःला जुळवून घेतलं होतं. नवीन नातेसंबंध, नवीन जबाबदाऱ्या. तेव्हा कुणी तिला शिकवलं नव्हतं; पण घर नीट ठेवणं, सगळ्यांची काळजी घेणं हळूहळू तेच तिचं अस्तित्व बनलं होतं. तेव्हाच तिच्या कानावर पहिल्यांदाच शालिनीताईंचं वाक्य पडलं होतं.
“अर्पिता घर फार छान सांभाळते.”
ते कौतुक होतं; पण त्यातच एक चौकटही होती. घर सांभाळणारी बाई हीच तिची ओळख बनली. हळूहळू इतर ओळखी बाजूला पडत गेल्या. तिचं मत, तिच्या इच्छा हे सगळं “घर नीट सांभाळतेय ना?” या प्रश्नाखाली दबत गेलं.
वर्षांनुवर्षं ती या भूमिकेत इतकी रुळली की त्या बाहेर काही आहे हेच ती विसरली. आणि मग पहिला धक्का तिला तेव्हा बसला, जेव्हा तिच्या सासूबाई आजारी पडल्या होत्या. काही महिने अर्पिता पूर्णपणे त्यांच्यात गुंतली होती. त्या काळात घराची सूत्रं यमुआत्याकडे गेली होती. सगळं नीट चाललं होतं अगदी तिच्याशिवायही.. तेव्हा कुणी मुद्दाम काही केलं नव्हतं. पण अर्पिताला जाणवलं होतं, आपण नसतानाही सगळं सुरळीत चालू शकतं. तो विचार तिला आतून हादरवून गेला होता. तोच धागा पुन्हा नंदिनीच्या येण्याने हलला होता.
वर्षांनुवर्षं ती या भूमिकेत इतकी रुळली की त्या बाहेर काही आहे हेच ती विसरली. आणि मग पहिला धक्का तिला तेव्हा बसला, जेव्हा तिच्या सासूबाई आजारी पडल्या होत्या. काही महिने अर्पिता पूर्णपणे त्यांच्यात गुंतली होती. त्या काळात घराची सूत्रं यमुआत्याकडे गेली होती. सगळं नीट चाललं होतं अगदी तिच्याशिवायही.. तेव्हा कुणी मुद्दाम काही केलं नव्हतं. पण अर्पिताला जाणवलं होतं, आपण नसतानाही सगळं सुरळीत चालू शकतं. तो विचार तिला आतून हादरवून गेला होता. तोच धागा पुन्हा नंदिनीच्या येण्याने हलला होता.
“ती चांगली आहे, म्हणून मला त्रास होतोय? की मीच स्वतःला इतकं एका भूमिकेत अडकवून ठेवलंय?”
अर्पिताने कुशी बदलली. उशी ओलसर झाली होती. तिला आठवलं, एकदा कुणीतरी सहज म्हटलं होतं,
“आता तर घरात सून आली आहे, तुला आराम मिळेल.”
ते वाक्य ऐकताना तिला आनंद झाला नव्हता तर पोकळी वाटली होती. जणू आराम म्हणजे बाजूला होणं!
दुसऱ्या दिवशी सकाळी आरशासमोर उभी राहून तिने स्वतःकडे नीट पाहिलं. केसांत पांढरे धागे जाणवले. डोळ्यांत थकवा होता; पण अनुभवही होता.
“मी फक्त घर सांभाळणारी बाई नाही, तर मी एक माणूस आहे.”
ती स्वतःशीच म्हणाली,
नंदिनी स्वयंपाकघरात काम करत होती. अर्पिता तिथे आली. क्षणभर थांबली आणि म्हणाली,
“नंदिनी, काल जे बोललो… त्याबद्दल धन्यवाद.”
नंदिनी गोंधळली.
“ताई.. मला स्वतःलाच समजून घ्यायचं होतं. तुम्ही निमित्त झालात..”
नंदिनी हसली. तो हसणं अर्पितासाठी दिलासा होतं.
त्या दिवशी अर्पिताने पहिल्यांदाच स्वतःसाठी काही वेळ काढला. जुनी वही उघडली. ज्यात कधीकाळी तिने लिहिलेल्या कविता होत्या. पानांवरची अक्षरं जरी फिकी झाली असली, तरी भावना जिवंत होत्या. तिला आता उमगलं होतं,
“नंदिनीचं सरपोतदारांच्या घरी येणं म्हणजे शेवट नव्हता. तो एक आरसा होता ज्यात अर्पिताला स्वतःला नव्याने पाहता आलं.”
क्रमशः
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा