डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. ३५
©अनुप्रिया
©अनुप्रिया
रात्री जेवणाच्या टेबलवर सर्वजण असताना स्वराजने त्याच्या आईबाबांना पुन्हा ऑफिस जॉइन करण्याबद्दल सांगितलं. अर्पिताने शेजारी जेवणासाठी बसलेल्या नंदिनीकडे पाहिलं. ती शांतपणे ताटातला भात चिवडत बसली होती.
“अरे, मग नंदिनीचं काय? तिला घेऊन जाशील ना?”
अर्पिताने प्रश्न केला.
“आधी मी पुढे जाईन आणि मग तिथे सगळी व्यवस्था झाली की घेऊन जाईन.”
“नको.. इथे मी आईंना असं आजारी अवस्थेत सोडून येऊ शकत नाही. आणि माझा जॉब? तो मी सोडणार नाही.”
स्वराजच्या बोलण्यावर नंदिनी उत्तरली. स्वराज काहीच बोलला नाही. सत्य त्या दोघांनाच माहीत होतं.
“पण नंदिनी.. तुला स्वराजसोबत जावंच लागेल. नवरा आहे तुझा.. तो जिकडे राहील तिकडे तुला रहावंच लागेल ना?”
अर्पिता तिच्याकडे पाहत म्हणाली. नंदिनी स्वराजसोबत जाणार म्हटल्यावर मीराच्या मुठी आवळल्या जाऊ लागल्या. मुलगा जॉबसाठी पुन्हा पुण्याला जाणार म्हटल्यावर शालिनीताईंचा घास घश्यातच अडकला.
“जावंच लागेल का बाळा?”
“हो आई.. महत्वाचं काम आहे.”
“एक तर माझ्या आजारपणामुळे तुम्हाला कुठे बाहेर फिरायलाही जाता आलं नाही. देवदर्शन झाल्यानंतर तुम्ही घरातच आहात.”
“अगं काय तुझी तब्येत महत्वाची.. फिरणं काय नंतर होऊन जाईल. आणि आई आता मला ऑफिस जॉइन करावं लागेल. एक महत्वाचा क्लायंट येतोय. त्यामुळे मला जावं लागेल.”
शालिनीताईंच्या डोळ्यांत आसवं जमा होऊ लागली. माधवराव स्वराजला काही बोलणार इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. मोबाईल स्क्रीनवर त्याच्या बॉसचा नंबर दिसला. तो त्याच्याशी बोलण्यासाठी खुर्चीतून उठून बाहेर आला. मीरा त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती.
“अरे स्वराज आणि नंदिनी इथून निघून गेले तर मी इथे राहून काय करू? आणि मग ते तिकडे गेले की त्यांचा संसार सुरू होईल मग माझा स्वराज मला कसा मिळेल? नाही.. नाही मी असं होऊ देणार नाही. त्याला तिकडे जाऊ देणार नाही. मी त्याला दुसरं कोणाचं होऊ देणार नाही. स्वराज फक्त माझा आहे. फक्त माझा..”
मीरा स्वतःशीच पुटपुटली. ती काही बोलणार इतक्यात स्वराज आत आला.
“आई.. मला उद्याच निघावं लागेल. चल मी माझी बॅग भरतो. आलोच मी.”
“अरे असं काय करतोस? बायको असताना तू पॅकिंग करणार? काय गं नंदिनी बरं दिसतं का हे?”
अर्पिता मिश्किलपणे हसून म्हणाली.
“मी करते..”
असं म्हणून चेहऱ्यावरची एकही रेष हलू न देता नंदिनी जागेवरून उठली आणि डायनिंग टेबलावरचा पसारा आवरू लागली.
“हे राहू देत.. तू जा स्वराजची बॅग भरायला घे. मी आवरते सगळं आणि मदतीला मीरा आहेच. हो की नाही मीरा? असंही आपण दोघी पूर्वी स्वयंपाकघरात किती छान गप्पा मारत काम करायचो. सकाळीच म्हणाली होतीस ना? चला मग मीरादेवी आवरूयात..”
अर्पिता आळीपाळीने नंदिनी आणि मीराकडे पाहत म्हणाली. मीराने मात्र नाखुषीने मनातल्या मनात चरफडत तिच्याकडे पाहिलं आणि मान डोलावत भांडी उचलून सिंकमध्ये ठेवायला सुरुवात केली. नंदिनी आणि स्वराज खोलीत आले. नंदिनीने कपाटातून स्वराजचे कपडे काढले आणि त्याची बॅग भरायला सुरुवात केली. इतक्यात स्वराज म्हणाला,
“अगं राहू देत.. मी बॅग भरतो माझी..”
नंदिनी काहीच न बोलता बॅग भरत होती. बॅग भरता भरता तिने त्याच्याकडे न पाहताच म्हणाली,
“आता जाणारच आहात तर तिला भेटून सगळं सांगा. कोणाला असं अंधारात ठेवणं योग्य नाही. चार पाच महिन्यांचा प्रश्न आहे.. मग तुम्ही मोकळे व्हाल आणि तिच्याशी लग्न करू शकाल.”
“आणि तू? तू काय करणार?”
त्याने प्रश्न केला.
“मी? मी बघेन माझं मी..”
नंदिनीने त्याच्याकडे न पाहताच उत्तर दिलं. त्याने खाली मान घातली.
इकडे मीरा सगळं आवरून खोलीत आली. खोलीतला दिवा बंद केला. ती पलंगावर आडवी झाली. इतक्यात तिच्या मोबाईलची रिंग झाली. मोबाईलच्या प्रकाशने त्या अंधारलेल्या खोलीत किंचितसा उजेड पसरला. मोबाईल स्क्रीनवर राघवचं नाव झळकलं. तिने पटकन कॉल उचलला.
“हं..”
समोरचा आवाज थोडा गंभीर होता.
“मीरा, तू सांगितल्याप्रमाणे मी नंदिनीची सगळी माहिती काढली.”
“हं बोल राघव.. काय माहिती मिळाली तुला?”
तिचा आवाज थंड होता; पण आतून ती अस्वस्थ झाली होती.
“नंदिनीचं माहेर अतिशय साधं आहे. वडीलांचा बिझनेस आणि तिची आई गृहिणी आहे. तिचे वडील आणि आपले माधवकाका हे चांगले व्यावसायिक मित्र होते. त्यामुळेच त्यांनी नंदिनीला स्वराजसाठी पसंत केलं. तिच्या भावाच्या धंद्यात आपल्या माधवकाकांची पार्टनरशीप आहे ना? त्यामुळे तीही लग्नाला तयार झाली. नंदिनीला एक धाकटी बहीण आहे. तिचं शिक्षण अजून पूर्ण व्हायचं आहे. तिची फायनल परीक्षा होती म्हणून ती लग्नाला आली नव्हती. मीरा खुर्चीत रेलून बसली. राघवने संपूर्ण माहिती पुरवली होती. क्षणभर पूर्ण शांतता पसरली.
“आणि हो.. अजून एक गोष्ट.. स्वराजचं लग्न घाईने का केलं माहितीये?”
“का?”
मीराचा आवाज कापरा आला. मीरा डोळे विस्फारून त्याचं बोलणं ऐकत होती. मीरा मोठ्याने हसली. ते हसू थरारक होतं. मीरा हळूहळू पलंगावरून उठून खिडकीजवळ उभी राहिली.
“राघव…”
ती शांत आवाजात म्हणाली,
“आता खरी खेळी सुरू होणार आहे.”
क्रमशः
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा