Login

तुम दे ना साथ मेरा.. ३६

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेमकहाणी..
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. ३६
©अनुप्रिया


खिडकीबाहेर अंधार दाटला होता. मीराने पडदा थोडासा बाजूला केला. बाहेरच्या रस्त्यावरचे दिवे लुकलुकत होते.

“फक्त चार पाच महिने..”

ती स्वतःशीच पुटपुटली.

“चार पाच महिन्यांचा काळ पुरेसा आहे. या अवधीत माणसाचं सारं आयुष्य उलटवता येतं नंदिनी..”

ती हलकेच हसली. त्या हास्यात कोमलता नव्हती फक्त जिद्द होती.

दुसरीकडे खोलीत नंदिनीने बॅगची साखळी लावली. स्वराज अजूनही शांत उभा होता.

“तिकडे जाऊन सगळं बदलणार आहे,”

तो हळूच म्हणाला.

“बदल तर केव्हाच झाला आहे स्वराज.. फक्त स्वीकारायला वेळ लागतोय.”

नंदिनीने थोड्या थकलेल्या आवाजात उत्तर दिलं. तो तिच्याकडे पाहत राहिला. इतकं स्पष्ट बोलूनही तिच्या डोळ्यांत कुठलाही आरोप नव्हता. अजूनही ती स्वराजला फक्त समजून घेत होती.

“नंदिनी… मला..”

“नको.. आता काही बोलून उपयोग नाही. जे बोलायचं आहे ना ते योग्य व्यक्तीला बोला.. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.”

ती त्याला थांबवत म्हणाली. स्वराजने मान खाली घातली. तो क्षण त्याच्यासाठी पराभवाचा होता. पुण्याला जाण्याची तयारी घरभर पसरली होती; पण प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे वादळ उठले होते. शालिनीताई देवघरात बसून माळ फिरवत होत्या.

“देवा… माझ्या मुलाला योग्य वाट दाखव.”

त्यांचे ओठ हलकेच हलले. अर्पिता मात्र सगळं पाहत होती. मीराचे बदललेले हावभाव, नंदिनीची अस्वस्थ शांतता आणि स्वराजची गोंधळलेली नजर.. काहीतरी भयंकर घडणार आहे याची जणू अर्पिताला चाहूल लागली होती. रात्री उशिरा सगळे झोपले असताना मीराने पुन्हा एकदा राघवला फोन केला.

“राघव, मला तिच्या बहिणीबद्दल अजून माहिती हवी आहे.”

“का? त्या मुलीचा याच्याशी काय संबंध?”

“संबंध?”

मीरा मंद हसली आणि हळू आवाजात म्हणाली,

“राघव.. तुला सांगितलंय तेवढंच काम तू करायचं. जास्त डोकं चालवायचं नाही. नसत्या चौकश्या करायच्या नाहीत. अरे, या खेळात तू अजून खूप नवीन आहेस. तुला माहितीये? कोणत्याही खेळात सगळे मोहरे महत्वाचे असतात, फक्त योग्य वेळी योग्य चाल टाकावी लागते.”

फोन कट झाला. मीरा पलंगावर बसली. अंधारात तिचे डोळे चमकत होते.

“स्वराज, तू पुण्याला जाणारच आहेस. पण परत येताना तुझं आयुष्य तुझ्या हातात नसेल.”

ती स्वतःशीच पुटपुटली. तिच्या चेहऱ्यावर असुरी आनंद पसरला. स्वराजची पुण्याला जाण्याची तयारी सुरू झाली. नंदिनी सकाळी लवकर उठली. अंघोळ वगैरे उरकून ती स्वयंकपाक घरात आली. पण का कोणास ठाऊक! स्वराज जाणार म्हणून तिच्या चेहऱ्यावर उदासी पसरली होती. नाही म्हटलं तरी ते दोघे एक महिना सोबत होते. सवयीने का होईना दोघांत मैत्र फुलू लागलं होतं. आणि आता तो निघून जाणार होता. त्याच्या गर्लफ्रेंडला त्याच्याबद्दल सांगणार होता. तिला माहित होतं, त्यांचं हे नातं आता फार काळ टिकणार नव्हतं. सहा महिन्यांचा प्रवास संपला की, एकमेकांपासून वेगळं व्हावंच लागणार होतं. तिने दीर्घ सुस्कारा टाकला आणि गॅसवर चहाचं आधण ठेवलं. सर्वांच्या नाश्त्याची तयारी करायची होती. थोड्याच वेळात अर्पिताही किचनमध्ये आली.

“नंदिनी आज आपण नाश्त्याला थालीपीठ करूया. चालेल ना?”

नंदिनीने मान डोलावली. इतक्यात दारावरची बेल वाजली.

“एवढ्या सकाळी कोण आलं आता? दूधवाला तर येऊन गेला मग?”

अर्पिता प्रश्नार्थक नजरेने नंदिनीकडे पाहत म्हणाली.

“थांबा.. मी बघते ताई..”

असं म्हणत हात पुसत नंदिनी बाहेर आली. दार उघडताच समोर उभी असलेली ती ओळखीची व्यक्ती पाहून तिच्या चेहऱ्यावर क्षणात आनंद फुलला आणि डोळे आश्चर्याने चमकले.

“अधिरा!”

“ताई…”

अधिराने दोन पावलं पुढे टाकत तिला मिठी मारली. नंदिनीची मिठी घट्ट होत होती. जणू सगळ्या दिवसांची, महिन्यांची दुरावलेली ओढ एकाच वेळी उतरवत होती.

“कधी आलीस? कळवलंसुद्धा नाहीस!”

“सरप्राईज! म्हटलं अचानक जाऊन तुला मस्त सरप्राईज द्यावं.”

नंदिनीच्या प्रश्नावर ती हसून म्हणाली.

“वेडाबाई.. चल आत ये..”

हसून नंदिनीने तिचं स्वागत करत तिला हाताला धरून आत आणलं. अधिरा सभोवार नजर फिरवत पाऊल पुढे टाकत आत आली. एवढा मोठा भव्य बंगला पाहून तिचे डोळे आनंदाने चमकत होते.

“आईबाबा कसे आहेत अधिरा?”

“अगं ताई, कालच परीक्षा संपली. आईकडून तुझा पत्ता घेतला आणि मी थेट इथेच आले. तुझं लग्न सगळं इतकं घाईत झालं की मला येताच आलं नाही.”

अधिराच्या आवाजात अपराधी भाव होता. नंदिनीने तिच्या गालावरून हात फिरवला.

“ये ना आत. दमली असशील.”

दोघी आत आल्या. अर्पिताकडे पाहत नंदिनी आनंदाने म्हणाली,

“ताई.. मी माझी धाकटी बहीण अधिरा.. पुण्यात शिकायला असते. माझं लग्न झालं तेंव्हा तिची परीक्षा सुरू होती ना.. त्यामुळे लग्नाला नव्हती ती. नाहीतर साऱ्या लग्नात अशी छान मिरवली असती ना काय सांगू!

“हो का? अरे व्वा! छानच.. बरं झालं आलीस. तुझ्या येण्याने नंदिनी किती आनंदी झालीय बघ.”

अर्पिता हसून म्हणाली.

“काय घेशील? चहा की कॉफी? नाही तर फ्रेश होऊन ये आणि डायरेक्ट नाष्टाच करतेस का?”

अर्पिता बोलत असताना स्वराज हॉलमध्ये आला. हातातल्या मोबाईलमध्ये त्याचं लक्ष होतं. डोक्यात ऑफिसचे विचार घोळत होते. तो चालत पुढे आला.

“स्वराज…”

अधिरा जागीच थबकली. नंदिनीने सहज ओळख करून द्यायला तोंड उघडलं; पण त्याआधीच अधिराच्या तोंडून अस्पष्टसे शब्द बाहेर पडले. ती थेट स्वराजकडे पाहत राहिली. क्षणभरासाठी काय बोलावं तिला समजेना. तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलू लागले. घरात नंदिनीला पाहून तिच्या चेहऱ्यावर जो आनंद पसरला होता तो क्षणार्धात गायब झाला. तिच्या भावोजीना भेटण्याची इच्छा, उत्सुकता दुसऱ्या क्षणाला मावळून गेली. समोर स्वराजला पाहून तिला जबरदस्त धक्का बसला होता. तोच धक्का स्वराजच्या चेहऱ्यावरही उमटला.

“तू?”

दोघांच्याही तोंडून शब्द एकाच वेळी बाहेर पडले. दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं होतं. खूप मोठा धक्का बसला होता. नंदिनी गोंधळून दोघांकडे पाहू लागली. तिने त्यांना विचारलं,

“तुम्ही… एकमेकांना ओळखता का?”

अधिराने पटकन नजर वळवली

“नाही… म्हणजे… ओळखत होतो. आधी.”

स्वराज गोंधळून तिच्याकडे पाहत उभा राहिला. आवाज संयत ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणाला,

“ती तिच्या कॉलेजच्या प्रोजेक्ट्स च्याकामानिमित्त माझ्या ऑफिसमध्ये कधीतरी आली होती.”

अधिराने होकारार्थी मान हलवली; पण तिच्या डोळ्यांत काहीतरी वेगळंच म्हणजे आश्चर्य, संभ्रम आणि थोडंसं दुखावलेपण स्पष्ट दिसत होतं.

“मला माहित नव्हतं, तू इथे…”

अधिराने स्वराजकडे पाहत वाक्य अर्धवटच सोडलं. तिच्या डोळ्यांत एक अनामिक वेदना स्पष्ट दिसत होती.

“अधिरा, तू आधी आमच्या खोलीत चल, फ्रेश हो. मग यानिवांत बोलूया.”


नंदिनी अधिराकडे पाहत म्हणाली.

क्रमशः
© अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”