डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. ३७
©अनुप्रिया
©अनुप्रिया
नंदिनी अधिराला घेऊन खोलीकडे वळली. अधिरा चालत होती; पण पाय जड झाले होते. तिच्या मनावर मनामनाचं ओझं झालं होतं. काय घडतेय तिला काहीच समजत नव्हतं.
“स्वराज, माझा प्रियकर हा माझ्याच बहिणीचा नवरा? कसं शक्य आहे हे? आणि मलाच माहित नाही?”
अधिराची डोक्यात विचार सुरू झाले. उंच कड्यावरून कोणीतरी ढकलून द्यावं आणि कपाळमोक्ष व्हावा असं तिला वाटून गेलं. डोळ्यांत पाणी जमा होऊ लागलं. दरवाजा बंद होताच तिने सुटकेचा श्वास घेतला.
“ताई… हा… तो…”
तिचा आवाज थरथरत होता.
“काय झालं अधिरा? तू इतकी गोंधळलेली का आहेस?”
नंदिनीने काळजीने विचारलं. अधिरा पलंगावर बसली. क्षणभर तिने डोळे मिटले. डोक्यात जुन्या आठवणींचा कल्लोळ माजला होता. फोन कॉल्स, अपूर्ण वाक्यं, अचानक तुटलेला संपर्क आणि आज समोर उभा असलेला तोच चेहरा..
“ताई, स्वराज… तो…”
अधिराचे शब्द तोंडातच थांबले.
“काय झालंय? स्वराज काय? त्याने काय केलं? त्याचा काही प्रॉब्लेम आहे का?”
नंदिनीने घाबरून विचारलं.
“म्हणजे.. तसं काही नाही.”
अधिराने पटकन सावरत म्हणायचा प्रयत्न केला; पण तिच्या डोळ्यांतलं पाणी काही लपत नव्हतं. नंदिनी तिच्याजवळ बसली. तिचा हात हातात घेत म्हणाली,
“अधिरा, काय झालंय सांग ना.. तू माझ्याशी तुझ्या मनातलं बोलू शकतेस. मी ऐकून घेईन. तू मला काहीही सांग, तुला त्रास होत असेल तर मला कळायलाच हवं ना?”
“काही नाही.. मी थोडा आराम करते मग येते. चालेल?”
“ठीक आहे.. तू आराम कर.. मी थोड्या वेळाने तुला उठवायला येते.”
अधिराच्या प्रश्नांवर नंदिनी उत्तरली आणि तिला आराम करायला सांगून ती बाहेर हॉलमध्ये आली. बाहेर हॉलमध्ये स्वराज अस्वस्थपणे चालत होता. अर्पिता त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत होती.
“स्वराज, तू ठीक आहेस ना?”
तिने विचारलं.
“हो… हो वहिनी..”
तो खोटं हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला; पण त्याचा चेहरा पांढराफटक पडला होता. त्याच क्षणी जिन्यावरून मीराने हे दृश्य पाहिलं. स्वराजची घालमेल, बंद झालेली खोली आणि अर्पिताची प्रश्नार्थक नजर सगळं तिच्या डोळ्यांत टिपलं गेलं. तिच्या चेहऱ्यावर असुरी आनंद पसरला. छद्मी हसत ती मनातच पुटपुटली,
“पहिला मोहरा हललाय..”
ती गालातल्या गालात हसत हसली. तिचं ते तिचं ते खूप शांत वाटणारं हसू फारच धोकादायक ठरणार असू शकणार होतं. इतक्यात नंदिनी खोलीबाहेर आली.
“अधिरा जरा थकली आहे. थोडावेळ आराम करून, फ्रेश होऊन येतेय..”
असं म्हणत तिने हसत सगळ्यांकडे पाहिलं. तिच्या आवाजात कुठलाही संशय नव्हता, फक्त बहिणीबद्दलची काळजी दिसत होती. स्वराजने मान हलवली.
“हो… ठीक आहे.”
अर्पिता किचनकडे वळली.
“मी नाश्ताचं बघते.”
हॉलमध्ये क्षणभर शांतता पसरली. स्वराज खिडकीजवळ उभा राहिला. बाहेर बघत होता; पण डोळ्यांत साचलेल्या पाण्यामुळे समोरचं काहीच दिसत नव्हतं. सारं धूसर झालं होतं आणि डोक्यात फक्त एकच नाव घुमत होतं.. ‘अधिरा..’
“ती इथे कशी?”
तो स्वतःशीच पुटपुटला.
“मी तिला पुण्याला गेल्यावर भेटणारच होतो. मला तिला भेटून हे सगळं सांगायचं होतं. पण अधिरा ही नंदिनीची धाकटी बहीण असेल असं मुळीच वाटलं नव्हतं. असं कसं झालं? आता काय करू? आता मी पुण्याला कसं जाऊ? मी आता निघून गेलो तर ती मला पळपुटा समजली तर? नाही अधिरा.. मी पळपुटा नाहीये. इथली परिस्थितीच तशी निर्माण झाली होती त्यामुळे मला इथे यावं लागलं कसं सांगू तुला?”
स्वराज व्याकुळ झाला होता.
त्याचवेळी वरच्या मजल्यावर अधिरा आरशासमोर उभी होती. चेहरा वेदनेने काळवंडून गेला होता. डोळ्यांतलं तळं रितं होत नव्हतं.
“देवा… ही भेट इथे, या घरात… असं कसं? स्वराजने मला काहीच कसं सांगितलं नाही? मी परीक्षेत गुंतले तर याने गावी येऊन थेट लग्नाच्या बोहल्यावरच चढला. आई आजारी आहे. मला तात्काळ जावं लागेल. मी परत आल्यावर सविस्तर सांगेन तुला असं म्हणणारा स्वराज इथे माझ्याच बहिणीसोबत लग्न करतो? आईबाबांना सरपोतदारांचा धाकटा मुलगा.. त्याच्याशी नंदिनीताईशी लग्न आहे इतकंच सांगितलं होतं पण तो स्वराज असेल असा विचार माझ्या मनातसुद्धा आला नाही. काय होऊन बसलं हे?”
तिने हात घट्ट मुठीत आवळले. ती दार उघडणार इतक्यात तिचा फोन वाजला. अधिराने फोन पाहिला. मोबाईल स्क्रीनवर एक अनोळखी नाव झळकलं. अधिरा क्षणभर थांबली आणि मग तिने फोन उचलला.
“हॅलो?”
“हां बोला.. कोण बोलताय?”
“ते महत्वाचं आहे का? तू पोचलीस वाटतं..”
मीरा अतिशय गोड आवाजात मवाळपणे म्हणाली. ती तिच्याशी हळू आवाजात कुजबुजत म्हणाली,
“तू आणि स्वराज…”
अधिरा चांगलीच हादरली.
“तुम्ही कोण आहात? आणि तुम्हाला कसं..”
मीरा हलकेच हसून अधिराला म्हणाली,
“मी मीरा.. आता याच घरात आहे. तुझ्या मदतीला हजर असणार आहे. अधिरा, काळजी करू नकोस. कुणालाच काही कळणार नाही… आत्तातरी.”
अधिराच्या कपाळावर घाम आला.
“मी काहीच बोलणार नाही.”
“मलाही तेच हवंय..”
अधिराच्या बोलण्यावर मीरा म्हणाली,
“कधी कधी सत्य उघडण्याआधी थोडं थांबावं लागतं. नाहीतर खेळ रंगत नाही.”
अधिरा पलंगावर बसली. तिच्या डोळ्यांसमोर नंदिनीचा निरागस हसरा चेहरा आला.
“ताई… मी तुला दुखावू शकत नाही.”
ती स्वतःशीच पुटपुटली.
खाली हॉलमध्ये स्वराज नंदिनीला चहा देताना म्हणाला,
“नंदिनी, मला तुझ्याशी काही बोलायचं.”
“काय झालं? आणि कशाबद्दल बोलायचे आहे?”
नंदिनी त्याच्याकडे पाहत म्हणाली.
“अधिरा आलीय ना म्हणून तिच्याशी थोड्या गप्पा माराव्या म्हटलं? आता बरं वाटतंय तुम्हाला? आणि कधी निघायचं तुम्हाला?”
स्वराजचा हात क्षणभर थरथरला; पण नंदिनीच्या नजरेत अजूनही त्याच्यावर कधीही न तुटणारा पूर्ण विश्वास होता. आणि जिन्यावर उभी असलेली मीरा हे सगळं पाहत होती.
“चार-पाच महिने…”
ती मनात म्हणाली.
“यांचं लग्न तुटण्यासाठी आणि मला माझ्या स्वराजला मिळवण्यासाठी पुरेसे आहेत.”
क्रमशः
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा