Login

तुम दे ना साथ मेरा.. ३८

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेमकहाणी
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. ३८
©अनुप्रिया


“कधी निघायचं तुम्हाला?”

नंदिनीने स्वराजला विचारलं.

“थोड्याच वेळात निघेन मी.”

“ठीक आहे.. मग मी पटकन तुमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवते. मग अधिरालाही बोलावते. तिनेही काही खाल्लं की नाही कोणास ठाऊक!”

असं म्हणत नंदिनी स्वयंपाकघरात गेली. सर्वांसाठी तिने आणि अर्पिताने मिळून नाष्टा बनवला. ती अधिराला बोलवायला गेली तेव्हा ती डोळे मिटून बिछान्यात पडून होती. म्हणून मग नंदिनी तिला न उठवता तशीच तिला आराम मिळावा म्हणून तिथून निघून पुन्हा डायनिंग टेबलापाशी आली. शालिनीताई, माधवराव, सार्थक, स्वराली, अर्पिता सर्वांनी मिळून नाष्टा केला. पण आज घरात नेहमीपेक्षा वेगळीच शांतता होती.

थोड्याच वेळात स्वराज पुण्याला जायला निघाला. त्याने बॅगेची शेवटची साखळी लावली. त्याचे हात क्षणभर थांबले. काहीतरी विसरल्यासारखं वाटलं; पण नेमकं काय, हेच त्याला कळेना. तो बॅग घेऊन बाहेर आला. नंदिनी देवघरात दिवा लावत होती. कापसाची वात पेटताच तिच्या चेहऱ्यावर उजेड पसरला. स्वराज जागीच थांबला. देव्हाऱ्यात लावलेल्या मंद प्रकाशात त्याला थोडं सुरक्षित वाटत होतं. भक्तिभावाने भरलेला क्षण त्याला खूप ओळखीचा वाटू लागला. आता मात्र तिथून त्याच पाऊल निघेना. जणू त्याचे पाय अचानकपणे जडावले होते!

“ इतक्यात निघालात?”

नंदिनीने मागे वळून पाहत विचारलं.

“हो.. लवकर पोहचायचं आहे.”

तो शांत आवाजात म्हणाला. नंदिनी आरतीचं ताट घेऊन त्याच्याजवळ आली. तिने त्याच्या हातावर प्रसाद ठेवला. स्वराजनेही प्रसादाला माथ्याला लावून तो तोंडात टाकला. नंदिनीने आरतीचं ताट देव्हाऱ्यासमोर ठेवलं आणि ती स्वराजजवळ आली आणि त्याची लॅपटॉपची बॅग त्याच्या हातात देत म्हणाली,

“पुण्याला गेल्यावर नीट जेवा. स्वतःकडे लक्ष द्या.”

स्वराजने होकारार्थी मान हलवली. काहीतरी बोलण्यासाठी तो पुढे झाला; पण शब्द गळ्याशीच अडकले. तिच्या डोळ्यांत अजूनही निखळ न तुटलेला विश्वास होता.

“मी… फोन करेन..”

तो इतकंच बोलू शकला. नंदिनी किंचित हसली.

“हो करा.. मी वाट पाहिन तुमच्या कॉलची..”

त्या हास्यात अपेक्षा होती; कोणतीही शंका नव्हती. बाहेर पडताना त्याची नजर क्षणभर वरच्या मजल्याकडे गेली. अधिराच्या खोलीचं दार बंद होतं. आत शांतता होती; पण त्याला माहीत होतं. ती शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता होती. तो नजर वळवून पुढे निघाला. दारात शालिनीताई उभ्या होत्या. स्वराजने वाकून नमस्कार केला.

“देव तुझ्या पाठीशी राहो,”

म्हणत त्यांनी कपाळावर हात ठेवला.

अर्पिता थोडं दूर उभी होती. तिची नजर त्याच्या चेहऱ्यावर थांबली.

“सगळं ठीक होईल.”

ती हळू आवाजात म्हणाली. जणू हे ती स्वराजला नाही तर ती स्वतःलाच समजावत होती! माधवरावांना नमस्कार करून स्वराज बाहेर आला. शालिनीताई, माधवराव, नंदिनी आणि अर्पिता सर्वजण त्याला निरोप देण्यासाठी दारात उभे उभे होते. शालिनीताईंच्या डोळ्यांत पाणी होतं. स्वराज गाडीत बसला. गाडी सुरू झाली आणि घर मागे पडू लागलं. खिडकीबाहेर झाडं, रस्ते, ओळखीचे वळणं मागे सरकत होती; पण त्याच्या डोक्यात फक्त दोन चेहरे उभे होते. एक नंदिनी आणि दुसरा अधिराचा.. जसंजशी गाडी पुढे जाऊ लागली. त्याचं मन भूतकाळाच्या दिशेने धावू लागलं. इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. मोबाईलच्या स्क्रीनवर मीराचं नाव झळकलं पण त्याने कॉल उचलला नाही. गाडी पुढे पुण्याच्या दिशेने धावत होती;पण स्वराजला पहिल्यांदाच स्पष्ट जाणवलं की, हा प्रवास फक्त ऑफिससाठी नव्हता तर हा प्रवास त्याला स्वतःपासून दूर नेत होता.

गाडीने आता तिचा वेग घेतला. स्वराज सीटला रेलून बसला. खिडकीबाहेर धूसर होत जाणारी दृश्यं पाहत राहिला; पण मन मात्र आत कुठेतरी अडकून पडलं होतं. डोळे मिटताच पुन्हा तो चेहरा पुन्हा समोर आला. निरागस, अवखळ, बडबडी अधिरा..

त्या दिवशीची ती कॉर्पोरेट ऑफिसची दुपार.. दुपारी लंच घेऊन सर्वजण आपापल्या कामाला लागले होते. स्वराजची एका महत्वाच्या क्लायंटसोबत मिटिंग होती. त्यामुळे तो प्रेझेंटेशन बनवण्यात गुंग होता. इतक्यात ऑफिसचा शिपाई सदाभाऊ तिथे आला.

“राजसाहेब तुम्हाला मोठ्या साहेबांनी त्यांच्या केबिनमध्ये ताबडतोब बोलावलंय.”

स्वराजने त्याचं बोलणं ऐकलं आणि लॅपटॉपवरच्या प्रेझेंटेशनवरून नजर न हटवताच स्वराज विचारलं.

“हो आलोच लगेच. पण मला सांग, सरांच्या केबिनमध्ये आता कोण आहेत?”

“ते बडोद्याचे मिरचंदानी साहेब आलेत. साहेबांच्या केबिनमध्ये बसलेत.”

“अरे बापरे! आले का ते? त्याच मीटिंगची तयारी करत होतो मी.. चैतन्य साहेबांनाही मी मिटिंगसाठी साहेबांच्या केबिनमध्ये बोलावलंय असा माझा निरोप दे.. तोपर्यंत मी आलोच.”

असं म्हणत स्वराज त्याचा लॅपटॉप उचलून खुर्चीतून उठला आणि तो डायरेक्टर साहेबांच्या केबिनच्या दिशेने चालू लागला. इतक्यात त्याची नजर रिसेप्शनजवळ उभी असलेल्या मुलीकडे गेली. गोरा रंग, टपोरे डोळे, चाफेकळी नाक काळेभोर लांबसडक केस, गुलाबी ओठांच्या पाकळ्या.. हसताना दिसणारी तिची दंतपंक्ती आणि गालावर पडणारी गोड खळी.. तिने परिधान केलेल्या निळी जीन्स आणि त्यावर व्हाईट टॉपमध्ये तिचं मॉडर्न लुक तिला खुलून दिसत होतं. आणि तिच्या हातात फाईल, डोळ्यांत आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर थोडीशी घाई स्पष्ट दिसत होती. वाऱ्याच्या झुळकेने तिच्या चेहऱ्यावर येणारी केसांची बट तिला उगीच सतावत होती.

“हाय!!”

त्याच्या तोंडातून आपसूकच शब्द बाहेर पडले. काही क्षण तो तिच्याकडे पाहतच राहिला. मागून चैतन्य आवाज देतोय हेही त्याच्या लक्षात आलं नाही. त्याने हलवून जागं केल्यावर स्वराज भानावर आला.

“हां बोल ना..”

“अरे कधी पासून आवाज देतोय राज.. कुठे लक्ष आहे तुझं?”

अजूनही त्याचं लक्ष तिच्याकडेच होतं. इतक्यात एच आर डिपार्टमेंटमधली सलोनी त्याच्या जवळ येत म्हणाली,

“सर, सरांनी तुम्हाला त्या मुलीला भेटून घ्यायला सांगितलंय..”

“तिला थोडा वेळ बसायला सांगतेस? मी पटकन आलोच.”

सलोनीने मान डोलावली. स्वराज आणि चैतन्य मीटिंगसाठी गेले. मीटिंगमध्येही त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. कधी एकदा मीटिंग संपतेय असं त्याला झालं होतं. अखेर मीटिंग संपली आणि तो धावतच बाहेर आला. ती बाहेर स्वागत कक्षेत ठेवलेल्या सोफ्यावर बसली होती. हातात मोबाईलचा चाळा सुरू होता. तिला तिथे बसलेलं पाहून त्याने सुटकेचा निःश्वास टाकला.

“थँक गॉड! मला वाटलं गेली की काय?”

तो स्वतःशीच गालातल्या गालात हसत पुटपुटला.

“सलोनी त्यांना आत पाठव.”

सलोनीला त्या मुलीला त्याच्या केबिनमध्ये पाठवण्यास सांगून त्याच्या केबिनमध्ये निघून गेला आणि त्याच्या खुर्चीत जाऊन बसला. इतक्यात केबिनच्या दारावर टकटक झाली.

“येस…”

“मे आय कम इन सर?”

दार अर्धवट उघडत तिने विचारलं.

“ओह येस प्लीज..”

ती आत केबिनमध्ये आली. त्याने खुणेनेच खुर्चीत बसायला सांगितलं. आभार मानत ती खुर्चीत येऊन बसली

“सर, मी अधिरा कॉलेज प्रोजेक्टसाठी अपॉइंटमेंट आहे. एच आरने सांगितलं होतं.. ”

स्वराजने तिच्याकडे पाहिलं आणि क्षणभर तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना. जणू काही शब्द हरवून गेले होते! कसंबसं स्वतःला सावरत तो टेबलवर मांडलेल्या तिच्या प्रोजेक्टकडे पाहू लागला. अधिरा त्याच्या समोर बसून त्याला प्रोजेक्ट समजावून सांगत होती. तर्कशुद्ध, अभ्यासपूर्ण, आत्मीयतेने ती आपला विषय मांडत होती. बोलताना मधेच तिचे डोळे चमकत होते. स्वराज लक्ष देऊन तिचं बोलणं ऐकत होता; पण लक्ष तिच्या शब्दांपेक्षा तिच्या सहजतेकडे त्याचं अधिक लक्ष होतं.

“सर तुम्ही फारच लक्ष देऊन ऐकत होतात.”

तिचं बोलणं संपल्यावर ती हसून म्हणाली.

“कारण विषय महत्त्वाचा आहे.”

वेळ मारून नेण्यासाठी स्वराज काहीतरी बोलून गेला. खरंतर विषय महत्वाचा नव्हता तर त्याच्यासाठी ती महत्वाची वाटू लागली होती.

“सर, मला तुमच्या कंपनीत एक महिना इंटर्नशिप करायला मिळेल का? म्हणजे माझा प्रोजेक्ट संपला की मी जाईन..”

त्याने तिला इंटर्नशिपसाठी परवानगी दिली.

“ठीक आहे.. मी आमच्या सरांशी बोलून घेतो आणि त्यांच्याकडून होकार आला की, तसं आमची एच आर सलोनी मॅडम तुम्हाला कळवेलच. तुम्ही बाहेर बसता का प्लीज?”

तिने आनंदाने मान डोलावली आणि तिथून बाहेर पडली. ती गेल्यावर त्याने दुसऱ्या क्षणाला एम. डी. ना कॉल करून परवानगी मिळवली आणि तसं सलोनीला कळवलं. ती स्वराजचा कॉल संपताच रिसिव्हर ठेवत अधिराकडे पाहून म्हणाली,

“मिस अधिरा, सरांनी तुम्हाला उद्यापासून यायला सांगितलं आहे.”

“ओह.. थँक्यू यू सो मच मॅम..”

असं म्हणून उद्या येण्याचं सांगून अधिरा तिथून निघून गेली. स्वराज मात्र अजूनही तिच्याच विचारात गुंग होता. त्याक्षणी स्वराजला जाणवत होतं, त्याचं आणि अधिराचं नातं हे व्यावसायिक नाही, खूप साधंही नाही तर ते एक अतूट बंध होतं. त्याने हे नातं थांबवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी थांबणार नव्हतं; कारण काही नाती थांबत नाहीत, तर ती फक्त खोल जातात. मनात खोलवर रुतून बसतात.

गाडीने अचानक ब्रेक घेतला. स्वराज दचकून वर्तमानात आला. डोळे उघडून समोर पाहिलं. गाडीने पुन्हा तिचा वेग धरला. पण त्याच्या छातीत काहूर माजलं होतं.

“अधिरा…”

नकळत त्याच्या ओठांवरून तिचं नाव निसटलं. तो खिडकीकडे पाहू लागला. पुण्याचा रस्ता जवळ येत होता; पण भूतकाळ त्याच्यापेक्षा आधी पोचला होता. आणि स्वराजला जाणवलं, तो निघून गेला असला तरी काही नातं अजूनही त्याच्या आत बसून प्रवास करत होती.

क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”


0

🎭 Series Post

View all