डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. ३
©अनुप्रिया
©अनुप्रिया
“म्हणजे? काय म्हणायचंय काय तुम्हाला?”
नंदिनीच्या डोळ्यांत राग उतरू लागला.
“माझं म्हणणं स्पष्ट आहे, हे घटस्फोटाचे पेपर्स आहेत. त्यावर तू सही कर आणि विषय संपव..”
स्वराज चेहऱ्यावरची एकही रेष बदलू न देता करड्या स्वरात म्हणाला.
“विषय संपव म्हणजे? खेळ लावलाय का तुम्ही? हे… लग्न? सगळे नातेवाईक… माझं घर… मी?”
काय बोलावं, काय विचारावं तिचं तिलाच समजत नव्हतं. जणू तिच्या शरीरातलं रक्त गोठत चाललं होतं.
“हे लग्न माझ्यासाठी नव्हतंच. मला हे लग्न मान्यच नव्हतं. हे सगळं माझ्या इच्छेविरुद्ध झालंय.”
तो कठोरपणे, कुठलाही भाव न दाखवता म्हणाला. तिचे डोळे पाणावू लागले.
“मग मला आधीच सांगायचं ना? माझ्या आईवडिलांनी हा लग्नाचा घाट घातलाच नसता. आणि मुळात आम्ही आलो होतो का तुमच्या दारी माझ्याशी लग्न करा म्हणून?”
बोलताना तिचा गळा भरून येत होता. डोळ्यांतून अश्रूवाटे अंगार बरसू लागला. तिच्या मुसमुसण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. आता स्वराजलाही तिचा विचार करून थोडं वाईट वाटू लागलं. शब्दांची धार कमी करत पण तरीही ठामपणे तो म्हणाला,
“हो बरोबर आहे तुझं.. माझेच आईवडील तुझ्या घरी तुला लग्नासाठी मागणी घालायला आले होते. पण मला कोणी विचारलंच नाही. परस्पर लग्न ठरवून मोकळे झाले. तरीही मी सगळं मोडायला सांगत होतो पण आमच्या बाबांसमोर बोलायची कोणाची बोलायची हिंमत नव्हती. मी माझ्या आईला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिलाही मी तुझ्याशी लग्न करावं असंच वाटत होतं. म्हणून मग तिने जबरदस्तीने या लग्नाला मला उभं राहायला सांगितलं.”
“अहो, एकदा माझ्याशी तरी बोलायचं होतं. मला कोणीच काहीच सांगितलं नाही. या सर्व गोष्टींची मला थोडी जरी कल्पना असती तर मीच या लग्नाला नकार दिला असता ना? आणि मला सांगा, यात माझी काय चूक होती? माझं आयुष्य का पणाला लावलंत?”
नंदिनी प्रचंड चिडली होती. असा विचित्र प्रसंग तिच्या आयुष्यात येईल असं तिला कधीच वाटलं नव्हतं.
“तुझी काहीच चूक नाही.”
तो थंडपणे म्हणाला.
“मग मला का शिक्षा? काय सांगू मी घरी? माझे बाबा.. आई..”
“पण मी कोणतंच नातं तुझ्यासोबत जगू शकत नाही. अशा रीतीने आयुष्य फक्त पुढे रेटत जाईल. मनासारखं जगता येणार नाही. मला माहितीये, माझ्यामुळे तुझं खूप नुकसान झालंय; पण माझा नाईलाज आहे हे मी तुला मनापासून सांगतोय. या परिस्थितीतून मी स्वतः तुला सहीसलामत बाहेर काढेन. सहा महिने.. फक्त सहा महिने माझ्यासोबत राहशील? या पुढचे हे सहा महिने आपल्याला एकमेकांना सहन करावं लागेल.. बस्स इतकंच.”
स्वराज घटस्फोटाच्या फाईलकडे पाहत म्हणाला.
“बस्स इतकंच म्हणजे? इतकी साधी गोष्ट वाटते तुम्हाला? माझं संपूर्ण आयुष्य ढवळून निघालंय आणि तुम्ही बस्स इतकंच म्हणताय? आणि फक्त सहा महिने म्हणताय तुम्ही? ते तरी कशाला हवेत? आताच जाते..”
ती त्वेषाने म्हणाली. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं.
“कारण कायदेशीर प्रक्रिया लगेच होऊ शकत नाही. सहा महिन्यांनंतर आपण वेगळे होऊ शकतो. त्यामुळे सहा महिने आपल्याला एकमेकांना सहन करावंच लागेल. ”
स्वराज खिडकीच्या दिशेने पाहत म्हणाला. नंदिनीला काय बोलावं ते समजत नव्हतं.
“मी हे सगळं आताच्या आता तुमच्या घरच्यांना आणि माझ्या घरच्यांना सांगणार.. मी हे असलं अजिबात सहन करणार नाही. आणि का करू? माझी काहीच चूक नसताना असं अपमानास्पद आयुष्य मी का जगायचं? आता मला एक क्षणही या खोलीत, या घरात थांबायचं नाही.”
असं म्हणून ती दरवाजाच्या दिशेने वळणार इतक्यात स्वराज म्हणाला,
“ठीक आहे.. तुला माझ्या घरच्यांना सांगायचंय, तुझ्या आईबाबांना सांगायचंय तर खुशाल सांग.. मी अजिबात अडवणार नाही तुला.. पण त्यानंतर जे काही होईल, त्या परिणामांसाठी तयार राहावं लागेल तुला.”
“म्हणजे? एक तर तुम्हीच माझी फसवणूक केलीत आणि वर मलाच धमकावताय?”
तिने रागाने त्याच्याकडे पाहिलं.
“मी धमकावत नाहीये सत्य परिस्थिती सांगतोय.. नुकताच तुझ्या बाबांना एक माईल्ड हार्ट अटॅक येऊन गेलाय. डॉक्टरांनी त्यांना कसलंच टेन्शन द्यायचं नाही असं सांगितलंय हे तू विसरलीस का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या मोठ्या भावाच्या कापडउद्योगात सरपोतदारांची पन्नास टक्केची भागीदारी आहे. आम्ही या बिझनेसमधून आमची भागीदारी काढून घेतली तर काय होईल याची कल्पना करू शकतेस तू?”
स्वराज खांदे उडवत म्हणाला.
“याचा अर्थ तुम्ही मला ब्लॅकमेल करताय?”
नंदिनी अजूनच चिडली.
“तसं समज हवं तर.. पण सहा महिन्यांसाठी तुला माझ्यासोबत राहण्याशिवाय गत्यंतर नाही. काय करायचं तुझं तू ठरव.. आता सगळं तुझ्या हातात आहे.. खरी परिस्थिती सांगून वडिलांना, भावाला संकटात टाकायचं की निमूटपणे या पेपर्सवर सह्या करून सहा महिने माझ्यासोबत राहायचं.. चॉईस इज योर्स.. ”
स्वराजचा प्रत्येक शब्द तिचं काळीज चिरत होता.
क्रमशः
©अनुप्रिया
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा