Login

तुम दे ना साथ मेरा.. ४१

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी प्रेमकहाणी..

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. ४१
©अनुप्रिया

मीराचं बोलणं ऐकताच अधिराच्या छातीत कुठेतरी कळ उमटली.

“मीरा… थांब ना जरा…”

ती थकलेल्या आवाजात म्हणाली.

“नको थांबायला. अधिरा, तुला अजूनही समजत नाहीये का? तो तुला कधीच स्पष्ट बोलला नाही. तुझ्या आयुष्यात आला, जवळीक वाढवली आणि योग्य वेळी पळ काढला. आजही बघ तो निघून गेला, पण तुला एक शब्द सांगायला थांबला का?”

मीराचे शब्द तिच्या जखमेवर मीठ चोळत होते. अधिरा गप्प बसली. ती खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेर अंधार गडद होत चालला होता. दिवसभरातल्या त्या कॅफेच्या क्षणांची उजळ आठवण आणि आत्ता मनात दाटलेली काळोखी दोन्ही एकमेकांशी झुंज देत होत्या. पुन्हा जुन्या आठवणी रुंजी घालू लागल्या. त्याचा प्रेमाचा प्रस्ताव तिने स्वीकारला तो क्षण तिच्या मनात आजही तसाच ताजा होता.

“सांग ना अधिरा, माझी होशील ना? तुझंही माझ्यावर प्रेम आहे ना?”

“हो.. स्वराज, तू आवडतोस मला.. तुझ्यासारखं असं पाहताक्षणी वगैरे नाही; पण तुझं बोलणं, मुलींशी आदराने वागणं, सर्वांची जिव्हाळ्याने वागणं सारं आवडू लागलंय मला.. माझंही तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्यासोबत असंच आनंदाने संपूर्ण आयुष्य घालावायला आवडेल स्वराज.. आय लव्ह यू टू..”

तिने नजर झुकवत होकार दिला. तिचं बोलणं ऐकून स्वराजला खूप आनंद झाला होता. त्याची आवडती व्यक्ती अधिरा आता कायम त्याच्यासोबत असणार होती. हळूहळू अंधार पडू लागला होता. आता आपापल्या घरी जाण्याची वेळ जवळ आली होती.

“चला, बराच वेळ बसलो आपण.. आता आपल्याला निघायला हवं. अंधार पडू लागलाय..”

“खरं सांगू? आता मला तुझ्यापासून दूर जाऊच वाटत नाहीये.. हे निरोप घेणं देणं नकोच यार.. तू कायमचीच माझ्याकडे का येत नाहीस?”

अधिरा खळखळून हसली.

“तेही होईल.. पण त्यासाठी आपल्याला आपल्या घरी सांगावं लागेल आणि त्यासाठी तरी इथून बाहेर पडेल लागेल. हो की नाही?”

त्याने दीर्घ सुस्कारा टाकला आणि नाईलाजाने होकारार्थी मान डोलावली. थोड्याच वेळात ते कॅफेमधून बाहेर पडले.

“चल, आधी मी तुला तुझ्या गर्ल्सहॉस्टेलवर सोडतो मग मी माझ्या रूमवर जाईन.”

स्वराजच्या बोलण्यावर तिने मान डोलावली आणि दोघेही कारमध्ये जाऊन बसले. स्वराजने गाडी स्टार्ट केली. आता गाडी गर्ल्सहॉस्टेलच्या दिशेने धावू लागली. गाडीत बसल्यानंतर बराच वेळ कोणीच काही बोलत नव्हतं. कॅफेमध्ये झालेल्या संवादाचा मनावर इतका परिणाम होता की, त्यांच्या मौनालाही आवाज होता आणि तो आवाज ते दोघेही ऐकत होते. रस्त्यावर पसरलेला अंधार, स्ट्रीटलाइट्सचा पिवळसर उजेड आणि दोघांमधली ती अस्वस्थ शांतता... थोड्याच वेळात गाडी गर्ल्सहोस्टेलसमोर येऊन थांबली. त्यादिवसापूरताचा निरोपही दोघांना असहनीय झाला होता; पण घरी जावं लागणार होतं. सगळंच वातावरण गंभीर झालं होतं.त्याने तिचा हात हातात घेतला आणि आपले ओठ त्यावर टेकवले. त्याच्या स्पर्शाने ती मोहरली. लाजून तिने पटकन तिचा हात त्याच्या हातातून काढून घेतला आणि शरमेने खाली मान घातली.

“राज, आता जाऊ देतेय.. पण तू मला कधीच सोडून जाणार नाही ना? माझा तुझ्या शब्दांवर विश्वास आहे, माझ्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देऊ नकोस, प्लिज..”

स्वराजने तिला कुशीत घेतलं आणि तिच्या माथ्यावर ओठ टेकवत म्हणाला,

“नाही गं राणी.. मी कधीच तुला सोडून जाणार नाही. कधीच तुझा विश्वासघात करणार नाही. आय प्रॉमिस..”

ती अजूनच त्याला बिलगली. आता त्याची मिठीही घट्ट झाली होती. थोडावेळ ते तसेच बसून राहिले. हॉस्टेलच्या सिक्युरिटी गार्डने मारलेल्या शिट्टीमुळे दोघेही भानावर आले आणि एकमेकांपासून विलग होत त्या दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. दोघे वेगळ्या दिशांना निघाले; पण अधिराचं मन मात्र मागेच अडकलं होतं.

आजही अधिराला तो प्रसंग जशाच्या तसा आठवत होता. हातातली बॅग बाजूला ठेवली आणि खिडकीतून आत येणारा चंद्रप्रकाश पाहत ती पलंगावर जाऊन बसली. डोळे मिटले तसा डोळ्यासमोर स्वराज उभा राहिला.

तो काळ काही वेगळाच होता. अधिराच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षातला तो काळ अगदीच छान, सोनेरी होता. अधिराच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. अभ्यास, नोट्स, रिव्हिजन अधिराचं आयुष्य त्या दिवसांत पुस्तकांत गुंतून गेलं होतं. इतकी गुंतली की, सख्या मोठ्या बहिणीच्या लग्नातही तिला जाता आलं नव्हतं. मुलगा कोण, सासर कुठलं काहीही माहीत नव्हतं. तिचं सारं लक्ष तिच्या परीक्षेवर होतं; पण त्यातही दिवसातून स्वराजचा एक फोन, एक मेसेज, एक “कसं चाललंय?” विचारणारा स्वराज तिचा श्वास बनला होता.

“स्वराज आज खूप अभ्यास आहे. आज मला तुझ्याशी बोलायला जमणार नाही अरे..”

ती हिरमुसून म्हणायची.

“ठीक आहे ना मग.. त्यात काय एवढं? तू तुझा अभ्यास कर. मी इथेच आहे. मी कुठं जाणार आहे?”

तो हसून म्हणायचा. तो कधीच तक्रार करत नसे. उलट तिच्या आयुष्यात तोच सर्वात मोठा आधार होता. तिला खात्री होती, स्वराज कायम तिच्यासोबत सोबत आहे. परीक्षा संपल्यावर ती आनंदाने त्याला भेटायला जाणार होती. मनात कितीतरी स्वप्नं होती. पण परीक्षेच्या शेवटच्या दिवशी फोन केला तरी तो उचलत नव्हता. मेसेजला उत्तर नाही. दुसऱ्या दिवशीही नाही. तिसऱ्या दिवशीही नाही. पहिल्यांदा तिला राग आला. मग काळजी आणि हळूहळू… भीती वाटू लागली होती.

दुसऱ्या दिवशी ती त्याच्या ऑफिसवर गेली. तिथे तिला चैतन्य भेटला.

“चैतन्य सर, स्वराजसर कुठे दिसत नाहीत?”

“अगं, काकूंची तब्येत बिघडली आणि त्याला अचानक त्याच्या घरी जावं लागलं.”

“मला कॉल करून कळवायचं तरी.. त्यांनी माझा कॉल घेतला नाही.. माझ्या मेसेजेसला रिप्लाय पण नाही. कसं कळणार मला? आल्यावर बघतेच त्याच्याकडे..”

ती स्वतःशीच पुटपुटली.

“आता कशा आहेत त्या?”

“ठीक आहेत.. ”

“स्वराजसर कधी येणार आहेत, काही कल्पना?”

“नाही.. काही कल्पना नाही.. तो घरूनच ऑफिसचं काम करतोय.”

“मग मला कॉल का करत नाहीये? काय भानगड आहे ही? तो मला टाळतोय का? तो मला फसवत तर नाही ना? नाही.. नाही.. मी काहीही काय विचार करतेय? स्वराज असा मुलगा नाहीये. त्याच्या आईची प्रकृती ठीक नाहीये. त्या टेन्शनमध्ये तो असेल. आणि मी आपली काहीही.. ”

तिने स्वतःच्याच मनाला समजावलं. एकदम तिला काही आठवलं.

“सरांचा ऍड्रेस मला देता का? मी भेटून येईन त्यांच्या आईंना.. ”

“अगं ते.. त्याचं.. ”

तो काही बोलणार इतक्यात सरांनी त्याला आवाज दिला.

“अधिरा मी नंतर बोलतो.. सरांनी बोलावलंय. येतो मी.. ”

चैतन्य चाचपडत म्हणाला आणि तिथून निसटला. का कोणास ठाऊक! चैतन्य तिला टाळतोय काहीतरी कारण काढून तो तिथून निसटलाय असं तिला उगीच वाटून गेलं.

“असो, स्वराज आल्यावर त्याचा चांगलाच समाचार घेते.. मला सांगितलं नाही म्हणजे काय?”

ती स्वतःशीच म्हणाली. इतक्यात तिच्या मोबाईलची रिंग झाली आणि तिचे डोळे विस्फारले गेले.

क्रमशः
©अनुप्रिया

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all