Login

तुम दे ना साथ मेरा.. ४२

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेम Ja
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. ४२
©अनुप्रिया

इतक्यात तिच्या मोबाईलची रिंग झाली आणि तिचे डोळे विस्फारले गेले. स्क्रीनवर स्वराज नाव झळकलं. क्षणभर तिला विश्वासच बसला नाही. इतके दिवस मनात साचलेली काळजी, राग, प्रेम, भीती सगळं एकाच वेळी उसळून आलं. थरथरत्या बोटांनी तिने कॉल उचलला.

“स्वराज, कुठे आहेस तू? तुला कल्पना आहे का मी किती..”

“अधिरा…”

पलीकडून आलेला स्वराजचा आवाज मात्र थकलेला आणि परका वाटला. ती बोलायची थांबली. तेंव्हा स्वराज चिंतीत स्वरात म्हणाला,

“आई बरी नाहीये अजून. खूप गोंधळ झालाय इकडे.. मला काहीच कळत नाहीये. मला थोडा वेळ दे.”

“पण मला एक फोन तरी करायला हवा होता ना? किती दिवस झाले सांग मला. मला वाटलं.. मला वाटलं तू..”

तिचा आवाज अडखळला.

“नको अधिरा. आत्ता मला हे सगळं नको आहे. मी तुला नंतर फोन करतो.”

“स्वराज, ऐक ना..”

पण तोवर कॉल कट झाला होता. अधिरा मोबाईल हातातच धरून तशीच उभी राहिली. आज पहिल्यांदाच स्वराजच्या आवाजात तिला आपलंसं काहीच वाटलं नव्हतं. अधिराशी तो बोलत होता पण फक्त बोलत होता. त्याच्या बोलण्यात जिव्हाळा आपुलकी काहीच नव्हतं. त्या दिवसानंतर स्वराजचा “नंतर” कधी आलाच नाही. दिवस गेले, आठवडे गेले पण स्वराजचा कॉल मेसेज काही आलं नव्हतं. अधिराने किती कॉल्स, किती मेसेजेस केले पण त्याने फिरून कॉल केला नाही. कधीतरी उपकार म्हणून एखादा कोरडा मेसेज यायचा ‘बिझी.. कॉल यू लॅटर..’ बस्स इतकंच असायचं आणि मग पुन्हा शांतता असायची. स्वराजच्या वागण्याचा तिला प्रचंड त्रास व्हायचा. चिडचिड व्हायची त्याच्यासाठी ती खूप रडली मग वाट वाट पाहिली; पण त्याने पुन्हा तिला कधी कॉल्स केला नाही. आणि मग हळूहळू अधिरा त्याची वाट पाहून थकून गेली.

आज, तब्ब्ल महिन्याभराने मीराचे शब्द ऐकताना तिच्या छातीत उमटलेली ती कळ याच आठवणींची होती.

“तो पळ काढून गेला अधिरा…”

मीराचा आवाज पुन्हा तिच्या कानात घुमला. अधिराने डोळे उघडले. चंद्रप्रकाश आता अधिकच फिका वाटत होता. तिने खोल श्वास घेतला. स्वराजने दिलेलं ‘आय प्रॉमिस’ आजही तिच्या मनात तसंच होतं; पण त्या शब्दांवरचा विश्वास मात्र कुठेतरी तुटून, बोथट होऊन पडून राहिला होता. पण तरीही मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात एक प्रश्न अजून जिवंत होता,

“तो खरंच पळून गेला होता की परिस्थिती तशी निर्माण झाली?”

अधिराच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाने ती थोडी साशंक झाली होती. तरी उसणं अवसान आणत अधिरा तिच्याकडे पाहत म्हणाली,

“मीरा, कधी कधी माणसं चुकीची नसतात, वेळ चुकीची असते.”

अधिराच्या चेहऱ्यावर समजूतदारपणाची भावना उमटली. स्वराजने हे सगळं मुद्दाम केलं नाही असंच तिचं मन सांगत होतं. मीराच्या भुवया उंचावल्या.

“अगं, तू अजूनही त्याचीच बाजू घेतेयस? वेळ चुकीची झाली म्हणून लग्न करून टाकायचं? आणि तेही तुझ्या बहिणीशी? हे कुठलं लॉजिक आहे?”

तिच्या प्रश्नांनी अधिरा हादरली. ‘बहिण’ हा शब्द हृदयावर घाव करून गेला.

“नंदिनीताईमुळे स्वराज माझ्यापासून दूर गेला?”

अचानक एक प्रश्न तिच्या मनात चमकून गेला.

“त्याने तुझा धरलेला हात सोडून तुझ्याच बहिणीचा हात धरला?”

“मला माहित नाही मीरा, मला फक्त एवढंच माहित आहे की तो खोटं बोलत नाहीये. त्याने नंदिनीताईशी लग्न केलं यामागे नक्कीच काही कारण असेल. आणि त्याच्या डोळ्यांत अपराधीपणाची भावना मला स्पष्ट दिसली होती. नाटक नव्हतं ते.. ”


“अगं, डोळे सगळं खोटं बोलतात कधी कधी..”

मीरा हसत म्हणाली, पण त्या हसण्यात करुणा नव्हती.

“तुला काय हवंय? पुन्हा दुखावून घ्यायचं? पुन्हा एकदा विश्वास ठेवून तुटायचं?”

मीराच्या प्रश्नावर अधिराने वळून पाहिलं.

“मला पुन्हा तुटायचं नाहीये; पण आयुष्यभर मनात प्रश्न ठेवूनही जगायचं नाहीये.”

मीराचा चेहरा क्षणभर बदलला.

“म्हणजे तू त्याच्याशी बोलणार आहेस?”

अधिराने काही क्षण विचार केला. मग शांतपणे मान हलवली.

“हो. एकदा तरी सगळं ऐकायचं आहे. सत्य कितीही कटू असलं तरी…”

मीराच्या डोळ्यांत क्षणभर अस्वस्थता चमकली; पण तिने लगेच सावरत हात झटकला.

“ठीक आहे. पण लक्षात ठेव, तो तुला परत फसवेल. तेव्हा मला दोष देऊ नकोस.”

मीरा बाहेर निघून गेली. दार बंद होताच खोलीत पुन्हा शांतता पसरली. अधिरा पलंगावर बसली. तिच्या फोनकडे नजर गेली. स्क्रीनवर अजूनही स्वराजचा मेसेज न उघडलेलाच होता.

“आज घाईत निघालो. तुला काही बोलायचं राहिलंय. कधी तरी भेटूया… प्लीज.”

तिच्या डोळ्यांत पुन्हा पाणी तरळलं.

“राज… तुझं सत्य ऐकायची माझी हिंमत आहे का?”

ती स्वतःलाच पुटपुटली. फोन हातात घेत तिने डोळे मिटले. भेट टाळणं सोपं होतं;पण उत्तरांशिवाय जगणं अशक्य होतं.हळूच तिने रिप्लाय टाइप केला,

“भेटूया. पण यावेळी पूर्ण सत्य हवंय.”

मेसेज सेंड होताच तिच्या मनात कुठेतरी भीतीसोबत आशेची एक लहानशी ज्योत पेटली.

क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all