तुम दे ना साथ मेरा.. ४३
©अनुप्रिया
©अनुप्रिया
बरीच रात्र झाली होती. सगळीकडे निरव शांतता पसरली होती. घरातली सारी मंडळी झोपली होती. अधिरा मात्र जागीच होती. मन सैरभैर झालं होतं. पलंगावर पडून ती छताकडे एकटक पाहत होती. डोळे मिटले की, जुन्या आठवणी जाग्या व्हायच्या. स्वराजचा आवाज, त्याचं “आय प्रॉमिस” हे शब्द.. सारं काही तिला आठवत होतं आणि मग आलेली ती अनाकलनीय शांतता तिला त्रास देत होती. तिचा मोबाईल टेबलवर होता. तो वाजेल अशी अपेक्षा नव्हती; पण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात अजूनही एक वाट पाहणारी अधिरा जिवंत होती. अचानक मोबाईलची रिंग वाजली आणि स्क्रीनवर स्वराजचं नाव झळकलं. क्षणभर तिचं काळीज थांबल्यासारखं झालं. उचलायचा की नाही, हा प्रश्न नव्हता; पण काय ऐकायला लागेल याची भीती होती. तरीही तिने कॉल उचलला.
“हॅलो…”
“अधिरा…”
पलीकडचा आवाज ओळखीचा होता; पण खूप थकलेला, दबलेला, पूर्वीसारखा आपला वाटणारा नव्हता.
“मी पुण्याला आलोय,” स्वराज म्हणाला.
अधिरा काही बोलली नाही. पुण्याचं नाव ऐकताच तिच्या मनात अचानक एक अनामिक अंतर उभं राहिलं. स्वराज एकदम दूर गेला आणि तेही तिला न भेटता.. जणू काही अधिराला तिथे पाहून त्याने तिथून पळ काढला होता!
“इकडे सगळं सेट करताना मला वाटलं तुला आधी सांगायला हवंच. उगाच तुला असं वाटायला नको की मी पुन्हा पळतोय.”
“स्वराज, तू पळतोयस की नाही, हे मला आता तुझ्या शब्दांवरून ठरवायचं नाहीये. मला फक्त सत्य हवंय.”
अधिरा हळू आवाजात म्हणाली. तो क्षणभर गप्प राहिला. मग पुढे हळूहळू बोलू लागला,
“आई आजारी पडली आणि बाबांनी कॉल करून गावी बोलवून घेतलं. सगळ्या गोष्टी माझ्या हाताबाहेर गेल्या. हॉस्पिटल, घर, जबाबदाऱ्या मी स्वतःलाच हरवून बसलो. त्यात आईने शपथ घालून लग्नाच्या बोहल्यावर चढण्यास भाग पाडलं.”
अधिराने डोळे मिटले; पण त्याच्या बोलण्यानेही तिचं मन शांत होत नव्हतं. स्वराज पुढे म्हणाला,
“त्या काळात नंदिनी माझ्यासाठी आधार बनली. तिने आईची काळजी घेतली, सेवा केली. तिचं औषध,पथ्यपाणी पाहिलं. आता आईला थोडं बरं वाटू लागलंय. मला कळायच्या आत..”
“थांब,”
त्याचं बोलणं तिने मध्येच तोडलं. अधिरा डोळे उघडून पलंगावर उठून बसली आणि त्याला थेट विचारलं,
“नंदिनी तुझ्यासाठी आधार बनली आणि मग तुझी बायको झाली. ती कोण आहे हे तुला सांगायला मी आठवण करून द्यावी का?”
क्षणभर शांतता दाटली.
“ती माझी बहीण आहे स्वराज..”
अधिराचा आवाज थरथरत होता, पण शब्द ठाम होते.
“तू माझा हात सोडून माझ्याच बहिणीचा हात धरलास, याचं काय स्पष्टीकरण आहे?”
स्वराजने दीर्घ श्वास घेतला.
“मला माहित आहे अधिरा, हे सगळ्यात जास्त चुकीचं आहे आणि तुझा राग योग्यच आहे.”
“राग?”
ती कुत्सितपणे हसली.
“हा राग नाही स्वराज.. हा माझा अपमान आहे.. विश्वासघात आहे.”
“मी मुद्दाम केलं नाही. मी कधीच असा विचार केला नाही की मी कधी तुझ्याशी असं काही वागेन. तुझा विश्वासघात करेन.. पण सगळ्या गोष्टी घडत गेल्या अगं.”
स्वराज हळू आवाजात म्हणाला.
“घडत गेल्या? मग माझे कॉल्स? माझे मेसेजेस? मला टाळणंही ‘घडत गेलं’ का?”
अधिराचा आवाज उंचावला.
“नाही.. ”
तो मान्य करत म्हणाला.
“ते मी केलं. कारण तुला सामोरं जाण्याची माझी हिंमत नव्हती.”
“आणि नंदिनीताईला? तिला माहित होतं का मी कोण आहे?”
तिने त्याला थेट विचारलं.
“नाही..”
स्वराज पटकन म्हणाला.
“तिला एवढंच माहित होतं की, माझ्या आयुष्यात कुणीतरी आहे; पण ती तूच आहेस हे तिला माहित नव्हतं आणि अजूनही तिला आपल्यातल्या नात्याबद्दल काहीच माहित नाही.”
अधिराच्या हृदयात कळ उमटली.
“म्हणजे मी फक्त लपवलेलं सत्य होते?”
ती हळूच म्हणाली.
“नाही अधिरा.. प्लीज असं बोलू नकोस. माझ्या आयुष्यातली सगळ्यात खरी गोष्ट तू होतीस; पण मी तुला न्याय देऊ शकलो नाही.”
तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. फोनवरची शांतता आता बोचरी झाली.
“स्वराज, सगळं फोनवर ऐकून माझा राग संपणार नाही आणि प्रश्नही नाही.”
ती थकलेल्या आवाजात म्हणाली.
“हे मला माहित आहे.”
तो म्हणाला.
“म्हणूनच दोन दिवसांनी मी घरी येतोय. मला तुला प्रत्यक्ष भेटून सगळं सांगायचं आहे. अगदी नंदिनीबद्दलही.. माझ्या प्रत्येक निर्णयामागचं कारणही.”
अधिरा काही क्षण विचारात पडली. अखेर क्षणभर थांबून ती म्हणाली,
“ये.. पण लक्षात ठेव, ही भेट फक्त तुझं स्पष्टीकरण ऐकण्यासाठी नाही तर माझ्या जखमांवर बोट ठेवण्यासाठीही असेल.”
“मी तयार आहे कारण सत्यापासून पळून जाणं आता मला परवडणार नाही.”
स्वराज चिंतीत स्वरात म्हणाला. कॉल कट झाला. अधिराने फोन बाजूला ठेवला. मनात वादळ होतं; पण आता तिच्या डोळ्यांत पाणी नव्हतं. आज तिचा स्वराजवरचा राग स्पष्टपणे व्यक्त केला होता आणि तिचं तसं वागणं योग्यच होतं. मीराने तिच्या मनात पेरलेले प्रश्न पुन्हा एकदा तिच्यासमोर पिंगा घालू लागले.
“तो पळून गेला होता का? की चुकीच्या वेळी चुकीच्या माणसाजवळ थांबला होता? त्याने तुझा हात सोडून तुझ्या बहिणीचा हात पकडला. त्याने विश्वासघात केला? याचा अर्थ मीरा खरं बोलतेय? माझी फसवणूक? माझ्या स्वाभिमानाला पायदळी तुडवून तो खुशाल निघून गेला? असं कसं करू शकतो तो?”
खिडकीबाहेर पहाटेची हलकी चाहूल लागली होती. अधिराला जाणवलं, ही येणारी भेट स्वराजसाठी नाही, तर तिच्या स्वाभिमानासाठी असणार होती.
इकडे नंदिनी स्वयंपाकघरात एकटीच उभी होती. गॅसवर ठेवलेली भाजी मंद आचेवर शिजत होती; पण तिचं लक्ष तिकडे नव्हतंच. तिचे हात थांबले होते; पण मन मात्र सतत कुठेतरी भरकटत होतं. स्वराजचे विचार मनात घोंगावत होते.
“स्वराजला पुण्याला जाऊन आठ दिवस झालेत. तो त्या व्यक्तीला भेटेल. आमच्या नात्याचं सत्य सांगेल. सहा महिन्याचं आयुष्य आमच्या नात्याचं.. मग पुढे काय? कसं सगळं सांभाळणार आहोत आपण? मुळात इथे जी माणसं जोडलीत त्यांना सोडून जाता येईल मला? इथे या घरात अडकलेलं माझं मन मला कसं सोडवता येईल? पण मला इतका का त्रास होतोय? असं घडणार हे तर आपल्याला आधीच ठाऊक होतं मग तरीही माझं मन अस्वस्थ का होतंय? स्वराजला त्याचं प्रेम मिळेल पण.. माझं प्रेम? मी गुंतत चाललीय त्याच्यात. तो आवडू लागलाय का मला?”
नंदिनी स्वतःच्याच विचारात गुंग होती. इतक्यात दारावरची बेल वाजली.
क्रमशः
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा