डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. ४६
©अनुप्रिया
©अनुप्रिया
“ओह गॉड! मी हे काय केलं?”
तो स्वतःशीच पुटपुटला.
“इतकं सगळं सांभाळताना, सगळं काही योग्य करण्याच्या नादात मी कधी चुकीचा होत गेलो हे माझं मलाच कळलं नाही. आईसाठी लग्न, घरासाठी तडजोड, समाजासाठी मौन. आणि स्वतःसाठी? काहीच नाही?”
दोन्ही पायांच्यामध्ये डोकं खुपसून तो आक्रंदत होता. त्याच्या डोळ्यांत पाणी दाटू लागलं. त्याने खूप आवरण्याचा प्रयत्न केला पण त्या प्रयत्नात त्याला हार पत्करावी लागली. बऱ्याच वेळ गळ्यात अडवून ठेवलेला हुंदका अखेर बाहेर पडलाच.. डोळ्यांतल्या आसवांनी जणू बंड पुकारलं आणि पापण्याचा काठ ओलांडून ते वाहू लागले. त्याचा श्वास अडखळू लागला. तो उठून सोफ्यावर बसला आणि हमसून हमसून रडू लागला. तोंड दाबून तो स्वतःच्या रडण्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होता. त्याचं पूर्ण शरीर हलत होतं. इतक्यात स्वयंपाकघरातून नंदिनी बाहेर आली आणि जागीच थबकली. दिवाणखान्यातलं दृश्य पाहून पुढे पाऊल टाकण्याची हिंमतच झाली नाही.
स्वराज दोन्ही हातांनी डोकं धरून रडत होता. त्याचे फक्त खांदे हलत होते. तिने त्याला कधीच असं उन्मळून पडलेलं पाहिलं नव्हतं. त्याला कायम स्वतःला सावरताना, कमी बोलताना, ठाम निर्णय घेताना पाहिलं होतं. आणि आज मात्र तो पूर्णपणे तुटलेला, एकदम हतबल दिसत होता. ती हळूहळू चालत पुढे आली. काहीच न बोलता त्याच्या समोर येऊन उभी राहिली. त्याच्या खांद्यावर हात ठेवावा असं तिच्या मनात आलंही; पण दुसऱ्या क्षणाला त्याला स्पर्श करण्यास मन संकोचून गेलं. काही क्षण तसेच शांततेत गेले. कोणाचीतरी चाहूल लागली म्हणून स्वराजने डोळे उघडले. समोर नंदिनीला पाहून त्याचा बांध सुटला.
“नंदिनी..”
तो अस्पष्टसा पुटपुटला आणि काही समजायच्या आत तो तिच्या कमरेला मिठी मारून मोठमोठ्याने रडू लागला. नंदिनी एकदम दचकली. हा क्षण तिच्यासाठी अनपेक्षित होता. तिचा नवरा तिच्या कुशीत रडत होता. ती क्षणभर गोंधळली. तिच्या मनात आता एकच विचार होता.
“सध्या स्वराज खूप वेदनेत आहे. एकटा आहे. माणुसकीच्या नात्यानं तरी त्याला आधार देणं हे माझं कर्तव्य आहे.”
तिने अलगद हात वर नेले आणि त्याच्या पाठीवर ठेवले. ती काहीच बोलली नाही. फक्त त्याला कुशीत घेऊन ती त्याच्या डोक्यावरून, पाठीवरून अलगद हात फिरवू लागली. तिच्या त्या हळुवारपणे स्पर्शाने तो अजूनच दुखरा झाला. त्याच्या हुंदक्यांचा वेग वाढला आणि त्याचा नंदिनीच्या कमरेभोवतीचा विळखा अजूनच घट्ट झाला.
“नंदिनी, मी सगळं गमावलंय अगं..”
तो तुटलेल्या आवाजात म्हणाला. नंदिनीने त्याला घट्ट धरून ठेवलं. तिच्याही डोळ्यांत पाणी आलं; पण तिने तिच्या आसवांना डोळ्यांतच रोखून धरलं कारण तिला माहित होतं, ती जर कमजोर पडली तर तोही तुटून जाईल. स्वराजच्या आयुष्यात कुणीतरी होतं. त्याचं कोणावरतरी नितांत प्रेम होतं;पण आता ते सगळं संपलंय एवढंच नंदिनीला कळत होतं.
नंदिनी त्या सावलीशी स्पर्धा करत नव्हती. फक्त आजच्या मुळासकट उन्मळून पडलेल्या तिच्या नवऱ्याला, स्वराजला धरून ठेवत होती.
“बसा.. शांत व्हा. घ्या, हे पाणी घ्या.”
ती हळू आवाजात म्हणाली. तिने त्याला सोफ्यावर बसवलं. स्वतः उठून पाणी आणलं आणि ग्लास त्याच्या हातात दिला. त्याचे हात थरथरत होते म्हणून तिने ग्लास सोडला नाही. तो पाणी घेईपर्यंत तसाच धरून ठेवला. स्वराजने डोळे मिटले. आता त्याचा श्वास हळूहळू स्थिर होत गेला.
“माझं आयुष्य खूप गुंतागुंतीचं झालंय गं..”
तो थकलेल्या आवाजात म्हणाला. नंदिनी क्षणभर गप्प राहिली मग शांतपणे म्हणाली,
“काही हरकत नाही. आता तुम्ही शांत व्हा. आता मला सगळं समजून घ्यायचं नाहीये. आता फक्त ही वेळ निभावून जाऊ देत. तुमचं बाकीचं सगळं मी ऐकेच आपण आता शांत राहूयात.. एवढंच.”
हे शब्द साधे होते पण त्या क्षणी स्वराजच्या मनाच्या उभारीसाठी तेच पुरेसे होते. तो पुन्हा गळ्यात पडला; पण यावेळीस रडण्यासाठी नाही तर तिचा आधार त्याला हवा होता. नंदिनीने त्याच्या पाठीवर एक हात ठेवला आणि दुसऱ्या हाताने त्याचा हात धरला.
“कोसळलेल्या माणसाला धरून ठेवणं, आधार देणं म्हणजेच कदाचित लग्न असावं.”
तिच्या मनात विचार आला. बराच वेळ स्वराज तिच्या खांद्यावर टेकून डोळे मिटून तसाच बसून राहिला. स्वराज हळूहळू शांत होऊ लागला. नंदिनीही तशीच बसून राहिली. त्याचे श्वास तिच्या कानापाशी ऐकू येत होते. ती त्याच्या हाताला धरून त्याच्या खोलीत घेऊन आली.
“तुम्ही थोडा आराम करा.. मी तुमच्यासाठी थोडी कॉफी आणि नाष्टा घेऊन येते.”
“नको कॉफी.. तू फक्त माझ्याजवळ बसशील? मला एकट्याला सोडून जाऊ नकोस.. थोडा वेळ थांब ना प्लीज..”
त्याच्या डोळ्यांतली आर्जवे नंदिनीला स्पष्ट दिसत होती. तो पहिल्यांदाच कोणावर तरी इतका विसावला होता.
“ठीक आहे.. मी थांबते. पण तुम्ही आता आराम करायचा. थोडं आडवं होता का?”
त्याने होकारार्थी मान डोलावली. तशी ती त्याच्याकडे पाहून मंद हसली. स्वराज पलंगावर आडवा झाला. तिने त्याच्या अंगावर चादर ओढून दिली. त्याच्या उश्याशी बसून ती अलगद त्याच्या केसांतून हात फिरवू लागली. आधीच रडून रडून त्याला ग्लानी आली होती. त्यामुळे त्याचे डोळे अलगद मिटू लागले. आता स्वराज शांत झोपी गेला होता. तिने अलगद त्याच्या अंगावरची चादर एकसारखी केली आणि मनातल्या मनात स्वतःशीच पुटपुटली,
“आज मी आपल्या संसाराचा पहिला कठीण क्षण निभावून नेला आहे.”
नंदिनी बराच वेळ त्याचा निरागस चेहरा न्याहाळत त्याच्याजवळ बसून राहिली. नंतर ती जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात आली. सर्वांची जेवणं झाली. अर्पिताने तिला जेवायला बसायला सांगितलं,
“नंदिनी, आईबाबांची जेवणं झालीत. माझं आणि यांचंही जेवण झालंय. आता तूही जेवायला बस. स्वराज भावोजी आलेत ना? थांब मी त्यांना बोलावते.”
“नको ताई, त्यांची तब्येत मला ठीक वाटत नाहीये. मी त्यांच्या खोलीतच त्याचं जेवण घेऊन जाते.”
“आणि तुझं जेवण?”
“ताई, मी जेवेन नंतर.. मला आता भूक नाहीये.”
अर्पिताच्या प्रश्नावर उत्तर देत नंदिनी म्हणाली. आणि मग सर्वांची जेवणं झाल्यावर ती स्वराजचं जेवणाचं ताट घेऊन त्यांच्या खोलीत आली. तिने दोन तीन वेळा जेवायला उठवण्यासाठी आवाज दिला; पण स्वराजने काहीच उत्तर दिलं नाही. तिने ताट टेबलावर ठेवलं आणि त्याची चादर थोडी बाजूला करून उठवण्यासाठी त्याची अंगाला हात लावत त्याला हलकेच हलवलं तसं पटकन तिने हात मागे घेतला.
“अरे बापरे! तुमचं अंग तर तापाने फणफणतेय. पोटात अन्नाचा कण नाहीये तुमच्या.. औषध पण देता येणार नाही. काय करू आता? आईंना सांगू? नको.. उगीच टेन्शन घेत बसतील..”
नंदिनी विचारात पडली. इतक्यात तिला काहीतरी आठवलं.
थांबा, मी आलेच..”
असं म्हणत ती पटकन स्वयंपाकघरात आली. तिच्या आईने तिला जो काढा बनवायला शिकवला होता, अगदी तसाच काढा बनवला. एका पसरट भांड्यात थंड पाणी आणि स्वच्छ सफेद कापड घेऊन घेतलं आणि ती खोलीत
आली. तिने कसंबसं स्वराजला काढा पाजला. पलंगावर सरळ झोपवलं आणि स्वराजच्या माथ्यावर पाण्याची पट्टी ठेवली.
आली. तिने कसंबसं स्वराजला काढा पाजला. पलंगावर सरळ झोपवलं आणि स्वराजच्या माथ्यावर पाण्याची पट्टी ठेवली.
“ताप उतरल्यावर त्यांना सूप बनवून देते. म्हणजे नंतर औषध देता येईल आणि त्यांना थोडं बरंही वाटेल.”
ती स्वतःशीच पुटपुटली. नंदिनी रात्रभर त्याच्या उश्याशी बसून त्याच्या माथ्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. त्याच्या काळजीने रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता.
क्रमशः
©अनुप्रिया
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा