Login

तुम दे ना साथ मेरा.. ४८

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेमकहाणी..

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. ४८
©अनुप्रिया


इकडे स्वराज घरातून निघून गेल्यावर अधिरा एकटी बसली होती. डोळ्यांत पाणी होतं. इतक्यात तिची आई खोलीत आली.

“अरे हे काय! जावईबापू गेले सुद्धा? अगं मी त्यांच्यासाठी नाष्टा करून आणला होता.”

हातातला ट्रे टेबलवर ठेवत अधिराकडे पाहत आईने विचारलं.

“हो त्यांना एक कॉल आला होता. काहीतरी अर्जंट काम होतं असं म्हणाले आणि घाईत निघून गेले.”

अधिराने आईकडे न पाहताच उत्तर दिलं.

“असं होय.. ठीक आहे. जाऊ देत. काही महत्वाचं काम असेल. बरं तू नाष्टा करून घे.. मी आलेच.”

असं म्हणून आई खोली बाहेर निघून गेली. अधिरा पुन्हा एकटी झाली. ही एकटेपणाची जाणीव तिच्यासाठी काही नवीन नव्हती; आज तिला फार वेगळं वाटत होतं. आज तिच्या एकटेपणात कुठलाही आवाज नव्हता. फोन हातात नव्हता. स्क्रीनवर नाव चमकण्याची वाट पाहायची गरज उरली नव्हती. मेसेज येईल का, कॉल येईल का, “तो काही बोलेल का?” या सगळ्या प्रश्नांनी तिच्या मनात जागा घेतली नव्हती. पहिल्यांदाच तिच्या हातात मोकळेपणा होता आणि मनात एक विचित्र शांतता होती.

ती खुर्चीतून सावकाश उठली आणि खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. खिडकीची काच उघडताच सकाळचं ऊन थेट आत आलं. ते कोवळं, नितळ, कोणताही हिशोब न ठेवणारं ऊन.. त्या उन्हात उभं राहून तिने डोळे मिटले. कालपर्यंत तिचं मन संध्याकाळच्या संधीप्रकाशात अडकलेलं होतं. कालपर्यंत तिच्याजवळ काही अस्पष्टसे शब्द.. न सांगितलेल्या भावना, आणि अपूर्ण राहिलेलं एक नातं होतं. पण आज प्रसन्न सकाळ होती. नव्याने सुरुवात करणारी, एक नवी उमेद घेऊन आलेली सकाळ..

तिला आठवलं, किती वेळा ती स्वतःला विसरली होती. “तो काय म्हणेल?, त्याला काय वाटेल?, “आपण थोडं थांबूया” असं म्हणत म्हणत तिने स्वतःच्या मनाला कितीदा गप्प केलं होतं. प्रेम करताना ती इतकी हरवली होती की, स्वतःचा आवाज तिला ऐकूच येईना. प्रेम म्हणजे देणं असतं, असं ती मानायची; पण देत देत स्वतः रिकामी होत चालली आहे, हे तिला फार उशिरा कळलं होतं.

खिडकीबाहेरचं शहर जागं होत होतं. रस्त्यावरची वर्दळ, चहाच्या टपऱ्यांवरची हालचाल, दूर कुठेतरी ऐकू येणारा हॉर्न हे सगळं नेहमीचंच होतं. पण आज ते सगळं वेगळं वाटत होतं. कारण आज हळूहळू बदलेली अधिरा कुठलाही गदारोळ न करता शांतपणे समोर उभी होती. आणि एक विचार अचानकपणे तिच्या मनात ठामपणे उमटला.

“मी पूर्वी कुठेतरी वाचलं, ऐकलं होतं; पण आज पहिल्यांदाच मला हा विचार माझ्या अनुभवातून आल्यासारखा वाटतोय. तो विचार मला माझा वाटतोय. मला समजलंय आता की, प्रेम हरवलं म्हणून आयुष्य संपत नाही; पण स्वतःला हरवलं, तर सगळं संपतं. मला स्वतःला हरवायचं नाहीये.”

ती स्वतःशीच पुटपुटली. ‘मला स्वतःला हरवायचं नाहीये’ हे वाक्य तिच्या मनात आत खोलवर रुतून बसलं. ‘स्वराज..’
त्या नावानं अजूनही तिच्या छातीत हलकीशी कळ उमटली. आणि हे ती नाकारू शकत नव्हती. तो तिच्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग होता. तिच्या मनात, तिच्या हसण्यात, रडण्यात, तिच्या स्वप्नांत, तिच्या असण्यात सगळीकडे तो होता; पण आज अधीराला स्पष्ट जाणवलं की, स्वराज तिच्या आयुष्याच्या पुस्तकातील एक अध्याय होता. सुंदर, गुंतागुंतीचा, कधी आनंद देणारा, कधी वेदना देणारा पण तरीही एक अध्यायच. स्वराज तिच्या आयुष्याचं पूर्ण पुस्तक नव्हता आणि ते पुस्तक अजून अपूर्ण होतं.

तिने साऱ्या खोलीभर एक नजर फिरवली. मग उठून तिचं कपाट उघडलं. त्यात सामान कमी होतं. काही कपडे, काही पुस्तकं, आणि काही आठवणी.. ज्या सामानात मोजता येत नव्हत्या; पण आज त्या आठवणी फक्त तिच्यात होत्या. त्या तिला वेदना देत नव्हत्या. तिने कपाट बंद केलं आणि पुन्हा खुर्चीत येऊन बसली. थोडा वेळ ती तशीच बसून राहिली. एक दीर्घ श्वास घेत आज तिने स्वतःच्याच मनाशी एक निर्णय घेतला होता. कोणतही नाटक न करता, कुठलीही घोषणाबाजी न करता, कसलीच तक्रार न करता फक्त एक शांत निर्णय घेतला,

“आता थांबायचं नाही. कोणासाठीच मागे वळून पाहायचं नाही. आता इथून बाहेर पडायचं..”

दोन दिवसांनी अधिराने जेवणाच्या टेबलवर आपला निर्णय सांगितला.

“आईबाबा, मला अजून शिकायचंय. माझ्या करियरकडे लक्ष द्यायचंय. मी बेंगलोरला राहण्याचा निर्णय घेतलाय. तिकडे मी सगळी सोय केलीय. मी आजच बेंगलोरला जाण्यासाठी निघतेय..”

“बेंगलोर? इतक्या दूर? एका अनोळखी शहरात? अगं तिथे एकटी कशी राहशील?”

बाबांनी चिंता व्यक्त केली.

“अगं पण तू आताच आलीस आणि लगेच निघतेस? तुझं काही बिनसलंय का?”

आईनेही काळजीने विचारलं.

“नाही आई.. तुम्ही दोघं जे समजता तसं काही नाहीये. माझी मैत्रीण आहे तिथे. तिच्याचसोबत राहणार आहे. तिथे गेल्यावर कॉलेज आणि जॉबचं पाहिन. त्याचसाठी मला लवकरात लवकर तिथे पोहचायचं आहे. फायनलचा निकाल चांगलाच लागेल याची मला खात्री आहे. त्यामुळे नोकरी शोधणं गरजेचं आहे. आई, मी लगेच निघणार आहे.”

अधिराने आईबाबांना समजावून सांगत उत्तर दिलं. अखेर आईबाबांनी तिचा निर्णय मान्य केला आणि तिला बेंगलोर जाण्याची परवानगी दिली. अधिराने निघण्याची तयारी केली. आईने सामान बांधायला मदत केली. पुन्हा लेक दूर जाणार म्हणून तिचे डोळे सारखेच भरून येत होते. त्यानंतर थोड्यावेळाने अधिराने आईबाबांना नमस्कार केला. बॅग्स उचलून दार उघडलं. बाहेर पाऊल टाकताना ती क्षणभर थांबली. एक दीर्घ श्वास घेतला. एकदा आईबाबांकडे वळून पाहिलं आणि ती पुढे चालू लागली. मागे काहीतरी सुटलेलं आहे, हे तिला माहीत होतं;पण पुढे काहीतरी सापडणार आहे, याची खात्री तिला पहिल्यांदाच होती. आणि त्या खात्रीतच तिची खरी सुरुवात होती.

काही तासांच्या प्रवासानंतर अधिरा बेंगलोरला पोहचली. मोकळ्या हवेत तिने डोळे मिटून एक श्वास घेतला. एक नवीन शहर तिच्या स्वागतासाठी जणू सज्ज होतं. मनात विचार सुरू झाले.

‘या शहराची मला अजून फारशी ओळख नाहीये. रस्ते अनोळखी.. माणसं अनोळखी.. म्हणूनच की काय! हे शहर मला आपलं वाटतंय. इथे माझा भूतकाळ कोणाच्या ओळखीचा नाहीये. आता इथे मी कोणाची प्रेयसी नाही, कोणाची सावली नाही, तर मी फक्त अधिरा आहे. आता माझ्या आवाजाला, अस्तित्वाला एक नवी ओळख असेल.
मला माहितीये सगळं काही सोप्पं नाहीये. काही दिवस कठीण जातील. काही रात्री एकट्या असतील.. कधी कधी मन पुन्हा मागे ओढेल. पण आज मला पळायचं नाहीये. थांबायचंही नाहीये. आज मला फक्त स्वतःसोबत राहायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्याने स्वतःकडे पाहायचंय.”

अधिराने नव्या घराचं दार ठोठावलं. समोर तिची मैत्रीण, प्रिया उभी होती.

“ये.. ये आत ये..”

तिच्या हातातली एक बॅग घेत हसून ती म्हणाली. अधिरा आत आली.

“अधिरा, ये बस.. प्रवास कसा झाला? फार दगदग तर झाली नाही ना?”

“नाही.. फार काही नाही. मी फ्रेश होऊन येते मग गप्पा मारूया. मला खूप काही सांगायचं आहे प्रिया..”

अधिराचे डोळे पुन्हा भरून आले.

“हो.. चालेल. तू फ्रेश हो. मी तुझ्यासाठी चहा टाकते.”

प्रिया हसून म्हणाली. अधिरा फ्रेश होऊन बाहेर आली. केस पुसत आरश्यासमोर उभी राहिली. चेहऱ्यावर अजूनही थोडा थकवा होता. डोळ्यांत काही न सांगितलेल्या कथा होत्या; पण त्या डोळ्यांत आज “मी ठीक होईन. मी स्वतःला परत मिळवेन,” हे सांगणारा, असा विश्वास देणारा एक ठामपणा होता


क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all