Login

तुम दे ना साथ मेरा.. ४९

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेमकहाणी..

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. ४९
©अनुप्रिया


हळूहळू स्वराज आणि नंदिनीचं नातं अधिक घट्ट होत चाललं होतं. अधिराच्या बोलण्याने व्यथित झालेला स्वराज पार कोलमडून गेला होता. नंदिनीने त्याला सावरलं. आधार दिला. हळूहळू नंदिनीला स्वराजबद्दल आपुलकी वाटू लागली. त्याची काळजी घेणं तिला आवडू लागलं. कधी कधी त्यांच्या इतक्या गप्पा रंगायच्या की, शब्दच अपुरे पडायचे तर कधी काहीही न बोलता डोळ्यांतून बोललेलं समजून घेतलं जायचं तेही नंदिनीसाठी पुरेसं होतं. आता नंदिनीला खात्री वाटू लागली होती, हे नातं फक्त सोयीचं नाही, तर मनापासून स्वीकारलेलं आहे.

स्वराजही हळूहळू दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. नंदिनीच्या प्रेमळ स्वभावाने त्याला खूप सावरलं होतं. तिच्या जिव्हाळ्याने त्याला पुन्हा पालवी फुटू लागली होती. असं म्हणतात की, सवयीने आपोआप प्रेम वाढत जातं. एकत्र राहण्याने एकमेकांना समजून घेत, सावरत, सांभाळत लग्नाचा प्रवास छान सुरू होतो. स्वराजलाही नंदिनीने घेतलेली मेहनत दिसत होती. त्यालाही तिच्याबद्दल आदर आपुलकी वाटू लागली. स्वराज अधिराला पूर्णपणे विसरू शकला नव्हता; पण विरहाच्या वेदनेची तीव्रता आता कमी होऊ लागली होती. नंदिनीच्या मायेच्या फुंकरीने स्वराजच्या घावाला आराम मिळत होता. पण अजूनही नंदिनी सत्यापासून खूप दूर होती. स्वराजला एक भूतकाळ होता हे तिला माहित होतं; पण ती तिचीच सख्खी बहीण अधिरा असेल असं तिला कदापीही वाटलं नव्हतं. त्यामुळे ती या साऱ्या गोष्टींपासून खूप लांब होती. तिला सगळं सांगून टाकावं असं स्वराजच्या मनात खूप वेळा आलं; पण नंदिनी दुखावली जाईल. ती आता जितकी मायेने करतेय ते सगळं संपून जाईल. ती घर सोडून निघून जाईल या भीतीने त्याची तिला सांगण्याची हिंमतही झाली नाही. तसंही अधिरासोबतचं नातं तर संपुष्टात आलं होतं. मग जुन्या आठवणी काढून तिला त्रास कशाला द्यायचा या विचाराने स्वराज शांतच बसला.

इकडे मीरा तिच्या खोलीत येरझाऱ्या मारत होती. डोक्यात विचारचक्र सुरू झाले होते.

“काय चाललंय या दोघांचं? हसतात काय, खिदळतात काय! नुसता पोरकटपणा! आता आई असती ना चांगलं सुतासारखं सरळ केलं असतं या दोघांना..”

ती स्वतःशीच पुटपुटली.

स्वराज आणि नंदिनी या दोघांना असं प्रेमाने वागताना, एकमेकांची काळजी घेताना पाहून मीराचा जळफळाट होत होता.

“किती प्रयत्न केले मी, त्या दोघांना वेगळं करण्याचा.. अर्पिता नंदिनीबद्दल भडकवलं.. नंदिनीला माझ्या आणि स्वराजच्या नात्याबद्दल मुद्दाम खोटंच सांगितलं.. अर्पिता आल्यावर नंदिनीबद्दल सांगितलं. तिच्या मोठ्या बहिणीने तिचं प्रेम हिरावून घेतलं असं सांगून तिलाही भडकवण्याचा प्रयत्न केला. पण काही झालं नाही. अधिरा तिच्या घरी निघून गेली आणि हे दोघे अजूनच जवळ आले. काय करू मी आता?”

मीराच्या हाताच्या मुठी आवळल्या जात होत्या. त्या दोघांना वेगळं करण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले होते; पण तिला फारसं यश आलं नव्हतं.

“पुरे झालं मीरा, हे छोट्या छोट्या कुरघोड्या करणं आणि स्वतःच अपमानित होणं.. आता मी एकच शेवटचा घाव घालणार आहे. नाही या दोघांचं नातं बेचिराख करून टाकलं तर मीरा नाव नाही सांगणार मी..”

मीराचा चेहरा द्वेषाने भरून गेला होता. ती ईर्षेने पेटून उठली होती. डोक्यात तिच्या काहीतरी कट शिजत होता. मनाशी एक ठाम निर्णय करून मीरा खोलीच्या बाहेर पडली.

संध्याकाळची वेळ होती. घरात सगळे जमले होते. शालिनीताईंचीही तब्येत आता हळूहळू सुधारत होती. आज त्या देवघरात दिवा लावत होत्या. स्वराजचे बाबा वर्तमानपत्र वाचत बसले होते. अर्पिता स्वयंपाकघरात चहा करत होती. नंदिनी रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत होती आणि स्वराज खिडकीजवळ उभा होता. इतक्यात मीरा हॉलमध्ये आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा ताण लपवता येत नव्हता.

“मामा,मामी मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचं आहे.”

तिच्या आवाजातली गंभीरता सगळ्यांना जाणवत होती. शालिनीताईंनी दिवा देवाजवळ ठेवला आणि देवाला नमस्कार करून बाहेर हॉलमध्ये आल्या. अर्पिता आणि नंदिनी सर्वांसाठी चहा घेऊन आल्या. सर्वांच्या हातात चहाचा कप देऊन त्या सोफ्यावर बसल्या. माधवरावांनीही हातातलं वर्तमानपत्र खाली ठेवलं आणि ते सर्वजण मीराकडे पाहू लागले.

“काय झालं मीरा?”

शालिनीताईंनी मीराला विचारलं. मीरा क्षणभर थांबली. तिची नजर स्वराजवर गेली. तो अजूनही खिडकीकडे तोंड करून उभा होता. तिला माहित होतं, तो तिचं बोलणं ऐकत आहे.

“खरंतर मी हे आधीच सांगायला हवं होतं; पण मी गप्प राहिले. आणि तीच माझी चूक होती.”

मीरा सर्वांवर नजर टाकत म्हणाली. नंदिनी शांतपणे सोफ्यावर बसली होती. चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. पण हात घट्ट गुडघ्यावर टेकलेले होते. मीरा थोडा खोल श्वास घेत म्हणाली,

“मामा, मामी.. स्वराज आणि नंदिनी यांचं नातं काही महिन्यातच संपुष्टात येणार आहे.”

आईच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडता पडता राहिला.

“काय?”

माधवरावांचा आवाज थरथरला. अर्पिता जागीच थबकली.

“मीरा, काय बोलतेस तू?”

अर्पिताने मीराला चिडून विचारलं.

“मी खरं बोलतेय, अर्पिता.. लग्नाच्या पहिल्याच रात्री दोघांनी घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या केल्यात. मी स्वतः ते पेपर्स पाहिलेत. हवं असेल तर तुम्ही स्वराज किंवा नंदिनीला विचारू शकता..”

तिने छद्मी हसत स्वराजकडे पाहिलं. त्या क्षणी स्वराज वळला. त्याच्या चेहऱ्यावर ना राग होता, ना आश्चर्य.. फक्त थकवा होता. जणू हे शब्द तो आधीच मनात हजारदा ऐकून बसला होता!

“स्वराज, काय ऐकतोय मी हे? मीरा बोलतेय ते सगळं खरं आहे? बोल ना.. असा गप्प का उभा आहेस? बोल काहीतरी..”

माधवराव अतिशय संतापले होते. त्यांचा आवाज कठोर झाला होता. स्वराज काही बोलणार इतक्यात नंदिनी उभी राहिली.

“थांबा बाबा, मी खरं काय ते सांगते.. मीरा बोलते ते अगदी खरं आहे. आम्ही लग्नाच्या पहिल्या दिवसापासून एकत्र न राहण्याचा निर्णय घेतला होता. घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्याही केल्या. पण बाबा, आता परिस्थिती वेगळी आहे. कायद्याने घटस्फोटाचे पेपर्स साईन केल्यानंतर सहा महिने एकत्र राहून एकमेकांना समजून घेण्याचा अवधी दिला होता आणि त्याच अवधीत आम्ही एकमेकांना समजून घेत होतो. आम्हाला हे नातं हवंय की नको हे तपासून पाहत होतो.”

नंदिनीने स्वराजकडे पाहिलं. आज ती स्वराजसमोर मनातलं प्रेम तिच्या शब्दांत मांडणार होती. इतकं दिवस आत साठवलेलं, जपून ठेवलेलं आज बोलून दाखवणार होती. पण त्या क्षणाआधीच सगळं बदललं. नंदिनी क्षणभर थांबून म्हणाली,

“आणि आई बाबा, आता मला हे सांगायला खूप आनंद होतोय की, मला हे नातं…”

“थांब नंदिनी.. घाई करू नकोस. काही सांगण्याआधी नीट विचार कर. एका खूप मोठ्या सत्यापासून तू अनभिज्ञ आहेस..”

मीरा नंदिनीवर कडाडली.

क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all