डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. ५०
©अनुप्रिया
©अनुप्रिया
नंदिनीने चमकून मीराकडे पाहिलं.
“तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल मीरा..”
शालिनीताई मीरावर चिडून बोलल्या. मीरा स्वराज आणि नंदिनीकडे पाहत म्हणाली,
“मामी, स्वराजचं लग्नाआधी कोण्या एका मुलीवर प्रेम..”
“हो मला माहितीये.. लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्यांनी मला हे सांगितलं होतं. तो त्यांचा भूतकाळ होता. जो पूर्णपणे संपलाय आणि मी त्यांचा वर्तमान आहे आणि भविष्यही.. समजलं तुला? तेंव्हा तू माझ्या मनात स्वराजविषयी विष कालवू नकोस. मला त्याने काहीही फरक पडणार नाही. सो शट यॉर माऊथ.”
नंदिनी मीरावर संतापून म्हणाली. मीरा तिला डिवचत पुन्हा म्हणाली,
“अगं पण ती मुलगी कोण आहे हे तरी माहीती करून घेशील की नाही?”
“त्याने काय फरक पडतो? मीरा, भूतकाळाला मागे सोडल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. त्यांचं आयुष्य खूप गुंतागुंतीचं आहे हे मला ठाऊक आहे. त्यांनीही ते माझ्यापासून कधी लपवलं नाही. कुटुंब आणि प्रेम या दोन्ही गोष्टी सांभाळताना त्यांची किती परवड झाली असेल मी समजू शकते. एकीकडे आईची प्रकृती, त्यांनी घातलेली शपथ आणि दुसरीकडे त्यांचं प्रेम यात थोड्या वेळासाठी आईला निवडलं तर बिघडलं कुठे? त्यांनी ज्या मुलीवर प्रेम केलं, त्या नात्यातही ते प्रामाणिक होते. म्हणूनच तर त्यांनी माझ्याशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असेल. त्यांना तिला जर फसवायचंच असतं तर मग माझ्याकडून घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या कशाला घेतल्या असत्या? त्या दिवशी स्वराज तुटून रडत होते, त्यांना आधाराची गरज होती. मी त्यांना आधार दिला. कारण त्याक्षणी ते फक्त माझे पती नव्हते तर एक माणूसही होते. त्या मुलीसाठी मुळासकट उन्मळून कोसळताना मी त्यांना पाहिलंय. पण त्याच दिवशी सर्व संपलंय, त्यांनी ते संपवलं हे त्यांनी स्वतःहून मला सांगितलं. इतक्या दिवसात मी त्यांना अधिक जवळून पाहिलंय. त्यांच्यातला सच्चेपणा मी अनुभवलाय. स्वराज त्यांचा भूतकाळ मागे सारून पुढे जाताहेत तर आपली हरकत का असावी?”
नंदिनी मनापासून स्वराजची बाजू मांडत होती. माधवराव आणि शालिनीताई तिच्याकडे कौतुकाने पाहत होते. आपल्या सुनेचा समजूतदारपणा पाहून त्यांचा ऊर आनंदाने भरून आला होता.
“अगं पण त्याने त्याचा भूतकाळ सोडलाय हे तुला कोणी सांगितलं? त्याचं तिच्यावर अजूनही प्रेम आहे. तो त्या नात्यात खूप गुंतलेला आहे. त्या दोघांचं नातं पूर्णपणे संपलेलं नाही आणि मी जे बोलतेय ते शंभर टक्के खरं आहे. तुम्हाला हवं असेल तर मी हे सिद्धही करू शकते. नंदिनी, तुला जर त्या मुलीचं नाव समजलं तर तुझ्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकल्याशिवाय राहणार नाही. त्या मुलीचं नाव ऐकायचं तुला? सांगू मी?”
मीरा शांतपणे म्हणाली.
“मीरा, खबरदार! आता एक शब्द जरी उच्चारशील तर!”
माधवराव रागाने अक्षरशः थरथरत होते. मीरा त्यांच्या रागाला न जुमानता म्हणाली,
“का? मला का रागवता? मी खरं बोलतेय म्हणून? कळू देत तिलाही, तिच्यासोबत कोण आणि कसं फसवणूक करतंय? तिला तिच्या नवऱ्यावर विश्वास आहे ना? मग तिलाही समजू देत तिचा नवरा कसा तिचा विश्वासघात करतोय.”
मीरा त्वेषाने बोलत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आवेग, आवाजातली कटू ठामपणा काहीतरी वेगळंच सांगत होता. आज तिला स्वराजने नंदिनीपासून लपवून ठेवलेलं अधिराचं सत्य उघड करायचं होतं. नव्याने रुजत चाललेल्या नंदिनी आणि स्वराजच्या नात्याला तिला सुरुंग लावायचा होता.
“ठीक आहे.. सांग, काय सांगायचं आहे तुला? स्वराजचा भूतकाळ? खरंतर मला त्या भूतकाळाशी काही घेणंदेणं नाही पण तुझ्या मनःशांतीसाठी सांगून टाक, कोण आहे ती मुलगी?”
कंटाळून नंदिनीने प्रश्न केला. स्वराजच्या मनात चलबिचल झाली. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट पसरलं. अखेर मीराने कुठलाही आडपडदा न ठेवता, स्वराजचं सत्य सगळ्यांसमोर उघड केलं.
“त्या मुलीचं नाव आहे अधिरा.. होय नंदिनी, तुझी धाकटी बहीण अधिरा.. तिचं आणि स्वराजचं एकमेकांवर खूप प्रेम..”
तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच तिच्या कानाखाली जोरात एक चपराक बसली. नंदिनीने भरदिवसा तिच्या डोळ्यांसमोर काजवे चमकवले होते.
“मूर्ख मुली, खबरदार माझ्या बहिणीचं नाव घेतलंस तर! तिचं नाव घेताना तुला काहीच कसं वाटलं नाही? अगं तू स्वतः एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल असं कसं बोलू शकतेस?”
नंदिनी तिच्यावर चवताळून जात म्हणाली.
“नंदिनी, तू माझ्या कानाखाली जाळ काढलास.. काही हरकत नाही.. मला वाईट वाटणार नाही कारण मी खरं बोलतेय. हवंतर स्वराजला विचार..”
मीरा खांदे उडवत स्वराजकडे पाहून म्हणाली. नंदिनीने स्वराजकडे पाहिलं. त्याने शरमेने मान खाली घातली.
“सांगा स्वराज.. ही मीरा जे बोलतेय ते खरं आहे?”
स्वराजच्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं. त्याने फक्त खजिल होत होकारार्थी मान हलवली आणि अपराधी भावनेने खाली जमिनीकडे पाहत काही न बोलता तिच्यासमोर उभा राहिला. ते पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला. माधवरावांची अवस्था फारच वाईट झाली होती. स्वराजने प्रेमविवाह करू नये म्हणून त्याच्या लग्नाच्या वेळी त्यांनी जी काही कारस्थानं केली होती ती त्यांच्या नजरेसमोर फेर धरू लागली. डोळ्यांत पश्चाताप दाटून आला. नंदिनीच्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर
“अधिरा.. माझी धाकटी, लाडकी बहीण अधिरा?”
तिच्या हातातला मोबाईल खाली पडला. तिला भोवळ आली. ती खाली जमिनीवर कोसळणार इतक्यात अर्पिताने पटकन पुढे येऊन नंदिनीला सावरलं. नंदिनी जागीच थबकली. मीराने सर्वांना अधिरा आणि स्वराजचं नातं.. अपूर्ण राहिलेल्या गोष्टी, दडपलेले संदर्भ… सगळं सगळं सांगितलं. नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकली.
ती तिथे उभी होती, पण तिचं मन कुठेतरी कोसळत होतं. स्वराजकडे पाहायची हिंमतही तिला उरली नव्हती. ज्याच्यावर विश्वास ठेवून ती आज स्वतःचं मन उघडणार होती, तिच्या मनातलं प्रेम व्यक्त करणार होती, त्याच्याच आयुष्यात आधीच एवढं काही घडून गेलं होतं. तिचे डोळे आता वाहू लागले होते. मनात अपराधीपणाची भावना दाटून आली होती.
ती तिथे उभी होती, पण तिचं मन कुठेतरी कोसळत होतं. स्वराजकडे पाहायची हिंमतही तिला उरली नव्हती. ज्याच्यावर विश्वास ठेवून ती आज स्वतःचं मन उघडणार होती, तिच्या मनातलं प्रेम व्यक्त करणार होती, त्याच्याच आयुष्यात आधीच एवढं काही घडून गेलं होतं. तिचे डोळे आता वाहू लागले होते. मनात अपराधीपणाची भावना दाटून आली होती.
“तरीच माझी अधिरा मी इतका आग्रह करूनही थांबली नाही. खूप दिवस राहणार आहे, मज्जा करणार आहे असं म्हणणारी अधिरा दोन दिवसांत परत घरी गेली. याचा अर्थ
स्वराजला तिने या घरात पाहिल्यावर ती तडक इथून निघून गेली. अरे देवा, हे माझ्या हातून काय होऊन बसलं! मीच माझ्या बहिणीच्या सुखाच्या आड आले. तिचं प्रेम, तिचा स्वराज मी तिच्यापासून हिरावून घेतला.”
स्वराजला तिने या घरात पाहिल्यावर ती तडक इथून निघून गेली. अरे देवा, हे माझ्या हातून काय होऊन बसलं! मीच माझ्या बहिणीच्या सुखाच्या आड आले. तिचं प्रेम, तिचा स्वराज मी तिच्यापासून हिरावून घेतला.”
नंदिनी हमसून हमसून रडत होती.
क्रमशः
©अनुप्रिया
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा