Login

तुम दे ना साथ मेरा.. ५१

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेमकहाणी..

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. ५१
©अनुप्रिया


“नाही…. असं होणार नाही किंबहुना मी असं होऊ देणार नाही. मी स्वराज आणि नंदिनीला विरहात जळू देणार नाही. एकमेकांवर नितांत प्रेम करणारे दोन जीव एकत्र यायलाच हवेत. ते दूर होण्यामध्ये मला कारणीभूत व्हायचं नाही. मी माझ्या बहिणीच्या सुखाच्या आड येणार नाही. मी त्या दोघांच्या मधे आलेय. मलाच त्या दोघांपासून दूर व्हायला पाहिजे. स्वराजच्या प्रेमावर अधिराचाच हक्क आहे आणि तो तिला मिळालाच पाहिजे.”

नंदिनीच्या मनात विचारांनी पुरता घेराव घातला होता. तिच्या मनात स्वराजबद्दल नकारात्मक भावना घर करू लागल्या. घरात एक विचित्र शांतता पसरली होती. कोणीच काही बोलत नव्हतं. जणू सगळ्यांच्या शब्दांचा साठा एकाच क्षणी संपून गेला होता! सर्वांसाठीच मीराने दिलेली माहिती धक्कादायक होती. कोणालाही झाल्या प्रकारची तसूभरही कल्पना नव्हती. मीराचा कडवटपणा सध्या कोणाला दिसत नव्हता. मीराचा डाव टाकून झाला होता आणि त्याचा व्हायला हवा तसा परिणाम होत होता. अखेर मीरा तिच्या या कारस्थानात विजयी झाली होती. घरातली शांतता भंग पावली होती. सर्वांच्या आनंदाला सुरुंग लागला होता.

नंदिनी अजूनही अर्पिताच्या आधाराने उभी होती. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तिचे ओठ थरथरत होते. नंदिनी काहीतरी बोलेल, विचारेल, स्वराजला जाब विचारेल अशी सर्वांची अपेक्षा होती; पण नंदिनी काहीच बोलली नाही. तिने एकदाही स्वराजकडे पाहिलं नाही. जणू त्याचं अस्तित्व त्या क्षणी तिच्यासाठी तो असूनही नसल्यासारखं होतं. तिने स्वतःला अर्पिताच्या हातातून सोडवलं. कोणालाही काही न बोलता, कुठलाही आरोप न करता, कुठलाही प्रश्न न विचारता ती सरळ तिच्या खोलीकडे निघून गेली. त्या पाठोपाठ दरवाजा अलगद बंद झाला आणि त्या आवाजात कितीतरी नाती तुटल्याचा भास झाला. सर्वजण तिच्या बंद दाराकडे पाहत उभे राहिले.

“स्वराज, तू आम्हाला आधी का नाही सांगितलंस? अधिराशी लग्न लावून देण्यात आम्हाला कसलीच अडचण नसली असती.. हे लपवून तू फार मोठी चूक केलीस बाळा.. तू आमच्यासकट नंदिनीचाही विश्वास तोडलास. फार चुकीचं वागलास तू..”

शालिनीताई डोळ्याला पदर लावत म्हणाल्या.

“मम्मा, डॅडला सगळं माहित होतं. तरीही त्यांनी माझं लग्न नंदिनीशी ठरवलं. अधिरा नंदिनीची बहीण आहे हे मला माहितही नव्हतं. तिच्या घरच्यांबद्दल ती कधी फारशी बोलली नव्हती. अधिरा पहिल्यांदा आपल्या घरी आली तेंव्हाच मला नंदिनी आणि ती सख्या बहिणी आहेत हे समजलं. तू मला शपथ देऊन नंदिनीशी लग्न करण्यास भाग पाडलंस. अधिराने आमचं नातं संपवलं तेंव्हा मी खूप कोलमडून गेलो होतो. नंदिनीने मला सावरलं. मला त्या दुःखातून बाहेर काढलं. मम्मा, संपलेला अध्याय नंदिनीसमोर उघडा करावा असं मला वाटलं नाही म्हणून मी शांत राहिलो गं.. चुकलं माझं..”

स्वराजच्या डोळ्यांत पाणी दाटू लागलं. सर्वजण स्तब्ध होऊन फक्त त्याचं बोलणं ऐकत होते. मीरा सोडून सर्वांनाच झालेल्या प्रकाराबद्दल वाईट वाटत होतं.

नंदिनी खोलीत येऊन मटकन खाली जमिनीवर बसली. तिने तिचे दोन्ही पाय पोटाशी घट्ट धरून ठेवले. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं.

“अधिरा…”

तो शब्द ओठांवर आला आणि पुन्हा तिने ओठातच गिळून घेतला. तिला राग येत नव्हता. तिला द्वेष वाटत नव्हता. तिला फसवणूक झाल्याची भावना देखील नव्हती. तिला फक्त एकच प्रश्न छळत होता.

“मी योग्य केलं का? बहिणीचं प्रेम हिरावून घेतलं आणि नवऱ्याच्या आयुष्यात नकळत घुसले. मी कुणाच्याच आयुष्यात असायला नको होते.”

हा विचार तिला आतून पोखरत होता. त्या रात्री नंदिनीने एक क्षणही झोप घेतली नाही. नंदिनी जागेवरून उठली. कपाटातून तिचे कपडे बाहेर काढून बॅगेत भरले आणि सकाळ होण्याच्या वाट पाहू लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी अर्पिता उठली आणि सकाळची कामं उरकू लागली. तिची नजर पुन्हा पुन्हा नंदिनीच्या खोलीच्या दिशेने जात होती. तिने विचार केला,

“रात्री उशिरा झोपली असेल त्यामुळे सकाळी जाग नसेल आली. पण स्वराज? तोही त्याच्या खोलीत गेला असेल का? असेल कदाचित.. पुढे त्यांच्या नात्याचं काय होणार आहे, देवास ठाऊक!”

अर्पिता विचार करतच होती की, स्वराज स्टडीरूममधून बाहेर आला.

“अरे हा तर इथेच होता, म्हणजे हा त्याच्या खोलीत गेलाच नाही?”

अर्पिता विचारात पडली. थोड्या वेळात सर्वजण न्याहारी करण्यासाठी एकत्र बसले; पण नंदिनी तिच्या खोलीतून बाहेर आली नाही. स्वराजची अस्वस्थ पाहून मीराच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. इतक्यात स्वराज शालिनीताईंकडे पाहत बैचेन होऊन म्हणाला,

“आई, मी नंदिनीला न्याहारीसाठी बोलवून आणतो. रात्रीही ती जेवली नव्हती. आलोच मी..”

“हो.. जा बघ बरं, ती खोलीत काय करतेय? एव्हाना ती स्वयंपाकघरात असते पण आज..”

शालिनीताईंनी चिंता व्यक्त केली. स्वराज जागेवरून उठणार इतक्यात नंदिनीच्या खोलीचं दार उघडलं. नंदिनी हातात कपड्यांची बॅग घेऊन उभी होती. ती चालत हॉलमध्ये आली. स्वराज तिच्याकडे पाहतच राहिला. खुर्चीतून उठत म्हणाला,

“हे काय? नंदिनी बॅग घेऊन कुठे निघालीस?”

नंदिनीने स्वराजकडे साफ दुर्लक्ष केलं आणि बॅग खाली ठेवून शालिनीताईंकडे पाहत ती म्हणाली,

“आई मी हे घर कायमचं सोडतेय. ऊर भरून येतोय पण मी आता इथे क्षणभरही राहू शकत नाही. मी माझ्या माहेरी जातेय.”

घरात पूर्ण शांतता पसरली. सर्वजण आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागले. ती शांतपणे पुढे म्हणाली,

“मी कोणावर आरोप करत नाही; पण मी अंधारात राहणारही नाही. मला फसवून निभावलेलं नातं नकोय. आणि मला हे असं खोटं शांत आयुष्यही नकोय.”

स्वराजने डोळे मिटले. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, नंदिनी रडत नाहीये, ओरडत नाहीये; पण तुटून निघून जात आहे. शालिनीताईंचा आवाज भरून आला.

“नंदिनी, असं संसार मोडून..”

नंदिनी त्यांना हलकेच थांबवत म्हणाली.

“आई, संसार तर कालच मोडला. आज फक्त सत्य समोर आलंय.”

इतकं बोलून कोणावरही न रागावता, कुठलाही गोंधळ न घालता नंदिनी माहेरी निघून गेली. जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. शालिनीताई, अर्पिता भरल्या डोळ्यांनी तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होत्या.

“ती निघून गेली?”

त्याचा आवाज थरथरत होता. मीराच्या ओठांवर मात्र हलकंसं समाधान उमटलं. तिला हवं तेच झालं होतं. नंदिनी दूर निघून गेली आणि स्वराज एकटा झाला होता.

“बघितलंस ना? सत्य समोर आलं की नाती तुटतातच.”

मीरा उपहासाने म्हणाली. पण स्वराज मीराकडे न पाहताच म्हणाला,

“मला नंदिनीशिवाय राहता येणार नाही. मी चुकलो.. खूप चुकलो; पण तिला गमावून मी जगू शकत नाही. तिचा शांतपणा, तिचं समजून घेणं.. हे सारं मला हवंय. तीच माझी खरी ताकद होती.”

“पण स्वराज.. ती आता परत येईल? सत्याला स्वीकारू शकेल?”

मीरा छद्मी हसत म्हणाली.

क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all