डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा ५२
©अनुप्रिया
©अनुप्रिया
स्वराज दुःखाने कोसळत चालला होता. नंदिनीचं घर सोडून जाणं त्याला प्रचंड वेदना देत होतं. शालिनीताई त्याला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवत आधार देत होत्या; पण त्याच्या दुःखाचा निचरा काही केल्या होत नव्हता. त्याला शोक अनावर होताना पाहून अर्पिता सावकाश चालत त्याच्याजवळ आली. त्याच्या खांद्यावर हात ठेवत शांतपणे म्हणली,
“स्वराज भावोजी, सावरा स्वतःला.. असा धीर सोडून कसं चालेल? तुम्हाला खंबीरपणे वागायला हवं. मला सांगा तिचं काय चुकलं? तिचा घर सोडण्याचा निर्णय चुकीचा होता? तुम्ही तिच्यापासून एवढं मोठं सत्य लपवून ठेवलंत. मग तिचं दुखावलं जाणं साहजिक नव्हतं का? भावोजी, तुम्हीच तिला आता थोडं समजून घ्यायला हवं. नंदिनी रागावलेली नाहीये. ती दुखावलेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या मनात अपराधीपणाची भावना आहे.”
स्वराज डोळे पुसत प्रश्नार्थक नजरेने अर्पिताकडे पाहू लागला. अर्पिता त्याच्याकडे पाहत म्हणाली,
“नंदिनीला तुमचा भूतकाळ माहीत होता. तुमचं कोण्या एका मुलीवर प्रेम होतं आणि तिच्यासाठी तुम्ही नंदिनीकडून घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या घेतल्या. त्यानंतर तुम्ही सगळं संपलंय म्हटल्यावर तीही तुमच्यासोबत यायला, संसार करायला तयार झाली होती; पण काल रात्री नंदिनीला अधिरा आणि तुमच्या नात्याबद्दल समजलं. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. आता तिला वाटतंय की, तीच अधिराच्या आयुष्यात अडथळा ठरली आहे. तिने कोणाचं तरी प्रेम चोरलंय..”
अर्पिता क्षणभर थांबली आणि म्हणाली,
“भावोजी, तिला थोडा वेळ द्या. तिच्या मनातलं वादळ तिला स्वतःलाच शांत करायचं आहे; पण लक्षात ठेवा ती निघून गेली आहे, ते या घरापासून दूर जाण्यासाठी नाही तर या दुःखातून स्वतःला सावरायला, मनाने खंबीर व्हायला, स्वतःशीच संवाद साधायला तिचा तिला वेळ हवाय.. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, नंदिनी नक्की परत येईल.”
स्वराजने एक दीर्घ श्वास घेतला आणि भरल्या डोळ्यांनी अर्पिताकडे पाहत म्हणाला,
“ठीक आहे वहिनी, तू म्हणते तसं होईल अशी आशा बाळगतो. वहिनी, नंदिनी माझा श्वास आहे अगं.. मी तिच्याशिवाय जगू शकणार नाही. या आधी माझ्याकडून खूप चुका झाल्यात; पण आता नाही. मला तिच्यासोबत राहायचं आहे. याच छताखाली एकत्र राहून सुखाचा संसार करायचा आहे. पण नंदिनी नक्की परत येईल ना? ती मला माफ करेल ना? ”
“हो नक्कीच.. मला खात्री आहे भावोजी, ती नक्की घरी परत येईल.”
“पण तू इतक्या खात्रीने कसं काय बोलू शकते आणि तेही इतकं सगळं झाल्यावर?”
“हो भावोजी, मला आपल्या नंदिनीच्या परत येण्याची खात्री आहे कारण मी तिच्या डोळ्यांत तुमच्याबद्दलचं प्रेम पाहिलं आहे. तिला तुमची काळजी आहे. तुमच्याबद्दल तिच्या मनात असलेलं प्रेमच तिला परत या घरात आणेल. तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. थोडा वेळ जाऊ द्या. नंदिनीच्या मनातली अपराधी भावना पुसायला वेळ तर लागेलच. थोडा वेळ गेला की, तुम्हीच शांतपणे तिच्याशी बोला. नंदिनी खूप समजूतदार आहे, ती नक्कीच तुम्हाला समजून घेईल.”
अर्पिताचं बोलणं ऐकून स्वराजला हळूहळू उभारी मिळू लागली. तिचं बोलणं ऐकताना त्याच्या मनात नंदिनी परत येण्याचा आशावाद जागा होऊ लागला. मनाला फुटलेल्या आशेच्या धुमाऱ्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तो अर्पिताकडे पाहत म्हणाला,
“ठीक आहे वहिनी.. तू म्हणतेस ते खरंच आहे. थोडा वेळ जाऊ दिला की, सगळं ठीक होईल. वहिनी, नंदिनी दुखावली गेली आहे आणि या गोष्टीला कळत नकळतपणे मीच कारणीभूत आहे. मी तिला समजावून सांगण्याचा, तिला परत आणण्याचा अतोनात प्रयत्न करेन. कितीही वेळ लागला तरी मी तिच्या परत येण्याची वाट पाहीन.”
“आता जा तुम्ही.. तुमच्या खोलीत जाऊन थोडा आराम करा..”
अर्पिता किंचित हसून म्हणाली. त्यानेही आनंदाने मान डोलावली आणि खुर्चीतून उठून आपल्या खोलीच्या दिशेने चालू लागला. अर्पिता, शालिनीताई आणि मीरा त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते. स्वराज खोलीत निघून गेला. शालिनीताई आपल्या सुनेकडे, अर्पिताकडे कौतुकाने पाहत होत्या.
“आज अर्पिताने जो काही समजूतदारपणा दाखवला, तो खरंच वाखाणण्याजोगा होता. सगळं किती सहज आणि स्वराजच्या मनाला पटेल अशा भाषेत तिने त्याला समजावून सांगितलं! साऱ्या जगाने वांझ म्हणून तिची हेटाळणी केली; पण आज तीच माझ्या स्वराजची आई झाली आणि आई बनून तिने स्वराजचं दुःख समजून घेतलं. कुठून आला हा समजूतदारपणा?”
त्या स्वतःशीच पुटपुटल्या. पुढे होऊन अर्पिताचा हात हातात घेत त्या म्हणाल्या,
“अर्पिता, आज जे तू केलंयस ना, त्यासाठी तुझे आभार कसे मानू तेच समजत नाहीये मला. ज्या पद्धतीने तू आज स्वराजला सावरलंस ते फक्त एक आईच करू शकते. आज तू माझ्या स्वराजची आई झालीस गं..”
शालिनीताईंच्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं. अर्पिताही सद्गदित होऊन म्हणाली,
“आई, वहिनी आणि धाकट्या दिराचं नातं हे मायलेकाचंच असतं ना? माझ्या पोटी जन्म घेतला नाही म्हणून काय झालं, स्वराज भावोजी मला माझ्या मुलासारखेच आहेत. मी माझं कर्तव्य केलं. बाकी काही जास्त केलं नाही. आणि खरं सांगू आई?”
शालिनीताईंनी हुंकार भरला.
“मोठा भाऊ आणि वहिनी हे आईबाबांच्या ठिकाणीच असतात. जन्मदात्याइतकीच त्यांची जागाही महत्वाची असतेच हे मला नंदिनीकडूनच उमजलं. आई, ज्यावेळी आजुबाजूच्या बायका माझ्याबद्दल काहीबाही बोलत होत्या, तेंव्हा तिनेच मला आधार दिला. ‘बाळाला जन्म दिल्यावरच आई होता येतं असं नाही तर आईपणाची भावना जगताना दुसऱ्यांच्या मुलांना जीव लावून आई होता येतंच की..’ हे तिनेच मला शिकवलं. तिने माझ्यातला आत्मविश्वास वाढवला. माझ्यातल्या कलागुणांना जपण्याचा खूप मोलाचा सल्ला दिला. आज जी मी इतकं छान समजावू शकले ते केवळ तिच्याचमुळे.. नंदिनी खूप गुणी मुलगी आहे. एक चांगली लेक, हक्काची मैत्रीण, उत्तम गृहिणी, समजूतदार जाऊबाई, चांगली सुन सगळ्या भूमिका तीच उत्तम पार पाडू शकते. आणि हो तीच स्वराज भावोजीना सावरू शकते. तीच त्यांची परफेक्ट पार्टनर आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यात कोणी कितीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचं नातं कधीच तुटणार नाही. त्यांच्या दोघांच्या नात्याला कधीच तडा जाणार नाही. समजलं का मीरा?”
अर्पिताने एक कटाक्ष मीराकडे टाकत विचारलं. मीराचा मात्र जळफळाट होत होता. अर्पिताला काहीच उत्तर न देता मोठ्या फणकऱ्याने पाय आपटत ती तिच्या खोलीत गेली.
क्रमशः
©अनुप्रिया
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा