Login

तुम दे ना साथ मेरा.. ५५

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेमकहाणी

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. ५५
©अनुप्रिया

मीराने स्वतःच्या मनाशी पक्कं ठरवलं आणि दुसऱ्याच दिवशी स्वराजचं घर सोडण्याचा निर्णय घेतला. झाल्या प्रकरणी शालिनीताई, अर्पिता, स्वराज सर्वांची माफी मागून ती घरातून बाहेर पडली.

इकडे नंदिनी माहेरी पोहचली. तिला असं अचानक बॅग घेऊन दारात उभी पाहून आईच्या काळजाचा ठोका चुकला. मनातली भीती चेहऱ्यावर न दाखवता आई हसून म्हणाली,

“काय गं नंदू, असं अचानक येणं केलंस? सगळं ठीक आहे ना? आणि हे काय, एकटीच आलीस? जावईबापू कुठे आहेत?”

“आई, काय गं हे, किती प्रश्न विचारशील? दारातच सुरू झालीस. मला घरात तर येऊ देशील का नाही?”

नंदिनी घरात येत आईवर चिडून म्हणाली. तिचा तो रौद्र अवतार पाहून आई शांत झाली. नंदिनी थेट तिच्या खोलीत आली. तिची ती माहेरची खोली ओळखीची होती. खिडकी, पडदे, कपाट… सगळं तसंच जागच्या जागी होतं. काहीच बदललं नव्हतं; पण नंदिनी मात्र बदलली होती. नंदिनी फ्रेश होऊन खिडकीजवळ येऊन उभी होती. बाहेर संध्याकाळ उतरत होती. मनात मात्र दिवस-रात्र एकत्र मिळून गोंधळ घालत होते. काय करावं तिला समजत नव्हतं. इतक्यात खोलीच्या दारावर टकटक झाली. कॉफी आणि नाश्त्याचा ट्रे घेऊन आई समोर उभी होती. काहीच न बोलता आईने आत येऊन ट्रे टेबलवर ठेवला आणि ती बाहेर जाऊ लागली.

“आई थांब.. सॉरी मगाशी मी तुझ्यावर चिडून बोलले.”

“ठीक आहे. मी कुठे काय बोलले? मुलं मोठी झाली की, असं होणारच ना? तू जास्त विचार करून नकोस. तू कॉफी घे.. गार होईल. दमली असशील ना? आपण बोलू नंतर.”

आई तिच्याकडे न पाहताच कॉफीचा कप तिच्या समोर धरत नाराजीच्या सुरात म्हणाली. नंदिनीच्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं. कापऱ्या स्वरात नंदिनी म्हणाली,

“तसं नाही गं आई.. मी जरा माझ्याच विचारात होते. मला खूप टेन्शन आलं होतं.”

“का? सासरी काही झालंय का? जावईबापूंशी काही भांडण वगैरे?”

आईच्या प्रश्नावर नंदिनीने दीर्घ श्वास घेतला आणि खाली जमिनीकडे पाहूनच म्हणाली,

“आई मी ते घर सोडून कायमची माहेरी आलीय. मी परत सासरी जाणार नाही.”

“काय? सासरी जाणार नाही म्हणजे?”

आई तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन विचारलं.

“आम्हाला तुम्हा मुलींचं काही कळतच नाही. एक पुढे शिकायचं म्हणून एका अनोळखी शहरात, बेंगलोरला गेली आणि आता तू मला सासरी जायचं नाही म्हणतेस. काय चाललंय तुमचं? करा काय हवं ते?”

आई इतकं बोलून बाहेर निघून गेली.

“काय? अधिरा बेंगलोरला गेली? कधी आणि मला सांगितलं का नाही?”

नंदिनीसाठी तर ही आश्चर्याची गोष्ट होती. नंदिनी विचार करू लागली,

“माझ्याचमुळे अधिरा बेंगलोरला निघून गेली असेल.. मला माफ कर अधिरा, तुझ्या सुखाच्या आड मीच आले. माझं जर स्वराजशी लग्न झालं नसतं तर आज तू माझ्या जागी असती. मीच तुझ्या दुःखाला कारणीभूत आहे.”

नंदिनीच्या मनात हा अपराधीपणा घट्ट बसून राहिला होता. दीर्घ श्वास घेत, डोळ्यांत पाणी पुसत नंदिनी स्वतःशीच पुटपुटली,

“पण मी माझी चूक सुधारेन. तुला तुझं प्रेम मिळवून देईनच अधिरा..”

दिवस भरभर पुढे सरत होते. नंदिनी माहेरी येऊन आठ दिवस झाले होते. नंदिनी माहेरी आली खरी; पण मन मात्र अजूनही सासरीच घुटमळत होतं.

“बाबांची गुढघेदुखी थांबली असेल ना? आईंचं खाणंपिणं, औषधंपाणी नीट सुरू असेल ना? अर्पिता ताई काय करत असतील? घरातल्या सर्वांची जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडली असेल.. भावोजी कारखान्यावर गेले असतील? आणि स्वराज… ”

स्वराजच्या विचाराने नंदिनी बेचैन झाली. तिलाही त्याची, घरच्यांची आठवण येत होती; पण मनात अपराधीपणाची बोचरी जखम सतत ठसठसत होती. इतक्यात तिची नजर मोबाईलच्या स्क्रीनवर गेली.

“तिला कॉल करू का? बोलून मनातलं दुःख निघून जाईल.”

असा विचार करून तिने अधिराला कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतला; पण दुसऱ्या क्षणाला डायल करायला घेतलेला मोबाईल पुन्हा खाली ठेवून दिला. अधिराशी बोलण्याची तिची हिंमतच होत नव्हती. तिच्या हातांच्या बोटांची चुळबुळ सुरू झाली. इतक्यात दारावर टकटक झाली. नंदिनीने दार उघडलं. समोर अधिरा उभी होती. दोघी समोरासमोर उभ्या होत्या. कोणाच्याही डोळ्यांत राग नव्हता.फक्त थकवा आणि अपूर्ण प्रश्न होते.

“ताई…”

अधिराचा आवाज किंचित थरथरला. नंदिनी काहीच बोलली नाही. अधिरा दोन पाऊल पुढे आली तसं नंदिनीने फक्त तिला मिठीत घेतलं. त्या मिठीत कितीतरी शब्द विरघळून गेले होते. थोड्या वेळाने तिने अधिराला पलंगावर बसवलं आणि म्हणाली,

“अधिरा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे.”

क्षणभर शांतता पसरली. जणू तिला नंदिनी काय बोलणार हे ठाऊक होतं. मग अधिराचा स्थिर शांत आवाज आला,

“हं ताई बोल.. काय बोलायचं आहे?”

“मीरा आम्हाला जे सांगितलं ते सगळं खरं आहे का?”

नंदिनी थरथरत विचारत होती. अधिरा काही क्षण गप्प राहिली. त्या शांततेत कुठलाही राग नव्हता, कुठलीही तक्रार नव्हती. फक्त एक स्वीकार होता. ती शांत स्वरात नंदिनीला म्हणाली,

“हो ताई, ते सगळं खरं होतं पण तो माझा भूतकाळ होता; पण तो तिथेच संपलाय. आत्ता स्वराज आणि माझा काहीही संबंध नाही. तो अध्याय माझ्यासाठी बंद झालाय.”

त्या वाक्यात वेदना नव्हत्या, मालकी हक्क नव्हता, अपेक्षा नव्हत्या. फक्त एक स्पष्टता होती. स्वराज आणि अधिरा कधीच वेगळे झाले होते. दोघांनी त्यांचे वेगळे रस्ते निवडले होते. त्यांचं नातं त्याच दिवशी संपलं जेव्हा स्वराज तिच्या कुशीत येऊन रडला होता. नंदिनी पुढे काहीच बोलू शकली नाही. थोडा वेळ शांततेत गेला. नंदिनी अधिराकडे पाहून म्हणाली,

“अधिरा, मला माफ कर बाळा.. माझ्यामुळे..”

“ताई, तू स्वतःला दोष देऊ नकोस. तू दोषी नाहीयेस. तो निर्णय आमचा होता आणि ती परिस्थितीपुढे हार होती.”

अधिरा हळू आवाजात म्हणाली. नंदिनीच्या डोळ्यांत पाणी आलं.

“पण तरीही…”

नंदिनी अस्पष्टपणे कुजबुजली.

“प्रेम कुणाचंच हिरावलं जात नाही ताई.. ते फक्त वेगवेगळ्या रूपात उरतं.”

अधिरा शांतपणे नंदिनीकडे पाहत म्हणाली, त्याक्षणी नंदिनीच्या मनातली गाठ सुटली. स्वराज आणि अधिराच्या नात्याविषयी वाटणारी अढी दूर झाली. दोघी बहिणी कितीतरी वेळ एकमेकींच्या कुशीत राहून आसवांना वाट मोकळी करून देत होत्या. मनावरचा भार हलका करत होत्या.


क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all