डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. ५६ (अंतिम)
©अनुप्रिया
©अनुप्रिया
अधिरा निघून गेल्यावर नंदिनी खूप वेळ खिडकीजवळ बसून राहिली. बाहेर अंधार दाटत होता; पण तिच्या मनात मात्र काहीतरी उजळून निघाल्यासारखं वाटत होतं. अपराधीपणाची जी जखम मनात खोलवर रुतून बसली होती, ती आज थोडी सैल झाली होती. त्या रात्री जेवणाची ताटं मांडली गेली; पण नंदिनी फारसं काही खाऊ शकली नाही. आई तिच्याकडे सतत पाहत होती. मुलीच्या शांतपणात दडलेला वादळाचा आवाज तिला ऐकू येत होता. जेवण झाल्यावर आई नंदिनीच्या खोलीत आली. तिने नंदिनीच्या डोक्यावरून हात फिरवला. आईच्या मायेच्या स्पर्शाने नंदिनी हळवी झाली मनाचा बांध फुटून वाहू लागला.
“आई…”
नंदिनीचा आवाज कापरा झाला. आई शांतपणे तिच्या शेजारी बसली.
“नंदू, एक गोष्ट सांगू?”
आईचा स्वर मायेचा होता. नंदिनीने मान डोलावली,
“लग्न म्हणजे फक्त सुख-सोयींची देवाणघेवाण नसते. नवराबायकोचं नातं म्हणजे दोन अपूर्ण माणसांनी एकमेकांना पूर्ण करण्याचा केलेला प्रयत्न असतो. तसं तर चुका दोघांकडूनही होतात. राग, अहंकार, गैरसमज सगळं येतं; पण त्या नात्याला टिकवायचं की तोडायचं हा निर्णय घेताना मनापेक्षा मोठं हृदय लागतं.”
नंदिनी गप्प होती. आई पुढे म्हणाली,
“माफ करणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं नसतं गं. उलट माफ करण्यात मोठेपणा असतो. जो माणूस माफी मागतो, तो लहान नसतो; आणि जो माफ करतो, तो मुळीच कमजोर नसतो. संसारात कधी कधी न्यायापेक्षा नातं मोठं असतं.”
आईचे शब्द नंदिनीच्या काळजावर अलगद उतरत होते. आई बोलत होती आणि नंदिनीला स्वराजचा चेहरा आठवत होता. त्याचा आक्रोश, त्याचे अश्रू, त्याची अपराधी भावना सारं सारं तिला आठवत होतं. त्याने केलेली चूक मोठी होती; पण त्याची पश्चात्तापाची आगही खरी होती.
त्या रात्री नंदिनी शांत झोप आली नाही. अगदी पहाटेपर्यंत ती जागी होती पहाटेच्या त्या शांततेत तिने स्वतःशीच एक निर्णय घेतला.
“मी पळ काढणार नाही. मी तुटलेलं नातं जोडायला परत जाईन.”
दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनीने आईकडे पाहून ठामपणे सांगितलं,
“आई, मी सासरी परत जातेय.”
आईच्या डोळ्यांत पाणी तरळलं; पण ओठांवर मात्र समाधानाचं हसू होतं.
इकडे स्वराज दिवसेंदिवस कोसळत होता. घरात असूनही त्याला नसल्यासारखं वाटत होतं. नंदिनी माहेरी गेल्यामुळे जणू त्या घरातला आत्माच निघून गेला होता. तो तिच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होता. रोज तो अर्पिताला एकच प्रश्न विचारत रहायचा,
“ती परत येईल का?”
“येईल.. नंदिनी नक्की परत येईल कारण ती अशी पळून जाणाऱ्यांतली नाही.”
अर्पिता ठामपणे म्हणायची: पण स्वराज मात्र काळजी करत रहायचा. कितीदा वाटलं त्याला, नंदिनीला कॉल करून सगळं मनातलं सांगावं की, ‘नंदिनी, तुझ्या दृष्टीने कदाचित मी चुकलो असेन; पण ज्या क्षणी आम्ही मुव्ह ऑन होण्याचा निर्णय घेतला, त्या क्षणानंतर माझ्या मनातून अधिराचे विचार पुसून टाकण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. तिला विसरून जाण्याचा कसोशीने प्रयत्न केला. आणि खरं सांगायचं तर तुझ्या मायेच्या स्पर्शाने, तू घेतलेल्या काळजीने, मला सावरल्याने मी तिला माझ्या मनातून खरंच पुसून टाकलंय. अधिरा माझा भूतकाळ होता आणि तू माझा वर्तमान आणि भविष्यही. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही नंदिनी.. प्लीज परत ये..’ पण स्वराजने इतक्या दिवसांत एकदाही कॉल केला नव्हता कारण त्याला माहीत होतं, नंदिनी रागावलेली नाहीये तर ती दुखावली गेलीय आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला तिचा वेळ हवाय. तिला माझ्या आयुष्यात तिची अशी हक्काची जागा हवीय म्हणून स्वराज शांत राहिला. विरहाचे घोट घेत राहिला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नंदिनी सासरी पोहोचली. दार उघडताच तिला स्वराज समोर उभा असलेला दिसला. डोळे खोल गेलेले, चेहऱ्यावर थकवा आणि भीती दोन्ही एकत्रितपणे दिसत होते. तिला पाहताच तो काही क्षण स्तब्ध झाला.
“नंदिनी…”
त्याचा आवाज थरथरत होता. नंदिनी काहीही न बोलता आत आली. काही क्षण शांततेत गेले. इतक्यात अर्पिता स्वयंपाकघरातून बाहेर हॉलमध्ये आली.
“कोण आलंय भावोजी?”
पदराला हात पुसत तिने विचारलं. तो काही बोलणार इतक्यात तिची नजर नंदिनीवर पडली.
“अरे नंदिनी, आलीस तू? व्वा! बरं झालं आलीस. भावोजीनी नुसतं तू कधी येणार म्हणून भंडावून सोडलं होतं मला.. घ्या भावोजी, म्हटलं होतं ना? बघा, आली की नंदिनी?”
अर्पिताला नंदिनीला असं समोर पाहून खूप खूप आनंद झाला होता. अर्पिता पटकन जवळ येऊन तिच्या गळ्यात पडली. तिच्या आवाजाने शालिनीताई, माधवराव आणि सार्थक बाहेर आले. नंदिनीने पुढे येऊन सासुसासऱ्याना वाकून नमस्कार केला. तिला परत आलेलं पाहून सर्वांनाच खूप आनंद झाला होता.
“नंदिनी, मी खूप चुकलोय. प्लीज मला माफ कर..”
स्वराजच्या डोळ्यांतून त्याचा पश्चाताप वाहू लागला. पण नंदिनी त्याच्याकडे न पाहता शालिनीताईंकडे पाहत म्हणाली,
“आई, मला आता जुन्या कडवट गोष्टी पुन्हा ऐकायच्या नाहीयेत. आठवायच्या सुद्धा नाहीयेत. मी नव्याने आज या घरात प्रवेश केलाय. तेंव्हा आई मला नव्याने सुरुवात करायची आहे.”
तिचं बोलणं ऐकून शालिनीताईंना खूप आनंद झाला. शालिनीताई आनंदून म्हणाल्या,
“ठीक नंदिनी, तू म्हणशील तसं.. आजपासून तुला जे आवडेल तेच या घरात होईल. तुला कोणीही दुखावणार नाही. हो की नाही अर्पिता? तुझी धाकटी जाऊबाई परत आलीय स्वागताची तयारी करशील की नाही?”
अर्पिताने आनंदाने मान डोलावली. शालिनीताईं आनंदाने अक्षरशः घरात फर्मान सोडत म्हणाल्या,
“अर्पिता, आज रात्रीच्या जेवणात काहीतरी गोडाचा पदार्थ कर हा.. माझी लाडकी सुन नंदिनी घरी आलीय. हा आनंद साजरा व्हायला हवा ना? चला लागा स्वयंपाकाला..”
नंदिनी आणि अर्पिता या दोघींनी मिळून छान स्वयंपाक केला. रात्रीच्या जेवणात शेवयांची गोड खीर बनवली. स्वराजला आवडतो म्हणून नंदिनीने गोडाचा शिराही बनवला. थोड्याच वेळात सर्वांनी आनंदात, हसत बोलत रात्रीचं जेवण केलं. त्यानंतर बराच वेळ सर्वजण गप्पा मारत बसले. गप्पा चांगल्याच रंगल्या. बऱ्याच दिवसांनी आज घरात हसण्या खिदळण्याचे स्वर कानावर पडत होते. जसजशी डोळ्यांवर निद्रादेवी आरूढ होऊ लागली तसं सर्वजण झोपण्यासाठी आपापल्या खोलीत जाऊ लागले. नंदिनीही सर्वांना सांगून तिच्या खोलीत गेली.
बरीच रात्र झाली होती. रात्रीच्या त्या शांततेतही नंदिनीला अजून झोप आली नव्हती. खिडकीतून चंद्रप्रकाश खोलीत पसरला होता. ती पलंगाच्या कडेला बसून होती. मनात प्रश्न होते; पण गोंधळ नव्हता. पहिल्यांदाच तिला स्वतःचं मन स्पष्ट वाटत होतं. दरवाजाबाहेर स्वराज बसलेला होता. तिला माहीत होतं, जोपर्यंत ती बोलावणार नाही, तोपर्यंत तो आत येणार नाही. तिने त्याला आवाज दिला.
“स्वराज.”
दार अलगद उघडलं आणि स्वराज आत आला. त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव, डोळ्यांत थकवा दिसत होता.
“बसा..”
तो आत येऊन समोरच्या खुर्चीत बसला. त्याचे डोळे अजूनही खाली जमिनीकडेच होते.
“मी तुम्हाला दोष देणार नाही कारण दोष देऊन मन हलकं होत नाही; पण एक गोष्ट स्पष्ट सांगते, मला माझ्या आयुष्यात, संसारात अजिबात खोटेपणा नकोय.”
नंदिनी हळू आवाजात म्हणाली. स्वराजने मान डोलावली.
“मला माहीत आहे, मी चुकीचा होतो.”
“हो, तुम्ही चुकीचे होतात आणि त्या चुकीची किंमत मला मोजावी लागली.”
ती थेट त्याच्या नजरेला नजर मिळवत म्हणाली. स्वराजचा स्वर थरथरला.
“प्लीज मला माफ कर, नंदिनी.”
त्याने कुजबुजत म्हटलं. नंदिनीने नकारार्थी मान हलवली.
“माफी इतक्या सहज मिळत नाही, स्वराज. पण संधी कधी कधी मिळू शकते.”
तो चकित होऊन तिच्याकडे पाहू लागला. ती पुढे म्हणाली,
“मला आता तुमच्यापासून कधीच वेगळं व्हायचं नाही; पण मला जुनी नंदिनी बनून पण जगायचं नाही. आपण जर पुढे जायचं ठरवलंय, तर ते नव्याने असेल, प्रामाणिकपणे असेल. स्वराज, आपण दोघंही चुकलो; पण चूक सुधारण्याची हिंमत ठेवणं हीच गोष्ट नातं वाचवण्यासाठी मदत करते.. मला पुन्हा नव्याने आपला संसार उभा करायचाय.”
नंदिनी क्षणभर थांबली. एक दीर्घ श्वास घेत सारा धीर एकवटून म्हणाली,
“स्वराज, मला तुम्ही आवडता.. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे; पण आता ते आंधळं नसेल. ते समजूतदार असेल.”
नंदिनीच्या डोळ्यांत स्पष्टपणा दिसत होता. स्वराजच्या डोळ्यांत पाणी आलं.
“मी तुला परत दुखावणार नाही. आणि जर कधी चुकलो, तर आधी तुला येऊन सांगेन. तुझ्यापासून काही लपवणार नाही.”
त्याच्या शब्दांत तिला सच्चेपणा जाणवत होता. नंदिनी हलकेच हसली.
“हेच मला हवं होतं.”
इतक्यात तिला काहीतरी आठवलं. ती पलंगावरून उठून उभी राहिली.
“पण एक गोष्ट राहिलीच..”
“कोणती?”
“ते घटस्फोटाचे पेपर्स? पुढे जाऊन ते कोर्टात फाईल करायचे की..”
ती पुढे काही बोलणार इतक्यात तिला थांबवत स्वराज खुर्चीतून उठून उभा राहिला. कपाटातून त्याने ते घटस्फोटाचे पेपर्स काढले. तिच्याच समोर त्याने ते फाडून टाकले आणि हसून म्हणाला,
“आता यांना आपल्या दोघांच्या नात्यात जागा नाही.”
“कधी कधी प्रेम टिकवायला भूतकाळ विसरावा लागतो. आणि भविष्यासाठी माफ करावं लागतं. कदाचित त्या माफीतूनच आपला संसार पुन्हा एकदा उमलू लागेल.”
नंदिनी लाजून त्याच्याकडे पाहत म्हणाली. त्याक्षणी स्वराजने तिला घट्ट मिठी मारली. ती मिठी फक्त प्रेमाची नव्हती तर ती माफीची, स्वीकाराची आणि एका नव्या शुभारंभाचा होती. दुरवर कुठेतरी गाणं ऐकू येत होतं..
“जब कोई बात बिगड़ जाए
जब कोई मुश्क़िल पड़ जाए
तुम देना साथ मेरा, ओ हमनवा.. ओ हमनवा.”
समाप्त
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
