Login

तुम दे ना साथ मेरा.. ५

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी प्रेमकहाणी..

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. ५
©अनुप्रिया


“अट म्हणजे विनंतीच समजा..”

स्वराजने नंदिनीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. आता ती लाजरीबुजरी नववधूसारखी नव्हती तर असंख्य तुकडे झालेले हृदय, तिचं स्वप्न हातात घेऊन उभी राहिलेली स्त्री होती. एक दीर्घ श्वास घेत नंदिनीने बोलायला सुरुवात केली,

“मी या घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या करेन; पण माझ्या काही अटी आहेत. पहिली अट या सहा महिन्यांत तुम्ही मला सन्मानाने वागवाल. माझा आदर कराल. मान्य आहे, मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात नको आहे; पण मी माझा सन्मान तरी जपू शकते नां? माझ्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही याची तुम्ही काळजी घ्याल. दुसरी अट मी पूर्वीसारखीच माझी आताची नोकरी मी चालू ठेवेन. घरी बसून राहणार नाही. माझ्या स्वातंत्र्यावर कोणीही गदा आणणार नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ही बेडरूम जरी शेअर करत असलो तरी आपण नवरा बायकोसारखं वागू शकत नाही. आपल्यात कायम अंतर राहील. आणि सहा महिने झाले की, त्या क्षणी या घरातून मी बाहेर पडेन. तेंव्हा कोणी मला थांबवायचं नाही. त्यावेळी तुमच्या घरच्यांना काय सांगायचं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न.. बोला हे मान्य आहे तुम्हाला?”

स्वराजच्या चेहऱ्यावर थोडासा बदल दिसला. त्याला नंदिनीविषयी काळजी वाटत नव्हती; पण तिने घातलेल्या अटींचा एक प्रकारचा थकलेला स्वीकार होता.

“ठीक आहे. मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत. मी तुझी मर्यादा पाळेन. या खोलीत, घरात तू सुरक्षित आहेस. तुझा स्वाभिमान जपण्याची जबाबदारी माझी..”

स्वराजने नंदिनीला आश्वासन दिलं. तिने त्या पेपर्सवर सह्या केल्या. ते करताना तिचे डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते. थरथरत्या हातांनी ते सह्या केलेले पेपर्स स्वराजच्या हातात देत नंदिनीने विचारलं,

“आता पुढे?”

स्वराज फाईलमधले सर्व कागद चेक करून फाईल बंद करत म्हणाला,

“पुढे काय! नवरा बायकोचं नाटक चालू ठेवायचं. रूम शेअर करायची पण आपण नवरा बायको असणार नाही. दुसरं म्हणजे ही गोष्ट फक्त आपल्या दोघांतच राहिली पाहिजे. घरातल्या कोणालाही कळता कामा नये.”

नंदिनीने एक नजर सर्वत्र फिरवली. पलंगावर पसरलेल्या गुलाबाच्या पाकळ्या तिला नकोश्या वाटू लागल्या.

“मग आज?”

स्वराजने फाईल त्याच्या कपाटात ठेवली आणि खिडकीकडे पाहत म्हणाला,

“तू पलंगावर झोप. मी सोफ्यावर झोपतो.”

तिचे पाय सुन्न झाले होते. ती पलंगावर जाऊन बसली. स्वराज दिवा बंद करायला वळणार इतक्यात नंदिनीच्या आवाजाने थांबवलं.

“एक विचारू?”

“हं.. विचार..”

सोफ्यावर बसून एका कुशीवर होत तो म्हणाला.

“जर ती मुलगी तुमच्या आयुष्यात इतकी महत्त्वाची होती तर मला लग्नाआधी का नाही सांगितलं?”

त्याचा चेहरा वेदनेने भरून गेला.

“कारण मलाही माझं लग्न ठरवलंय हे अचानक कळलं. आईची तब्येत ठीक नाहीये म्हणून घरी बोलवून घेतलं आणि वडिलांनी थेट बोहल्यावरच चढवलं. काहीही करण्याआधी खूप उशीर झाला होता. वडिलांचा हट्ट आणि आईची आत्महत्या करण्याची धमकी यामुळे मी परिस्थितीपुढे हार मानली आणि हे लग्न स्वीकारलं.”

“म्हणजे आपण दोघेही कुणाच्यातरी निर्णयाचे बळी आहोत?”

ती हलकेच म्हणाली. स्वराज काहीच बोलला नाही. त्याच्या शांततेतच त्याचं उत्तर होतं. त्याने दिवा बंद केला. खोलीत अंधार पसरला. नंदिनी पलंगावर आडवी झाली. खिडकीतून येणाऱ्या चांदण्यांनी तिच्या डोळ्यांतील अश्रूंची चमक दिसत होती. लग्नाची पहिली रात्र संपली नव्हती तर ती फक्त वेदनेच्या सुरुवातीची रात्र ठरली होती.

“लग्नाच्या पहिल्या रात्रीची काय काय स्वप्न पाहिली होती आणि हे काय घडतंय माझ्यासोबत..”

ती स्वतःशीच पुटपुटली.

“काही स्वप्नांना अपूर्णतेचा शाप असतो बहुतेक..”

क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all