डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. ६
©अनुप्रिया
©अनुप्रिया
नंदिनीला झोप येत नव्हती. आयुष्यात इतकी उलथापालथ झाल्यावर झोप तरी कशी येणार म्हणा! तिला तिच्या आईवडीलांची, बहिणीची, मैत्रिणींची आठवण येऊ लागली. मनाचे वारू भूतकाळाच्या दिशेने दौडू लागले. स्वराजचे आईबाबा तिला लग्नाची मागणी घालण्यासाठी आले होते, तो दिवस तिला आठवला. त्या दिवशी स्वराजचे बाबा घरी आले आणि नंदिनीच्या घरात अचानक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. रविवारचा दिवस होता त्यामुळे नंदिनी थोडी निवांतच उठली. अंघोळ वगैरे उरकून ती तिच्या खोलीत केस विंचरत होती. क्षणभर आरशातले स्वतःचेच प्रतिबिंब पाहून तिच्या रूपाचा तिलाच हेवा वाटला. इतक्यात आईने आवाज दिला.
“नंदू… पटकन खाली ये. कोण पाहुणे आलेत बघ? तुला भेटायचंय म्हणताहेत. ये खाली..”
“कोण आलं असेल? इंदूमावशी? की सूर्यकांत मामा?”
मनात अंदाज बांधत नंदिनी स्वतःशीच पुटपुटली. केसांवर कंगवा फिरवून पटकन केस छोट्या क्लिपमध्ये अडकवले आणि धावतच खाली आली. हॉलमध्ये समोर सोफ्यावर तिच्या वडिलांचे जुने मित्र माधवराव आणि त्यांच्या पत्नी शालिनीताई बसले होते.
“काका.. काकू तुम्ही? बऱ्याच दिवसांनी आलात.. नमस्कार करते हं..”
आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत नंदिनी पटकन त्यांच्याजवळ आली आणि तिने त्यांना वाकून नमस्कार केला. माधवरावांनी डोक्यावर हात ठेवून “सुखी रहा पोरी!” असा हसून आशीर्वाद दिला. शालिनीताईंनीही मायेने तिच्या गालावरून हात फिरवत हनुवटीला अलगद पकडून म्हणाल्या,
“यशस्वी हो बाळा!”
नंदिनी लाजून मागे सरकून आईपाशी येऊन उभी राहिली. माधवराव नंदिनीकडे पाहत होते. गव्हाळ वर्ण, कमनीय बांधा, चाफेकळी नाक, रेखीव डोळे, लांबसडक काळेभोर डोळे, हसताना गालावर पडणारी खळी, गुलाबी ओठांच्या कडेला असलेला नाजूक काळा तीळ.. निळ्या रंगांच्या सलवार कुर्त्यामध्ये नंदिनी खूप सुंदर दिसत होती. नंदिनीच्या आईने त्यांची चहापाण्याची व्यवस्था केली. तेवढ्यात नंदिनीचे बाबा माधवरावांच्या बाजूला येऊन बसले आणि मोठया आदराने म्हणाले,
“माधवराव, वहिनीसाहेब.. घ्या चहा घ्या.”
नंदिनीच्या आईने सर्वांना चहा आणि नाष्टा दिला.
“काय मग, माधवराव, आज अचानक भेट? काही विशेष?”
नंदिनीच्या बाबांनी हसत विचारलं खरं, पण त्यांच्या आवाजात एक हलकासा उत्सुकतेचा सूर होता. माधवरावांनी नंदिनीच्या बाबांकडे पाहिलं, मग नजर हळूच नंदिनीवर नेली.
“विशेष तर आहेच; पण आधी पोरीला इथे बसू द्या.”
आईने खुणेने सांगितलं आणि नंदिनी शांतपणे सोफ्याच्या कडेला बसली. तिचे हात नकळत घट्ट झाले. हृदयाचा ठोका वाढला होता.
‘नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट सांगितली जाणार आहे.’
ही जाणीव तिच्या मनाला स्वतःहून होत होती. त्यांच्या उपस्थितीमुळे एक वेगळीच दडपणाची भावना दाटून येत होती. तिचे बाबा मात्र त्यांच्या शेजारी समाधानाने, आदराने बसले होते. माधवरावांनी खोल श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली.
“दामोदरराव, तुम्हाला तर माहित असेलच, माझा मुलगा स्वराज, तो पुण्यात असतो. एक मल्टीनॅशनल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम पाहतोय. तसं तर त्याला या नोकरीची गरज नाही. घरचा कारभार, उद्योगधंद्यात लक्ष घातलं तरी पुरेसं आहे. पण त्याला पुण्यात राहूनच करियर करायचं होतं म्हणून मग आम्ही पण परवानगी दिली. आता सगळं स्थिरस्थावर झालंय म्हटल्यावर यंदाच्या वर्षी त्याचं लग्न उरकण्याचा बेत आहे.
दामोदरराव, आम्ही बऱ्याच दिवसांपासून विचार करत होतो म्हणजे त्याच्यासाठी योग्य मुलगी पाहत होतो.”
दामोदरराव, आम्ही बऱ्याच दिवसांपासून विचार करत होतो म्हणजे त्याच्यासाठी योग्य मुलगी पाहत होतो.”
नंदिनीच्या हृदयात धडधड वाढली. शालिनीताईंनी हसत नंदिनीच्या आईकडे बघितलं.
“आणि आम्हाला तुमची नंदूच आठवली. निरागस, गुणवान, सुशील.. संसार सांभाळायला अशीच संस्कारी आणि सौम्य स्वभावाची मुलगी हवी. तुमची नंदू आमच्या घरासाठी अगदी योग्य आहे..”
नंदिनीचे आईबाबा एकदम अवाक होऊन त्यांच्याकडे पाहत होते. क्षणभर हॉलमध्ये एक गोड शांतता पसरली.
माधवराव पुढे म्हणाले,
“दामोदरराव, आम्ही तुमच्या नंदिनीला आमच्या स्वराजसाठी लग्नाची मागणी घालायला आलोय. तुमची काय हरकत नसेल तर.. म्हणजे तुम्ही होकार दिलात तर आम्हाला खूप आनंद होईल. काय म्हणणं आहे तुमचं?”
माधवरावांचं बोलणं ऐकून दामोदरराव आणि नंदिनीची आई, सुमित्राबाई यांना खूपच आनंद झाला. या गोड धक्यातून सावरत दामोदररावांनी बोलायला सुरुवात केली.,
“माधवराव, तुम्हाला तर माझ्या तब्येतीबद्दल माहितच आहे, नुकताच हृदयविकाराचा झटका येऊन गेला त्यामुळे सतत भीती वाटत राहते. कधी काय होईल काही सांगता येत नाही. आपण जिवंत असेपर्यंत मुलींचं सगळं नीट झालेलं असावं हीच एक इच्छा आहे बघा.”
“आबा.. ”
नंदिनीच्या तोंडून अस्पष्टसे शब्द बाहेर पडले. तिच्या बाबांचं बोलणं ऐकून तिचे डोळे पाण्याने डबडबले. दामोदररावांनी मुलीकडे किंचित हसून पाहिलं. आपल्या लेकीची आपल्यासाठी होणारी घालमेल त्यांना स्पष्ट जाणवली. ते पुढे म्हणाले,
“अधिरा आणि नंदिनी माझ्या दोन्ही मुली खूप गुणी आहेत. नंदिनी इथेच एका सहकारी बँकेत नोकरी करतेय आणि अधिरा तिच्या मामाकडे म्हणजेच पुण्याला असते. ती अजून तिचं शिक्षण पूर्ण करतेय. दोन्ही मुलींची चांगली स्थळं पाहून लग्नं करून दिली, त्या त्यांच्या घरी सुखाने संसार करू लागल्या की, आमचा कार्यभाग संपला.. आम्ही जायला मोकळे झालो.. त्या सुखी राहिल्या तर आम्ही सुखी..”
“काहीहीं काय अभद्र बोलता हो भावोजी तुम्ही? तुम्हाला काहीही होणार नाही. अजून खूप पाहायचं.. खूप जगायचंय. ”
शालिनीताई त्यांच्यावर लटक्या रागाने म्हणाल्या.
“नाही वहिनी.. आयुष्याचं काही सांगता येतंय होय? पण असो.. सरपोतदार घराण्याची सुन होण्याचं भाग्य माझ्या नंदूला मिळालं तर आमच्यासाठी खूप आनंदाचीच गोष्ट आहे. तुम्ही आमच्याशी सोयरीक करण्याचा विचार केलात हेच आमच्यासाठी खूप आहे. आम्हाला तुमच्याशी नातेसंबंध जोडण्यास मनापासून आवडेल त्यामुळे आपले बिझनेस रिलेशन तर घट्ट होतीलच पण त्याचबरोबर आपली मैत्री अजूनच दृढ होत जाईल. मैत्री नात्यात बदलली तर हे ऋणानुबंध कायम असेच राहतील. आम्हाला हीं सोयरीक आवडलीय.”
“आम्हाला ठाऊकच होतं, तुम्ही आमचा प्रस्ताव नक्कीच स्वीकाराल म्हणून मग आम्ही मुलीसाठी साडीचोळी आणि शकुनाचं सामान संगटच आणलं होतं. वहिनी, पोरीच्या वटीत नारळ टाकू ना?”
दामोदररावांचं बोलणं पूर्ण होतं नं होतं तोच सुमित्राबाईंकडे पाहत शालिनीताईंनी हसून विचारलं. सुमित्राने हसून नंदिनीकडं पाहिलं आणि होकारार्थी मान डोलावली. शालिनीताईनी पुढे येऊन नंदिनीची खणानारळाने ओटी भरली. नंदिनी पसंत असल्याची ही पोचपावती होती. इतक्यात माधवराव म्हणाले,
“मग आजच सगळं ठरवून सुपारी फोडायची? साखरपुड्याची आन लग्नाची तारीख पण ठरवून घेऊ..”
“लग्न? एवढ्या अचानक?”
ती अवाक होत बाबांकडे पाहत राहिली.
“अरे थांबा.. थांबा माधवराव, आधी मुलांना तरी विचारलं पाहिजे ना? त्यांची पसंती पण पहायला लागेल ना?”
दामोदरराव हसून म्हणाले आणि त्यांनी नंदिनीकडे पाहिलं.
त्यांच्या शब्दांनी तिला हायसं वाटलं; पण तितक्यात माधवराव म्हणाले,
त्यांच्या शब्दांनी तिला हायसं वाटलं; पण तितक्यात माधवराव म्हणाले,
“दामोदरराव, सरपोतदारांच्या घरी आजवर वडीलधारी मंडळीच निर्णय घेत आलीत. अजूनतरी लहानांना विचारून काही ठरवण्याची वेळ आमच्यावर आली नाही. मोठ्याचं लग्न पण आम्हीच ठरवलं आणि आम्हाला खात्री आहे, आमचा स्वराज आमच्या शब्दाबाहेर नाही. आम्ही आदेश दिला तर तो उद्याही बोहल्यावर चढेल.”
हे ऐकताच नंदिनीच्या मनात विजेप्रमाणे विचार चमकून गेले.
“मला न पाहताच तो बोहल्यावर चढेल? आबा आणि काकांची इतकी मैत्री असूनही आम्ही एकमेकांना साधं पाहिलंही नाही, कधीच एकमेकांशी बोललोही नाही. आणि आता एकदम लग्न? त्याच्या मनात असेल ना? की वडिलांच्या दबावाखाली तर…”
क्रमशः
©अनुप्रिया
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा