Login

तुम दे ना साथ मेरा.. १७

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेम कहाणी..

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. १७
©अनुप्रिया

शालिनीताई आणि नंदिनी यांच्यात एक सुंदर नातं उमलत होतं. माधवराव लांबून सगळं पाहत होते. जिन्याजवळ उभी नंदिनी, डोळे लाल झालेले, आणि तिला मिठीत धरून उभ्या असलेल्या शालिनीताई… तो क्षण त्यांच्या काळजात खोल खोल रुतला गेला. त्यांच्या मनात विचार आला. शालिनीताईंच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी असलेल्या नंदिनीला पाहताना माधवरावांची नजर नकळत ओलावली.

“नंदिनी हे घर सोडून निघून जाईल असं वाटलं होतं. पुन्हा एकदा हातातून सगळं निसटतेय असंही मनात येऊन गेलं होतं; पण नंदिनी घर सोडून गेली नाही. ती इथे थांबली. मला कळून चुकलंय, नंदिनी परिस्थितीला घाबरून पळून जाणारी मुलगी नाहीये. ती मनातून जरी तुटली आहे तरी ती स्वराजला, या घराला सोडून जाणार नाही.”

ते स्वतःशीच पुटपुटले. दुसऱ्या क्षणाला त्यांच्या डोळ्यांसमोर प्रतापचा चेहरा आला. वृंदाचं पळून जाणं आठवलं.

“वृंदाही तशीच रडली असेल का? की तिला रडायला कोणी वेळच दिला नसेल?”

त्यांच्या स्वतःच्या मनाने त्यांना प्रश्न विचारला; पण त्यांच्याच मनाला त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची त्यांची हिंमत झाली नाही. नंदिनीने गालावर आलेली आसवं साडीच्या पदराने पुसली आणि शालिनीताईनी हातात घेतलेला हात तिने तसाच हातात धरून ठेवला. जणू ती त्यांना ‘मी आहे आई..’ हेच सांगत असावी. माधवरावांनी खोल श्वास घेतला.

“कदाचित देवाने मला अजून एक संधी दिलीय. माझ्या चुकीचा पश्चात्ताप फक्त आठवणींत न ठेवता, कृतीत दाखवण्याची हीच वेळ आहे.”

ते हलकेच पुढे सरसावले; पण दुसऱ्या क्षणाला ते थांबले.

“आज नाही.. आज फक्त पाहायचं. कसलाच हस्तक्षेप करायचा नाही. कोणाला आदेश द्यायचा नाही. फक्त विश्वास ठेवायचा. सगळं छान होणार आहे. घराची विस्कटलेली घडी फक्त एकच मुलगी पुन्हा बसवू शकते.

“नंदिनी…”

तिचं नाव त्यांच्या ओठांवर आलं; पण त्यांनी ते मनातच ठेवून दिलं.

‘नंदिनीच्या सहवासाने आता या घरात पुन्हा प्रेम टिकू शकेल असं त्यांना पहिल्यांदाच वाटलं. आणि त्या जाणिवेत, प्रतापच्या आठवणींवरची काळी छाया थोडीशी हलकी झाली. माधवराव बाहेर येण्यासाठी वळले. पावलांत अजूनही भीती होती; पण मनात, खूप दिवसांनी आशेचा एक साधा पण जिवंत किरण उजळून निघाला होता. इतक्यात एक खणखणीत आवाज दोघींच्या कानावर पडला. दोघींचं लक्ष बाहेरच्या दिशेला दाराकडे वेधलं गेलं.

“शालिनी… माधवा..”

दारात तिची पावलं दिसली.ठाम, न डगमगणाररी, जमिनीवर टॉक टॉकचा आवाज करत ती पुढे येत होती. तिच्या चालण्यात घाई नव्हती. शांत, संयमी डौलदार चाल.. त्या चालण्यात ‘मी येथे आहे आणि प्रत्येक वेळ माझ्या ताब्यात आहे.’ असा आत्मविश्वास जाणवत होता. ती आत आली. रेशमी क्रीम रंगाची महागडी साडी, पदरावर सोन्याची नाजूक नक्षी, अंगावर दागिन्यांचा मारा नव्हता; पण कानात हिरेजडीत टॉप्स, गळ्यात जड मंगळसूत्र, मनगटावर सोन्याचं घड्याळ हे सारं तिची श्रीमंती सांगण्यासाठी पुरेसं होतं. तिने केस नीट मागे बांधलेले, चेहरा ठाम, भावनांचा फेर न करता फक्त निर्णयांची झलक दिसत होती. ती थेट पुढे आली. खुर्ची ओढून बसली. हातातली लेदर फाईल तिने टेबलावर ठेवली. तिच्या आवाजातही एक ठामपणा होता.

“अगं बाई! प्रभा वन्स तुम्ही?”

शालिनीताई आजारी असतानाही पटकन लगबगीने पुढे आल्या आणि त्यांनी त्या स्त्रीला नमस्कार केला. माधवरावही घाईने पुढे आले आणि पटकन त्यांनी खाली वाकून नमस्कार केला.

“आक्कासाहेब,आता आलात? आम्ही लग्नासाठी तुमची खूप वाट पाहिली.”

क्षणभर शांतता पसरली. गळ्यातल्या मंगळसूत्रावर हात फिरवत त्या म्हणाल्या,

“‘प्रभावती मुजुमदार..’ म्हणतात आम्हाला.. मुजुमदारांची सुन असलो तरी रक्त सरपोतदार घराण्याचंच आहे. माधवा, हे विसरलास की काय?”

त्यांच्या आवाजात कणखरपणा स्पष्ट होत होता. माधवराव बोलण्यासाठी पुढे आले. ते काही बोलणार इतक्यात त्यांनीच माधवरावांना खुणेनेच थांबवलं. मनगटावरील घड्याळात पाहत त्या करड्या स्वरात म्हणाल्या,

“माधवा, आम्हाला तुझ्याशी बोलायचंय.. आमचा वेळ फार महत्वाचा आहे. त्यामुळे शब्द मोजून वापरा.. बोलुयात? शून्य मिनिटात निकाल लावतो..”

त्या करड्या आवाजाने माधवराव आणि शालिनीताई दोघांचंही धाबं दणाणलं होतं. त्यांनी फक्त होकारार्थी मान डोलावली. इतक्यात त्यांची नजर नंदिनीवर पडली; पण त्या नजरेत कोणतीच भावना नव्हती. जणू त्यांच्यासाठी ती घरातल्या वस्तूपलीकडे कोणीच नसावी! त्यांनी बोलायला सुरुवात केली .,

“माधवा, स्वराजचं लग्न आमच्या मीराशी होणार होतं. आपण त्यांच्या लहानपणी ठरवलं होतं. योग्यवेळी, चांगला मुहूर्त पाहून अगदी थाटामाटात आपण त्यांचं लग्न लावून देणार होतो. लहानपणापासूनच स्वराजसोबत तिने तिचं संपूर्ण आयुष्य सोबत घालवण्याची स्वप्नं पाहिली होती; पण ऐन वेळीस तुम्ही दोघे पलटलात. आम्ही कारणं ऐकून घेऊ आणि शून्य मिनिटात निकाल लावू.. बोला का असे वागलात?”


“आता हे काय नवीन? लग्न करून या घराचा उंबरठा ओलांडल्यापासून एकेक नवनवीन धक्के पचवतेय.. आता अजुन एक धक्का..”

नंदिनीसाठी अजून एक धक्का बसला. ही गोष्ट तिच्यासाठी नवीन होती. प्रभावती खुर्चीत मागे टेकून बसल्या. खोलीतला प्रत्येक आवाज थांबलेला होता पण त्यांचा दबदबा जराही कमी झालेला नव्हता. माधवरावांनी शब्दांची जुळवाजुळव करत बोलायला सुरुवात केली,

“आक्कासाहेब, मान्य आहे, आपण आपल्या मुलांची लग्न अगदी त्यांच्या लहानपणीच ठरवली होती; पण जसजसा काळ पुढे सरकत जातो, माणसांच्या आवडीनिवडी बदलू शकतात. तेंव्हा वाटणारी भावना आजही त्यांच्या मनात असेलच असं नाही ना? परिस्थिती बदलू शकते. मुलांना दुसरं कोणीतरी आवडू शकतो ना? तुम्ही मीराला एकदातरी विचारलंत? तिला काय हवं हेही तितकंच महत्वाचं आहे ना?”

“माधवा, मुजुमदारांच्या घरात लहानांची मर्जी चालत नाही. आम्ही जे बोलतो तेच होतं. त्यामुळे मीराच्या आयुष्याचा निकालही आम्हीच शून्य मिनिटात लावला होता. तुम्ही घाण केलीत. आम्ही बिझनेस निमित्त युरोपला काय गेलो तर ही कुठली दळभद्री मुलगी आमच्या स्वराजच्या गळ्यात बांधलीत?”

“वन्स, नंदिनी.. आपल्या दामोदररावांची मोठी मुलगी.. अगदी गुणी, संस्कारी, शिकलेली आहे हो.. नंदिनी.. जा, आत्याबाईंना नमस्कार कर..”

नंदिनी नमस्कार करायला पुढे सरसावली. तिने खाली वाकून त्यांना नमस्कार केला. प्रभावती काहीच बोलल्या नाहीत.

“आक्कासाहेब, आता स्वराजचं लग्न झालंय.. आपण ते स्वीकारून त्यांना आशीर्वाद दिले पाहिजेत ना?”

“हं.. ठीक आहे.. आता आम्ही आलोच आहोत. पाहतोच हिच्याकडे.. नाही शून्य मिनिटात हिचा निकाल लावला तर नावाच्या प्रभावती मुजुमदार नाही आम्ही..”

आता मात्र दबक्या पावलांनी नंदिनीच्या आयुष्यात प्रभावती मुजुमदार नावाच्या एका वादळाने शिरकाव केला होता.

क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all