Login

तुम दे ना साथ मेरा.. २

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी प्रेमकहाणी..

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. २
©अनुप्रिया


नंदिनीने त्या खोलीत प्रवेश केला. समोरचं नयनरम्य दृश्य पाहून ती जागीच थबकली. अतिशय सुंदररीतीने ती खोली सजवली होती. संपूर्ण खोली मंद प्रकाशात न्हाऊन निघाली होती. खोलीभर सुगंधी मेणबत्या तेवत होत्या. पलंगाच्या चारी बाजूनी फुलांच्या माळा सोडल्या होत्या. पलंगावर मधोमध बदामाच्या आकारात गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या टाकल्या होत्या. आणि त्यात दोघांच्या नावाची ‘एस आणि एन’ अशी अद्याक्षरं कोरली होती. दोन हृदयाच्या आकाराच्या उशांवरही फुलं पसरवून ठेवली होती.

“अगदी सिनेमात दाखवतात तशी छान सजवलीय खोली..”

ती स्वतःशीच पुटपुटली. तिला सिनेमांतल्या नवीन लग्न होऊन मिलनाच्या पहिल्या रात्री एकत्र असणाऱ्या हिरो हिरोईनचे प्रसंग आठवू लागले. आणि त्या हिरो हिरोईनच्या रूपात तिला स्वराज आणि स्वतःचा चेहरा दिसू लागला.

“अय्या.. इश्शss..”

मिलनाच्या नुसत्या कल्पनेनेच तिच्या अंगावर शहारा फुलला. तिने आपल्या हातांच्या ओंजळीत लाजून चेहरा झाकून घेतला. स्वतःला सावरत ती अलगद पलंगावर येऊन बसली. लाल शालूच्या पदराची किनार हातात धरून चुरगळलेली, ओठांवर लाजेची थरथर, मनात नव्या आयुष्याचा नाजूक अपेक्षाचा बहर.. हातातल्या हिरव्या चुड्यातील नाजूक बांगड्यांची किणकीण, आणि तिच्या गोऱ्या अंगावर चढलेला हळदीचा पिवळा रंग.. सारं कसं तिला शोभून दिसत होतं. तिचे काळेभोर डोळे त्याच्या येण्याच्या वाटेकडे लागले होते. तिच्या त्या स्वप्नील डोळ्यांत त्या दोघांच्या मिलनाचे स्वप्न रेंगाळत होते.

”कधी येईल? काय बोलेल? प्रेमाने जवळ घेईल ना? की अधीरपणे मिठीत माझ्या विरघळून जाईल?”

त्याच्या स्पर्शाच्या नुसत्या कल्पनेनेच नंदिनी मोहरली. बाहेर अजूनही गडबड सुरू होती. लग्नाचं घर म्हटलं तर गडबड गोंधळ असणारच ना! पण त्या खोलीत मात्र निरव शांतता होती. नंदिनी तशीच पलंगाला टेकून डोळे मिटून बसून राहिली. दिवसभराच्या दगदगीने ती इतकी दमली होती की, लगेच तिचा डोळा लागला. अचानक दरवाजा जोरात उघडण्याचा आवाज आला तशी ती खडबडून जागी झाली. तो आत आला. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. त्यालाही कोणीतरी आत ढकलून दिलंय, कोणीतरी जबरदस्तीने आत पाठवलंय असंच तिला वाटलं. तिने त्याच्याकडे एक नजर पाहिलं. उंच, रुबाबदार, पिळदार शरीरयष्टी, ओठांवर मिशीची महिरप, सरळ नाक, धारदार नजर.. चालण्यात एक सहज आत्मविश्वास दिसत होता. क्रीम-गोल्ड शेरवानीवर सूक्ष्म झरीकाम, आणि खांद्यावर हलकासा दुशाला.. कपड्यांचा रंग त्याच्या गोऱ्या, नितळ त्वचेवर आणखी उठून दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर नवरा मुलगा म्हणून कुठलेच भाव दिसत नव्हते. ना लाज, ना ओढ, ना आपुलकी.. फक्त चिडलेली त्याची नजर. नंदिनीने सावकाश उठायचा प्रयत्न केला.

“आ… आलात? बस… मी.. ”

त्याने हात वर करून तिला बोलता बोलता मधेच थांबवलं. एकही शब्द न बोलता त्याने उजवीकडंचं कपाट उघडलं. नंदिनीच्या हृदयाची धडधड वाढली होती.

“आता यावेळी, इतक्या रात्री काय हवयं त्याला? नेमकं काय शोधतोय?”

नंदिनीला प्रश्न पडला. स्वराजने कपाटातून एक फाईल बाहेर काढली. पलंगाजवळ जाऊन त्यांनी ती फाईल नंदिनीच्या दिशेने भिरकावली. फाईलमध्ये कागद आवाज करत पलंगावर पसरले. पानांची फडफड जणू खोलीतली आणि मनातलीही शांतता चिरू पाहत होती. तिला काहीच समजत नव्हतं. भांबावलेल्या नजरेने तिने फाईलकडे पाहिलं,

“हे काय आहे? कसले पेपर्स आहेत हे?”

“घटस्फोटाचे पेपर्स.. ”

त्याने तिच्याकडे न पाहताच उत्तर दिलं. पहिल्यांदा त्याचा थंड, चिरत जाणारा आवाज तिच्या कानावर पडला होता. क्षणभर जणू तिच्या श्वासांचा ठोकाच चुकला होता! तिचा तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता.

“क.. काय म्हणताय तुम्ही? तेही आत्ता? लग्नाच्या पहिल्या रात्री?”

तिला हा धक्का पचवताच येत नव्हता. डोळ्यांत आसवं जमा होऊ लागली.

“सॉरी. पण आपल्यात कोणतंच नातं होऊ शकत नाही.”

स्वराज थेट तिच्या डोळ्यांत डोळे घालून निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे पाहत म्हणाला.

क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all