Login

तुम दे ना साथ मेरा.. ३२

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेमकहाणी..
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. ३२
©अनुप्रिया

सारं काही सुरळीत चालू असताना एक दिवस अचानक घरातलं वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं. नंदिनी आणि अर्पिताच्या नात्यात पुन्हा एकदा दरी पडण्याचं वातावरण निर्माण झालं. त्या दिवशी अर्पिता आणि नंदिनी स्वयंपाक घरात दुपारच्या जेवणाची तयारी करत होत्या. जेवणाच्या तयारी सोबत त्यांच्या गप्पाही छान रंगल्या होत्या. इतक्यात दारावरची बेल वाजली.

“थांब मी बघते.”

असं म्हणून अर्पिता दार उघडण्यासाठी बाहेर आली. तिने दार उघडलं. समोर साधारण पन्नाशीची बाई उभी होती.

“अरे, यमुआत्या तुम्ही या ना.. ”

अर्पिताने त्यांच्या हातातल्या बॅग्स तिच्याकडे घेतल्या आणि त्यांना आत यायला सांगितलं. यमुनाआत्या आत आल्या. यमुनाआत्या म्हणजे माधवरावांची चुलत बहीण आणि स्वराज आणि सार्थकची लाडकी यमुआत्या.. त्या म्हणजे एक वादळच. त्या आल्या की वादळ येणार हे निश्चित..

“कशी आहेस अर्पिता? आणि शालिनी?”

“आई बऱ्या आहेत आता? त्यांच्या खोलीत आराम करताहेत..”

“खास तिलाच भेटायला आले होते. चल, आधी तिच्याच खोलीत जाऊ.. तिला सुखरूप पाहिलं की, माझा जीव भांड्यात पडेल.”

यमुआत्या हसून म्हणाल्या. अर्पिताने मान डोलावली आणि त्यांना घेऊन शालिनीताईंच्या खोलीत आली.

“शालिनी.. ए शालिनी.. डोळा लागला का? कशी आहेस बाय?”

शालिनीताईंनी खुणेनेच ठीक असल्याचं सांगितलं. यमुआत्या थोडा वेळ तिथे बसल्या. शालिनीताईंची विचारपूस केली. बरंवाईट विचारलं आणि थोडा वेळ बोलून झाल्यानंतर त्यांना आराम करायला सांगून शालिनीताईंच्या खोलीतून बाहेर पडल्या आणि बाहेर हॉलमध्ये येऊन बसल्या.

“आत्या.. अर्पिताताई, तुम्ही बसा.. मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते.”

असं म्हणून नंदिनी त्यांच्यासाठी चहा करायला स्वयंपाकघरात आली. अर्पिता त्यांच्यासोबत बाहेर गप्पा मारत बसली. यमुआत्या नेहमीप्रमाणे हसून सगळ्यांची चौकशी करत होत्या. अर्पिताशी प्रेमाने बोलत होत्या.

सुरुवातीला अर्पितालाही बरं वाटलं. कुणीतरी आपल्याला भेटायला आलंय, आपुलकीने विचारतंय, हेच खूप आहे असं वाटत होतं; पण बोलता बोलता अखेर यमुआत्या त्यांच्या मूळपदावर आल्याच. अर्पिताकडे पाहून त्या म्हणाल्या,

“काय गं अर्पिता… तुझ्या लग्नाला एवढी वर्षं झाली. इतकी वर्षे तू घर छान चालवलंस, मायेने सांभाळलंस. सर्वांसाठी हवंनको ते पाहिलंस. थोरली सुन म्हणून तू सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम रितीने पार पाडल्यास.. अजूनही पाडतेयस हे सगळं मला मान्य आहे; पण घराला वारस नसेल तर सगळं पोकळ वाटतं.”

अर्पिता क्षणभर गप्प झाली. उगीच हसण्याचा प्रयत्न केला.

“देवाची इच्छा..”

ती अस्पष्टशी पुटपुटली. खरंतर तिला विषय संपवायचाच होता; पण यमुनाआत्या थांबल्याच नाहीत. त्यापुढेही बोलतच राहिल्या.

“देवाची इच्छा असतेच गं… पण आपण प्रयत्न तरी करायला हवेत ना? असं हातावर हात धरून कसं चालेल? दुसऱ्यांच्या घरी पाहिलं की असं वाटतं, आपल्या घरातच काहीतरी उणं आहे. अर्पिता लवकर काहीतरी ठरव.. बाळाच्या बाबतीत निर्णय घे नाहीतर ती नंदिनी, तुझी धाकटी जाऊ मागून येऊन नंबर लावेल. मग घरातल्या अडगळी इतकीही किंमत उरणार नाही तुला.. तेंव्हा तुला या यमुआत्याचे शब्द आठवतील आणि मग पश्र्चाताप करण्यापलीकडे काहीच उरणार नाही. तेंव्हा वेळेत लक्ष दे..”

यमुआत्यांच्या बोलण्याने अर्पिताच्या हृदयाला चरे पडत होते. तिच्या अपूर्णत्वावर बोट ठेवलं जात होतं. दिसताना ते शब्द सरळ, साधे वाटत असले तरी अर्पिताच्या हृदयात ते घरे पाडणारे होते. थोडा वेळ थांबून चहापाणी करून यमुनाआत्या निघून गेल्या. घर पुन्हा शांत झालं. पण ती शांतता अस्वस्थ करत होती. अर्पिता थेट तिच्या खोलीत गेली. दार लावून घेतलं. नंदिनी क्षणभर दाराबाहेर उभी राहिली. तिला आत काय चाललं असेल याची कल्पना होती.थोड्या वेळाने तिने हलकेच दार ठोठावलं.

“ताई…”

आतून काहीच आवाज आला नाही. नंदिनी आत गेली. अर्पिता पलंगावर बसली होती. डोळे कोरडे होते; पण चेहरा थकलेला दिसत होता.

“मी काही चुकीचं बोलले का?”

अर्पिताने अचानक विचारलं. नंदिनी जवळ बसली.

“नाही.”

ती ठामपणे म्हणाली.

“तुमचं काहीच चुकलेलं नाही.”

“पण सगळ्यांना तेच दिसतं. घर, संसार, जबाबदाऱ्या हे सगळं कुणाला मोजता येत नाही. मोजता येतं ते फक्त अपूर्णत्व.”

अर्पिताच्या शब्दांनी नंदिनीचं मन भरून आलं.

“नंदिनी, अगं कमी का प्रयत्न केलेत? उपासतापास, व्रतवैकल्ये, गावोगावीचे डॉक्टर्स, वैद्य, हकीम,, नवस बोलले.. कोणी सांगेल ते सगळे सगळे उपाय केले. त्यात यश आलं नाही त्यात माझा काय दोष सांग? आई होऊ शकण्याची फक्त माझीच जबाबदारी आहे का? डॉक्टरांनी सार्थकलाही तपासण्या करायला सांगितलं होतं; पण त्याने स्पष्टपणे तपासणी करण्याला नकार दिला. माझ्यातच दोष आहे असं त्याचं म्हणणं आहे. आताही तू पाहिलंस ना? यमुआत्या मलाच बोल लावून गेल्या. उपदेशाचे डोस पाजून गेल्या. माझं अपूर्णत्व सर्वांनी ठरवून टाकलंय अगं.. वांझपणाचा शिक्का मारून मोकळे झालेत सगळे..”

अर्पिताच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. नंदिनी अर्पिताच्या पुढ्यात आली. अलगदपणे तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत हळू आवाजात म्हणाली,

“ताई.. तुमचं अपूर्णत्व लोक ठरवू शकत नाहीत. आई होणं हे स्त्रीचं एक रूप आहे; संपूर्ण अस्तित्व नाही.”

अर्पिताने पहिल्यांदाच नंदिनीकडे थेट पाहिलं.

“माझं मन मानत नाही गं.”

“कारण तुम्ही स्वतःला समजावलं नाहीये.”

नंदिनी अर्पिताकडे पाहून म्हणाली.

“आज पहिल्यांदा जास्त दुखावले गेलेय म्हणून असं सगळं बाहेर येतंय. मला कधी कधी वाटतं, मी सगळ्यांसाठी आहे, पण माझ्यासाठी कोणीच नाही.”

हे बोलताना अर्पिता गळा दाटून आला. ती हुंदके देऊन रडू लागली. नंदिनीने तिचा हात हातात घेतला.

“ताई, आजपासून मी तुमच्यासोबत आहे आणि कायम असणार आहे. मी या घरात असो वा नसो, मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. समजलं?”

ती शांतपणे म्हणाली. त्या दोन शब्दांत अर्पिताला आधार वाटला. पहिल्यांदाच तिचं दुःख कुणीतरी समजून घ्यायला आलं होतं.

“असो वा नसो म्हणजे? तू कुठे जाणार आहेस?”

नंदिनी अर्पिताच्या प्रश्नावर चपापली. अनाहुतपणे इतके दिवस लपवून ठेवलेलं सत्य बाहेर पडण्याच्या मार्गावर होतं.

“तसं नाही ताई.. मी असंच बोलून गेले.”

ती सावरण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

“आपण दोघी बहिणी बहिणी कायम एकत्र असणार आहोत आणि आपल्या घराला सजवणार आहोत. प्रत्येक संकटापासून वाचणार आहोत. समजलं?”

अर्पिता किंचित हसून म्हणाली. नंदिनीनेही हसून मान डोलावली.

त्या संध्याकाळी नंदिनी आणि स्वराज ओसरीत बसले होते.वनंदिनी थोडी शांत होती.

“काय झालं, आज इतकी शांत का?”

“आज ताई खूप दुखावल्या गेल्या.”

“का काय झालं?”

नंदिनीने दुपारी घडलेला सगळा वृतांत स्वराजला सांगितला. स्वराजने उदास होत दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला,

“लोक किती सहजपणे बोलून जातात ना? कोणाच्या मनाला किती यातना होतील याचा साधा विचारही करत नाहीत.”

“हो.. आणि हेच काही दुखरे शब्द आयुष्यभर सोबत राहतात.”

स्वराज काहीही न बोलता फक्त तिला शांतपणे ऐकत होता. कसलाही उपदेश नाही. फक्त त्याची उपस्थिती फार मोलाची होती. त्याला नंदिनीचा हळवा, सर्वांची काळजी करण्याचा स्वभाव उमजू लागला होता त्या मैत्रीचा हा दुसरा टप्पा होता. एकमेकांचं दुःख न बोलताही ओळखण्याचा..

आणि त्याचवेळी त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं एक दबा धरून बसलेलं वादळ अनपेक्षितपणे समोर आलं..

क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all