Login

तुम दे ना साथ मेरा.. ३९

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेमकहाणी

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. ३९
©अनुप्रिया

इकडे अधिरा खिडकीजवळ उभी होती. बाहेर कोवळं ऊन पडलं होतं. सूर्यकिरणं खिडकीतून आत येत साऱ्या घरभर पसरली होती; पण तिच्या मनात मात्र अजूनही धूसर संध्याकाळ अडकून होती. स्वराज निघून गेला होता. तिला ते माहीत होतं; पण तो जाताना तिला काहीच न सांगता गेला हेच जास्त बोचत होतं.

तिने डोळे मिटले आणि आठवणींची दारं अलगद उघडली गेली. उदासीचा दर्प नाकात शिरला. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी पहिल्यांदा ती आणि तिची मैत्रीण चैत्राली स्वराजच्या ऑफिसमध्ये आल्या होत्या. दोघींना तिथे इंटर्नशिप करायची होती. तिने पहिल्यांदा त्या ऑफिसमध्ये पाऊल टाकलं तेव्हा ती प्रचंड घाबरली होती. एवढीमोठी कंपनी, ओळखीचा कोणी नाही याचंच तिला दडपण आलं होतं. हातात फाईल घट्ट धरून ती रिसेप्शनजवळ उभी होती.

“अधिरा मॅम?”

तो आवाज तिला ओळखीचा वाटला. ती मागे वळली. समोर स्वराज उभा होता. एकदम साधा, नीटनेटका, डोळ्यांत अनोळखी शांतता, ओठांवरचं मिश्किल हसू त्याच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसत होतं.

“या. तिकडे बसू.. मीच तुमचा गाईड आहे,”

तो हसून म्हणाला. त्या हास्यात औपचारिकता होती; पण तिच्यासाठी मात्र त्या अनोळखी लोकांत तो आधार होता. पहिल्याच भेटीत तो तिला एकदम आपलासा वाटला होता. त्याने तिचा प्रत्येक प्रश्न शांतपणे ऐकून घेतला. ती एक मुलगी आहे म्हणून कमी लेखलं नाही. उलट विद्यार्थिनी म्हणून आदर दिला. तेच तिला खूप वेगळं वाटलं. पुढच्या भेटीत ती थोडी निर्धास्त झाली.

“तुम्ही इतकं छान समजावता की, त्यामुळे मला वाटतं मी चुकीचा विचार किंवा चुकीचा प्रश्न विचारत नाहीये..”

ती म्हणाली.

“अगदी खरंय.. पण चुकीचे प्रश्न नसतात. फक्त ते सोडवताना आपण घाई करतो.”

तो शांतपणे म्हणाला. ती त्याच्या या वाक्यावर थांबली. त्या दिवसानंतर त्याच्यासमोर मूर्ख वाटू नये म्हणून किंबहुना फक्त त्याच्यासाठी तिच्या प्रत्येक प्रोजेक्ट मिटिंगमध्ये अधिरा थोडी जास्त तयारी करून यायची. कधीतरी कॉफी ब्रेकमध्ये ती त्याला विचारायची,

“सर, तुम्ही नेहमी इतके शांत कसे?”

स्वराज शांतपणे हसून उत्तर द्यायचा,

“खरं सांगू अधिरा मॅम? नेहमी बडबड करत बसण्यापेक्षा कधी कधी शांतपणे ऐकून घेणं बरं असतं. कधी कधी आपलंही कोणीतरी ऐकावं असं वाटू शकतं ना? हल्ली सगळेच बोलतात पण ऐकून घेणारे कान कमी झालेत. खरंय की नाही?”

स्वराजचं बोलणं ऐकून तिला जाणवलं, त्याचंही कोणीतरी ऐकावं याची तो वाट पाहतोय. एकदा संध्याकाळी ऑफिस सुटलं. सगळे घरी जात होते. तीही घरी जाण्यासाठी निघाली. त्याच्या केबिनच्या दारात थांबून तिने विचारलं,

“तुम्हाला त्रास दिला ना?”

“नाही.. उलट तुम्ही आल्यापासून ऑफिस जरा जिवंत वाटायला लागलंय.”

तो हसून म्हणाला. त्याच्या त्या वाक्याने पाहिल्यांदाच तिला वाटलं, तिच्या हृदयाचे ठोके वेगाने पडत होते. त्या वाक्यानं जणू तिचं काळीज थांबलं.

त्या रात्री तिने तिच्या डायरीत लिहिलं होतं.

“आज पहिल्यांदा कुणीतरी मला ऐकून घेतलं. मी कोण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला.”

हळूहळू त्यांच्या मीटिंग्स वाढू लागल्या. प्रोजेक्ट्स चर्चा होऊ लागल्या. दोघे जास्त वेळ एकत्र दिसू लागले. दोघांत छान मैत्री झाली होती. प्रेमाचं बीज रुजू लागलं होतं. आणि एक दिवस स्वराजने तिच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव मांडला. कारणही तसंच होतं म्हणा! त्यांच्या एकत्र बसण्या उठण्याने ऑफिसभर त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. दोघांत काहीतरी आहे अशा वावड्या उठू लागल्या. अधिरा मात्र तिचा प्रोजेक्ट करण्यात गुंग होती. चैतन्य बऱ्याचदा स्वराजला बोलायचा,

“अरे राज, तू या विषयावर तिच्याशी बोलत का नाहीस? तुझ्या मनातलं तिला कळायला नको का? असं नको व्हायला तुला तिच्याबद्दल प्रेम वाटायचं आणि तिच्या मनात तश्या काही फिलिंग्स नसतील तर घोळ व्हायचा. तिला स्पष्टपणे विचार.. तिच्या मनात काय आहे हे जाणून घे..”

“हो रे बोलतो.. थांब ना.. मी रोज तिला आज विचारेन असं ठरवतो पण ती समोर आली ना की, सगळं विसरायला होतं. हृदय जोरजोरात धडधडू लागतं.. काय सांगू यार तुला काय अवस्था होते, तुला कळणार नाही ते!”

स्वराज हसून म्हणायचा. दिवस सरत होते. जवळपास दोन महिने उलटून गेले होते. तिच्या मैत्रिणीचा, चैत्रालीचा प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि तिची इंटर्नशिप आधीच संपली. ती आता ऑफिसला येत नव्हती.अधिराचा प्रोजेक्ट अजून बाकी होता. त्यामुळे अधिराची इंटर्नशिप आता संपण्याच्या मार्गावर होती.

आणि एक दिवस संध्याकाळी स्वराज त्याच्या केबिनमध्ये काम करत बसला होता. इतर कर्मचारी आपलं काम संपवून घरी निघाले होते. तितक्यात दारावर टकटक झाली.

“सर, मी आत येऊ प्लीज?”

“हो.. प्लीज.”

अधिरा आणि आत आली. त्याने तिला बसायला सांगितलं.

“थँक्यू सर..”

असं म्हणत ती खुर्चीत बसली. त्याने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तिने बोलायला सुरुवात केली.

“सर, आज माझ्या इंटर्नशिपचा आजचा शेवटचा दिवस.. माझा प्रोजेक्ट झाला. एच आरने तसं लेटरही दिलंय. आता उद्यापासून मी..”

“येणार नाही हेच ना?”

त्याने व्याकुळ होत विचारलं. तिने होकारार्थी मान डोलावली.

“सर, मी तुम्हाला थँक्यू म्हणायला आलेय. तुम्ही या प्रोजेक्टमध्ये खूप मदत केली. तुमच्याकडून आम्ही खूप काही शिकलोय. स्पेशली मी.. तुमच्यामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. मनापासून आभार सर..”

तिचा ऊर त्याच्याबद्दलच्या आदराने भरून आला होता आणि डोळे पाणावले होते.

“मग असं कोरडं थँक्यू? ही तुमची आभार मानण्याची पद्धत आहे का? प्रॉजेक्ट संपला, इंटर्नशिप संपली.. एक कॉफी तर व्हायलाच पाहिजे ना?”

तिने त्याच्याकडे पाहिलं. तो पुढे म्हणाला,

“कॉफी घेऊयात? कदाचित तुमच्या सोबतची ही शेवटची..”

“असं का बोलता? नंतरही आपण संपर्कात राहूच की.. असो, चला आज तुम्हाला कॉफीची ट्रीट माझ्याकडून.. चला लवकर पॅकअप करा..”

ती हसून म्हणाली. त्याने होकारार्थी मान डोलावली.

“चला.. आता मनातलं तिला सांगण्याची हीच चांगली संधी आहे. ही दवडता कामा नये.. आज, आता ताबडतोब तिला विचारतोच..”

स्वराज स्वतःशीच पुटपुटला आणि तिच्यासोबत ऑफिसच्या बाहेर पडला.

क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all