Login

तुम दे ना साथ मेरा.. ४४

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेमकहाणी..

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. ४४
©अनुप्रिया


दारावरच्या बेलने अधिराच्या विचारांची तंद्री भंग पावली.

“आता कोण आलं?”

तिला प्रश्न पडला. ती पटकन दार उघडण्यासाठी बाहेर आली. समोर स्वराज उभा होता.

“हा अचानक परत कसा आला? तो तिला भेटून आला असेल? पण कोणाला? ते नाव मात्र अजूनही त्याने गुलदस्त्यात ठेवलंय.. “माझ्या आयुष्यातली ती व्यक्ती” एवढंच सत्य त्याने मला सांगितलंय.”

“कुठे हरवलीस?”

तिला असं स्तब्ध उभं राहिलेलं पाहून स्वराजने विचारलं. ती काहीच बोलली नाही. त्याच्या विचारण्याने ती भानावर आली.

“आई कशी आहे? बरं वाटतंय ना तिला?”

स्वराजने आत येत विचारलं.

“ठीक आहेत. त्यांच्या खोलीत आराम करताहेत.”

नंदिनीने उत्तर दिलं तसं बॅग खाली ठेवून सर्वात आधी तो शालिनीताईंच्या खोलीत गेला. आईच्या तब्येतीची विचारपूस केली आणि तो फ्रेश होण्यासाठी त्याच्या खोलीत निघून गेला. नंदिनी पुन्हा स्वयंपाकघरात गेली आणि दुपारच्या जेवणाची तयारी करू लागली. मनातले विचार काही शांत बसू देत नव्हते.

“तसं तर मी स्वतःच्या मनाला समजावलं होतं. तो स्वराजचा भूतकाळ आहे आणि मी त्याचा वर्तमान.. पण आज मन ते मान्य करायला तयार होत नाहीये. लग्नाआधीच स्वराजने मला स्पष्ट सांगितलं होतं, ‘मी तुला पूर्ण आयुष्याभर सोबत असण्याचं वचन देऊ शकत नाही.’

तो प्रसंग नंदिनीच्या डोळ्यांसमोर जशाच्या तसा उभा राहिला. तेव्हा ती गप्प बसली होती कारण त्या काळात तिलाही आधार हवा होता. स्वराजच्या आईची जबाबदारी, घरची परिस्थिती, समाजाचा दबाव सगळं एकत्र आलं होतं ‘हे लग्न गरजेचं आहे, प्रेमासाठी नव्हे तर कर्तव्यासाठी, आईवडिलांच्या सन्मानासाठी..’ तिने स्वतःलाच समजावून सांगितलं होतं; पण तरीही मनाला प्रश्न पडत होते.

“स्वराज तिला भेटला असेल तेंव्हा त्याने तिला दुखावलं तर नसेल ना? मी कुणाच्या आयुष्यात जागा अडवतेय का? मी त्या दोघांच्यामध्ये अडसर होतेय का?”

तिच्या हृदयात हलकीच कळ उमटली. तेवढ्यात कोणाच्यातरी येण्याची चाहूल लागली. स्वराज आला होता. नंदिनीने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा तिला स्पष्ट दिसत होता.

“भेट झाली तिची?”

नंदिनीने प्रश्न केला.

“नाही.. पण कॉलवर बोलणं झालं.”

तो फक्त एवढंच म्हणाला. नंदिनीने थोडं थांबून विचारलं,

“ती रागावली असेल ना?”

स्वराज काही क्षण गप्प राहिला.

“हो.. खूप रागावली.”

त्याच्या तोंडून शब्द फुटले. नंदिनी मान हलवून गप्प बसली. तिला त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव जाणून घ्यायचं होतं;
पण ते विचारण्याची हिंमत झाली नाही कारण कधी कधी आपल्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचं नाव कळणं म्हणजे स्वतःला आवडत नसतानाही तिची जबाबदारी स्वीकारणं असतं आणि मग आयुष्यभरासाठी ते नावडतं नाव एखाद्या ओझ्यासारखं वागवावं लागतं. या विचाराने नंदिनी अस्वस्थ झाली.

“स्वराज हे सगळं जास्त काळ चालणार नाही ना?”

तिने हळू आवाजात विचारलं, मग तो किंचित हसला. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता.

“नाही.. मी लवकरच सगळं संपवेन.”

नंदिनीच्या मनात अनामिक भीती दाटली.

“संपवेन म्हणजे काय? नातं? की सत्य?”

ती काहीच बोलली नाही. रात्री सर्वांची जेवणं आटोपल्यानंतर नंदिनी आणि अर्पिता दोघींनी मिळून स्वयंपाकघर आवरलं आणि झोपण्यासाठी आपापल्या खोलीत निघून गेल्या. नंदिनी खोलीत आली. स्वराज आधीच सोफ्यावर झोपला होता. तीही पलंगावर आडवी झाली. बराच वेळ डोळे मिटून ती तशीच पडून राहिली पण तिला झोप येत नव्हती. तिला अचानक अधिराची आठवण आली. दोन दिवसांपूर्वीच ती तिच्या घरी निघून गेली होती.

“अधिरा पहिल्यांदा घरी आली तेंव्हा किती आनंदी होती. मग अचानक काय झालं देव जाणे! खूप दिवस राहणार असं म्हणाली होती पण लगेच दोन दिवसांनी ती परत निघून गेली. त्यानंतर ना फोन ना मेसेज.. काय झालंय मुलीला काहीच कळत नाही. एकदा घरी जाऊन तिला भेटायला हवं.”

हा विचार नंदिनीच्या मनात येऊन गेला. तिला हे माहीत नव्हतं, ती ज्याच्याशी नकळत गुंतली होती, तो धागा तिच्याच बहिणीच्या आयुष्याशी जोडलेला होता. आणि जेव्हा सत्य समोर येईल, तेव्हा त्या वेदना फक्त स्वराजच्या नसून, त्या तिच्याही असणार होत्या.

दुसऱ्याच दिवशी स्वराज अधिराच्या घरी पोहचला. घराच्या बाहेरची बेल वाजली. नंदिनीच्या आईने दार उघडलं.

“अरे जावईबापू तुम्ही! असे अचानक? आणि एकटेच आलात की नंदिनी सोबत आलीय?”

“नाही आई.. एकटाच आलोय.. या बाजूला थोडं काम होतं म्हणून म्हटलं आलोच आहोत तर तुम्हाला भेटून जावं.”

“अरे व्वा! छान केलंत.. या ना आत या..”

नंदिनीची आई स्वराजला म्हणाली तसं तो आत आला. अधिरा समोरच सोफ्यावर बसली होती.

“अधिरा, कोण आलंय बघ? तुझे स्वराज भावोजी आलेत.”

आईने अधिराकडे पाहिलं. स्वराज सोफ्यावर येऊन बसला. अधिरा त्याच्याकडे उदास नजरेने पाहत होती. दोन दिवसांत तो तिला अधिक थकलेला दिसत होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं, चेहऱ्यावर अपराधीपणाची छाया.. तो तिच्याकडे पाहत राहिला; पण तिच्याशी काही बोलण्याची त्याची हिंमत होत नव्हती.

“बाबा दिसत नाहीयेत, कुठे गेलेत?”

त्याने उगीच काहीतरी विचारायचं म्हणून प्रश्न केला.

“तुम्ही बाबांना भेटायला आलात?”

अधिराने त्याच्याकडे रोखून पाहत प्रश्न केला. स्वराजने शरमेने खाली मान घातली.

“असं काय अधिरा, आल्या आल्या अशी जावईबापूंची फिरकी घेतेय?”

आई हसून म्हणाली. तसं स्वराजही कसनुसं हसला.

“ते जरा बाहेर गेलेत.. येतीलच इतक्यात.. मी तुमच्या न्याहारीचं पाहते. तोवर अधिरा तू जावईबापूंशी गप्पा मारत बस..”

“आई, मी यांना आमच्या खोलीत घेऊन जाते. आमची खोली पाहिली नसेल त्यांनी.. ताईचे आणि माझ्या कितीतरी गोष्टी आहेत ते त्यांना दाखवते. चालेल?”

“हो.. हो.. चालेल.. जा.. त्यांना तुमच्या खोलीत घेऊन जा.. मी तिथेच तुमच्यासाठी नाष्टा घेऊन येते.”

तिने मान डोलावली आणि स्वराजकडे पाहिलं. तो उठून उभा राहिला. अधिरा तिच्या खोलीच्या दिशेने चालू लागली आणि मागोमाग स्वराज चालू लागला. त्यांच्या खोलीत आल्यावर तिने त्याला खुणेनेच बसायला सांगितलं. तो खुर्चीत बसला आणि ती त्याच्यासमोर पलंगावर बसली. या दोन दिवसांत तिने स्वतःला सावरलं होतं; पण मनातली तयारी आणि प्रत्यक्ष त्याच्या समोर उभं राहणं यात प्रचंड अंतर असतं हे तिला माहित होतं. खोलीत तशी शांतता होती; पण त्या शांततेत दडपलेली एक वेदना भरून राहिली होती. ते समोरासमोर बसले. काही क्षण कोणीच काही बोललं नाही.

“सांग..फोनवर अर्धवट सोडलंस ते पूर्ण कर.”

अधिराने स्वतःच सुरुवात केली. स्वराजने मान खाली घातली.

क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”


0

🎭 Series Post

View all