Login

तुम दे ना साथ मेरा.. ८

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक सुंदर प्रेमकहाणी..
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. ८
©अनुप्रिया


दामोदररावांनी दचकून मागे वळून पाहिलं. मागे नंदिनी उभी होती. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. आवाज थरथरत होता; पण तिच्या शब्दांत असलेला ठामपणा पाहून तेसुद्धा काही क्षण नि:शब्द झाले होते.

“नंदू, हो.. हो.. अगं, किती चिडशील? आधी शांत हो पाहू..”

दामोदरराव नंदिनीला समजावण्याच्या सुरात म्हणाले.

“शांत? कसं शांत होऊ मी आबा? आणि मला सांगा तुम्ही त्यांचं म्हणणं मान्य तरी कसं केलंत?”

नंदिनीचा आवाज दाटून आला.

“अगं काय बोलतेस तू हे? लग्नाला उभी राहणार नाही म्हणजे? बोलण्याचं काही तारतम्य आहे तुला?”

सुमित्रा किचनमधून बाहेर येत नंदिनीला डाफरत म्हणाली.

“सुमित्रा, तू तिच्यावर रागवू नकोस. तिचं म्हणणं बरोबरच आहे.”

त्यांनी सुमित्राला शांत केलं. नंदिनीने तिच्या आईआबांकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाली,

“आई, आबा.. तुम्हीच सांगा, तुम्ही म्हणाला होतात ना, लग्न होण्याआधी मुलं एकमेकांना भेटतात, बोलतात आणि मग त्यांच्या पसंतीने लग्न जुळवलं जातं. मग आता काय झालं? मलाही त्याला भेटून, बोलून पुढचं ठरवायचं असेल तर माझं चुकलं कुठे? पण त्याच्याकडे मला भेटायला वेळच नाही. तो गावाला येणार नाही असं म्हणतोय. तुम्हाला हे बरोबर वाटतंय का?”

नंदिनीचा नाराजीचा सूर पाहून सुमित्रा थोडी हबकली.

“पण बाळा, ते माधवराव सरपोतदार आहेत. आपल्या जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यांच्या शब्दांना काही वजन असेल की नाही?”

“म्हणजे आपल्या, माझ्या मनाचा काहीच विचार नाही ना?”

नंदिनीचा स्वर चढला होता.

“आबा, माधवकाका आणि शालिनीकाकूंच्या प्रस्तावाला आपण विचार न करताच हो म्हणायचं? ज्या मुलाचं नावही मी कधी ऐकलं नाही, तो माझ्या आयुष्याचा निर्णय घेणार? तो मला भेटणार नाही? मी त्याला न पाहताच लग्नाला होकार द्यायचा? हे कसं शक्य आहे? आणि काय, तर म्हणे थेट लग्नाला येतो. बाकी मी आहे की नाही, माझी पसंती याला काहीच महत्त्व नाही ना?”

दामोदररावांनी दीर्घ श्वास घेतला. कपाळावरचा घाम उपरण्याने पुसला आणि हळू आवाजात म्हणाले,

“नंदू, आम्ही तुला कधीच जबरदस्ती करणार नाही. पण आपल्याला दुसऱ्याची परिस्थितीही समजून घ्यायला हवी. कदाचित स्वराजला खरोखरीच काम आलं असेल म्हणून त्याचं आता येणं रहित झालं असेल. आपणही इतका हट्ट करू नये बाळा..”

“हट्ट नाहीये हा आबा.. पण इतकं बिझी कोण असतं का? माझ्याचसाठी वेळ नाही म्हणजे काय?”

नंदिनीच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. ते पाहून सुमित्राला गलबलून आलं. नंदिनीच्या जवळ जाऊन तिला कुशीत घेत म्हणाली,

“बाळा, आम्ही कायम तुझ्या पाठिशी आहोत. तुझ्या मनाविरुद्ध आम्ही काहीही करणार नाही हे तुला माहितीये ना? मग तू डोळ्यांत पाणी कशाला आणतेस? आपण शांतपणे बोलूया.”

नंदिनी आईच्या कुशीत विसावली; पण तिच्या मनातला रोष अजून मावळला नव्हता. काहीतरी विचित्र असल्याची जाणीव तिला होत होती. दामोदरराव गंभीर आवाजात म्हणाले,

“नंदू, तुझं म्हणणं बरोबर आहे. आम्हाला तुझी संमती हवीच आहे. पण तूही आमचं म्हणणं ऐकून घे. आम्ही माधवरावांशी बोलून घेऊ. तू स्वराजशी नक्की बोलशील. आम्ही त्याला सांगू की, तुमची भेट व्हायलाच हवी.”

नंदिनी गालावर आलेले डोळ्यांतल्या पाण्याचे ओघळ ओढणीने टिपत म्हणाली,

“आबा, मी एकच सांगते, जो माझ्या आयुष्याचा साथीदार होणार आहे, त्याला माझ्याशी बोलायला वेळ नसेल तर मी अशा नात्यात पाऊल ठेवणार नाही. सरपोतदारांची सत्ता असू दे, संपत्ती असू दे, माझं मन तिथे रमणार नाही. अशा नात्यात मी सुखी होऊ शकणार नाही.”

तिच्या शब्दांनी घरात काही क्षण शांतता पसरली. केवळ तिच्या धडधडत्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता.

दामोदरराव तिच्याकडे पाहत म्हणाले,

“ठीक आहे नंदू. तुझा निर्णय, तुझ्या भावना आम्हाला मान्यच आहेत. तू काळजी करू नको. तुझ्या मर्जीशिवाय काही ठरणार नाही. मी लगेच माधवरावांना फोन करतो.”

त्यांनी लगेच मोबाईल हातात घेतला. ते माधवरावांना कॉल करणार इतक्यात नंदिनीने त्यांना थांबवलं आणि ठामपणे म्हणाली,

“थांबा आबा, माधवकाकांना कॉल करू नका. आधी स्वराजला मेसेज किंवा कॉल करा. मला त्याचं मत ऐकायचं आहे. तो काही म्हणतो, त्यावर माझा निर्णय ठरेल.”

दामोदरराव तिला पाहतच राहिले.

“सुमित्रा, पाहिलंस? आपली नंदू आता लहान मुलगी नाही राहिली. ती आता स्वतःचं आयुष्य स्वतः ठरवू शकते. ती आता इतकी सक्षम झालीय.”

दामोदररावांच्या बोलण्यावर सुमित्राने आपल्या लेकीकडे कौतुकाने पाहत मान डोलावली. नंदिनीच्या वडिलांनी स्वराजला कॉल केला. पण कॉल कट झाला आणि त्याचा मेसेज आला. तिच्या वडिलांनी मेसेज वाचून दाखवला.

“आय एम बिझी नाऊ.. कॉल यू लॅटर..”

बरोबर अर्ध्या तासांनी नंदिनीच्या मोबाईलची रिंग वाजली. एक अननॉन नंबर मोबाईलवर झळकला.


क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”


0

🎭 Series Post

View all