Login

तुम दे ना साथ मेरा..

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी प्रेम कहाणी..

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा..
©अनुप्रिया


“चला थोरल्या सुनबाई.. पुरे झाली आता चेष्टा मस्करी.. आमच्या धाकल्या सुनबाईंना, नंदिनीला त्यांच्या खोलीत घेऊन जा बरं.. स्वराज येईलच इतक्यात.. ”

शालिनीताई आपल्या थोरल्या सुनेला, अर्पिताला म्हणाल्या.

“हो आईसाहेब, चला गं मुलींनो.. पटकन तुमच्या लाडक्या वहिनीला तिच्या खोलीपर्यंत सोडून येऊ.. आमचे भावोजी आले तर उगी त्यांचा खोळंबा व्हायला नको..”

अर्पिता जमलेल्या मुलींकडे पाहत मिश्किलपणे म्हणाली तशा साऱ्या बायकांत हशा पिकल्या आणि नववधूच्या वेशातली नंदिनी मात्र लाजून चूर चूर झाली. लाजेने तिच्या चेहऱ्यावर गुलाबी रंग पसरला. नुसत्या त्याच्या विचाराने अंगावर गोड शहारा आणि हृदयात हलकीशी कळ उमटली.

“ए.. चिडवू नका रे तिला.. आणि घाबरवू तर मुळीच नका. बिचारी वहिनी, किती घाबरलीय ते पहा!”

अर्पिताची धाकटी नणंद, स्वराली नंदिनीला चिडवत हसून म्हणाली. पुन्हा एकदा हास्याचे कारंजे उडाले.

आज ‘आशीर्वाद’ बंगल्यावर खूपच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. आणि का असणार नाही? आज माधवराव आणि शालिनी सरपोतदार यांच्या धाकट्या चिरंजीवाचं म्हणजेच स्वराजचं मोठ्या धूमधडाक्यात लग्न झालं होतं. माधवराव सरपोतदार म्हणजे मोठी आसामी.. सातारा जिल्हातल्या ‘सरपोतदार साखर कारखाना, कृष्णाई दूध डेअरी, सरपोतदार कापडउद्योग, सरपोतदार भाजी मंडई आणि बरेच ग्रामउद्योगांचे मालक असलेले, गावचे पाटील, आमदार माधवराव सरपोतदार.. आणि त्यांच्या धाकट्या मुलाचं लग्न म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. ‘स्वराज सरपोतदार’ यांच्या लग्नाचा थाट काय थाट वर्णवा! साऱ्या पंचक्रोशीत याच लग्नाची चर्चा होती. शहरातले बरीच नामांकित, उच्चभ्रू, प्रतिष्ठित, उद्योजक, सिनेसृष्टीतले मोठमोठे सिनेकलाकार, न्यूज चॅनलवाले अशा बऱ्याच मंडळींनी त्या लग्नाला वर्दी लावली होती. सर्वजण खूप आनंदी होते.

माधवराव सरपोतदार अतिशय कडक शिस्तीचे होते. घरात आणि घराबाहेरही त्यांच्या नावाचा दबदबा होता. नोकरमंडळी त्यांच्या समोर यायलाही घाबरत असत. त्यांच्या एका शब्दात सत्ता उलथवून टाकण्याची शक्ती होती. ते जे म्हणतील तेच अंतिम मानलं जायचं. त्यांचे शब्द म्हणजे आदेश असायचा. शालिनीताई तशा मृदू स्वभावाच्या.. घरातला सारा कारभार त्यांच्या हाती असायचा. सणवार, पै पाहुणे, नोकरचाकर सारं त्याच पाहायच्या. माधवरावांचा प्रत्येक शब्द म्हणजे ‘काळ्या दगडावरची पांढरी रेष.. त्यात बदल होणे शक्य नाही. त्यांच्या मर्जीशिवाय त्यांनी आजवर कधीच एक पाऊलही पुढे टाकलं नव्हतं. कोणतीच गोष्ट त्यांना विचारल्याशिवाय व्हायची नाही किंबहुना तसं झालेलं माधवरावांना रुचायचं नाही.

माधवराव आणि शालिनीताई सरपोतदार यांना तीन मुलं.. थोरला सार्थक, धाकटा स्वराज आणि सगळ्यात लहान शेंडेफळ असलेली स्वराली.. मोठा मुलगा सार्थक वडिलांच्या उद्योगधंदयात हातभार लावत होता. धाकटा मुलगा स्वराज पुण्यात एका मल्टीनॅशनल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम पाहत होता आणि स्वराली पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. पाच वर्षांपूर्वी अर्पिता आणि सार्थकचा विवाहसोहळा संपन्न झाला आणि अर्पिता सरपोतदारांच्या घरचा उंबरठा ओलांडून घरात आली. आणि आता नंदिनी स्वराजची अर्धांगिनी बनून या घरात आली होती.

मुलींच्या घोळक्यात नंदिनी पुढे चालत होती. लाल रंगाच्या शालूमध्ये तिचं रूप अजूनच खुलून दिसत होतं. नंदिनी दिसायला सुंदर, गोरा रंग, मृगनयनी, चाफेकळी नाक, गुलाबी ओठांच्या पाकळ्या, कंबरेपर्यंत रूळणारे काळेभोर केस, त्यावर शोभून दिसणारे मोगऱ्याच्या फुलांचे गजरे.. हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, कानात लोंबणारे झुमके.. हातावर काढलेली लालचुटूक मेहंदी तिच्या रूपात अजूनच भर घालत होती. ती हळूहळू चालत खोलीपाशी आली. मुलींनी दार उघडून जवळजवळ तिला आत ढकललंच.. आणि पटकन दार बंद करून घेतलं. बाहेर अजूनही हसण्याचे आवाज येत होते. नंदिनीने बावरून शालूचा पदर सावरत समोर पाहिलं.. समोरचं दृश्य पाहून ती एकदम जागीच थिजून राहिली.


क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all