डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. ४५
©अनुप्रिया
©अनुप्रिया
“अधिरा… हे लग्न मी आनंदाने केलेलं नाही.”
तो हळू आवाजात म्हणाला.
“आईच्या आजारपणात तिने शपथ घालून मला लग्नाच्या बोहल्यावर चढवलं. आईची शपथ, गावाकडचं दडपण, लोकांची नजर सगळं एकदम अंगावर आलं आणि मी लग्न केलं.”
“मला कारणं नकोत स्वराज.. निर्णय ऐकायचाय.”
ती मध्येच म्हणाली. तो क्षणभर गप्प राहिला. मग थेट तिच्याकडे पाहून म्हणाला,
“हे लग्न फक्त सहा महिन्यांसाठी आहे.”
अधिराच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही.
“काय म्हणालास?”
तिने शांतपणे विचारलं.
“सहा महिने..”
तो पुन्हा म्हणाला.
“आईची तब्येत स्थिरावली की, घरच्यांना वाटेल मी संसारात रमलोय. त्यानंतर मी वेगळा होणार आहे.”
“आणि नंदिनीताई?”
अधिराने थेट प्रश्न केला.
“तिला हे सगळं आधीच माहितीये. मी लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिला स्पष्ट सांगितलं होतं की, हे नातं कायमचं असणार नाही. फक्त सहा महिने.. न्यायालयाच्या प्रक्रियेप्रमाणे घटस्फोटाची पीटीशीयन दाखल केल्यावर सहा महिने एकत्र रहावं लागतं म्हणून आम्ही एका घरात, खोलीत राहतोय. आमच्यात कसलंच नवराबायकोचं नातं नाहीये अगं.. सहा महिन्यानंतर रीतसर घटस्फोट घेऊन आम्ही वेगळे होऊ. नंदिनीनेही हे सगळं मान्य केलं. आम्ही दोघांनी त्याच दिवशी घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या केल्यात. त्यामुळे नंदिनीसाठीही हे तडजोडीचं लग्न आहे. सहा महिन्यांनी हे नातं संपणार आहे. हे सगळं तात्पुरतं आहे. प्लीज समजून घे अगं..”
अधिरा उठून खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेर हळूहळू ऊन पसरत होतं. ती मागे न वळता तशीच खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली,
“म्हणजे तू आधी माझा विश्वास तोडलास. माझ्या बहिणीशी लग्न केलं आणि आता मला सांगतोयस की, हे सगळं तात्पुरतं आहे?”
स्वराज काहीच बोलला नाही. ती पुन्हा मागे वळून त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली,
“स्वराज, माझं आयुष्य तात्पुरतं नव्हतं. माझं प्रेम तात्पुरतं नव्हतं आणि हे असं वागून तू जो माझा अपमान केला आहेस तो तर अजिबातच तात्पुरता नाही.”
“मला अजूनही तूच हवीयस अधिरा.. हे सहा महिने संपले की, आमच्या घटस्फोटानंतर आपण दोघे..”
तो घाईघाईने म्हणाला.
“थांब..”
तिने हात उंचावत त्याला मधेच थांबवलं.
“मला ‘नंतर’चं स्वप्न दाखवू नकोस. तू ज्या क्षणी माझ्याशी प्रामाणिक राहिला नाहीस, त्या क्षणी तू मला गमावलंयस.”
“मी स्वतःलाच हरवून बसलो होतो..”
स्वराज हताश स्वरात म्हणाला.
“आणि मी?”
तिचा आवाज थरथरला.
“मी काय होते त्या काळात? वाट पाहणारी, स्वतःलाच दोष देणारी, तुटत जाणारी?”
तिने गळ्यात दाटून आलेला हुंदका आत निमूटपणे गिळून घेतला.
स्वराज मान खाली घालून बसला.
“तुझं सहा महिन्यांचं लग्न हा तुझा निर्णय आहे; पण माझा निर्णय झालाय.”
अधिरा ठामपणे म्हणाली.
“काय? काय निर्णय घेतलायस तू?”
त्याने घाबरून विचारलं.
“मी यापुढे कोणाचाच ‘पर्याय’ व्हायचं नाही. ना तुझ्या परिस्थितीचा ना तुझ्या पश्चात्तापाचा..”
स्वराजच्या डोळ्यांत पाणी आलं.
“मला वेळ दे अधिरा…”
“मी तुला याआधी बराच वेळ दिला होता स्वराज.. आता मला स्वतःला वेळ द्यायची गरज आहे..”
अधिरा दाराकडे वळत पुन्हा शांतपणे म्हणाली,
“खरं सांगू स्वराज? मी तुला भेटायला येण्याची परवानगी दिली, का माहितीये? मला तुझं कोणतंही स्पष्टीकरण ऐकायचं नव्हतं तर मला तुला माझा निर्णय सांगायचा होता. ही भेट मी ठरवून घडवून आणली, कारण मला तुझ्यासमोर माझ्या स्वाभिमानाची घोषणा करायची होती. मला सांगायचं होतं, आता तुझ्या कोणत्याही गोष्टीची मला गरज नाही. तू तुझ्या मार्गाने जाऊ शकतोस. अरे माझ्या बहिणीचा संसार मोडून मी तिच्याशी विश्वासघात करू म्हणतोस? हे योग्य आहे?”
तिचे प्रश्न त्याच्या मनावर वार करत होते. काय बोलावं त्याला समजत नव्हतं. डोळ्यांतून पाणी वाहत होतं. अधिराचा निर्णय झाला होता. तिने त्याला तिच्या मनाच्या राज्यातून हद्दपार केलं होतं. स्वराज उठून उभा राहिला आणि कोणाशी काहीच न बोलता तिथून निघून गेला. अधिरा शांत दाराशी उभी राहिली. डोळ्यांत पाणी होतं; पण ते आता तिच्या दुबळ्यापणाचं नव्हतं. आज तिला जाणवलं, तिचं प्रेम हरवलं होतं; पण स्वतःला तिने परत मिळवलं होतं.
इकडे स्वराज अधिराच्या घरातून बाहेर पडला. गाडीत येऊन बसला. त्याचा जीव कासावीस झाला होता. सर्वांगातून जणू सारं त्राण निघून गेलं होतं. श्वास कोंडू लागला होता. त्याने गाडी स्टार्ट केली आणि घराच्या दिशेने वळवली. गाडी आता भरधाव वेगाने धावत होती. डोळे धूसर होत होते. कशीबशी तो गाडी घेऊन घरी आला. गाडी पार्किंगला लावली आणि अंगणातून घरच्या दिशेने चालत येत होता. स्वराज घराच्या दाराशी येऊन थांबला. त्याने सभोवार नजर फिरवली. आज त्याला स्वतःचंच घर अनोळखी वाटू लागलं होतं. जणू आत शिरताच सगळे मुखवटे उतरून पडणार होते! दार उघडून तो आत आला. स्वयंपाकघरातून येणारा भाताचा मंद वास अजून हवेत रेंगाळत होता. तिथे नंदिनी असणार, हे त्याला माहीत होतं; पण तरीही तो तिला हाक मारू शकला नाही. बूट काढताना त्याच्या हातातून एक बूट घसरून खाली पडला.
तो वाकून उचलायचाही प्रयत्न त्याने केला नाही. सरळ सोफ्यापाशी गेला आणि तिथे बसण्याऐवजी तो मटकन खाली जमिनीवर बसला. त्याने त्याचे डोळे घट्ट मिटून घेतले; पण त्याच्या डोळ्यांसमोर काळाकुट्ट अंधार नव्हता तर त्याला जाब विचारणारी अधिरा होती.
तो वाकून उचलायचाही प्रयत्न त्याने केला नाही. सरळ सोफ्यापाशी गेला आणि तिथे बसण्याऐवजी तो मटकन खाली जमिनीवर बसला. त्याने त्याचे डोळे घट्ट मिटून घेतले; पण त्याच्या डोळ्यांसमोर काळाकुट्ट अंधार नव्हता तर त्याला जाब विचारणारी अधिरा होती.
“मी कोणाचा पर्याय होणार नाही.”
ते तिचे शब्द जणू खोलीत घुमत होते. त्याच्या मनावरचं दडपण वाढलं आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.
क्रमशः
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा