Login

तुम देना साथ मेरा..23

प्रेम



    रात्री झोपतानाही तिच्या मनात त्याने काही खाल्ले असेल का? हाच विचार येत होता फोन करून विचारावे का? की मेसेज करू जेवलात का म्हणून?  असाही विचार आला.

   मोबाईल हातात घेऊन कितीतरी वेळा त्याच्या व्हाट्सअप अकाउंट वर तिने मेसेज टाईप केला आणि डिलीट ही केला... शेवटी, 'उद्या रात्री नक्की या ! गुड नाईट!' असा मेसेज टाईप करून ती झोपायचा प्रयत्न करू लागली.

   इकडे साईला ही अंथरुणावर पडला तरी झोप येत नव्हती..  इतके दिवस अभ्यासाने, श्रमाने थकून लवकर झोपून जायचा तो.. 

    तसा तर आजही थकला होताच, पण या काही दिवसात ईश्वरीच्या आजूबाजूला असण्याची सवय झाली होती. त्यामुळे घर अगदी खाली खाली वाटत होतं.. 

    या चार-पाच दिवसातच घरात बाईचं असणं किती महत्त्वाचं असतं, बाईमुळे घराला घरपण येतं, याची जाणीव त्याला होत होती.. जेवण तर गेले नव्हतेच..  बाहेरच त्याने गाडीवरची पावभाजी खाऊन पोट भरले होते..

     मोबाईलची मेसेज टोन वाजली आणि नोटिफिकेशन बघून चेहऱ्यावर चमक आली त्याच्या..  ईश्वरीचाच मेसेज होता.. डोळे बंद करून तिचा चेहरा आठवतच त्याला झोप लागून गेली..


....

    "इशू.. फोन कर साईश ना.. अग आठ वाजले अजून आले नाहीत..  जेवण कधी करणार तुम्ही? आणि मग पुन्हा जायलाही उशीर होईल..  उद्याच्या शाळेची तयारी पण करायची असेल ना?" आईने घड्याळ बघतच म्हटले..

     "हो आई अजून दहा मिनिटे वाट बघते आणि मग करते कॉल." ईश्वरीने भाजीच्या पातेल्यावर झाकण ठेवत म्हटले.

   आईने एका बाजूला ताट वाटी पुसायला घेतलें. तो पर्यंत ईश्वरी ला कोशिंबीर करून ठेव म्हणून सांगितले.

    साई जेवायला येणार म्हणून, छान पुरी भाजी, वरण-भात भजी आणि श्रीखंडाचा बेत केला होता आज..  तसे दुपारी त्याला फोन करून, 'लवकर या.' म्हणून कळवले होते दिनकर रावांनी..  पण आता आठ वाजले तरी तो आला नव्हता. म्हणून ईश्वरी च्या आईचे सतत तिच्या मागे फोन करून, विचार केव्हा येत आहे?  म्हणून टूमणे लागलेले होते..

     शिवम ही आज घरीच होता रविवार असल्यामुळे..  उद्यापासून पुन्हा त्याचे कॉलेज आणि ईश्वरी ची शाळा दोघांचेही रुटीन नेहमीप्रमाणे सुरू असणार होते.

    आज दिवसभर सगळ्यांनी घरात छान पैकी गप्पा मारल्या होत्या. दिनकर रावांची नेहमीप्रमाणेच घरी शाळेची कामे चालूच होती. पण तरीही आपल्या लेकीच्या गप्पा ते मनापासून ऐकत होते. आपल्या निर्णयाने ती दुखावली गेली आहे. किंवा साई तिला आवडला नाहीये, साईची परिस्थिती त्याच्या घरचे यांच्या विषयी तिच्या मनात काही किंतु आहे, असे तिच्या बोलण्यावरून आणि चेहऱ्यावरून त्यांना जाणवत नव्हते. त्यामुळे ते निश्चींत झाले होते.

     तशी आपल्या मुलीबद्दल त्यांना खात्री होतीच.. ती बाहेरच्या भुलाव्याला भूलणारी नाही..  माणसाच्या स्वभावाला ओळखणारी आणि जपणारी आहे हे लहानपणापासूनच ते पाहत आले होते..  म्हणूनच तिला न विचारताच त्यांनी अचानक तिच्या लग्नाचा तसा निर्णय घेतला होता..  आणि आता त्या निर्णयाबद्दल त्यांना तो निर्णय चुकला नसल्याची खात्री पटत चालली होती..

    साई बद्दल सर्व माहिती होतीच. त्याच्या जिद्दी बद्दल, ध्येयाबद्दल, त्याच्या मेहनती बद्दल ते जाणून होते.. शहरात राहायला पैसा लागतो. आणि तो मिळवायला नोकरी किंवा उद्योगधंदा.. नोकऱ्या तर काही रस्त्यावर पडलेल्या नसतात. तसेच उद्योग धंद्यासाठी भांडवल लागतेच.. ते एखादा घर सोडून आलेला मुलगा कुठून आणणार? आणि असले तरी नवख्या प्रदेशात धंदा कसा उभा करणार?

  रोजच्या जगण्यासाठी, अन्न, वस्त्र,नी, डोक्यावर छत यासाठी आधी पैसा कमवावा लागेल. मग नंतर बँकिंग च्या परीक्षेसाठी तयारी आणि अभ्यास, या विचारातूनच साई ला दिनकर रावांनी रिक्षा चालवायचा सल्ला दिला होता.

   साई ला त्यांच्याकडे घेऊन आलेले मोहिते त्यांच्या शाळेत क्लर्क होतें.. त्यांच्याशी ही प्रत्यक्ष मोहितेंची ओळख नव्हती. पण त्यांच्या शेजारी राहणारा दिलीप, साईच्या ओळखीचा होता. तोच त्याला मोहितेंकडे घेउन आला होता. आणि मोहितेंना दिनकर रावांचा गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचा स्वभाव माहीत असल्याने त्यांनी त्याची गाठ दिनकर रावांशी घालून दिली होती. आणि ही गाठ आता त्यांच्या मुलीशी झालेल्या लग्नंगाठीत बदलली होती..


   साडेआठच्या दरम्यान साई ईश्वरीच्या पप्पांच्या घरी आला.  त्यानंतर थोड्याशा गप्पा आणि जेवण वगैरे आटोपले. गप्पा म्हणजे फक्त शिवम आणि आईच जास्त बोलत होत्या. दिनकरराव मधून मधून काहीतरी विचारत होते आणि साई फक्त सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होता.. त्याच्या परिक्षेबद्दलची चौकशी, अभ्यासाची तयारी, अभ्यासिकेतील शिक्षकांचे मार्गदर्शन याबद्दल चे प्रश्र्न जास्त होते त्यात.. यावरून सर वारंवार आपल्या बद्दल अभ्यासिकेत सरांकडे चौकशी करत असतात, हे लक्षात आले त्याच्या..

   अवघडले पण तर होतेच त्यांच्यात.. आधी भाडेकरू म्हणून दर महिन्याचे रूमचे भाडे घेऊन येणारा तसेच, परीक्षेबद्दल किंवा काही अडीअडचणी बद्दल मार्गदर्शन घ्यायला येणारा व्यक्ती, आज त्यांचा जावई म्हणून मानाने त्यांच्या घरात जेवण करत होता..

    त्याला  जरा जास्तच अवघडल्यासारखे वाटत होते.. कदाचित आपली लायकी नसताना मिळालेला हा आदर  आहे. आणि तोही ईश्वरी शी लग्न झाल्यामुळे, नाही.. तिचे लग्न मोडल्यामुळे आपण तिच्या आयुष्यात आलो आणि म्हणून हा आदर आपल्याला मिळतोय..  ही खंत कुठेतरी होतीच मनात..  पण तो आता तिच्यासाठी, आपल्या ध्येयासाठी.. अजून मेहनत करणार होता. आणि आडून आडून जे लोकांचे टोमणे तोही ऐकत होता, तिथे स्वतःला सिद्ध करून दाखवणार होताच..

  " इशू.. ही पिशवी पण घे.." ईश्वरी आणि साई निघायला लागले, तेव्हा आईने तिच्या हाती एक पिशवी सोपवली..

   तिने भुवया उंचावतच काय आहे? म्हणून विचारले.

  " अग काही नाही. तुझ्या आधीच्या साड्या ब्लाउज आणि पेटिकोट आहेत त्यात.. उद्यापासून शाळेत तुला लागतील ना?"

  "बर चालेल.." म्हणत ईश्वरीने ते पिशवी घेतली..  घेताना मात्र एकदाच साईकडे पाहिले..
पण त्याचा चेहरा निर्विकार होता..  तिने साड्या घ्याव्या की नाहीत हे कदाचित ती त्याच्याकडे पाहून नजरेनेच विचारत होती.
पण तो तरी काय सांगणार? अजून दोघांमध्ये तेव्हढी मोकळीक नव्हती.. आणि लगेच तो तीच्यासाठी जास्ती खरेदी ही करू शकत नव्हता.. त्यामुळे तो काही बोलला नाही..

   दोघांनी ही आईं पप्पांना नमस्कार केला. शिवम चा निरोप घेऊन दरवाज्या बाहेर पडले.. आईं पप्पा ही बाहेर पर्यंत सोडायला आले.. शिवम ही होताच..

    "अं.. ईश्वरी?" रिक्षा जवळ आला तसे साई ने पटकन तिला आवाज दिला. खिशात काहीतरी शोधत होता तो..

    "हां काय?"

   "ते.. आत टी पोय वर चावी राहिलीय.. आणता प्लिज!"

   "मी आणतो ताई." शिवम पटकन चावी आणायला आत पळाला..

   आई डोळे मोठे करुन ईश्वरी कडे पाहत होती.. नजरेनेच काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होती.. पण ईश्वरी ला काही कळले नाही.. साई आणि दिनकर रावांचे लक्ष गेले. तशा दोघींच्या नजरेचे खेळ थांबले..

   "हं.. जिजू ही चावी.." शिवम ने चावी साई च्या हातात दिली.. आणि लग्न होई पर्यंत साई दादा म्हणून संबोधणाऱ्या शिवम च्या तोंडून जिजू शब्द ऐकून साईच्या अंगावर शहारे उमटले.. त्या दोघांचे नाते दोघांच्याही घरच्यांनी किती सहजपणे मान्य केले होते.. त्यांना मान्य करायला मात्र अजून किती वेळ लागणार होता काय माहीत?

     दोघांनाही घरी येता येता अकरा वाजले.. रस्त्यातच पाऊस लागला होता.. कधीपासून शांत असणारा पाऊस आता चांगलाच लागून राहील, असे वाटत होते.. 

   तसेही जुलै महिना म्हणजे अगदी झडीचा महिना समजला जातो ठाणे जिल्ह्यात..  आणि त्याची प्रचिती कदाचित लवकरच येणार होती.

घरी आल्यावर साई ने सकाळचा अलार्म सेट केला. तो सकाळी लवकर स्टेशन ला जाणार आहे याची कल्पना त्याने ईश्वरी ला दिली होती.. 'तुम्ही झोपा, मी माझे आवरून निघेल. फक्त दरवाजा बंद करायला उठा.' असे त्याने झोपतांनाच तिला सांगितले.

सकाळीं पाच च्या दरम्यान येणाऱ्या एक्सप्रेस मुळे डायरेक्ट भाडे भेटायचे. म्हणून सकाळी पाच लाच तो स्टेशन वर जायचा.. आणि सात पर्यंत घरी यायचा..

   ईश्वरी ची शाळा मात्र दुपार शिप ला होती..त्यामुळे तिला आरामात अकरा सव्वा अकरा ला निघाले तरी चालणार होते.

ईश्वरीला नेमके आईकडून आपली छत्री घेऊन यावी हे सुचलेच नाही.. आणि आता उद्या शाळेत जाताना जर पाऊस असला तर काय करावे? याची चिंता सतावत होती.

साईला तरी कसे लगेच 'मला छत्री घेऊन द्या.' म्हणावे.. जाऊ दे उद्या सकाळी पाऊस असला तर शिवम ला घरची माझी छत्री घेऊन यायला सांगते.. नाहीतर रस्त्याने जाता जाता दुकानातून एक नवी छत्री घेऊन टाकेन. असा विचार करत ती झोपायचा प्रयत्न करू लागली..

  साई खाली अंथरूण टाकून झोपी गेलेला होता.. भिरभिरत्या पावसाने हवेतला गारवा वाढला होता.. तीने साईच्या पायाशी ठेवलेली चादर त्याच्या अंगावर ओढुन दिली.. आणि आपले ब्लँकेट ही छाती पर्यंत ओढून घेत बेड वर पडून राहिली.. नजर मात्र त्या निळसर डिम लाईट च्या प्रकाशात शांत वाटणाऱ्या साई च्या निरागस चेहऱ्यावर खिळली होती..