साईला तरी कसे लगेच 'मला छत्री घेऊन द्या.' म्हणावे.. जाऊ दे उद्या सकाळी पाऊस असला तर शिवम ला घरची माझी छत्री घेऊन यायला सांगते.. नाहीतर रस्त्याने जाता जाता दुकानातून एक नवी छत्री घेऊन टाकेन. असा विचार करत ती झोपायचा प्रयत्न करू लागली..
साई खाली अंथरूण टाकून झोपी गेलेला होता.. भिरभिरत्या पावसाने हवेतला गारवा वाढला होता.. तीने साईच्या पायाशी ठेवलेली चादर त्याच्या अंगावर ओढुन दिली.. आणि आपले ब्लँकेट ही छाती पर्यंत ओढून घेत बेड वर पडून राहिली.. नजर मात्र त्या निळसर डिम लाईट च्या प्रकाशात शांत वाटणाऱ्या साई च्या निरागस चेहऱ्यावर खिळली होती..
"ईश्वरी.. ईश्वरी.. दरवाजा लावून घ्या आतून.. मी येतो दोन तासात.." ईश्वरी ने डोळे उघडून पाहिले, तर साई आवरुन तयार होता. ती उठून दरवाज्यात आली.. तो चाळीपार गेला तसे दरवाजा आतून लावून घेतला..
वॉश रूम ला जातांना सहज नजर गेली तर दुधाच्या पातेल्यात काल चे दूध तसेच होतें. म्हणजे तो चहा न घेताच गेला होता. 'शिट.. मी उठून करून द्यायला पाहिजे होती चहा.. पण मला काय माहीत हे असेच जातील.. जाऊ दे, घरी येतील तेंव्हा नाश्त्यासाठी पोहे बनवते. आणि मस्त आल् घालून चहा बनवेन.. उद्या पासून मीच उठून बनवून देत जाईन चहा..' स्वतः शीचं पुटपुटत ती पुन्हा झोपली.. साडे सहा चा अलार्म लावला होता तीने..
साडेसातला साई येतानाच दूध घेऊन आला होता. तोपर्यंत ईश्वरी ची अंघोळ आणि दिवाबत्ती करून झाली. नाश्त्यासाठी पोहे ही भिजवून ठेवले होते. आणि कांदा चिरत होती. तोवर साई घरात आला होता. लोटलेला दरवाजा उघडून तो आत आला. किचनमध्ये दुधाची पिशवी ठेवता ठेवता तिच्याकडे लक्ष गेले आणि तिला पहातच राहिला..
साधासाच फिकट गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता तिने.. एका बाजूच्या खांद्यावरून घेतलेली ओढणी दुसऱ्या बाजूला कमरेवर गाठ मारून अडकवून ठेवली होती.. धुतलेल्या केसांना वर क्लिप मध्ये अडकवले होते.. तरी काही चुकारबटा लटकत होत्या मानेवर.. त्यातून ओघळणारे पाणी आणि मध्येच कपाळावरील बट मागें सारणारी तिची नाजूक बोटे, साई तिचा प्रसन्न चेहरा पाहतच राहिला..
"तुम्ही फ्रेश होऊन घ्या.. पोहे करते गरम गरम.." ईश्वरी च्या बोलण्याने भानावर आला तो.
"हो आलोच." साई बाथरूम मध्ये शिरला.. अंघोळ वगैरे सकाळीच करून गेला होता.. दोघांनीही नाश्ता आणि चहा घेतला..
"अहो भाजी काय बनवू?" चहा पिऊन झाला तसे ईश्वरीने त्याला विचारले आणि पटकन नजर वळून तो तिच्याकडे पाहू लागला..
त्या दिवशीही तिने याच प्रश्नासाठी त्याला कॉल केला होता. ते आठवून पटकन हसू आले त्याला.
"सांगा ना प्लीज!" तो काहीच बोलत नाही हे पाहून तिने पुन्हा विचारले.
" ईश्वरी तुम्हाला हा प्रश्न विचारायची खरच गरज नाही.. माझे खाण्याचे असे कोणतेच लाड नाहीत.. या दोन वर्षात अन्नाच महत्त्व शिकलो आहे मी.. त्यामुळे तुम्ही कोणतीही भाजी बनवा. मी खाईल.. "
"तरी सुद्धा तुम्ही सांगितलं तर मला विचार करावा लागणार नाही.."
" विचार करायची गरजच नाही.. तुम्हाला आवडेल ते बनवत जा." तो म्हणाला. तरीही ती त्याच्याकडे अपेक्षेने पाहत होती..
"ठीक आहे.. बटाट्याची ची भाजी बनवा. आवडते मला." तो म्हणाला. आणि तिचा चेहरा खुलला..
"अहो पण रात्रीच खाल्ली ना? आता पुन्हा तीच.."
" असू द्या.. चालेल मला. काल आईंनी बनवली होती, आता तुम्ही बनवणार आहात..चवीत फरक तर असेलच ना.. आणि लहान पणापासून बटाटा आवडतो मला.. रोज दिला तरी खाऊ शकतो मी.. हां.. पण असं रोज नका विचारत जाऊ. तुम्हाला हवं ते बनवत जा.. मी सगळ्याच भाज्या खातो." त्याने सांगितले आणि तिने मान डोलावली.
ईश्वरीने टिफिन साठी बटाट्याची भाजी आणि पोळ्या बनवल्या. ठराविक भाज्या सोडल्या तर साई सगळेच खात होता.. तसे तर गावी गेले होते तेव्हा, आई आणि काकू कडून तिला साईची जेवणाबाबतची आवड निवड कळली होती. त्यामुळे त्याला न आवडणाऱ्या भाज्या कोणत्या आहेत हेही माहिती होते.. तिने भरभर हात चालवत सकाळची कामे आवरली.
" ईश्वरी तुम्ही किती वाजता निघणार आहात? " बाहेर मोबाईल मध्ये नोट्स वाचत असणाऱ्या साईने तिला विचारले. ती किचन मध्ये टिफिन भरत होती..
साई दुपारी घरीच जेवायला येणार होता. तसे तर आधी तो सकाळी सात साडेसातला घरी आल्यावर एखादा तास झोप काढायचा. आणि मग फ्रेश होऊन पुन्हा दहा वाजता बाहेर जायचा. दहा ते एक वाजेपर्यंत रिक्षाचे भाडे करून पुन्हा घरी यायचा. आणि मग जेवण करून वाचनालयात जायचा. पण आज तो ईश्वरीला सोडायला म्हणून अजून घरीच थांबला होता. सव्वा अकराला तिला शाळेत घेऊन गेला की मग परस्पर रिक्षाचे भाडे करणार होता.
त्याने तिला तसे सांगितल्यावर तिने म्हटले होते की, मी जाईन हवं तर. तुम्ही जा भाडे घ्यायला. पण असेही ती दुसऱ्या कोणाच्यातरी रिक्षात बसून जाईलच ना.. त्यापेक्षा आपणच रोज सोडावे हा विचार त्याने केला होता.. आधीही त्याने बऱ्याच वेळेस तिला शाळेत सोडले होते.. शहरातल्या शहरात शाळा असली तरीही बऱ्यापैकी लांब होती. दोन वेळा रिक्षा बदलून जावे लागत होते..
"अहो भाजी आणि चपाती झाकून ठेवली आहे.. तिथे कपाटामध्ये बरणी आहे त्यात शेंगदाण्याची चटणी भरलेली आहे.. दुपारी जेवण करून घ्या.." पर्समध्ये आपल्या वस्तू चेक करता करता तिने त्याला सांगितले. हिरव्या रंगाची छानशी तलम साडी नेसली होती तिने. साध्या अशाच पेहरावत सुद्धा अगदी सुंदर आणि सोज्वळ दिसत होती ईश्वरी... कितीही कंट्रोल केलें तरी त्याची नजर तीच्याकडे वळतच होती.
"ईश्वरी संध्याकाळी साडेपाचला घ्यायला येईल मी तुम्हाला."
" अहो कशाला मी येईन ना.. साडेपाचला सोडतात असं नाही, सहा वाजतातच शाळेतून निघायला."
" ठीक आहे.. मग मी पावणेसहाला येईल.. वेळ झाला तर थांबेल तिथे.."
" मी येईल ना.. पुन्हा एवढ्या लांब कशाला येताय तुम्ही?"
"नको.. आपलीच रिक्षा आहे ना. येईन मी.. उगाच रिक्षा बदलावी लागेल तुम्हाला.. "
" तुम्हाला लांब पडत जाईल.. त्यापेक्षा जाताना तुम्ही मला सोडत जा.. येताना मी येत जाईल.. "
" ठीक आहे.. बघू. आज तरी मी येतो.. मग नंतर ठरवू.." त्याने म्हटले. आणि तिने ही मग नकार दिला नाही. बस आपल्या मुळे त्याला त्उगाच हेलपाटे मारायला नको असे वाटत होते तिला.. सध्या त्याने त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवे होते.
तिचे आवरलेच होते.. घरातले सगळे झाकपाक करून, लाईट फॅन चे बटन बंद करून साईने चावी घेतली. आणि दोघेही बाहेर पडले. घराची अजून एक चावी शोधावी लागणार होती..
नशीब.. पाऊस नव्हता.. त्यामुळे छत्री नसली तरी चालणार होतें.. शाळा सुटल्यावर मात्र ती नवी छत्री विकत घेणारच होती.
"अहो पॅसेंजर आहेत ना इथे उभे.. दोन सीट रिक्षात बसतील अजून.." बाहेर रिक्षासाठी उभे असलेले पॅसेंजर बघून ती एका बाजूला सरकत म्हणाली.
" नको राहू द्या.. येताना घेईल की मी भाडे .. आता तुम्हाला आधी सोडतो."
"मला वेळ आहे अजून.. बऱ्यापैकी लवकर निघालोय आपण.. तेवढेच भाडं होईल. आणि मी एकटीच तर आहे रिक्षात. अजून दोन सीट सहज भरू शकता तुम्ही.." तिला एकटीलाच तो घेऊन जात होता, हे बघून ईश्वरीने त्याला सुचवले. पण तरीही त्याने काही पॅसेंजर रिक्षात घेतले नाहीत. तो तसेच रिक्षा चालवत राहिला..
" ईश्वरी. जरा खाली उतरा.. या.." रिक्षा एका दुकानासमोर थांबवत त्याने तिला उतरायला सांगितले.
"इथे का आलोय आपणं?" ती दुकानाचे निरीक्षण करत म्हणाली.
"छत्री लागेल ना तुम्हाला? पावसाळ्याचे दिवस आहेत.." तो तीच्याकडे पाहत म्हणाला..
" मी घेईन ना संध्याकाळी.."
"आताच घेऊन टाका.. दहा मिनिटे लागतील फक्त..पावसाचा काय भरोसा.. उतरल्यावर आला तर? गेट पासून वर्गापर्यंत जाता जाताच भिजून जाल.." बोलत तो दुकानात शिरला देखील. आणि फोल्डिंग ची लेडीज छत्री दाखवायला सांगितली.
तीने ही मग जास्त आढेवेढे न घेता एक छानशी छत्री निवडली.. ती पैसे काढायला गेली तो पर्यंत त्याने ऑनलाईन पेमेंट केले होते..
खूश होतच ईश्वरी रिक्षात बसली.. न सांगताही तो करत असलेली काळजी तिला अजूनच त्याच्या जवळ खेचत होती.
आता पर्यंत केवळ तीचे पप्पा होते, जे न सांगता तिच्या अडचणी समजून घेत तिची काळजी करत होते.. कधीही काही बोलून न दाखवता तिला आवश्यक असतील त्या वस्तू घेत होतें. उगाच महागाच्या नसल्या तरी तिच्या आवडी नुसारच घेऊन देत होतें.
आणि आत्ता साई सुध्दा तसेच वागत होता ना? तीने न सांगताच तिला छत्रीची आवश्यकता भासेल हे ओळखून तो दुकानात घेऊन आला होता. त्याची नजर गेली तर ती समोरच्या आरशात दिसणाऱ्या त्यालाच बघत होती. दोघांचीही नजरानजर झाली तशी बावरून ती पटकन बाहेर बघू लागली.
