Login

तुम देना साथ मेरा--भाग 3

दीर्घकथा
तुम देना साथ मेरा--भाग 3


"हो, हो तेच. पण तुम्ही असे आश्चर्याने का विचारताय?"

"नाही म्हणजे तुमच्यासारखे शहरातले पाव्हणे आमच्या शिरपूर मध्ये फारसे येत नाहीत ना. थोडं आडवळणावर आहे गाव," बाईकवाला म्हणाला.

"तुम्ही शिरपूरचे आहात?," राज उत्साहाने म्हणाला.

"हो, हो चला तुम्ही माझ्यासोबत. मी गावाकडेच निघालोय. सोडतो तुम्हाला. चला, बसा," म्हणत त्याने बाईकला किक मारली.

मनोमन देवाचे आभार मानत राज त्याच्यासोबत निघाला.

"मी अंशु, अंशुमन पाटील. शिरपुरातच राहतो. मोठी शेती आहे तिथे. तिचा कारभार बघतो," बाईकवाल्याने त्याची ओळख करून दिली.

"पण तुम्ही कुणाकडचे पाहुणे? गावात कसे काय?"

राजने त्याला त्याच्या पॅशन बद्दल, दोन महिन्यांच्या भटकंतीबद्दल सगळे सांगितले.

अंशु तर भारावून ऐकत होता.

ऐकता ऐकता गावाकडच्या रस्त्यावर ते वळले.

दूरवर घरे दिसू लागली होती.

गावाच्या हद्दीत ते शिरले आणि राज उद्गारला, " वॉव, अमेझिंग,वंडरफुल..."
"थांबा, थांबा, गाडी थांबवा प्लिज," त्याने अंशुला बाईक थांबवण्यास सांगितले.

एका जागी स्तब्ध होऊन तो सर्वत्र बघायला लागला.

आनंद त्याच्या पोटात, ओठांत आणि मनात मावत नव्हता.

"ओह माय गॉड, काय बोलावे? आयुष्यात पहिल्यांदा अगदी योग्य निर्णय घेतला मी इथे येण्याचा, गुड जॉब राज," तो स्वतःसोबत बोलत स्वतःची पाठ थोपटून घेत होता.

छोटंसं टुमदार गाव, हिरवीकंच वनराई, लगतची झुळझुळ वाहणारी स्वच्छ नदी, पर्वतरांगांनी घेरलेलं शिरपूर म्हणजे राजला स्वप्नातलं गाव वाटायला लागलं.

विविध झाडं, फुलं, पक्षी यांच्या माध्यमातून निसर्गाने रंगांचा खजिना उघडला होता तिथे.

आणि त्यातून आता काय काय घेऊ, डोळ्यांत किती साठवू अशी स्थिती राजची झाली. कितीही बघितलं तरी मन भरत नव्हतं.

"चला साहेब, गावाच्या वेशीवरच थांबणार का?," अंशु हसतच म्हणाला.

खरेतर राजला अजून थोडावेळ तरी तिथे थांबावेसे वाटत होते पण नाईलाजाने तो अंशुसोबत निघाला.

"दादा, एखादी राहण्याची जागा मिळेल ना गावात? काही लॉज वगैरे आहे का?"

"बस का पाव्हनं, अतिथी म्हणजे देव असे मानणारे लोकं आहोत आम्ही, तुम्ही चला तर गावात."

अंशुने गावात गाडी सरळ त्याच्या वाड्याजवळ थांबविली.

"या, आत या," राजला वाड्याच्या आत नेत असतानाच त्याच्या आईला त्याने हाळी दिली.
"ओ आये, पाव्हनं आलं बघ शहरातून."

अंगणात विहीर होती. बोलता बोलता अंशुने एक बादली पाणी शेंदले आणि राजला हात पाय धुण्यासाठी दिले.

थंडगार पाण्याने राजच्या वृत्ती प्रफुल्लित झाल्या, नकळत त्याच्या तोंडून "अहाहा, मस्त" असे निघाले.

अंशुच्या आईने बाहेर येत, या बसा, म्हणत राजचे मनापासून स्वागत केले. त्याच्यासमोर गुळाचा खडा आणि थंडगार पाण्याचा लोटा ठेवला.

राजसाठी सगळंच नवीन होतं पण त्याला ते आवडलं होतं.
अंशु सगळ्या पद्धती त्यामागचं विज्ञान त्याला समाजवून सांगत होता.

"मस्त आहे हे सगळं, या पद्धती. किती छान जीवन जगता तुम्ही," राज भारावून बोलत होता.

चहा नास्ता झाला.
अंशुच्या आईने त्याला जेवायला इथेच थांबायचे आहे याचा आग्रह केला होता.
जेवायला वेळ होता, तोपर्यंत अंशु त्याला वाडा दाखवू लागला.

भली मोठी पडवी, तिथे झुलणारी मोठी बंगळी, मोठं स्वयंपाकघर पण आधुनिक उपकरणांनी सजलेलं, एक अख्खा वन बीएचके सामावून जाईल इतक्या मोठमोठाल्या खोल्या, परसदार आणि तिथे फुलवलेली सुंदर बाग सगळंच मन मोहून टाकणारं होतं.

आतापर्यंत फक्त कथा कादंबऱ्या किंवा सिनेमात बघितलेला वाडा राज प्रत्यक्ष बघत होता आणि अद्वितीय अनुभवसाठू मनोमन अंशला धन्यवाद म्हणत होता.

राज आणि अंशु दोघेही बडबड्या स्वभावाचे होते.
त्यामुळे दोघांची पटकनच गट्टी झाली.

अंशु गावात जरी रहात होता तरी तो शहरातून कृषी पदवीधर होऊन आलेला होता.
सगळ्याचं विषयाचं ज्ञान त्याला होतं.
आणि दोघेही समवयस्क त्यामुळे अवघ्या काही तासांतच, गप्पा करता करता, 'अहोजाहो, पाव्हनं, दादा' यावरून त्यांची गाडी 'अरेतुरे, राज, अंशु' यांवर कधी जाऊन पोचली त्यांना देखील कळले नाही.

"आणि ही तुझी खोली बरं का राज. आजपासून तू इथे रहायचे," तिसऱ्या मजल्यावरील एक मोठी रूम दाखवत अंशु त्याला म्हणाला.

"इथे तुला कुणीही डिस्टर्ब करणार नाही. शांतपणे तू तुझी चित्रं काढू शकशील. बाकी सगळी सोय इथे आहेच आणि काही लागलं तर आम्ही आहोतच, फक्त एक आवाज द्यायचा," अंशु म्हणाला.

"हे शक्य नाही अंशु, मी इथे असा कसा राहू इतके दिवस? एक दोन दिवसांची गोष्ट असती तर मी राहिलोही असतो पण इतके दिवस असं तुझा पाहुणा म्हणून राहणे मला शक्य नाही होणार, प्लिज, आय एम सॉरी," इति राज.

दोघेही आपले म्हणणे पटवून देत होते.

"तू माझ्याकडून भाडे घेणार असशील तर मग मी राहील इथे," राजने असे म्हणताच अंशु रागावला.

"काय? अरे हे घर आहे माझे, हॉटेल नाही भाडं घ्यायला."

पुन्हा दोघांचे शब्द युध्द सुरू झाले आणि शेवटी राज त्यात जिंकला.

"बरं बाबा, ठीक आहे. इथून अगदी दोन घरं सोडून एका ठिकाणी तुझी व्यवस्था होऊ शकते. तिथे दे भाडे आणि रहा खुशाल, मग तर झाले," अंशुने माघार घेत विषय संपवला आणि एक जिवाभावाचा मित्र मात्र कमावला.

राजला तर गावात शिरल्यापासूनच त्या मातीचं जबरदस्त आकर्षण वाटू लागलं होतं.

कदाचित शिरपूरच्या मातीशी त्याची नाळ जुळणार होती.


क्रमशः

© डॉ समृध्दी अनंत रायबागकर, अमरावती

#अष्टपैलूस्पर्धा2025

(कशी जुळणार राजची नाळ, तेही तो कधीही न गेलेल्या गावासोबत?, वाचत रहा पुढील भागांमध्ये....)


"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा"

🎭 Series Post

View all