Login

तुम्ही असे एकत्र राहता! _ भाग १

वडिलांच्या मृत्यूनंतर तीन भाऊ दिखाव्यासाठी कसे राहता
तुम्ही असे एकत्र राहता! _ भाग १

जलदलेखन स्पर्धा _नोव्हेंबर २०२५

विषय _ दुरून डोंगर साजरे

"ए अजय माझ्यासाठी पुरणपोळी आणलीस की नाही! मी कधीपासून होळीची वाट पाहत होतो."

"मकरंद हा काय प्रश्न आहे का! अरे गेली तीन वर्ष प्रत्येक सणाला माझ्या घरी जे बनतं ते आई आधी तुझ्यासाठी देते."

"हो आणि म्हणून तू माझ्यावर जळतोस ते पण माहित आहे मला. चल चल आधी पुरणपोळी दे."

अशी अजय आणि मकरंद यांची घनिष्ठ मैत्री. अजय मुंबईत राहणारा आणि मकरंद एका गावातून शिक्षणासाठी मुंबईत आलेला. मुंबईत हॉस्टेल मध्ये राहणारा. कधी मकरंद अजयकडे रहायला यायचा तर कधी अजय मोठी सुट्टी असेल तेव्हा मकरंदच्या गावच्या घरी राहायला जायचा. त्याचं घर म्हणजे वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेला एक बंगला होता. मागे वाडी होती. घरापासून थोड्या अंतरावर त्यांच्या अजून दोन वाड्या होत्या. एक स्पेअर पार्ट्सचे वर्कशॉप होतं. बंगल्याच्या पुढील भागात मस्त कारंज आणि शोभेची झाडं आकर्षकरित्या लावली होती. हिरवागार परिसर असल्यामुळे हवा थंड होती. मोठ्या ओसरीवर सागवानी सुंदर झोपाळा होता. ह्या बंगल्यात मकरंदचे मोठे एकत्र कुटुंब आनंदात जीवन जगत होते. त्याचे आई बाबा, चार भावंडं, काका काकू आणि त्याची चुकत भावंडं. अजयला त्याच्या घरातील खेळीमेळीचे वातावरण खूप आवडायचे.

अजय आणि मकरंदचे कॉलेज जीवन, नोकरी इतकंच काय त्यांची लग्न झाल्यावर सुद्धा त्यांची मैत्री अभेद्य होती. कालपरत्वे त्यांची कुटुंब विस्तारत गेली आणि घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे निधन झालं. इथे अजयच्या मुंबईच्या घरी तो आणि त्याची पत्नी राहत होते. त्यांचा एकुलता एक मुलगा लग्नानंतर पत्नीसह नोकरी निमित्ताने दुसऱ्या शहरात राहत होता. तरीही त्यांच्यात खूप जिव्हाळा होता. इकडे मकरंदच्या घरी त्याची तिन्ही मुलं लग्न झाल्यानंतर सुद्धा आई बाबांबरोबर राहत होती.

आता सुद्धा अजय आणि मकरंद एकमेकांच्या घरी जात येत होते. मकरंदच्या घरी पूर्वीसारखेच खेळीमेळीचे वातावरण होते. अजय हया गोष्टीसाठी नेहमीच मकरंदला म्हणायचा,

"मकरंद काही म्हण तुझ्यावर देवाची कृपा आहे. तुझी मुलं पण तुमचाच वारसा चालवून आजतागायत एकत्र राहत आहेत."

"अरे लहानपणापासून त्यांच्यावर तसेच संस्कार झाले आहेत आणि मला वाटतं की ते एकमेकांपासून कधीच वेगळे कधीच राहू शकत नाहीत."

अजयला ह्या गोष्टीचे खूपच कौतुक वाटायचं आणि प्रत्येक वेळी त्यांच्या घरून निघताना अजय मकरंदच्या मुलांना सांगायचा की कायम असेच एकत्र रहा.

हे असं किती काळ चालणार! मुलांची लग्नं नवीन होती तोपर्यंत सारं काही आलबेल होतं. नंतर नंतर तीन मुलांमध्ये, कधी त्यांच्या बायकांमध्ये छोट्या छोट्या कारणावरून कुरबुरी होऊ लागल्या. मकरंदला ह्या गोष्टीचे खूप वाईट वाटू लागलं. मकरंदची पत्नी मंदा त्याला समजावयची,

"अहो ही जगरहाटी आहे. आपल्या पिढीतला समंजसपणा आताच्या पिढीत कसा येणार. आपण त्यांना वाटण्या करून देऊ आणि त्यांच्या मनाप्रमाणे वेगळे राहू दे."

"नाही मंदा हे कदापि शक्य नाही. माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली आहे. मी उद्याच माझा वकिल मित्र मिलिंदला बोलावून त्याची अंमलबजावणी करतो."

(मकरंदला काय कल्पना सुचली आहे ते पाहूया पुढील भागात)