Login

तुम्ही असे एकत्र राहता! _ भाग २

वडिलांच्या मृत्यूनंतर तीन भाऊ दिखाव्यासाठी कसे एकत्र राहतात
तुम्ही असे एकत्र राहता! _ भाग २

जलदलेखन स्पर्धा _नोव्हेंबर २०२५
विषय _ दुरून डोंगर साजरे

मुलांच्या आणि त्यांच्या बायकांच्या रोजच्या धुसफुसीमुळे मकरंद मनातून खचून गेला. त्याच्या मनात आलं आपली आणि आपल्या आधीच्या दोन पिढ्या ह्याच वास्तूत किती आनंदाने एकत्र नांदत होत्या. आता आपल्या मुलांना काय झालं काही कळतच नाही. मकरंदने म्हणूनच मिलिंद वकिलाला बोलावून मृत्युपत्र तयार करून घेतलं. त्यात त्याने एक महत्त्वाचे कलम घातलं. त्यात त्याने नमूद केले होते,

"माझी तिन्ही मुलं जोपर्यंत एकत्र राहतील तोपर्यंतच ते ह्या मालमत्तेचा लाभ घेऊ शकतील. जर ते वेगळे झाले तर माझ्या पत्नीच्या पश्चात सारी संपत्ती आपल्या गावातील "कैवारी" ह्या धर्मादाय संस्थेला दान करण्यात येईल त्याचप्रमाणे माझ्यानंतर त्यांनी आपल्या आईची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे."

मृत्युपत्र केल्यानंतर काहीच दिवसांत मकरंदचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं.

बाबांचं निधन झाल्यावर दिवसकार्य झाल्यावर तिन्ही मुलांना वाटत होतं की बाबांनी नकीच वाटणी करून ठेवली असणार. पण त्यांच्या मनसुब्यावर पाणी पडलं. वकिलांनी मृत्युपत्र वाचून दाखवलं. तेव्हा तिन्ही मुलांना कळलं की एकत्र राहण्याशिवाय काही गत्यंतर नाही. राहता बंगला, घरामागे असलेली मोठी वाडी, एक वर्कशॉप शिवाय घरापासून दूर असलेल्या अजून दोन आंब्याच्या वाड्या हे मकरंदने वडिलांच्या मृत्यूनंतर स्वतः अजून विकसित केलं होतं.

मकरंदच्या मृत्यूनंतर काही महिन्यात मंदाने अंथरूण धरलं. तिची जगायची उमेदच संपली. तिन्ही मुलं, सुना करायचं म्हणून आईचं करत होते. मकरंद गेल्यानंतर अजय त्याच्या घरी राहायला आला नव्हता. त्याच्या मनात आलं की आपल्या मित्राच्या पश्चात त्याच्या मुलांचे कसं चाललं आहे ते बघून यावं म्हणून त्याने फोन करून मकरंदच्या घरी तो आणि त्याची पत्नी अनघा दोघे येणार आहेत असं कळवलं. तिन्ही मुलांना आता त्यांचं तिथे येणे अनावश्यक वाटत होतं.

एका रविवारच्या सकाळी स्वतःच्या गाडीने अजय आणि अनघा मकरंदच्या घरी आले. गाडीचा हॉर्न वाजल्यावर तिन्ही मुलं, सुना, नातवंड सगळेच लगबगीने बाहेर आले. मुलांनी खाली उतरून गाडीतून अजयचे सामान काढलं. सर्वांनी दोघांचं हसतमुखाने स्वागत केलं. मोठ्या मुलाने दिनेशने विचारलं,

"काका कसा झाला प्रवास? प्रवासात काही त्रास झाला नाही ना. काकू या न. कशा आहात?"

आत येताना अजयचे डोळे मकरंदच्या आठवणीने पाणावले. दोघं अगदी जिवाला जीव देणारे मित्र होते. सर्वांनी दोघांना खाली वाकून नमस्कार केला. सर्वांना एकत्र पाहून अजयला खूप छान वाटलं. मकरंद नेहमी म्हणायचा. माझी ऐहिक संपत्ती खूप आहे पण माझी खरी संपत्ती कायम एकजुटीने राहणारी माझी मुलं. माझी इच्छा आहे की ह्या सर्वांनी कायम एकत्र रहावे. मी असेन नसेन, पण तू अधूनमधून येऊन माझ्या मुलांवर लक्ष ठेव. खरं तर म्हणूनच मकरंदचे दिवसकार्य झाल्यानंतर अजय आज आला होता.

"काका बाबा गेल्यानंतर पहिल्यांदाच आलात. तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. आता आम्हाला बाबांच्या जागी तुम्हीच आहात."

"बरं मंदा वाहिनींची तब्ब्येत कशी आहे. आम्ही आधी त्यांना भेटतो."

"हो काका तुम्ही हातपाय धुवून घ्या आणि आईला भेटा. तोपर्यंत वसुधा तू आलं घातलेला वाफाळता चहा आणि पोहे घेऊन ये." दिनेशने त्याच्या पत्नीला सांगितलं.

हातपाय धुऊन अजय मकरंदच्या खोलीकडे जाऊ लागला. इतक्यात मकरंदचा मधला मुलगा रमेश म्हणाला,

"काका आई त्या खोलीत नाही. इथे गेस्टरूम मध्ये आहे."

"अरे आई बाबांची ती आवडती खोली होती. आईला दुसऱ्या खोलीत का नेलं?"

"आईच म्हणाली आता बाबा नसताना मला त्या खोलीत झोप लागणार नाही."

अजयला वाटलं मंदा वहिनी हळव्या आहेत त्यांना तिथे झोप येत नसेल.

(मंदा वहिनींना भेटल्यावर अजयला काय वाटले पाहूया पुढील भागात)