तुम्ही असे एकत्र राहता! _ भाग ३
जलदलेखन स्पर्धा _ नोव्हेंबर २०२५
विषय _ दुरून डोंगर साजरे
अजय आणि अनघा गेस्टरूम मध्ये आले. त्यांनी पाहिलं मंदा वहिनी खूप खंगलेल्या दिसत होत्या. त्यांच्या बेडवरची चादर बरेच दिवसात बदललेली दिसत नव्हती. खोलीमध्ये साफसफाई पण दिसत नव्हती. त्यांना रात्री जे काही दिलं गेलं होतं ती भांडी तशीच बाजूच्या टेबलावर पडली होती. मकरंद गेल्यावर वहिनींनी अंथरूण धरलं होतं. ज्या वहिनींना अजय ओळखत होता त्या खूपच नीटनेटक्या आणि घर टापटीप ठेवणाऱ्या होत्या. अजयने विचारले,
"वहिनी कशा आहात?" क्षीण आवाजात खोटं हसू चेहऱ्यावर आणत मंदा म्हणाली,
"मजेत. खूप दिवसांनी आलात."
अजयला असं वाटलं की वहिनींना काहीतरी सांगायचं आहे. धाकट्या सुरेशच्या लक्षात आलं की काकांची नजर सर्वत्र फिरते आहे लगेच तो म्हणाला,
"काका चला ना दिवाणखान्यात बसूया. वहिनीने चहा पोहे आणलेच असतील."
सगळे बाहेर आले. अजयने बघितलं पोह्याच्या फक्त दोन डिश आणि दोन कप चहा टीपॉयवर ठेवले होते.
"हे काय फक्त दोनच डिश. तुम्ही सर्व पण घ्या ना आमच्या बरोबर."
"नाही काका मी मगाशीच उपमा खाल्ला रागिणीने केलेला."
"हो मी पण सरिताने केलेलं थालीपीठ खाल्लं."
"एकाच घरात असे तीन वेगवेगळे नाश्ते. कमाल आहे. मकरंद असताना सगळ्यांसाठी एकच नाश्ता असायचा ना."
"आज रविवार आहे ना म्हणून" दिनेशने लगेच सावरून घेतलं.
अनघाने सर्वांसाठी आणलेल्या भेटी प्रत्येकाच्या हातात दिल्या. लहान मुलांसाठी आणलेला खाऊ टीपॉयवर ठेवला. मंदा वहिनींसाठी आणलेली साडी घेऊन ती त्यांच्या गेस्टरूमकडे जाऊ लागली इतक्यात वसुधा अनघासमोर येऊन म्हणाली,
"काकू आईंची साडी माझ्याजवळ द्या मी नंतर देईन त्यांना."
अनघाने नाईलाजाने ती साडी तिच्या हातात दिली. त्यानंतर अजय आणि अनघा त्यांना दिलेल्या दुसऱ्या गेस्टरूम मध्ये थोडा वेळ आराम करायला गेले. ते येणार म्हणून बहुदा ती रूम नीट ठेवली होती. ते आत गेल्यावर अजयला जाणवत होतं की काहीतरी चुकतंय. अनघाला पण सर्वजण ओढूनताणून वागल्यासारखे जाणवत होतं. अजय थोडा वेळ तिथल्या आरामखुर्चीत बसला. अनघा बाहेरचा कानोसा घेत होती. तिला कुजबुजत्या आवाजात दोघी बोलताना ऐकू आलं,
"वसू वहिनी आईंची साडी तू तुझ्याजवळ का घेतलीस. आधीच आईंच्या चांगल्या महागातल्या साड्या तू ढापल्या आहेस. आता ही साडी तरी मला दे कळलं ना. नाहीतर मी सर्व काका काकूंना सांगेन."
"वसू वहिनी सर्व खाऊ पण तुम्ही तुमच्या खोलीत नेऊन ठेवला. सर्व मुलांसाठी खाऊ आणला आहे. ती नाइसची बिस्किटे माझ्या रोहनला खूप आवडतात. ती त्यालाच द्या." सुरेशची सरिता बोलत होती.
अनघाला हे काय चाललं आहे असे वाटत होते. तिने जाण्यापूर्वी सर्व अजयच्या कानावर घालायचं ठरवलं. थोड्या वेळाने दिनेश दोघांना जेवायला बोलवायला आला. फार पूर्वीपासून मधल्या मोठ्या खोलीत एक लांबलचक डायनिंग टेबल होतं. मकरंदच्या घरची शिस्त होती सर्वांनी एकत्र नाश्ता, जेवण इथेच बसून करायचं. आता दोघे जेवायला गेले तर दोघांच्याही लक्षात आलं की आतापुरती वापरण्यासाठी डायनिंग टेबलचा आवश्यक भाग स्वच्छ केला होता. बाकीच्या डायनिंग टेबलवर धूळ दिसत होती.
सर्वजण एकत्र जेवायला बसले होते पण पूर्वीसारखं हसतंखेळतं वातावरण नव्हतं. एक प्रकारचा ताण जाणवत होता. जेवण नेहमीसारखेच साग्रसंगीत होतं. जेवण झाल्यावर हात धुवायला गेल्यावर अनघाने पाहिले की ओळीने तीन स्वयंपाकघरं आहेत. तिला कळेना पूर्वी तिथे एकच मोठे स्वयंपाकघर होतं. जेवण एकत्र करतात मग तीन स्वयंपाकघरं का ? त्या एका मोठ्या स्वयंपाकघराचे तीन भाग केले होते. काहीतरी गडबड नक्कीच आहे. अनघाने इथून जाण्याआधी निर्णायक छडा लावण्याचं ठरवलं.
(हा सगळा प्रकार नक्की काय होता ते अनघाला कळू शकेल का?)
क्रमशः
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा