तुम्ही असे एकत्र राहता! _ भाग ४
जलदलेखन स्पर्धा _नोव्हेंबर २०२५
विषय _ दुरून डोंगर साजरे
विषय _ दुरून डोंगर साजरे
अजय आणि अनघा आले त्या दिवशी सगळे जेवायला, चहाला आणि रात्रीच्या जेवणाला एकत्र होते. दुसऱ्या दिवशी अजय आणि अनघावर चकित होण्याची पाळी आली. सकाळचे स्नानादी विधी आटोपल्यावर रमेशची रागिणी ह्या दोघांना नाश्त्यासाठी बोलवायला आली. दोघे आले तेव्हा तिथे रमेश, रागिणीची मुलं आणि हे दोघेच होते.
"अरे काय रे बाकीचे कुठे आहेत?"
"काका त्यांना बाहेर जायचं होतं ते नाश्ता करून गेले."
नंतर थोड्या वेळाने अनघाने पाहिले आणि अजयला पण दाखवले वसुधा एक मोठा बाउल आणि काही प्लेट्स घेऊन तिच्या रूममध्ये गेली आणि सरिता तिच्या. ह्याच प्रकाराची पुनरावृत्ती दोन्ही जेवणाच्या वेळेस झाली. ह्या दोघांनी ठरवलं आता जे काही घडतंय ते सारं फक्त बघायचं. त्या नंतरच्या दिवशी या दोघांना नाश्त्याच्या वेळी सरिता बोलवायला आली. टेबलवर फक्त अजय, अनघा आणि सुरेशचे कुटुंब. बाकीच्या दोघी आपापल्या खोल्यांमध्ये कालच्याप्रमाणे गेल्या. अनघा आणि अजयच्या लक्षात आलं की आपला पाहुणचार करण्याची जबाबदारी तिघांनी अशा प्रकारे वाटून घेतली आहे. दोघांनाही खूप वाईट वाटले.
रोज ते दोघं दुपारचा चहा झाल्यावर मंदा वहिनीची विचारपूस करायला जात होते.
"काय वहिनी कशा आहात?" त्या जास्त काही बोलायच्या नाहीत. फक्त बरी आहे असं अगदी क्षीण आवाजात बोलायच्या. आज ते दोघं त्यांच्या खोलीत आल्यावर अजयला जाणवलं की त्या नजरेने काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे डोळे पाणावले होते. अजयच्या मनात आलं कधी काळी इतक्या हौशी उत्साही बाईवर ही काय वेळ आली आहे.
दुसऱ्या दिवशी दोघं पुन्हा मुंबईला जाणार होते त्याआधी इथली घडी ठीक करायची होती. दोघं ओसरीवर आले पाहतात तर काय रमेश आणि सुरेशच्या मुलांमध्ये खाऊवरून भांडण चालू होतं.
"त्या आजींनी सगळ्यांसाठी खाऊ आणला आणि तुझ्या आईने सगळा खाऊ तुम्हा दोघांना देऊन टाकला. मला पण खाऊ पाहिजे." ते पाहून अनघाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने वसुधाला हाक मारली.
"अगं वसुधा मी आणलेला खाऊ तू सगळ्या लहान मूलांना दिला नाही का."
"मी आज संध्याकाळी सगळ्यांना देणारच होते खाऊ."
"इतका भरपूर खाऊ आणून ही दोन लहान मुलं खाऊवरुन भांडत आहेत. ह्या भरलेल्या घरात हे बरं दिसतं का. तू आताच सर्व मुलांना खाऊ वाटून टाक."
"हो लगेच वाटते."
"बरं ऐक आम्ही दोघं उद्या नाश्ता करून मुंबईला जाणार आहोत. आज जरा गावात फेरफटका मारून येतो. जेवायच्या आधी घरी येऊ."
अजय आणि अनघा रमतगमत मावळत्या दिनकराच्या साक्षीने फिरायला निघाले. ह्या गावात ते दोघं आणि मकरंद, मंदा अनेक वेळा असे फिरले होते. अजय अनघाला म्हणाला,
"मला एक शंका येते आहे ही मुलं तिथेच राहून एका अर्थी वेगळे राहत आहेत त्यात काहीतरी गूढ असावं. मला वाटतं मिलिंदला नक्कीच माहीत असेल. चल आपण त्याला भेटून येऊ."
"तुम्हाला असं वाटतंय तर चला जाऊन येऊ."
थोडं चालून आल्यावर दोघं त्या मिलिंद वकील मित्राच्या घरी गेले. मकरंद मुळेच तो अजयचा पण मित्र झाला होता. त्यांनी त्याला स्पष्ट विचारले,
"मला एक सांग ही मकरंदची तिन्ही मुलं एकत्र राहून वेगळे राहत आहेत ह्यात काहीतरी नक्कीच गोम असणार. मकरंदने मृत्युपत्रात काही लिहिलं आहे का?"
"अजय बरोबर ओळखले. मकरंदने मृत्युपत्रात लिहिले आहे की तुम्ही एकत्र असाल तरच ह्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकाल नाहीतर ती दान केली जाईल."
"अच्छा! आम्ही गेले तीन दिवस सगळं बघतोय. आता सगळ्याचा उलगडा झाला. आता आम्ही मकरंदच्या घरची सर्व घडी नीट बसवूनच मुंबईला जाऊ."
"अजय तू हे पुण्यकर्म केलं तर मकरंदच्या आत्म्याला शांती लाभेल."
"रात्री नऊ वाजता तू पण ये मग बोलू आपण."
(अजय मकरंदच्या घरची घडी व्यवस्थित बसवू शकेल का पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा