Login

तुम्ही असे एकत्र राहता! _ भाग ५(अंतिम)

वडिलांच्या मृत्यूनंतर तीन भाऊ दिखाव्यासाठी कसे एकत्र राहतात
तुम्ही असे एकत्र राहता! _ भाग ५ (अंतिम)

जलदलेखन स्पर्धा _ नोव्हेंबर २०२५
विषय _ दुरून डोंगर साजरे

रात्री सर्वांची जेवणं झाल्यावर अनघाने वसुधाला सर्वांना दिवाणखान्यात बोलवायला सांगितलं. सगळे जमल्यावर अजय सर्वांना उद्देशून म्हणाला,

"उद्या सकाळी आम्ही निघणार म्हणून तुम्हाला सर्वांना गप्पा मारण्यासाठी इथे बोलावलं. मकरंद गेल्यावर खूप दिवसांनी आम्ही इथे आलो. तुमच्याबद्दल आमच्या मनात खूप कौतुक होतं. मी माझ्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये तुमच्या आदर्श कुटुंबाचे उदाहरण नेहमी द्यायचो. वडील गेल्यानंतर पण तीन भाऊ आपल्या बायको मुलांसह किती आनंदाने एकत्र कुटुंबात नांदत आहेत. पण इथे आल्यावर आमचा भ्रमनिरास झाला. "दुरून डोंगर साजरे" म्हणतात ना ते हेच. बाहेरून बघणाऱ्याला हेच वाटतं की हे तिन्ही भाऊ किती आनंदाने एकत्र राहत आहेत. सर्वप्रथम तुम्ही आईची रवानगी गेस्टरूम मध्ये केली याचा मला खूप जास्त खेद होतो. आई-बाबांच्या खिडकीसमोर एक प्राजक्ताचे झाड आहे. तो बहरलेला प्राजक्त पाहणे आणि नंतर त्या प्राजक्ताचा जमिनीवर पांघरलेला शुभ्रधवल सडा पाहणे हा दोघांचाही निखळ आनंद होता. बाबा गेल्यानंतर तुम्ही सर्वांनी आईला जपायला पाहिजे होतं. आज तुम्ही केवळ आई आणि बाबांमुळे या पृथ्वीतलावर आहात याचा तुम्हाला विसर पडला. तुम्ही आईची ज्या प्रकारे काळजी घेत आहात ती पाहता एखाद्या वृद्धाश्रमात आईची चांगली काळजी घेतली गेली असती. वसुधा, रागिणी आणि सरिता तुम्ही मला एक सांगा तुमचा भाऊ आणि भावजय जर तुमच्या आईशी असे वागले तर तुम्हाला कसं वाटेल. नक्कीच वाईट वाटेल ना. मंदा वहिनी इतक्या प्रेमळ आहेत त्या नक्कीच तुम्हाला आईची माया देत असतील." अजय बोलत असतानाच वकील मित्र मिलिंद तिथे आला.

"ये मिलिंद. काल आम्ही बाहेर पडलो तेव्हा मिलिंद आम्हाला भेटला त्यामुळेच आम्हाला मकरंदने मृत्युपत्रात काय लिहिलं ते कळलं आणि तुम्ही का आणि कसे एकत्र राहता त्याचं कारणही कळलं." अजयला मध्येच थांबवत मोठा दिनेश म्हणाला,

"काका आम्हाला पण हे असे एकत्र राहायचं नव्हतं म्हणून आम्ही बाबांना तिघांमध्ये समान वाटणी करण्याची विनंती केली. आता मला सांगा हल्ली कोण एकत्र राहतं. पण बाबांना आम्ही एकत्र राहावं असंच वाटत होतं. घरात माणसं असली की भांड्याला भांडं लागतंच. रोज कशावरून ना कशावरून कुरबुरी होतच होत्या. कधी घरातील सामान आणण्यावरून तर कधी मुलांवरून. हे सगळं टाळण्यासाठी आम्ही आपापला स्वयंपाक स्वतंत्र करू लागलो. आपल्या गरजा स्वतंत्रपणे भागवू लागलो. आमच्या बायकांचं पण एकमेकींमध्ये अजिबात पटत नव्हतं. मग आम्ही दुसरं काय करणार?"

"अरे पण त्यावर हा इलाज नाही ना. आता तुम्ही सर्व आपापल्या परीने काही ना काही काम करतच आहात. तुमची एवढी प्रॉपर्टी आहे की नुसतं बसून खाल्लं तरी काही कमी पडणार नाही. कुटुंबात एखादी व्यक्ती आपल्या पदरचा जास्त पैसा खर्च करते कधी एखाद्या व्यक्तीला जास्त काम पडतं. त्याचा एवढा बाऊ कशाला करावा. तुम्ही कोणी परक्यासाठी तर करत नाही ना. सगळी आपलीच माणस आहेत ना. हा विचार तुम्ही करायला हवा. आज तुम्हीच असे वागलात तर तुमच्या मुलांवर तेच संस्कार होणार. परमेश्वर कृपेने तुम्हाला एकत्र राहण्याचा पिढीजात वारसा लाभला आहे. गावात आजही तुमचं सर्वत्र कौतुक होत आहे कारण अजून कोणाला तुम्ही एकत्र राहण्याचं कारण माहित नाही. जेव्हा सगळ्यांना कळेल तेव्हा सर्वजण तुमची छी थू करतील."

"आपल्या मुलांनी स्वेच्छेने एकत्र राहावं हीच मकरंदची ईच्छा होती. त्याला सुद्धा असं मृत्युपत्र करताना खूप यातना झाल्या." मिलिंदने मकरंदची व्यथा सांगितली.

"दिनेश हे बघ तू मोठा आहेस. मोठा भाऊ वडिलांच्या जागी असतो. तू आणि वसुधाने वडिलकीच्या नात्याने लहान भावांचे काही चुकलं तर सांभाळून घ्यायला हवं. तुम्ही असं आपुलकीने, निःस्वार्थीपणे वागलात की त्यांनाही तुमच्याशी प्रेमाने वागावे लागेल. ते दोघं तुम्हाला योग्य तो आदर आणि प्रेम देतील. अरे ही ऐहिक संपत्ती प्रत्येकाला ह्या जगाचा निरोप घेताना इथेच सोडून जावी लागते. खरी संपत्ती म्हणजे आपापसातील प्रेम, माया असते." अजय खूप कळकळीने बोलत होता.

दिनेश, रमेश, सुरेश आणि त्यांच्या पत्नी अजयचे बोलणं ऐकून विचारमग्न झाले. आपण एकमेकांशी कसे वागत होतो ते आठवून सगळेच खजिल झाले. दिनेश मोठ्या भावाच्या नात्याने बोलला,

"काका आज तुम्ही आमचे डोळे उघडलेत. मी तुम्हाला आम्हा सर्वांच्या वतीने हमी देतो यापुढे आम्ही सर्व तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वागू. आईवर नामांकित डॉक्टरकडून उपचार करवून घेऊ आणि तिला आम्ही तिची मुलं असल्याची खंत कधीच वाटणार नाही ह्याची काळजी घेऊ. काका तुम्ही पुढल्या वेळी याल तेव्हा आम्ही सर्व खऱ्या अर्थाने गुण्यागोविंदाने नांदत आहोत असेच तुम्हाला दिसेल."

"बाळांनो आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे. तुम्हाला आमचे म्हणणं पटलं हे पाहून खूप आनंद झाला. आता आम्ही आनंदाने मुंबईला जाऊ."