टर्निंग पॉइंट भाग १

अनपेक्षित वळणावर गोष्ट तिची....
टर्निंग पॉइंट.. भाग १


"मला नाही भेटायचं कुणाला? कुणाला म्हणजे कुणाला च नाही? कळलं का?" स्निग्धाने धाडकन सीमाताईंच्या तोंडावर दरवाजा बंद केला? 


"अगं.. अगं.. ऐक ना बाळा माझं, एकदा ऐकून तर घे?"


"एवढ्या आपुलकीने आलाय भेटायला?" सीमाताई, दरवाजाला बाहेरून ठोकत बोलत होत्या. 


"सांगितलं ना एकदा. नाही म्हणजे नाही. 

मला कुणालाच भेटायचं नाही."


"जेव्हा मला गरज होती तेव्हा कोणीच मला साथ दिली नाही आता मला ही फुकटची सहानुभूती नकोय... कुणाची? कुणाचीच नको." तिने आतून जोरात दरवाजाला हाताने मारलं होतं.. 


"का करतेस ग अशी?" का ऐकत नाहीस तू?


"बाळा, माफ करू शकत नाही का तू आम्हाला, फक्त एकदा?" सीमाताईंच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा लागल्या होत्या...


"मला माझ्या भरवशावर, एकटं सोडा? कुणाचा आधार नकोय मला?" स्निग्धाचा जोरजोरात रडण्याचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत होता. 


राजनच्या कानावर स्निग्धाचे शब्द पडले तसा तो कासावीस झाला. त्याच्या अंगावर अक्षरशः शहारा आला होता. 


"काय होऊन बसलं हे!"


"किती छान होती स्निग्धा.... निरागस, अल्लड, स्निग्ध हसू सतत तिच्या चेहऱ्यावर असायचं." काय झालं हे."


"तिच्या आजच्या या सगळ्या परिस्थितीला, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मीच जबाबदार आहे. हो सर्वस्वी मीच जबाबदार आहे." माझ्यामुळे तिला बोचऱ्या काटेरी वळणावर प्रवास करणं भाग पडलं." त्याला स्वतःचाच राग आला होता. हाताची मूठ त्याने दणकन सोफ्याच्या दंडावर आपटली. डोळ्यात आपसूकच आसवांनी गर्दी केली. गालावर ओघळलेला एक टिपूस त्याने हळूच शर्टच्या बाहिने पुसून घेतला. 


सीमाताई बाहेर आल्या. राजन सोफ्यात मान खाली घालून बसला होता. त्याने वर सीमाताईंकडे बघितलं. 


डबडबलेल्या डोळ्यातील आसवांना, वाट मोकळी करून देत त्यांनी हलकेच नकारार्थी मान हलवली. 


राजनच्या डोळ्यात ही आसवांनी गर्दी केली होती. तो लगेच उठला आणि जायला निघाला... 


"पाणी तरी घे."


"नको... पाणी नको!" बाहेर जावून तो कसाबसा घाईगडबडीत बूट पायात सरकवायला लागला.


"अरे अपूर्वा आहे घरात. भेटून जा तिला."


अपूर्वा ये अपूर्वा!! सीमाताईने अपूर्वा ला जोरात हाक दिली.


"नको... येतो मी!" आल्या पावली तो निघून गेला होता. 

---


सीमाताई आणि अशोकराव.... सीमाताई गृहिणी तर अशोकराव एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला होते.  घरची परिस्थिती तशी खावून पिऊन सुखी होती.  समीर, स्निग्धा त्यांची मुलं दोघेही हुशार.  समीर बारावीत चांगल्या मार्कानी पास झाला आणि सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याची ऍडमिशन ही झाली. चार वर्ष कसे गेले कळले च नाही. त्यांनंतर त्याने सरकारी नोकरी मिळावे म्हणून प्रयत्न सुरू केले. सरकारी नोकरीसाठी, परीक्षा देत होता. रात्रंदिवस एक करून, खूप मेहनत करत होता. अखेर प्रयत्नांना यश आलं आणि तो आता तो इंजिनीयर म्हणून सरकारी डिपार्टमेंट मध्ये रुजू झाला होता. स्निग्धाने दहावीनंतर डिप्लोमा साठी ऍडमिशन घेतली होती. 


एक दिवस अचानक अशोकरावांच्या छातीत दुखायला लागलं. लगेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्या गेलं. डॉक्टरांनी हार्ट अटॅक आल्याचं निदान केलं. त्याच्यावर महागडी ट्रीटमेंट सुरू होती. ओपन हार्ट सर्जरी करावी लागली पण गुण येत नव्हता. त्यांची तब्बेत हळुहळू ढासळतच चालली होती आणि एक दिवस अशोकराव अचानक निघून गेले.


अशोकरावांच्या ट्रीटमेंट वर बराच खर्च झाला होता. होता नव्हता जमवलेला पैसा खर्च झाला होता. घराचा सगळा भार आता समीरवर पडला. 


नोकरी लागून चार वर्ष झाली होती. समीर अठ्ठावीशीत आला होता. इकडून तिकडून त्याच्या लग्नासाठी, मुलींचे निरोप यायला लागले होते. अशातच अपूर्वाच स्थळ सांगून आलं. 


मोठा बंगला, पार्किंगमध्ये महागड्या दोन मोठमोठ्या कार. नाकी डोळी रेखीव असलेली अपूर्वा. पदवीधर होती. समीरला अपूर्वा बघता क्षणी पसंत पडली. समीर ही देखणा होताच, चांगली सरकारी खात्यात इंजिनिअर म्हणून नोकरी होती.


समीर,आपण खावून पिवून सुखी असलेली माणसं. त्यांच्याकडे बघितलं का? साक्षात लक्ष्मी पाणी भरते एवढी श्रीमंती. आपल्या घरात होईल का रे ती ऍडजस्ट. सीमाताईंनी मनातली शंका बोलून दाखवली. 


"एवढं विचार नको ग करू तू. सगळं बघूनच त्यांनी पसंतीचा होकार पाठवला असेल नाही का?" 


"मला पसंत आहे अपूर्वा..!" समीरने शिक्कामोर्तब केलं आणि दोन्ही घराच्या संमतीने समीर आणि अपूर्वाच लग्न ठरलं. 


एकुलत्या एका, दादाचं लग्न.. स्निग्धाच्या आनंदाला उधाण आलं होतं. साखरपुड्याच्या दिवशी मैत्रिणीसोबत ईकडून तिकडे मिरवण्यात, समीरला काय हवं नको ते बघण्यात ती व्यस्त होती. 


उंच पुरा दिसायला राजबिंडा, टपोऱ्या मोठ्या डोळ्यांचा, कुरळ्या केसांचा राजन त्याच्यावर स्निग्धाची नजर पडली.


"अरे हा इथे कसा? ह्याला कोणी  बोलावलं इथे? कॉलेजमध्ये किती भाव खातो हा. किती गुर्मीत राहतो. टपोरी मुलांच्या घोळक्यात सदा टवाळपणा बसलेला असतो. कॉलेजमधल्या सगळ्या मुली या हँडसम हंकच्या मागे मागे असतात चिकटलेल्या. जणू काही गुळावर माशा च"


"पण हा इथे कसा?" स्निग्धाला पुन्हा प्रश्न पडला. 


तिच्या मैत्रिणींची ही कुजबुज सुरू झाली. "असू दे, आपल्याला काय करायचयं, कॅटरिंग सर्व्हिस किंवा डेकोरेशन करणाऱ्यां मधला का असेना?" हसतहसत खिल्ली उडवत,  त्यांनी एकमेकींना टाळी दिली.


 "हॅलो..!" राजनने, शेक हैंड करायला हात पुढे केला.


"हॅलो !!" आपण ओळखतो, एकमेकांना?" तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत विचारलं.


"नो नो..!"  म्हणजे तशी ओळख नाहीये आपली. पण अगदीच एकमेकांना कधी बघितलं नाही, असं ही नाहीये, नाही का? 


"माझ्या जिजाजींची बहीण म्हटल्यावर, तुझ्याशी ओळख तर वाढवावी लागणारच! मुलाकडले ना तुम्ही. तुमची खातिरदारी करावी लागणारच, नाही का? नाहीतर उद्या म्हणाल, मुलींकडे मान पान कमी पडला म्हणून.".... राजनने तिरकस डोळा मारला.


"म्हणजे... तु वहिनीचा भाऊ!"  तिने ही तिरकस कटाक्ष टाकला. 


"हो... अपूर्वा... तुझी होणारी वहिनी.. माझी लाडकी एकुलती एक अपूताई आणि मी तिचा एकुलता एक लाडका भाऊ." राजनने ओळख करून दिली.


"मी राजन!" त्याने हात समोर केला. 


'तुला कोण नाही ओळखत, अख्ख कॉलेज तूझ्या मागे फिरतं.' मैत्रिणीकडे नजर फिरवत, स्निग्धा मनातल्या मनात पुटपुटली..  


"काय झालं? कुठे आहात मॅडम" त्याने दोन बोटांची चुटकी तिच्या डोळ्यासमोर वाजवली.


"छे छे काहीच नाही.... काहीच नाही!" भानावर येत, स्निग्धाने स्वतःची बाजू सावरली. 


"मी, स्निग्धा...  समीर दादाची लाडकी एकुलती एक बहीण आणि तो ही माझा एकुलता एक भाऊ!" 


"आणि आता तुमच्या बहिणीची एकुलती एक नणंद, बर का!" तिने ही त्याच लयीत स्वतःची ओळख करून दिली.


साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता. समीर अपूर्वा दोघे ही एका सुंदर नात्यात बांधले गेले होते. दुसरीकडे जेवण सुरू होती. नातेवाईक, मिञ मैत्रिणींसोबत फोटो काढण्यात सगळे व्यस्त होते. 


"छान छान फोटो काढून घे.. छान दिसतेय आज, रोजपेक्षा वेगळी!" इतर वेळी, मोठ्या भावाचा तोरा मिरवणारा, शिस्तीत वागणारा, या त्या कारणावरून ओरडणारा दादा, स्निग्धाच कौतुक करत होता. 


आदरयुक्त  धाकात असलेल्या, स्निग्धाला दादाच्या तोंडून स्वतःच कौतुक! ऐकून, तिला छान वाटलं. तीने ही अटकुन मटकुन मस्त मस्त पोज देत भरमसाठ फोटो काढून घेतले.. 


फोटोग्राफरला छान छान पोज देताना, राजन कोपऱ्यातून स्निग्धाला चोरून न्याहाळत होता.


 'किती सुंदर दिसतेय. सात्विक सौदर्यात न्हालेली अप्सरा च जणू. गोरी तेजस कांती, पाणीदार टपोरे डोळे, नाजूक जीवनी आणि हसल्यावर खुलणारी तिच्या गालावरची खळी. अहाहा!'


'फिक्का बदामी रंग आणि तो घेरदार लेहेंगा नेट च्या ओढणीतून डोकावणारी तिची नाजुक कंबर... लाजवाब!' राजन एकटक तिला न्याहाळत होता. 


'कॉलेजमध्ये तर अशीच येते केसांना तेल चोपून... आज लांब सडक केस छान मोकळे सोडलेत. त्यावर नाजूक फुलांचा तो झुबका.' डोळ्यांच्या तिरकस कडांमधून चोरून चोरून तो तिच्याकडेच बघत होता. 


"गेली लेका तुझी विकेट...... गेली." मित्र आता सोडणार थोडीच होते. स्निग्धावरून ते हि आता, राजनला चिडवायला लागले.


पुढचे  दोन महिने, लग्नाच्या तयारीत लवकर सरकले. समीर आणि अपूर्वाच लग्न थाटामाटात पार पडलं होतं. समीरची सहचरणी बनून अपूर्वा उंबरठा ओलांडून सासरी आली होती. 


चार पाच वर्ष मोठा असलेल्या आणि भावाच्या आदरयुक्त धाकात असलेल्या स्निग्धाला वहिनीच्या रुपात, चांगली मैत्रीण मिळाली होती.


स्निग्धाच्या दादाचं लग्न झालं होतं....  मिळेल का स्निग्धा ला वहिनीच्या रुपात मैत्रीण.....
क्रमशः


🎭 Series Post

View all