टर्निंग पॉइंट भाग २

अनपेक्षित वळणावर कहाणी तिची
भाग २


स्निग्धा च्या दादाचं लग्न झालं होतं. 


नवीन लग्न झालेल्या वहिनीला, आपल्या घरात एकटं वाटू नये. तिला या घरात काही कमी पडू नये ही जबाबदारी फक्त एकट्या दादाची नाही तर आपली हि आहेच, असच स्निग्धाला वाटत होतं. 


वहिनीच्या नवीन नवीन वस्तू बघायला त्या रूममध्ये व्यवस्थित अरेंज करायला तिला मनापासून आवडतं होतं.  दादा ऑफिसला गेल्यानंतर वहिनीला काहीच कमी पडणार नाही ह्याची खबरदारी ती घेत होती. 


एकुलती एक असलेली अपूर्वा लाडाकोडात वाढलेली. एकुलत्या एका मुलाची बायको आपली एकुलती एक सून म्हणून घरी सीमाताईं पण अपूर्वाच कौतुक करण्यात मशगुल होत्या. 


स्निग्धाच्या बाबतीत, सकाळी उठण्यावरून आग्रही असलेल्या सीमाताई, अपूर्वा कितीच उशिरा उठली तरी तिला त्यावरून काहीच बोलत नसतं. 


उगाच कशाला "लेकी बोले सुने लागे"... म्हणून आजकाल त्या स्निग्धाला पण समजून घेवू लागल्या होत्या. 


स्निग्धाच कॉलेज सुरू झाल होतं. डिप्लोमा नंतर इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षात डायरेक्ट ऍडमिशन मिळाल्याने ती ह्या कॉलेज मध्ये उशिराच आलेली होती. राजन ही त्याच कॉलेजमध्ये लास्ट इयर ला होता. आणि स्निग्धा इंजिनिअरिंग च्या तिसऱ्या वर्षाला. आता दोघांची कॉलेज मध्ये वारंवार भेट होत होती. 


हाय हॅलो पासून बोलायला सुरुवात झाली आणि आता दररोजच्या भेटण्या बोलण्याने त्यांच्या नात्यातले अवघडलेपण हळुहळू  नाहीस होतं चाललं होतं. एकमेकांच्या मित्र मंडळींत सुद्धा चांगली गट्टी जमली होती. 


तडफदार, रुबाबदार त्या बरोबरच घमेंडी, आगावू, टपोरी... मुलींशी फ्लर्ट करणारी राजनची प्रतिमा आता सगळ्यांच्या नजरेत बदलायला लागली होती. 


टपोरी मित्रांच्या गराड्यात वावरणारा. कॉलेजचे लेक्चर मिस करून कट्ट्यावर तासनतास बसणारा,  मुलींची फ्लरटिंग हक्क समजणारा राजन आता अभ्यासाला महत्व द्यायला लागला होता. 


स्निग्धाच्या मैत्रिणी, राजनच्या नावाशी तिचं नाव जोडून तिला चिडवायला लागल्या होत्या. 


तसं काही नाहीचये म्हणून, मैत्रिणींवर चिडणारी स्निग्धा, आता तिला त्यांनी चिडवलेलं छान वाटू लागलं होतं. 


राजन दिसला की आतल्या आत तिला काही तरी व्हायचं.. मन त्याच्या दिशेने झोके घेत होतं. तिची नजर आता सतत राजन चा शोध घेत राहत होती. त्याच्या आठवणीने तिला गुदगुल्या होत होत्या. 


दिसल्या बरोबर भेटस्वरुप दिलेला हातात हात आणि निरोप घेताना, घेतलेली हळूवार मिठी.... त्याचा किंचित स्पर्श ही तिला पाकळीतून फुलाच्या उमलतानाचा आनंद देऊन जातं होता.


कधीकाळी, राजन दिसला नाही तर तिला कॉलेजमध्ये नकोस वाटायच. नकळत ती त्याच्याकडे ओढली जात होती. 


एका नाजूक नात्याने दोघे जोडले गेले असले तरी आता दोघांत छान मैत्री आणि मैत्रीच्या पलीकडे जावून सुंदर नातं उभारी घेऊ लागलं होतं.. 


"क्या यही प्यार हैI" ही ओढ म्हणजेच प्रेम... आता दोघे ही अनभिज्ञ राहिले नव्हते. 


अपूर्वा माहेरी गेली की, राजन या ना त्या कारणावरून स्निग्धाचा विषय काढत होता. तिच्याविषयी जाणून घ्यायला त्याला, तिच्या विषयी बोलायला त्याला मनापासून आवडत होतं. 


"तुला मोठी रे तिची काळजी." अपूर्वाच्या लक्षात यायला वेळ लागला नव्हता.


"स्निग्धाचा विषय निघाला की अपूर्वा ही चिडत होती." मग उगाच मुद्दाम ताईला चिडवण्यासाठी तो मुद्दाम स्निग्धा चा विषय छेडत होता.


"राजन तू दूर राहा बरं का त्या बये पासून" अपूर्वा चिडायची. 


"मैत्रिण आहे ग ती माझी... मला किती मैत्रिणी आहेत, माहिती आहे ना तुला.. त्यातलीच ही एक!" त्यात काय एवढं, राजन बाजू सावरत बोलला.


"मैत्रिण करायला,  तुला आमच्या घरातलं पात्र मिळालं का?" दूर राहायचं बरं तिच्यापासून." अपूर्वा ने निक्षून सांगितलं होतं.


"राजन आणि तू, एकाच कॉलेजमध्ये आहात. 

तुमची भेट होतच असेल"... एक दिवस अपूर्वाने स्निग्धाला विचारलं. 


राजनच नावं ऐकताच, तिच्या गालावर खळी खुलली होती. डोळ्यात प्रेम आणि गालावर लाजेची लाली पसरली होती. अपुर्वाच्या चाणाक्ष नजरेने हे हेरल होतं.


"ओढली चूनरिया, तेरे नाम की"... गुणगुणत आरश्यासमोर उभी राहून स्निग्धा स्वतःला बारकाईने न्याहाळत होती...  केसांच्या बटांना पिळ देत, लटकणाऱ्या बटांशी जणू ती काहीतरी बोलत होती.. 


अपूर्वा मागे येऊन उभी, तिला जरा ही कल्पना नव्हती.... 


"काय ग? एवढी कशात गुंतलीस?" 


"कोण ग?"


" कोण हैं वो सपनोका सौदागर".. अपूर्वा ने मस्करी केली.


"वहिनी तू, तू कधी आलीस." आणि असं काही नाहीये, मी गाणं म्हणतेय फक्त" म्हणतच नकारार्थी मान हलवत स्निग्धा घाईत बाहेर निघून गेली होती.


"अगं, ही संत्रा बर्फी घेऊन जा कॉलेजमध्ये जाताना. राजन भेटेल तर दे त्याला. अपूर्वाने स्निग्धाच्या हाती बर्फीचा एक डबा दिला.


कुठले ही आढेवेढे न घेता, स्निग्धाने हसत हसत डबा घेतला. 


"रोज भेटता का ग तुम्ही?" अपूर्वाने विचारलं.


"नाही म्हणजे, अगदी रोज नाही. लेक्चर मिस असले की होते भेट. संकोचतच स्निग्धाने उत्तर दिलं. 


एक दिवस अपूर्वा घरी माहेरी गेली... या ना त्या कारणावरून अपूर्वाने स्निग्धाचा विषय काढला. 


नणंद भावजयीच नातं तसं.... तपत्या तव्यावरच पाणी. नणंदेचे गुणगान गाईल ती वहिनी कुठली?


'नणंद नावाचा प्राणी घरात नकोच. 

"आमच्या घरची महाराणी, नाव फक्त स्निग्धा बाकी कारस्थानी आहे कारस्थानी.. स्निग्धा अशी ती तशी. आमच्या घरची अवदसा वगैरे.. !" काहीबाही बोलायला अपूर्वाने सुरुवात केली. बहिणीच बोलणं ऐकून, राजनच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. 


"काय ग सासरच्या चुगल्या करायला, त्यांच्या विषयी कुरघोड्या करायला येतेस की काय इकडे?" तो तिच्यावर जोरात चिडला.


"सांगतेस तेवढी वाईट नाहीयेत तूझ्या सासरची माणसं. त्यातल्या त्यात स्निग्धा तर नाहीच नाही. स्निग्धाशी रोज भेटतो मी कॉलेजला. चांगली आहे ती. शांत आहे. समंजस आहे." राजन चिडून बोलला. 


"तुला कसं माहिती रे.. पाच दहा मिनिटाच्या भेटीत कुणी कसंय नाही ओळखता येत कळलं का? मी त्या घरात रात्रंदिवस राहते मला विचार एक नंबर ची लबाड, लफंटूस आहे ती."


"कारस्थानी आहेत मायलेकी...एक नंबरच्या. कुठे फसली मी माहिती नाही." अपूर्वा सासू आणि ननंदे विषयी काहीबाही बोलत होती. 


खरं तर आपली बहीण गर्विष्ठ आहे. आपल्या श्रीमंतीचा तिला प्रचंड माज आहे. राजनला माहिती होतं पण लग्न होऊन गेलेल्या सासरच्या माणसांचा ताई एव्हढा दुस्वास करेल, राजन ला पचनी पडत नव्हतं. 


काय होईल पुढे... मिळेल का या नात्याला संमती 



🎭 Series Post

View all