टर्निंग पॉइंट भाग ६

अनपेक्षित वळणावर कहाणी तिची
टर्निंग पॉईंट भाग ६


एक एक दिवस पुढे पुढे सरकत होता. आजकाल राजन आपल्यातच राहायचा. कॉलेजला कधीच सुट्ट्या न मारणारा राजन अनेकदा घरी लोळत पडलेला राहायचा. काही बाही कारण सांगून मित्रांना टाळायचा. काही तरी बिनसलंय एवढं मात्र नक्की होतं आणि ते स्निग्धा आणि त्याच्या मित्रमैत्रिणींना लक्षात यायला लागलं होतं. 


घरात ही तो कुणाशी जास्ती बोलत नव्हता. वसुधा ताईंना कारण माहिती होतं तो वेळेत जेवत नाही, मनमोकळेपणाने बोलत नाही, मनातल्या मनात कुढत राहतो. ह्याच त्यांना ही वाईट वाटत होतं. त्याच्या एकटेपणाची जाणीव त्यांना ही होती पण वेळ हेच त्यावरच औषध, त्या स्वतःला समजावत होत्या.


इंजिनियरिंगच तुझ हे शेवटचं वर्ष. एकदा कॉलेज बंद झालं की कळेल तुला प्रेम आणि आकर्षण ह्यातला फरक.

एक दिवस त्यांनी आपल्या वतीने राजन ला समजावून सांगितलं. पण प्रेम आणि आकर्षणातला फरक समजू शकणार नाही एव्हढा ही तो लहान राहिला नव्हता. 


आता त्यांच्या भेटी गाठी तेवढ्या होत नव्हत्या राजन मात्र तिला भेटण्यासाठी कासावीस व्हायचा. कॉलेज सुटायच्या वेळेवर, ती दुरून दिसेल लालसेपायी तो कॉलेज बाहेर जावून उभा राहायचा.


-----


"दर्शन दुर्लभ तुमचे... आज कुठून सूर्य उगवला?" राजनला बघून एका मित्राने त्याला टोमणा मारला. 


तो काहीच बोलला नाही त्याने फक्त इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्या. 


"आजकाल कॉलेजला येत नाहीस? वडिलांसाठी, एका प्रॉजेक्ट वर काम करतोय. म्हणून त्याने जुजबी उत्तर देवून वेळ मारून नेली. 


कॅम्पस सिलेक्शनसाठीची प्रोसिजर करायला आज तो मुद्दाम कॉलेजमध्ये आला होता. राजन च काहीतरी बिनसलंय, सगळ्यांनाच माहिती होतं. इतर मैत्रिणींच्या घोळक्यात बसलेल्या स्निग्धाकडे त्याने जराही बघितलं नाही. 


'चार दिवस झाले कॉलेज ला आला नाही साधी भेट ही नाही. पण याला काही पडलंय का? मी इथे मरतेय ह्याला एक नजर बघण्यासाठी आणि हा, तिला कससंच झालं होतं.'


राजन दिसता क्षणी मनात उमललेला आनंद क्षणात कोमेजला. मनातली अलवार उडणारी फुलपाखरं क्षणात शांत  झाली होती. राजन एक शब्द ही न बोलता निघून गेला. तिला राजनचा प्रचंड राग आला होता. 


"काय झालं ग ह्याला? 

हा असा काय वागतोय? 

काही बिनसलंय का तुमच्यात?

तूझ्या वहिनीचा भाऊ, तू विचार ना तुझ्या वहिनीला? 

राजनच हे असं वागणं मुळीच अपेक्षित नाहीये. 

स्निग्धासमोर, मैत्रिणींनी एकावर एक प्रश्नांचा भडिमार केला.


"मला काय माहिती, त्याला काय झालंय मी कसं सांगू." स्निग्धा मैत्रिणीवर, जोरात चिडली आणि गाडीला किक मारून निघून गेली.


'किती छान दिवस होते ते... 

वाऱ्यासंगे झुलायचे 

कोकीळ गुंजनात रमायचे

प्रेमात बहरायचे

आठवणीत जगायचे.....'

किती आनंद व्हायचा आपल्याला ह्यांच्यातली केमेस्ट्री बघून

ह्यांची खट्टी मोठी पण अबोल प्रेमकहाणी.. छान एन्जॉय करायचो आपण... मैत्रिणी आपापसात कुजबुजल्या.


कोणाची दृष्ट लागली आपल्या ग्रुपला काय माहिती? 

किती छान चाललं होतं सगळं..

आपल्याला तर वाटलं होतं.. ह्यांचं!! प्रेम वगैरे.... 

प्रपोज वगैरे.... नंतर

कोणी कोणाला दुखावलं तर नसेल... समिधा, साक्षी,  एकमेकांत कुजबुजल्या..


हो ना, खरं तर... दोघे एकमेकांचा सहवास छान एन्जॉय करत होते. आपली चिडवाचीडवी त्यांना आवडत होती. 

"क्या यही प्यार है!" तालासुरात म्हटलेल्या या एका ओळीने दोघांच्या, मनात प्रेमाचे गुब्बारे फुलायचे.. 

राजनला स्निग्धा आवडू लागली होती आणि स्निग्धा राजन कडे खेचली जात होती. त्यांच्या डोळ्यात दिसत होत यार सगळं.. साकेत पुटपुटला. 


"कुठे माशी शिंकली कुणास ठावूक".... सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली.


राजन आणि स्निग्धाच्या उमलू बघणाऱ्या या प्रेमाला छान बहर यावा. हे नातं श्रावण सरी सारखं स्वच्छंद होऊन बरसावं. धरणीच्या कुशीत हिरवं गार रान फुलावं तसं ह्यांचं प्रेम ही बहरावं, सगळ्यांनाच वाटतं होतं. 


स्निग्धा गाडी घेऊन निघाली.. रस्त्याने कुठे तरी एका कोपऱ्यात उभ राहून राजन आपल्याला बघत असावा, त्याने समोर येऊन आपल्याला अडवावं.... त्या एका दिवशी सारखं!"...  तो आपल्याला दिसावा, आशेने ती आपल्याच धुंदीत चालली होती.


किती छान दिवस होते ते...


आजकाल स्निग्धा रोजचं छान तयार होऊन कॉलेज गाठत होती. तिच्या टपोऱ्या डोळ्यात तेज आणि गालावर आनंदाची लाली. आजकाल ती जास्तीच खूश राहत होती. तिच्यातला बदल मात्र ती घरच्यांपासून लपवण्याच आटोकाट प्रयत्न करत होती. 


एक दिवस... कॉलेजला निघताना स्कूटी नेमकी पंचर झाली. "नको जावू कॉलेजमध्ये, आज सुट्टी घे" सीमाताईंनी सुचवलं. "सुट्टी काय सुट्टी?"  ती आईवर चिडली. 

आज सुट्टी पडणार म्हणून कासावीस झाली. कॉलेजला जायला मिळणार नाही, राजन दिसणार नाही. त्याची भेट नाही. हे सगळं आज ती मिस करणार. तिला जास्ती वाईट वाटतं होतं. 


'मनातलं दुःख तरी कोणाला सांगणार?' ती अस्वस्थ झाली. "महत्वाच लेक्चर आहे, मिस करू शकत नाही" असं सांगून ती ऑटोने कॉलेजला पोहचली. 


केवढा तो खटाटोप केला होता. जून्या आठवणींनी तिला गलबलून आलं.

कॉलेज मध्ये, गेल्या गेल्या समोर राजन दिसताच कॉलेजमध्ये येण्याचं सार्थक झाल्याचं फिलिंग तिला आलं होतं. किती हायस वाटलं होतं तेव्हा. त्या दिवशीच्या गोड आठवणीत ती फिरून आली. 


घरी परत जाताना,

"मी सोडून देतो तुला घरी" म्हणत त्याचा तो गोड हट्ट.


"नको, मी जाईल माझी माझी"  म्हटल्यावर त्याच्या चेहऱ्यावर झळकलेला तो राग. 


"असं कसं बसणार तूझ्या बाईकवर?  मित्र मंडळी काही बाही बोलतील. नको ते अर्थ लावतील." समजावून सांगून ही तो समजायला तयार होत नव्हता.


"मी स्पष्टच.. नाही म्हणून सांगितलं!"  आणि लगेच, मैत्रिणीच्या गाडीवर बसले.


'बापरे!! किती राग आला होता त्याला. भरधाव वेगाने गाडी उडवली होती त्याने'. 


'नंतर दोन दिवस अबोला'


'भेटून सुद्धा त्याने धरलेल्या अबोल्याने.. किती त्रास झाला होता मला.'


'त्याला ही तेवढाच त्रास होतोय, लक्षात आलं होत माझ्या.'


'हे प्रेम नाहीतर अजून काय?' उगाच का माझं मन असं, त्याच्या दिशेने झेलकावे घेतं. आठवणींची गर्दी तिच्या डोळ्यात तरळली.


एक दिवस, मित्र मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये गप्पा करत बसलेलो होतो.. नेमकी माझ्याजवळ थोडी जागा रिकामी बघून तो जवळ आला.


"सटक जरा तिकडे".. जोरात धक्का देत, माझ्याजवळ अगदी चिटकून बसला. 


'अनपेक्षित होत हे सगळं माझ्यासाठी.'


त्यांचं अनपेक्षित वागणं, त्याचा अलवार स्पर्श.. सुखावून गेला होता मला. नकळत गप्पांमध्ये त्याने माझ्या, खांद्यावर हात ठेवला, अंग शहरालं होतं माझं त्याच्या स्पर्शाने. 


'मित्राला जागा देण्यासाठी म्हणून तो पुन्हा मला खेटून बसला. मनात चलबिचल सुरू झाली. त्याचा स्पर्श एखाद्या मोरपीसासारखा अलवार वाटला. अगदी हवाहवासा! काय नव्हतं त्या स्पर्शात? प्रेमाचा अंकुरच तर हळूहळू बहरायला लागला होता, मनात माझ्या आणि कदाचित त्याच्या ही. त्याशिवाय का तो असा हक्क बजावल्यासारखा वागायचा.' आठवणींनी ती मोहरली.


बाईकच्या मागच्या सिटवर त्याला खेटून बसावं. वर्षासरी बरसू लागाव्या आणि आम्ही मनसोक्त भिजावं... मन उधाणलेल्या लाटेसारखं आजकाल राजनच्या दिशेने हेलकावे घेत होतं.


'सगळच हवहवंस.... मग असं अचानक काय झालं?' विचार करून ती अस्वस्थ झाली. घरी आल्यावर शांतच होती. 


काय ग काय बिनसलंय? जेवली नाहीस आज सीमाताईंनी विचारलं.


"भूक नाहीये" उद्या टेस्ट आहे." म्हणत पुस्तक घेऊन स्निग्धा रूममध्ये गेली.


"काय झालं तुला?" 


"असा का वागतोय तू?"

"कॉलेज मध्ये रेगुलर येत नाहीस?" 

"बोलत ही नाहीस व्यवस्थित?"

"कसला राग आलाय एव्हढा?"

"त्रास होतोय मला?"

"काय झालं?" 

"नक्की सांगशील तरी?"

"आपल्यात काहीतरी आहे यावरून सगळे चर्चा करतात"

"सगळे मला विचारतात, त्यांना काय सांगू?"

'आज सोक्षमोक्ष लावायचाच काय सुरू आहे त्याच्या मनात' जाणून घेण्यासाठी, न राहवून स्निग्धाने राजनच्या मोबाईलवर खूप सारे मेसेज टाकले. 


"तुला का त्रास होतोय?"


"तुझा काय सबंध?"


"असाच आहे मी?" 

त्याने मेसेजला जुजबी उत्तर दिलं. 


"मुझे निंद ना आये...

मुझे चैन ना आये...

कोई जाये जरा धुंड के लाये

न जाने कहा दिल खो गया......"

आजकाल असच व्हायला लागलं होतं.. डोळ्यात झोप येतं येईना, चैन पडेना.. फिरत्या पंख्याकडे बघत रात्र जगायची.  मनात उमलू बघणारं पण अव्यक्त प्रेम आणि गोंधळलेलं मन हा दुरावा.... सगळं च असहनिय होत चाललं होतं.


आजकाल ती ही अस्वस्थ राहायला लागली होती. राजनची भेट होईल म्हणून ती आशेने कॉलेजमध्ये यायची पण तिचा हिरमोड व्हायचा.

काय होईल पुढे.. होतील का राजन आणि स्निग्धा एक!



🎭 Series Post

View all