टर्निंग पॉइंट भाग ८

अनपेक्षित वळणावर कहाणी टीची
टर्निंग पॉइंट भाग ८
मला नोकरी लागली म्हणून राजन ने घरी ही सांगितलं.

"दुसऱ्या कंपनीत नोकरी, काही गरज आहे का? एवढा घरचा बिझनेस आहे. तो कोण सांभाळेल. आजवर बाबांनी खूप मेहनतीने उभा केलेला बिझनेस. बघतोयस ना किती मेहनत करतात ते. पायाला भिंगरी लावून फिरत असतात. कामापायी घरात पाय टिकत नाही त्यांचा. इंजिनीयर झाला तेवढं शिक्षण पुरेसं आहे आता गपचूप आपल्या व्यवसायात लक्ष घालायचं." वसुधाताईंनी दटावलं.

"दुसऱ्यांच्या कंपनीत खर्डेघाशी करण्यापेक्षा नवीन प्रोजेक्टकडे लक्ष दे, तो प्रोजेक्ट तू सांभाळायचा?" राजनच्या बाबांनी पण समजावलं. 

"मला काही अधिकार आहेत का नाही. माझ्या मताला या घरात काही किंमत नाहीच आहे का? माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय तुम्हीच घ्या?" राजन चिडून आत निघून गेला. 

राजनच वागणं अनपेक्षित होतं. 

"सगळे निर्णय म्हणजे?" काय बोलला हा? काय म्हणायचं आहे ह्याला?" राजनच्या वडिलांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं.

राजन कुणाचं ऐकायला तयार होईना. 


राजन बाहेर जाणार, वसुधाताईंच्या डोळ्यात गंगा जमुना वाहायला लागल्या. लेकरू मनाने दुरावलं होतंच आता शरीराने सुद्धा दूर जाणार त्यांना खूप वाईट वाटत होतं. मनाने तो दुखावला गेलाय वसुधाताईंना कळत होतं. पण त्या ही अपूर्वासमोर काहीच करू शकत नव्हत्या.


"आता काय, साहेबांना कंपनीत जॉब लागलाय. तो कसला येतो आता कॉलेजमध्ये."

चार दिवस झाले राजन कॉलेजमध्ये आलाच नव्हता. मित्र आपापसात कुजबुजत तेव्हा, आता राजन आपल्यापासून दूर निघून जाईल? ह्याची स्निग्धा ला भीतीच वाटली. विचारानेच ती अस्वस्थ झाली होती. 


"प्रेमात लोक पागल होतात, ऐकलं होतं अलिप्त होतात, गर्विष्ठ होतात, हेकेखोर आणि प्रचंड मतलबी होतात." आजकाल मित्र राजनबद्दल त्याच्या पाठीमागे ही बोलत.

"कॉलेज संपेन, सगळ्यांच्या वाटा वेगळ्या होतील. पुढे भेटू न भेटू..... कॉलेजच्या शेवटच्या वर्षाचे काहीच दिवस बाकी उरले होते. एका गाली आसू तर एका गाली हसू होतं...


या आठवड्यात अनेक मित्र मैत्रिणी बरोबरच राजन कंपनीत जॉईन होणार होता. सगळ्यांच गेट टुगेदर ठरलं. ज्युनियर मित्र मंडळींनी या सगळ्यांना सेंड ऑफ पार्टी देण्याचं ठरवलं होतं.

"अरे भाई...चार साल की दोस्ती के लिये ही सही. तुम्हे आना पडेगा! आज शाम को मिलते हैं ना!"  मित्रांनी राजनला येण्यासाठी आग्रह केला.

अबोली पिंक रंगाचा नाजूक नक्षी असलेला, सुंदर कुर्ता त्यावर डार्क पिंक रंगाचा चुडीदार. ड्रेसवर मॅचींग कानात राणी कलरचे स्टट्स. ओठांवर हलकंस पिंक रंगाचं लिपस्टिक. साध्याशा तयारीत ही स्निग्धा खूप सुंदर दिसत होती. 


"वाव!! यार काय दिसतेयस आज स्निग्धा.. गजब!!" तिच्या साधेपणात ही...  कमाल च आहे नाही का ती"

"आज तिला बघून, राजन ची नक्कीच विकेट जाणार, खल्लास होणार आज तो. एवढ्या दिवसाचा अबोला  सुटणार"

आपल्याला माहितीय. दोघे ही एकमेकांना आवडतात, सांगायला तेवढे घाबरतात. जणू काही, या दोघांना एकत्र आणण्यासाठी सगळे आटोकाट प्रयत्न करत होते.

नेहमीच्या टर्निंग पॉइंट हॉटेल च्या हॉल मध्ये सगळ्यांनी भेटायचं ठरवलं होतं. राजन मित्रांसोबत वेळेत पोहचला होता. त्याचे डोळे स्निग्धाचा शोध घेत होते.

राजन आल्याचं दिसताच, "प्यार किया तो डरना क्या".... गुणगुणत, कोपऱ्यात खुर्चीवर बसलेल्या, स्निग्धाच्या दिशेने अमेय ने नजर फिरवली.

स्निग्धाच्या ओठांवर झळकलेलं स्निग्ध हसू राजन ने क्षणात वेचलं.  आता या क्षणी, गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करावं. "माझं  तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे" म्हणून सांगून टाकावंz त्याला ही वाटलं. तर दुसऱ्या क्षणी आईने दिलेली शपथ आठवली.  सून म्हणून या घरात, इतर कोणी ही चालेल, अगदी कुणी ही.. पण ती नाही, डोक्यावर हात ठेवून घेतलेली आईची शपथ. त्याला स्वतः चाच राग येत होता.  मनातलं प्रेम प्रगट करण्यासाठी, आई आणि ताईच्या मायेच्या बेड्यासमोर तो असमर्थ होता.


एकीकडे आईने दिलेली शपथ होती तर दुसरीकडे मनाच्या हळव्या कोपऱ्यात दडवून ठेवलेलं आणि ओठांवर कधीच न आलेलं त्याच पहिलं प्रेम होतं.


सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या. डोळ्यात भविष्याचा वेध घेणारी स्वप्न होती. पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने सगळेच एकमेकांना शुभेच्छा देत होते. 

डिजे वर गाणं सुरू झालं. गाण्याच्या तालावर सगळे च थिरकायला लागले. एक एक करत, सगळेच डान्स फ्लोअरवर पोहचले. "कम ऑन यार, गेट ऑन द डान्स फ्लोअर."  राजन आणि स्निग्धाचा हात, डान्स फ्लोअर वर येण्यासाठी आग्रह केला. राजनने नाही म्हणून सांगितलं.

"स्निग्धा तू चल!"  करण डान्स करण्यासाठी फोर्स करायला लागला. राजन करणवर जोरात चिडला.

"नाही म्हणतेय ना ती, उगाच कशाला तिला आग्रह करतोस. तुला नाचायचं तर नाच, उगाच दुसऱ्याला जबरदस्ती कशाला?"


"रंग मे भंग नको उगाच. एन्जॉय करायला आणि एकमेकांना भेटायला आलात तर भेटा एन्जॉय करा." त्याने सगळ्यांना निक्षून सांगितलं.. 


"हा भाई हा! काहे को तू इतना चिढता हैं!" अमेयने राजनला शांत केलं आणि तो करणला सोबत घेऊन गेला. 


"ये, राजन स्निग्धा को, खुद की प्रॉपर्टी समझता हैं सा.... ला....!! करण जाता बडबडला. तू शांत रह ना भाई, वो रिलेटिव्हं हैं! कुच्छ भी करे हमको क्या!" अमेय ने त्याला शांत राहायला सांगितलं. 


सगळे छान एन्जॉय करत होते. राजन आणि स्निग्धा,  आवाजापासून जरा दूर बसले. हा एकांत हवाहवासा वाटत असला तरी, या एकांताची भीती राजनला वाटत होती. डोळ्यांच्या चोरट्या नजरेतून, स्निग्धाचं सौंदर्य साठवून... मनाच्या कुपीत जपून ठेवावं, पुन्हा पुन्हा आठवण्यासाठी त्याला वाटलं..


"जाणार आहेस." स्निग्धाने विचारलं.

"हो... अर्थात!" त्याने जुजबी उत्तर दिलं.

"आठवेन का रे काही?" स्निग्धाने विचारलं.

"आठवण्यासारखं काही घडलंय का?" तो मिश्कीलपणे हसला. 

त्याच्या उत्तराने तिच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं. 

रोजसारखी आता भेट नाही.  अधूनमधून दिसायचास तरी आता, नजरभर बघता ही येणार नाही. तिच्या मनात विचार डोकावला.

बेचैनी पायी त्याचे दोन्ही पाय तो सतत हलवत होता. काहीसा अस्वस्थ ही.. जणू काही हरवलेले ते क्षण भविष्यात साठवण्यासाठी वेचून घेऊ पाहत होता.

"असं काय झालं? की तू एव्हढा बदलला." स्निग्धाने विचारलं.


"म्हणजे?" राजन ने आश्चर्यचकित भाव चेहऱ्यावर आणत प्रतिप्रश्न केला. 


"काही नाही?" तिने हलकेच नकारार्थी मान हलवली. डोळ्यातली सारी स्वप्न अश्रुंसोबत गालावरून ओघळताना त्याला दिसली.

"काय झालं? रडतेस काय अशी?"

"हे क्षण येणार च होते नाही का?"

"त्यात काय एवढं आसवं गळण्यासारखं. कधी ना कधी, कॉलेज चा शेवटचा दिवस येणारंच होता. पुढच्या वर्षी तू माझ्या जागी असशील. तूला ही एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल. तू ही निघून जाशील."


"एव्हढ च काय तर, तुमच्या मुलींची लग्न पण लवकर होतात.. एक दोन वर्षात, घोड्यावर बसून तुझा राजकुमार येईल आणि तुला दूर घेऊन जाईल... मगं सगळंच, काळाच्या पडद्याआड जाणार. विसरून जाशील तू ही. हे मित्र, तो कट्टा, त्या तासनतास रंगलेल्या गप्पा, हे सगळं आठवायला तुझ्याजवळ वेळ नसेन मग."

"प्रत्येकाचा हरेक एक दिवस आव्हानांनी भरलेला असेल. मग ती आव्हान पेलताना का स्वतःला गुंतवून ठरवायच. असं गुंतवून ठेवलं स्वतःला तर आव्हान कशी पेलायची, सांग."

"करूया ना मोकळं स्वतःला." राजन बोलत होता. 

"एवढं सोप्प आहे का ते." स्निग्धा इमोशनल झाली होती.

"हो पाहिजे तर सोप्प आणि पाहिजे तर कठीण ही." राजन
बोलता बोलता थांबला.


"झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे... जीवनगाणे!"
ह्यालाच जीवन ऐसे नाव...

पुढे बघायचं असेल तर मागे वळून बघण्यात काय अर्थ? राघव प्रॅक्टिकल होऊन बोलत होता. स्निग्धा त्याच्याकडे एकटक बघत होती. 

"झाल्या का गप्पा... गप्पा झाल्या असतील तर या इकडे छान एन्जॉय करतोय आम्ही" साकेत दोघांना बोलवायला आला होता.

राजन ने हातानेच.. नाही म्हणून सांगितलं..


"बसा बसा.. तुमच्या भावी आयूष्याची स्वप्न रंगवत" आमची काहीचं हरकत नाहीये..." मित्रांच्या घोळक्यातून कोण्या एकाचा आवाज आला. 

स्निग्धाच्या अंगावर, पुन्हा एकदा रोमांच उभे राहिले..... 


राजनने मित्राचं बोलणं, ऐकून न ऐकल्यासारख केलं होतं.  काहीच रीॲक्ट केलं नव्हतं..



🎭 Series Post

View all